नसे गर्भारपण, तरि फुटला पान्हा...
मंजिरी फडणीस (manjiri.phadnis@esakal.com)
Tuesday, June 14, 2011 AT 04:52 PM (IST)
Source - esakal
Url - http://www.esakal.com/esakal/20110614/5083983653632248186.htm
दत्तक घ्यायचं ठरलं, पण त्या बाळाचं आईपण सर्वार्थाने निभावून नेण्यासाठी आपलं दूधही त्या बाळाला मिळायला हवं, ही एका आईची अपेक्षा पूर्ण केली आणि प्रसूतीविना पान्हा फुटण्याची अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली नाशिकच्या डॉ. श्यामा कुलकर्णी यांनी... त्यांच्या या आणि इतर विविध समाजोपयोगी कार्यांबद्दल ...
संध्याकाळची वेळ...गोठ्यात हंबरणारी गाय...गाईचा मालक बांधलेल्या वासराला सोडतो आणि वासरू सुसाट आईकडे धाव घेतं. तिच्या आचळाला बिलगतं. तिला लुचू लागतं...वासरू ढुसण्या देत असतं तरीही गाय त्याला चाटत राहते... प्राणी असो नाही तर माणूस, आईच्या दुधातून आपल्या शरीरात झिरपत जाणारं सर्वव्यापी ममत्व सारखंच असतं. मुलाला दूध पाजणं यात त्या माउलीला जन्माच्या सार्थकतेचाच आनंद वाटतो. आई म्हणून आपण दूध पाजू शकलो नाही तर आईपणात कमतरता राहिल्याची बोच सलत राहते.
नाशिकमधल्या एका बाईंना अशीच आईपणातल्या कमतरतेची बोच जाणवत होती. त्यांना मूल दत्तक घ्यायचं होतं. आपण त्या मुलाला आणलं की ते स्वत:च्या आईचं दूध पिऊ शकणार नाही. शिवाय मला दूध नाही म्हणजे ते तान्हुलं आईच्या दुधाला मुकेल, या विचारानं तर त्यांना रडूच यायला लागलं. त्या बाईंनी डॉक्टरांना आपल्या मनातली ही बोच सांगितली. प्रयत्न सुरू झाले...
बाळ जन्माला आलं आणि या आईच्या मांडीवर आलं...या दत्तक मुलाला त्यांनी छातीशी धरलं आणि "नसे गर्भारपण, तरि फुटला पान्हा ...'चा चमत्कार झाला.
त्यातल्या आईपणाच्या भावनेला वैज्ञानिक आधार दिला. मूल जन्माला न घालता "हे आईपण" दिलं नाशिकच्या डॉ. श्यामा कुलकर्णी यांनी. ""अनेकदा मूल जन्माला घातल्यानंतरही आईला पान्हा फुटत नाही, कधी दूध कमी असतं. आई स्वत:त काही कमतरता असल्याचं मानून खचून जाते आणि साहजिकच मुलाच्या वाढीवरही सुरुवातीपासूनच परिणाम व्हायला लागतो. हे सगळं टाळता येतं.'' डॉ. श्यामा आत्मविश्वासानं सांगतात. बालरोगतज्ज्ञ असूनही डॉ. श्यामा यांचा विशेष अभ्यास आहे तो स्तनपानाबद्दल. ब्रेस्ट फीडिंग कौन्सेलिंगच्या राष्ट्रीय पातळीवरच्या प्रशिक्षक म्हणून त्या काम करतात.
डॉ. श्यामा यांच्याशी बोलत असतानाच एक "आई" तिथे आली. तिला पुरेसं दूध येत नव्हतं. डॉ. श्यामा म्हणाल्या, ""अशा अनेकजणींच्या समस्या असतात. कधी प्रसूतीनंतर दूधच येत नाही, कधी ते पुरेसं नसतं. कधी स्तनाग्राला चिरा पडतात, त्यामुळे बाळाला दूध पाजता येत नाही. आजकाल तर अनेकजणी सुरुवातीलाच बाटलीच्या दुधाची सवय मुलाला लावतात. यात कधी फॅशनचा भाग असतो, आपला फिटनेस बिघडेल अशी गैरसमजूत असते. काही दिवसांनी त्यांना आपली चूक कळते तेव्हा पान्हा आटलेला असतो. अशा अनेकींवर मी उपचार केले आहेत.''
