Sunday, March 10, 2013

'ती'ला समजून घेताना...

Published: Saturday, March 2, 2013
बायकोच्या, स्त्रीच्या मेंदूत कामभावनेचं चक्र केवळ 'बेड लाइफ'च्या आसाभोवती फिरत नसतं, हे नवऱ्याच्या, पुरुषाच्या लक्षात आले पाहिजे. तिची अन्य आकर्षणं त्याला जाणवली पाहिजेत. तिच्या मेंदूत आकर्षणांची गर्दी झालेली असते. पतीने काही प्रमाणात तरी तिच्या या गोष्टी लक्षात ठेवून तिला यथाशक्ती साथ दिली तर तिचं मन जिंकायला त्याला सोपं जातं. यामुळे सुखकर कामजीवनाचा मार्ग हा सुकर होत असतो. जोडीदाराचा तिरस्कार करण्यात वेळ घालवू नका. कारण प्रेम करायलाच आयुष्यात वेळ कमी पडत असतो..
'म ला आता खूपच टेन्शन येतंय सर. रितूला तर आता फारशी इच्छाच होत नाही आणि आमच्या नात्यात बराच ताण वाढतोय.' अमोल सांगत होता. अमोल-रितू जोडपं माझ्यासमोर बसलं होतं. अमोल पस्तिशीचा आणि रितू तिशीतली. लव मॅरेज. लग्नाला सात वषर्र् झाली होती. सारखे वाद, भांडणं यामुळे दोघेही वैतागले होते. सगळय़ांचा संबंध थेट नाही तरी अप्रत्यक्षपणे त्यांच्यातील कामजीवनाशी येत होता. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्यात प्रचंड दुरावा आला होता. त्यालाही आता तीन वष्रे होत होती. गरोदरपणाच्या काळात बरेच महिने त्यांच्यातला सेक्स थांबला होता. मुलाच्या जन्मानंतर काहीशी सुरुवात झाली असली तरी विस्कळीतच होतं सारं. महिन्यातून एखादं दोन वेळा त्यांचे संबंध यायचे आणि ते सुद्धा रितूच्या निरुत्साहीपणाने यांत्रिकपणे, मेकॅनिकली. आता मात्र दोघांनीही ठरवलं काही तरी सल्ला घेणं जरुरीचं आहे. 
'सर, मला जशी इच्छा होतीय तशीच रितूलाही व्हायला पाहिजे ना? आमच्या कामजीवनाविषयी माझ्या मनात नेहमीच वसंत ऋतू असतो, पण हिच्या मनात मात्र सतत ग्रीष्म! त्याचा ताप आणि चटके आता मला असहय़ होत आहेत. सततच्या वादांमुळे आम्ही दोघंही पार त्रासलो आहोत. रितूच्या मनात कधी कामऋतू सुरू होणार आणि कसा मी तो आणू, याबद्दलही जरा माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत.' अमोल अगदी रितूच्या नावावर कोटी करत रोमँटिकली सांगत होता. 
मी त्याला म्हटलेसुद्धा, 'अरे अमोल, तू तर चांगलाच रोमँटिक दिसतोस. कवी वगरे आहेस की काय?'
 'डोंबल, रोमँटिक! कविता, शायरी वगरे करतो तो, पण माझ्याशी मात्र रौद्र रस. मला तो कधी समजूनच घेत नाही. तो शायरीतला शृंगाररस जरा माझ्या वाटय़ाला कसा आणायचा ते त्याला जरा सांगा सर.' रितूला कंठ फुटला. 'लग्नापूर्वी ना अमोल एवढा रोमँटिक होऊन बोलायचा, वागायचा. आता काय बिनसलंय कोण जाणे!' 
'हो, हो, आता तूच अनरोमँटिक झाल्यावर मी काय करू एकटाच रोमँटिक होऊन?' अमोलचा रितूला सडेतोड प्रश्न होता. असो. आता मला या वादात पडणं क्रमप्राप्त होतं.
