वर्तमानाची निवड... |
चित्रा बेडेकर , शनिवार , ३१ डिसेंबर २०११
मेंदू याच विषयात शास्त्रज्ञ असणाऱ्या डॉ. जिल टेलरला अचानक मेंदूच्या स्ट्रोकला बळी पडावं लागलं. स्मृती नष्ट झालेल्या अवस्थेत नऊ वर्षे असताना तिला मेंदूच्या शक्तीचा साक्षात्कार झाला. जाणिवेपलीकडच्या अद्भुत जगाचं घडलेलं दर्शन तिने शब्दबद्ध केलं आणि भूतकाळ हा अपघात असतो. वर्तमान ही निवड असते, हा साक्षात्कार तिने जगाला घडविला. कळत-नकळत हातून घडलेले प्रमाद मागे टाकून ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ म्हणत आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करणं बऱ्याचदा शक्य असतं; पण प्रत्यक्ष मरणाच्या दारी पोहोचण्याचा अनुभव घेतलेल्यांनी नवी सुरुवात कशी करावी? याचं उत्तर अमेरिकेतल्या डॉ. जिल टेलर हिच्या अनुभवात आणि जिद्दीत सापडेल. मेंदूविज्ञान किंवा ज्याला न्यूरो सायन्स म्हणतात, त्या क्षेत्रातल्या संशोधनाला वाहून घेतलेली डॉ. जिल टेलर १९९३ पासून सामाजिक कार्यातही आघाडीवर होती. अमेरिकेतल्या सिझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांच्या ‘नामी’ संघटनेच्या कार्यकारिणीतली ती सर्वात तरुण सभासद होती. मेंदूच्या या विशिष्ट आजाराच्या संदर्भातल्या संशोधनासाठी मृत्यूनंतर अशा रुग्णांचे मेंदू मिळविण्यासाठी तिने मेंदूदानाच्या प्रचाराची एक मोहीमसुद्धा हाती घेतली होती. वयाच्या ३७ वर्षांंपर्यंत काम, काम आणि फक्त काम करणाऱ्या डॉ. जिलला नियतीच्या एका फटकाऱ्यात आपल्या बऱ्याचशा क्षमता गमवाव्या लागल्या. १० डिसेंबर १९९६ च्या सकाळी जिलच्या मेंदूच्या डाव्या भागात अचानक रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर अवघ्या चार तासात आपलं चालणं, बोलणं, वाचणं, लिहिणं, गतायुष्यातल्या आठवणी, सातत्याने स्वत:चा स्वत:शी चालणारा आत्मसंवाद आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव अशा एकेक क्षमता ती गमावून बसली होती. बाहेरच्या जगाच्या तुलनेत आपलं शरीर नेमकं कुठे सुरू होतंय आणि कुठे संपतंय याचं भान गेलं होतं. स्वत:च्या घनरूप अस्तित्वाची, वेगळेपणाची जाणीव नष्ट झाली होती. त्याऐवजी आपण द्रवस्थितीत असल्याचा अनुभव ती घेत होती. फक्त एकाच बाबतीत ती सुदैवी ठरली होती. स्ट्रोक येताना किंवा त्यानंतर ती कधीच बेशुद्ध पडली नव्हती. यामुळे आपल्या मेंदूत काय चाललंय हे आतून तिला समजत होतं. त्यानंतर आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी जिद्दीने डॉ. जिलने आपल्या मेंदूच्या गमावलेल्या बहुतेक सर्व क्षमता परत मिळवल्या. आजसुद्धा ती मेंदूरचनाशास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहे. त्यासोबतच त्या क्षेत्रातली सल्लागार आणि मनोरुग्णांची