मागच्याच वर्षी आलेली ती केस म्हणजे डॉ. श्यामा यांच्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. अजूनही तो अनुभव तसाच त्यांच्या डोळ्यासमोर येतो. ""एक बाई आली ती अतिशय अस्वस्थतेतच. तिला काय समस्या आहे हे सांगतानाही रडू येत होतं. तिला आधीच्या दोन मुली आहेत. तिच्या जावेलाही दोन मुली. आता जाऊ पुन्हा गरोदर होती. तिला जुळं होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्यातलं एक मूल हिनं दत्तक घ्यायचं होतं. त्या मुलाला आई म्हणून आपण जवळ करू शकू का, याचा ताण तिच्यावर होता. त्यांनी तिला धीर दिला. आईपासून आपण मूल तोडतो आहोत, असं वाटून घेऊ नकोस, हे तिला समजावलं. डॉ. श्यामा यांनी तिला सर्वांत मोठा धीर दिला तो तू या मुलाला पाजू शकशील याचा. त्या दृष्टीनं उपचार सुरू झाले.
डॉ. श्यामा म्हणाल्या, ""तिला सुरुवातीला समुपदेशन केलं. तिच्या संपूर्ण परिवारालाही समुपदेशन केलं. त्यानंतर तिला मसाजाच्या पद्धती शिकवल्या. मेडिटेशन सुरू केलं. याबरोबरीने तिला काही आयुर्वेदिक औषधं दिली. हॉर्मोन्स देणं मी सुरुवातीपासून टाळलं, कारण त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. महिने उलटले तसे हिच्यात बदल जाणवू लागले. हिचंही वजन काही प्रमाणात वाढलं. जाऊ प्रसूत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बाळाला हिच्याजवळ दिलं.''
""कोणत्याही आईने मूल जन्माला आल्यानंतर त्याला स्पर्श करणं, छातीशी धरणं गरजेचं असतं,'' डॉ. श्यामा मुद्दाम विषयांतर करत सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, ""या काळात आई आणि मुलात इमोशनल बॉंडिंग तयार होत असतं. म्हणून आईने त्याला अधिकाधिक स्पर्श करावा. तसंच बाळाच्या स्पर्शानंही मातृत्वाची भावना अधिक उद्दीपित होते आणि दूध यायला मदत होते. ही थेरपी त्या स्त्रीच्या बाबतही सुरू ठेवली. मग तिला पाजायला घ्यायला सांगितलं. पाच दिवसांनी त्या मातेला पान्हा फुटल्याचं लक्षात आलं. त्या दिवशी अगदी सकाळीच मला तिचा फोन आला, डॉक्टर मला दूध येतंय. तिचा आनंद ओसंडत होता. आम्ही ते दूध औरंगाबादला फार्मसी कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठवलं. त्या बाळाच्या जन्मदात्रीचं दूधही पाठवलं. दोन्ही दुधांतले घटक बहुतांशी सारखेच होते. आता ते बाळ 9 महिन्यांचं झालं आहे. त्याची वाढ व्यवस्थित आहे.'' हे सांगताना त्या आईचाच आनंद डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही जाणवला.
डॉक्टर या केसबद्दल सांगतानाच एक पालक डॉक्टरांची वेळ घेण्यासाठी आले. "बालरोगतज्ज्ञ, स्तनपानाचा अभ्यास आणि वयात येणाऱ्या मुलांसाठी उपचार" अशा विविध विषयांवर त्या मार्गदर्शन करतात. त्यांना मुलासाठी डॉक्टरांची वेळ घ्यायची होती.