'अमोल तू रोमँटिक आणि रितूलाही रोमँटिकपणा हवाय तर मग प्रॉब्लेम काय?' मी असं विचारताच अमोल उत्तरला, 'मी तर तिच्याशी सततच रोमँटिक वागत होतो. पण काही र्वष मात्र रितूच्या स्वभावात बदल होत गेला. माझा स्पर्शसुद्धा ती झिडकारत होती. जवळीक करायला लागलो की मला दूर लोटायची. आमच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिच्यात हा बदल जाणवायला लागला. त्या अगोदर तशी अगदी पूर्वीसारखी रोमँटिक नसली तरी बऱ्यापकी मला रिस्पॉन्स द्यायची. आता तर हद्दच झालीय.'
'सर, अमोल निशाचरासारखा वागतो. त्याला माझ्यातलं चांगलं फक्त रात्री बेडवरच दिसतं. एरवी नाही. हे सारखं सारखं अंगचटीला येणं म्हणजे काही रोमान्स का हो? मला आता त्या गोष्टीचा उबग आलाय.' रितू आता चिडीच्या राज्यातून रडीच्या राज्यात शिरत होती. तिचा चेहरा अगदी फिका पडला होता. अमोलही जरा नरमला. 
'अगं, पण लग्नापूर्वी तर तुला हे सर्व आवडायचं की. सुरुवातीला तर सेक्समध्ये पूर्ण जीव ओतायचीस. आता काय झालं मग? हां, मला ऑफिसच्या कामामुळे यायला जरा उशीर होत होता, पण तरी मी उत्साहाने जवळ येत होतो ना?'
'हो, कधीही आलास तरी तुला फक्त तेवढंच सुचायचं. मला आवडत नव्हतं तरी मी तुला नाराज करायचं नाही म्हणून साथ द्यायचे, पण नाइलाज म्हणून. मनापासून नाही.' रितू.
'सर, आता तुम्हीच सांगा, सेक्ससारखी आनंदाची गोष्ट आम्हा दोघांनाही आवडायची. ती आता फक्त मला एकटय़ालाच आवडली पाहिजे का? रितूची आवड कशी काय गायब झाली? हिला नेमके हवंय काय?' अमोलला या गोष्टीचं फारच आश्चर्य वाटत होतं.
अशी कित्येक जोडपी असतात ज्यांच्या आयुष्यात अमोल-रितूसारखा काळ येत असतो. नवऱ्याला बायकोचा सेक्समधील इंटरेस्ट कमी का झाला, याचा पत्ता लागत नाही. मग वाद, भांडणे यांच्या चक्रात ते जोडपे अडकून पडते आणि एकमेकांपासून दूर जाते. आणि ही खरी आयुष्याची शोकांतिका असते. दोन व्यक्ती जिवंत असतात, पण त्यांच्यातलं नातं मात्र जेव्हा मरून जातं तेव्हा ती सगळय़ात दु:खद गोष्ट असते! नात्याचा शेवट आला की कळतं नात्याची सुरुवात किती सुंदर होती. हा शोकांतिक शेवट निश्चित टाळता येऊ शकतो.
पती-पत्नीचं नातं हे नसíगक नातं नाही. ते बनवलेलं नातं असतं, निवडलेलं नातं असतं. निवडलेलं नातं निभावणं ही एक कला असते आणि प्रत्येक दाम्पत्याने ती आत्मसात करणं नितांत गरजेचं असतं. जगात कोणीही कोणासाठी जन्माला आलेलं नसतं, पण तुम्ही त्या 'कुणा'ला तरी तुमच्यासाठी जगायला निश्चित लावू शकता. प्रत्येक दाम्पत्याने ही बाब ध्यानात ठेवली की 'एकमेकांना' काय हवंय, नकोय ते समजून घ्यावंसं वाटायला लागेल. पती-पत्नी नातं हेच मुळात समाजबांधणीसाठी निर्मिलेलं असल्याने कामजीवन हाच त्याचा पाया बनतो व त्यासाठी कामजीवनात जोडीदाराला समजून घेणं, त्याला काय हवंय, नकोय लक्षात घेऊन वागणं गरजेचं असतं. 
