संगीता वझे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
अलीकडे लोकांची जीवनशैली अशी होतेय की, पुरेसा सूर्यप्रकाश शरीराला मिळतच नाही. खूप लवकर ऑफिसला जाऊन खूप उशिरा घरी परतणाऱ्या आणि दिवसभर ए.सी.त राहणाऱ्यांना मग अशक्तपणा, निरुत्साह वाटू लागतो. यातून बाहेर पडण्यासाठी हवं ‘व्हिटॅमिन डी’ जे शरीरातील कॅल्शियम शोषून घेते. कॅल्शियमचा कमी झालं तर हाडांची घनता (बळकटपणा) कमी होते, हाडे ठिसूळ होतात आणि मोडू लागतात आणि मग ऑस्टिओपोरॅसिस अर्थात हाडांची घनता कमी होण्याच्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागतं. जागतिक ऑस्टिओपोरॅसिस दिन नुकताच झाला त्यानिमित्ताने..
म ध्यंतरी कोलावरी ‘डी’ या गाण्यानं सर्वानाच वेड लावलं होतं. हे गाणं सुरू झालं की, मनात सहजच ताल धरला जायचा किंवा जातोही आणि आपलं शरीरही मग गाण्याच्या ठेक्यावर डोलू लागतं आणि गाणं संपल्यावर शरीराला व मनाला खूप उत्साही वाटतं. असा शरीर आणि मनाचा उत्साह कायम टिकवायचा असेल तर कोलावरी ‘डी’च्या संगीताप्रमाणे शरीराला कायम ‘व्हिटॅमिन डी’ची आवश्यकता असते. दिवसातून एकदा काही मिनिटं जरी एखादं आवडतं गाणं कानावर पडलं तरी दिवस कसा खूप छान जातो तसंच हे ‘व्हिटॅमिन डी’ (जीवनसत्त्व) नियमितपणे अल्प मात्रेत शरीराला मिळालं की शरीर तंदुरुस्त राहते, पण हेच अल्प प्रमाणात लागणारं व्हिटॅमिन डी शरीराला मिळालं नाही तर मात्र थोडं काम करूनही थकवा येणं, निरुत्साही वाटणं, चिडचिडेपणा वाढणं, केस गळणं, नकारात्मक विचार सातत्यानं येणं, डिप्रेशन आल्यासारखं वाटणं इ. गोष्टी दिसून येतात.
या लक्षणांवरून तुम्हाला वाटेल इतक्या प्रकारचं मानसिक आरोग्य बिघडवणारं तसंच शारीरिक कमजोरी निर्माण करणाऱ्या ‘व्हिटॅमिन डी’चं नेमकं कार्य काय आणि ते किती प्रमाणात शरीराला लागते?
आपण जाणतोच आपलं शरीर हे हाडा-मांसाचं बनलेलं असतं. या हाडांचं आरोग्य चांगलं असेल म्हणजेच ती बळकट असतील तरच प्रकृती चांगली राहते आणि हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. हे कॅल्शियम आपल्या शरीराला आपण खातो त्या अन्नपदार्थातूनच मिळते आणि आहारातले कॅल्शियम शोषून घेण्यासाठीच ‘व्हिटॅमिन डी’ या घटकाची आवश्यकता असते. थोडक्यात, तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थाचा कितीही आहार घेतलात किंवा नुसत्याच कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्यात आणि ‘व्हिटॅमिन डी’ हा घटक तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात तयार होत नसेल तर त्या कॅल्शियमचा शरीराला योग्य तो उपयोग होत नाही. योग्य प्रमाणात कॅल्शियम शरीराला मिळाले नाही की शरीरात असलेल्या कॅल्शियमच्या राखीव साठय़ातून कॅल्शियम काढून घेऊन शरीर आपली गरज भागवते. असं काही काळ चालू राहिलं की शरीरातील कॅल्शियमचा साठा कमी होऊ लागतो. त्या हाडांची घनता (बळकटपणा) कमी होते, हाडे ठिसूळ होतात आणि मोडू लागतात आणि मग ऑस्टिओपोरॅसिस अर्थात हाडांची घनता कमी होण्याच्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागतं. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कॅल्शियमची गरज जास्त प्रमाणात लागते, कारण स्त्रियांना गरोदरपण, स्तनपान चालू असताना कॅल्शियमची गरज प्रचंड प्रमाणात लागते. अनेकदा आपण म्हणतो, आमचा आहार चांगला आहे तरीही कॅल्शियमची कमतरता का? तर त्याचं कारण ‘व्हिटॅमिन डी’ डी योग्य प्रमाणात शरीरात तयार होत नाही. आपल्या शरीराला दर दिवशी सुमारे १००० ते १५०० मि. ग्रॅम कॅल्शियम व १००० युनिट ‘व्हिटॅमिन डी’ची गरज असते, पण एवढी गरज असतानाही आपल्या भारतीय लोकसंख्येत ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असलेल्या लोकांची मोठी फौजच आहे, अशी धक्कादायक माहिती एका अभ्यासातून मिळालीय. एका अभ्यासानुसार भारतीय लोकसंख्येचा विचार करता उन्हाळ्याच्या मोसमात ८२ टक्के लोकांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दिसून आली, तर हेच प्रमाण थंडीच्या मोसमात ९२ टक्के इतकं प्रचंड होतं. ही स्थिती फक्त भारतातच नाही तर सर्व जगात दिसून येते. या अंदाजावरून आपण वेळीच काळजी घेतली नाही तर ‘व्हिटॅमिन डी’ कमतरतेची साथच काही वर्षांत येईल.
इतर आजारांप्रमाणे याची लक्षणं चटकन सर्वसामान्य माणसाला समजत नाहीत म्हणून तो डॉक्टरांकडे जात नाही, पण शारीरिक, मानसिक अस्वस्थपणा रोजच्या कामात अडथळा निर्माण करू लागला की मग डॉक्टरी सल्ला घेतला जातो. अनेकदा शारीरिक लक्षणांवरून औषधोपचार दिले जातात. रुग्णाला बरेही वाटते, पण पूर्वीसारखा उत्साह नाही, एनर्जी नाही हे जाणवतेच. ‘‘यासाठी रुग्णाची योग्य आरोग्य तपासणी, व्यवसायाचे स्वरूप, मानसिक अस्वास्थ्याचे कारण, त्याचं वय, व्यायाम-आहार सवयी, कामाच्या वेळा याचा योग्य अभ्यास करून, योग्य चाचण्या करून मगच आजाराचं निदान केलं तरच योग्य उपचार करता येतात,’’ अशी माहिती आरोग्य सल्लागार, एम.डी. डॉ. पुष्कर शिकारखाने यांनी सांगितलं.
‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता नुसता रुग्ण बघून लगेच सांगता येत नाही. त्यासाठी रक्त तपासणी करावी लागते. यासंबंधी एका रुग्णाचे उदाहरण देताना डॉ. शिकारखाने म्हणाले, खासगी कंपनीत काम करणारा मध्यमवयीन तरुण नुकताच माझ्याकडे येऊन गेला. कामात एकाग्रता न होणं, भीती वाटणं, सतत नकारात्मक विचार येणं, अंगदुखी, अस्वस्थता अशा तक्रारी घेऊन तो आला होता. कामासंबंधी विचारताना तो म्हणाला, सकाळी ८ ते रात्री ८ अशा त्याच्या कामाच्या वेळा आहेत. त्यांच्या वैद्यकीय तपासणीत काही वेगळं आढळलं नाही. त्याची लक्षणं मानसिक आजाराकडे जास्त झुकणारी होती, पण त्याच्याकडून आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घेतल्या आणि त्यात त्या रुग्णाला तीव्र स्वरूपाची ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता होती असं निदान आलं. त्याला ‘व्हिटॅमिन डी’चा उपचार दिल्यावर दोन महिन्यांत त्याची वरील लक्षणं निघून गेली. या रुग्णाची शहरी जीवनशैली आणि सूर्यप्रकाशच शरीरावर न घेण्याच्या सवयीने या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. याबरोबरच ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेसाठी देशाच्या भौगोलिक सीमा, पावसाळा- थंडीचा ऋतू, काळ्या रंगाची त्वचा, संपूर्ण त्वचा झाकून टाकणारे कपडे घालणं, नियमित सन स्किन लोशनचा उपयोग करणं, वाढतं वय, अयोग्य आहार, लठ्ठपणा, लीव्हर व मूत्रपिंडाचे आजार इ. गोष्टी कारणीभूत होतात. म्हणूनच आपली नियमीत वैद्यकीत तपासणी होणं गरजेचं आहे. ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता रक्त तपासणीतून कळते.
‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण योग्य असेल तर कोणत्या आजारांपासून संरक्षण मिळते? त्याविषयी सांगताना डॉ. शिकारखाने म्हणाले, ‘‘यामुळे कॅल्शियमची व फॉस्फरसची चयापचय क्रिया चांगली होते. मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, स्ट्रोक, स्नायूंचा अशक्तपणा, केस गळणं, कर्करोग आदी आजार टाळण्यास मदत होते.’’
अशा महत्त्वाच्या आजारांना दूर ठेवायचं असेल तर शरीरामध्ये ‘व्हिटॅमिन डी’चं प्रमाण वाढवायचं कसं? यावर डॉ. शिकारखाने म्हणाले, ‘‘दिवसातून फक्त एकदा १०-१५ मिनिटं सूर्याची किरणं संपूर्ण शरीरावर घेतली की या सूर्यकिरणांमुळे त्वचेखाली ‘व्हिटॅमिन डी’ तयार होते.’’ आपली त्वचा जेवढी जास्त कपडय़ांनी झाकली गेली असेल तेवढे ‘व्हिटॅमिन डी’ कमी तयार होते. आपल्याला दिवसाला सुमारे १००० युनिट ‘व्हिटॅमिन डी’ची आवश्यकता असते, तर १०-१५ मिनिटांचा सूर्यप्रकाश संपूर्ण त्वचेवर घेतला तर १०,००० युनिट ‘व्हिटॅमिन डी’ तयार होते. हे ऊन शक्यतो सकाळी ७ ते ११ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत घ्यावं, असं सुचविलं जातं. याशिवाय गरजेप्रमाणे गोळ्या, इंजेक्शन, पूड या माध्यमांतून दिलं जातं. अर्थात, याचा जास्त डोस झाल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून औषधं डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यावीत, पण सूर्यप्रकाश घेण्यास काहीच हरकत नाही. शिवाय आहारातून ‘व्हिटॅमिन डी’ घेता येते. शाकाहारात अळंबी, दूध, दही, ताक यातून मिळते. मांसाहारात अंडी, बांगडा, तेलकट मासे यातून मिळते. याबरोबरच कॅल्शियमयुक्त पदार्थ जेवणात ठेवले तर हाडं, स्नायू आयुष्यभर बळकट राहतीलच, पण मानसिक आरोग्यही त्यामुळे तंदुरुस्त राहील.
मग काय शारीरिक-मानसिक तंदुरुस्तीसाठी सक्काळी, सक्काळी ‘सन बाथ’ घेणार ना? सन बाथ या किंवा भारतीय परंपरेप्रमाणं सूर्यासमोर उभं राहून गायत्री मंत्र म्हणा. दिवसाच्या सुरुवातीला शरीराची बॅटरी एकदा का चार्ज करून घेतली की मग दिवस कसा उत्साहाने सळसळतो, ते पाहा! मग काय आपलं जीवन उत्साहाने न्हाण्यासाठी सकाळच्या उन्हात न्हाणार ना? |