या पालकत्व मार्गदर्शनाचेही त्यांच्याकडे खूप अनुभव आहेत. त्यांनी एक केस सांगितली. ""एक आई-वडील आठ-नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. तो मुलगा घरात चोऱ्या करत होता. त्यानंतर तो मुलगा फारसा बोलतही नव्हता. मी हळुवार पणे त्या मुलाशी बोलले. एक-दोन भेटींतून त्याचा माझ्यावर विश्वास वाढला. तो म्हणाला, ""आई आजारी असते. वडील त्यांच्या कामात असतात. मग घरातली अनेक कामं मला करावी लागतात. तीच कामं नोकरांनी केली असती तर त्यांना पैसे दिले असतेच ना, म्हणून मी घेतो ते पैसे.'' त्या पैशांचं काय करतोस, असं विचारल्यावर तो लगेच काही बोलला नाही. पुढच्या वेळी येताना त्याने एक छोटं खोकं आणलं होतं. त्यात नोटा बोळे करून टाकलेल्या होत्या. तो मुलगा त्या नोटांचं करत काहीच नव्हता...
दुसरा एक मुलगा खूपच गप्प झाला होता. कोणाशीच न बोलता तो सतत झोपून राहायचा. त्याच्याशी बोलल्यानंतर समजलं की त्याचा आवाज फुटला होता. एक-दोनदा बाहेरून आलेले फोन त्याने घेतले आणि फोनवरची व्यक्ती त्याची आई समजून त्याच्याशी बोलू लागली. परिणामी, आपला आवाज बायकी झाला आहे अशी भावना मुलाच्या मनात आली आणि तो बोलायचाच बंद झाला...''
असे किती तरी प्रश्न. कधी मुलांमध्ये व्यसनाधीनतेचा प्रश्न असतो, कधी अति जंक फूडमुळे होणाऱ्या परिणामांचा प्रश्न असतो. कधी वयात येणारी मुलं मोबाइल ऍडिक्ट होतात. अशा अनेक समस्या डॉ. श्यामा यांच्यापर्यंत येतात आणि त्या त्या सोडवतात. चुकीच्या पालकत्वामुळेच असे प्रश्न निर्माण होतात, असं त्या ठामपणे सांगतात. या संदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळाही त्या घेतात.
डॉ. श्यामा यांच्या क्लिनिकमध्ये एक वर्कशॉप सुरू होतं. मुलं जमली होती. तिथे वेगवेगळ्या वस्तू आणल्या होत्या. त्या म्हणाल्या, ""प्रत्येक गुरुवारी मी इथे पालकत्वाबाबतचे वर्गही घेते. तसेच मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठीही आमच्याकडे काही प्रयोग होतात. आता मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू जमा करायला सांगितल्या. कोणाच्या अधिकाधिक वस्तू होतात अशी स्पर्धाच ठेवली. कोणी खोडरबर गोळा केलं, कोणी पुस्तक. यात वस्तू कोणती यापेक्षा त्यांनी आपल्या छंदाला वेळ देणं महत्त्वाच असतं. विविध प्रयोगांतून मुलांचा भावनिक बुद्ध्यंकही आम्ही तपासत असतो.''
डॉ. श्यामा यांच्या हॉस्पिटलमध्ये हस्ताक्षर सुधारणा वर्गही आहेत. ""हे वर्ग थोड्या वेगळ्या मुलांसाठी आहेत.''त्या पटकन म्हणाल्या, ""डिस्लेक्सिया थेरपिस्ट म्हणून मी काम करते.'' म्हणजे "तारे जमीं पे'मध्ये मुलगा आहे ना तसंच...त्यांनी अधिक स्पष्टता आणली. मूल जन्माला आल्यानंतर त्याला गरज असते आईच्या दुधाची. त्याला इतर काही समस्या असतील तर गरज आहे उपचारांची आणि वयात येताना त्याला गरज आहे मार्गदर्शन आणि भावनिक आधाराची...या सगळ्या गरजा पूर्ण होतात डॉ. श्यामा यांच्या "जगदीशा चाइल्ड गायडन्स क्लिनिक ऍण्ड रिसर्च सेंटर'मध्ये.
थोडक्यात, हे आहे एक परिपूर्ण व्यक्ती घडवणारं केंद्र, ऑल इन वन!
Tuesday, June 14, 2011
Subscribe to:
Posts (Atom)