कामजीवन नाकारून जगणं हा जोडीदारावर अत्याचारच असतो. काही अंशी हे खरं आहे की कामजीवन दुर्लक्षून आपण आपलंच नातं कमजोर करीत असतो. ती जोडीदाराची फसवणूक असते. हे भान सर्व, विशेषत: युवा व मध्यमवयीन, जोडप्यांनी ठेवलं पाहिजे. तसंच जुलमी कामसंबंध हासुद्धा जोडीदारावर अत्याचारच असतो. म्हणूनच दोघांनीही सेक्सला महत्त्व देणं आवश्यक असतं, सल्ला घेणं आवश्यक असतं व तज्ज्ञांनी दिलेला सल्ला अमलात आणणं आवश्यक असतं. नाही तर 'बरंच काही' घडू शकतं आणि मग जोडीदाराला दोष देणं चुकीचं ठरतं. 
स्त्रीने पुरुषाला व पुरुषाने स्त्रीला सेक्समध्ये समजून घेण्यासाठी दोघांचीही मनोलंगिकता, सायकोसेक्शुअॅलिटीही जाणून घेणं गरजेचं असतं. स्त्री पुरुषाला 'चांगलीच' ओळखून असते हे बहुतांशी खरं आहे; परंतु स्त्रीला याविषयी जाणून घेणं हे पुष्कळ पुरुषांना शक्य होत नाही, ते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतं. स्त्रीच्या मनोलैंगिकतेचा, सायकोसेक्शुअॅलिटीचा जरा 'नीट' अभ्यास केला तर पुरुषाला सुखकर कामजीवन व समाधानी वैवाहिक जीवन जगायला मदत होऊ शकते.
  निसर्गाने स्त्री व पुरुष हे पूर्णत: भिन्न मनोवृत्तीचे केले आहेत म्हणूनच कामजीवनामध्ये त्यांची अपेक्षा व वागणूक ही भिन्नच राहते. याला त्यांच्यातील मेंदूची रचना व कार्य हे कारणीभूत असतं. कारण 'मन' म्हणजे मेंदूच्याच वेगवेळय़ा भागाचं कार्य. ज्यामुळे विचार, कल्पना, भावना उद्भवत असतात.
मेंदूचे दोन मुख्य भाग असतात, उजवा मेंदू व डावा मेंदू. त्यांच्या मूलभूत कार्यातही फरक असतो. पुरुषी मेंदू हा स्त्रीच्या मेंदूपेक्षा रचनेने वेगळा असतो. पुरुषामध्ये डावा तर स्त्रीमध्ये उजवा मेंदू जास्त प्रभावी असतो. डावा मेंदू हा तर्काचा आधार घेऊन विचार करणारा तर उजवा मेंदू भावनांच्या आहारी जाऊन विचार करणारा. डावा मेंदू हा एकमार्गी म्हणजे एका वेळी एकाच विषयाचा, मुद्दय़ाचा विचार (सिंगल ट्रॅक, पॉइंटवाइज) करणारा तर उजवा मेंदू हा बहुमार्गी म्हणजे एकाच वेळी अनेक मार्गानी व अनेक विषयांचा (मल्टी ट्रक, ग्रॉस) विचार करणारा असतो.
ते एकमेकांना एका मज्जातंतूंच्या नाळेने जोडलेले असतात, त्याला म्हणतात 'कॉर्पस कॅलोजम.' हा एक जाड जोड असतो आणि संशोधकांना असं आढळलं आहे की, स्त्रीमध्ये हा मज्जाजोड पुरुषाच्या मज्जाजोडापेक्षा जाड (साधारणपणे ३०%) असतो. म्हणजेच उजव्या व डाव्या मेंदूतील संवेदनवहन, संदेशवहन, देवाण-घेवाण ही स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा जास्त असते. त्यामुळे स्त्रीच्या डाव्या मेंदूचे कार्य उजव्या मेंदूच्या प्रभावामुळे पुरुषाच्या डाव्या मेंदूपेक्षा काही प्रमाणात वेगळय़ा पद्धतीने घडत असते. म्हणजेच निसर्गानेच स्त्री-पुरुषामध्ये डावं-उजवं केलेलं आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे.
स्त्रीमध्ये भावनेचा 'लिम्बिक' मेंदू पुरुषापेक्षा जास्त प्रभावशाली असतो म्हणून स्त्री ही निसर्गत:च जास्त भावनाशील असते. तिचा इस्ट्रोजेन सेक्स हॉर्मोन स्त्रीला जास्त भावुककरीत असतो. पुरुषामधील टेस्टोस्टेरॉन सेक्स हॉर्मोन मूलत: त्याला जास्त आक्रमक व कमी भावुक करीत असतो. 
पुरुषामध्ये फ्लोर-हेन्री या संशोधकाने दाखवल्याप्रमाणं तो पुरुष वयात येताना एक विशिष्ट 'इनेट रिलीजिंग मेकॅनिझम' (आयआरएम) कार्यान्वित, अॅक्टिवेट होतं की ज्यामुळे पुरुषाला स्त्रीशरीराचं आकर्षण वाटू लागतं. मेंदूच्या तळभागात आढळणाऱ्या 'मॅमिलरी बॉडीज' यांचा संबंध पुरुषाच्या या कामाकर्षणाशी, सेक्शुअल अट्रॅक्शनशी असतो. ही गोष्ट पुरुषाच्या 'टेस्टोस्टेरॉन' या लैंगिक हॉर्मोनचा वयात येतानाच्या 'मॅमिलरी बॉडीज'वरील प्रभावामुळे घडत असते. त्यामुळे सर्वसाधारण पुरुषाचं 'प्रेम' हे मुळातच स्त्रीच्या शारीरिक आकर्षणातून निर्माण होणारी समागमाची अभिलाषा असते.  म्हणूनच लैंगिकतेमध्ये स्त्री-पुरुषांचे विचार भिन्न पातळींवर होत असतात. पुरुष स्त्रीच्या शारीरिक आकर्षणाला बळी पडत असतो तर स्त्री मात्र पुरुषाला त्याच्या शरीराच्याही पलीकडे पाहण्याची क्षमता बाळगत असते. म्हणून पुरुषाच्या 'इतर' गोष्टींचा प्रभाव तिला आकर्षति करीत असतो. काही स्त्रियांच्या बाबतीत पुरुषाचा मानमरातब, स्टेटस, बँक बॅलन्स या गोष्टींचा प्रभाव त्याच्या शारीरिक ठेवणीपेक्षा जास्त पडू शकतो. पण साधारणत: पुरुषाचे वागणं, बोलणं, बुद्धिमत्ता, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची एकंदर पडणारी छाप व त्याचं स्त्रीवर प्रभाव टाकण्याचं कौशल्य, फ्लर्टिग स्किल अशा बहुआयामी पुरुषीपणामुळे स्त्री पुरुषाकडे जास्त ओढली जाते हे खरं. 
स्त्रीचं 'प्रेम' हे पुरुषाच्या अशा 'कुठल्याही' वैशिष्टय़ातून निर्माण होणारी जवळीकतेची अभिलाषा असते व एका स्त्रीला वाटणारं आकर्षण हे दुसऱ्या स्त्रीला पुरुषाविषयी वाटणाऱ्या आकर्षणाच्या वैशिष्टय़ांपेक्षा पूर्णपणे भिन्न असू शकते. किंबहुना असतेच. म्हणूनच साधारण दिसणाऱ्या पुरुषाकडे एखादी मेनका का व कशी आकर्षति होते हे सर्वसामान्यांना न सुटणारं कोडं असतं. स्त्रीचा 'सेक्स'मधील उद्देश केवळ शारीरिक आनंद एवढाच नसून आपल्या आवडत्या व्यक्तीच्या 'जवळीकते'चा आनंद हा जास्त असतो आणि स्त्रीला पुरुषाविषयी निर्माण होणारी ही 'जवळीकतेची आवड' अन्य विषयांशी संबंधित असते व स्त्री स्त्रीमध्ये या 'अन्य' विषयांविषयी भिन्नता असते.  
म्हणूनच पती-पत्नीच्या कामजीवनात या अशा 'इतर' गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात हे पुरुषाने लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं वागणं, बोलणं अशा 'इतर' गोष्टींचा प्रभाव स्त्रीच्या मानसिकतेवर खूप पडत असतो. पुरुषाने प्रणयाराधनाला महत्त्व देणं यासाठीच आवश्यक असतं. स्त्रीच्या मेंदूत कामभावनेचं चक्र केवळ 'बेड लाइफ'च्या आसाभोवती फिरत नसतं हे पुरुषाच्या लक्षात आलं पाहिजे. तिची अन्य आकर्षणं त्याला जाणवली पाहिजेत. तिच्या मेंदूत आकर्षणांची गर्दी झालेली असते, ज्यात शॉिपग, कपडेलत्ते, दागदागिने इत्यादींचाही समावेश असतो. पतीने काही प्रमाणात तरी तिच्या या गोष्टी लक्षात ठेवून तिला यथाशक्ती साथ दिली तर तिचं मन जिंकायला त्याला सोपं जातं. यामुळे सुखकर कामजीवनाचा मार्ग हा सुकर होत असतो. 
अर्थात हे सर्व व्यक्तिसापेक्ष आहे हे खरं. परंतु तिच्या या आकर्षणाकडे 'पूर्ण' दुर्लक्ष करणंसुद्धा चुकीचं असतं हेही पतिदेवांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. स्त्रीनेसुद्धा जाणीवपूर्वक अशा आकर्षणांना वास्तवाच्या तराजूत तोलूनच मर्यादेत ठेवलं पाहिजे. पुष्कळ स्त्रियांना त्यांचे वॉर्डरोब उघडल्यावर हमखास दोन प्रश्न पडत असतात, एक म्हणजे घालायला चांगले कपडेच नाहीत आणि दुसरा म्हणजे नवीन कपडे ठेवायला जागाच नाही! तेव्हा अशी आकर्षणं ही तारतम्याची गोष्ट आहे हे तिनेही जाणलं पाहिजे. तिने लक्षात ठेवलं पाहिजे की 'ती सध्या जे आयुष्य जगत असते तेसुद्धा कित्येकांचं स्वप्न असू शकतं.' म्हणूनच अपेक्षेलेल्या आकर्षणपूर्तीच्या अपेक्षाभंगामुळे तिने स्वत:ला नाराज करून त्याचा परिणाम कामजीवनावर करणं योग्य ठरणार नाही.  
कामजीवन हे मुळातच पती-पत्नींनी तीन स्तरांवर जगलं पाहिजे. शारीरिक, मानसिक व भावनिक. शेवटच्या दोन बाबतीत पुरुष जर कमी पडला तर स्त्रीचं कामजीवनातील लक्ष, रुची ही कमी होऊ लागते. जसे अमोल-रितू यांच्या बाबतीत घडत होतं. अमोलच्या विचारांमध्ये सेक्स म्हणजे केवळ शारीरिक पातळीवरील एकत्र येणं. अशी चूक घडू नये म्हणून पती-पत्नींनी एकमेकांच्या तिन्ही स्तरांवरच्या गरजा जाणून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी प्रथम एकमेकांकडे लक्ष दिलं पाहिजे. (नवऱ्याचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर स्त्रीने आपला चेहरा दु:खी केला पाहिजे तर बायकोचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर नवऱ्याने आपल्या चेहऱ्यावर हसरा व आनंदी भाव आणला पाहिजे! - काही अनुभवी लोक). एकदा जोडीदाराने लक्ष दिलं की दोघांमधील संवाद क्षमता वाढवली पाहिजे.
वाद हे संवादाचे भ्रष्ट रूप. संवाद हे देवाणघेवाणीसाठी असतात तर वाद केवळ आपले विचार, आपली मतं एकतर्फीपणे जोडीदारावर लादण्याचा केलेला चढेल आवाजातील प्रयत्न. वादावादीचा थेट परिणाम जोडप्याच्या बेड लाइफवर होत असतो. दोघांनीही आपली मानसिकता बदलली तर वादाकडून संवादाकडे जाता येईल. मग जोडप्याची मानसिक पातळीही संतुलित राहू शकते. संवादावेळी पतीने हे भान ठेवणं आवश्यक असतं की स्त्रीचे विचार हे भावनांनी ओथंबलेले असतात. तो मात्र ताíकक विचार मांडत असतो आणि मग वेगवेगळय़ा पातळ्यांवर संवाद होत राहतात. 
हेच कुठल्याही वादाचं मूळ स्वरूप असतं. सततच्या वादाने जोडीदाराविषयी तिरस्कार, घृणा व द्वेष मनात घर करू लागतात आणि सेक्स लाइफचा बट्टय़ाबोळ होतो. म्हणून वाद करून एक वेळ त्यावेळची परिस्थिती जिंकता येईलही, पण ती व्यक्ती मात्र गमवावी लागते. या करताच वाद तात्काळ मिटवून, विषयावर पडदा टाकून (माझी 'ड्रॉप कर्टन मेथड') पुढे जाणं आवश्यक असतं. जोडीदाराचा तिरस्कार करण्यात वेळ घालवू नका, कारण प्रेम करायलाच आयुष्यात वेळ कमी पडत असतो.  
मानसिक पातळी म्हणजे विचारांची पातळी. एकमेकांचे विचार, विशेषत: सेक्सविषयीचे, जाणून घेणे आवश्यकच नाही तर अनिवार्य असतात. यातूनच जोडीदाराचे लैंगिकतेविषयीचे समज-गरसमज हे कळतात. यासाठी हवा असतो संवाद. आणि सर्वसाधारण पती-पत्नीमध्ये सेक्सविषयक संवाद हे घडतच नाहीत. मी नेहमी सांगतो की दाम्पत्याचे 'बेड लाइफ' हे 'मूकपट' न होता 'बोलपट' असलं पाहिजे. एकमेकांनी आपल्या सेक्सविषयक विचारांना जोडीदारापर्यंत पोचवणं गरजेचं असल्याने सेक्सविषयीचा संकोच, लाज नवरा-बायकोने दूर ठेवणं आवश्यक आहे. मग लक्षात येईल 'आर्ट ऑफ इन्टिमसी'चं महत्त्व. 
कामजीवनाबाबतच्या आचार-विचारांची शास्त्रीयता तज्ज्ञांकडून माहीत करून घेऊन आपल्यातील लैंगिक गंड दूर केले पाहिजेत. आम्हा सेक्सॉलॉजिस्टसमोर लोकांना योग्य ज्ञान देणं एवढंच काम नसून लोकांना स्वत:ला जे ज्ञान योग्य वाटत असतं, ते कसं चुकीचं आहे हे समजावून देणं हेही असतं.
भावनिक पातळी ही भावनांच्या देवाण-घेवाणीने नात्यातील माधुर्य टिकवायला मदत करते. स्त्री ही जास्त भावनाप्रधान असल्याने त्याचं गांभीर्य पतीने जर नाही ओळखलं व स्वत:च्या वागण्यात भावनाशून्यता आणली तर त्याला जे नातेसंबंधातील ताणतणाव जाणवायला लागतात त्याचे पडसाद त्या दाम्पत्याच्या कामजीवनावर निश्चितच पडतात. स्त्रीला काही वेळा भावनिक अतिरेकही होत राहतो आणि त्या वेळी बेभानपणा जर आला तर 'हिस्टेरिया'सारखे स्फोटही होत राहतात. हे टाळणं कष्टाने शक्य असतं. जोडीदारावरील राग म्हणजे जोडीदाराच्या चुकीबद्दल (तुमच्या दृष्टीने)स्वत:ला दिलेली शिक्षा! असा राग आणि त्या जोडीला जोडीदाराविषयी वाटणारा द्वेष यांच्या संयोगातूनच 'हिस्टेरिया'चा 'अॅॅटॅक' येत असतो. जोडीदाराविषयी वाटणारा द्वेष व स्वत:ला येणारा राग हे काबूत आणायला शिकणं म्हणजेच नात्यातील परिपक्वता. यासाठी कष्ट न घेतल्यास वारंवारच्या अशा घटनांनी कामजीवन विस्कळीत होऊन संसारात कटुता वाढू शकते. 
म्हणूनच रितूसारख्या स्त्रीचं मानसिक आणि भावनिक कामरंगी मन अमोलसारख्या पतीने जाणून घेतलं तर 'आर्ट ऑफ इन्टिमसी'चा व 'सेक्शुअल फिटनेसथेरपी'चा सुयोग्य वापर करून कामजीवन केवळ शारीरिक स्तरावर यांत्रिकपणे, मेकॅनिकली न होता सचेतन, लाइवली होईल यात शंका नाही.

Source - loksatta.com - 11 mar 2013