राष्ट्रीय पातळीवरची प्रवक्ती या जबाबदाऱ्यासुद्धा ती समर्थपणे पार पाडत आहे. ‘नामी’ संघटनेची अजूनही ती खंदी कार्यकर्ती आहे. एवढंच नव्हे, तर ‘टाइम मॅगेझिन’च्या जगात सर्वात प्रभावी असणाऱ्या २००८ सालातल्या १०० माणसांच्या यादीतसुद्धा डॉ. जिल टेलरचं नाव आहे. स्वत:ला बरं करण्याच्या त्या आठ वषार्ंत जिलच्या आयुष्यात योग्य वेळी चालून आलेल्या संधी आणि प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तिला भेटलेली योग्य माणसं यांचा महत्त्वाचा वाटा होता, हे ती स्वत:च मान्य करते. मुख्य म्हणजे तिच्या कर्तबगार, समंजस, कर्तव्यदक्ष आणि बालसंगोपनात निष्णात असणाऱ्या आईची अत्यंत मोलाची खंबीर साथ तिला मिळाली होती. अशी आई लाभणं हे आपलं भाग्यच आहे, असं जिल अभिमानाने सांगते. जिल स्वत: मेंदूशास्त्रज्ञ असल्यामुळे स्ट्रोकने आपल्या मेंदूत नेमका काय बिघाड झालाय आणि तो कसा दुरुस्त करायला हवा, याचं संपूर्ण शास्त्रशुद्ध ज्ञान तिला होतं. त्याचा आतून प्रत्यक्ष अनुभव मात्र स्ट्रोकमुळेच तिला मिळाला. मेंदूच्या आकलनापलीकडे असणाऱ्या काही सामथ्यार्ंचा साक्षात्कार, जाणिवांपलीकडील जागृतावस्थेचा विलक्षण अनुभव जिलने या काळात घेतले व शब्दबद्ध केले. या सर्वांहून आणखी एका बाबतीत जिलचं वेगळेपण लक्षात घ्यावं लागेल. माणसाचा मेंदू म्हणजे सतत बदलत जाणारा एक विलक्षण गतिशील अवयव आहे. बाहेरून येणाऱ्या संवेदनांनुसार मेंदूपेशींच्या म्हणजेच न्यूरॉन्सच्या आपापसातल्या जोडण्या बदलण्याची अद्भुत क्षमता मेंदूकडे असते. मेंदूच्या या लवचिकतेमुळे म्हणजेच ‘प्लास्टिसिटी’मुळे मेंदू आपल्या हरवलेल्या बऱ्याचशा क्षमता पुन्हा परत मिळवू शकतो. मेंदूच्या या निसर्गदत्त क्षमतेवर डॉ. जिलने संपूर्ण विश्वास टाकला. स्वत:च स्वत:ला बरं करण्याच्या मेंदूच्या या नैसर्गिक प्रक्रियेत होऊ शकणारा अवास्तव वैद्यकीय हस्तक्षेप जाणीवपूर्वक टाळण्यासाठी जिलने स्वत:च्या अखत्यारित काही धाडसी निर्णय घेतले होते. स्वत: न्यूरो सायटिंस्ट असणं ही जिलची सर्वात मोठी जमेची बाब होती. एखाद्या दुर्घटनेतून किंवा धक्कादायक प्रसंगातून निर्धाराने बाहेर येण्यासाठी माणसाला तीव्र जीवनेच्छा आणि पुढच्या आयुष्याचं भरभक्कम उद्दिष्ट असावं लागतं. जिलकडे या दोन्ही गोष्टी होत्या. स्ट्रोक आला त्या क्षणापासून स्वत:ला कायमचं अपंग होण्यापासून वाचविण्याची तिला आतून तीव्रतेने निकड वाटत होती. त्यामुळे तातडीने वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी तिने जिवाच्या कराराने धडपड केली. स्ट्रोकग्रस्त रुग्णाला हानीकारक ठरू शकणारी प्रस्थापित वैद्यकीय शुश्रूषा निर्भीडपणे नाकारून आपल्या पुनर्वसनाचं सुकाणू तिने स्वत:च्या हाती घेतलं. स्ट्रोकमुळे आपल्या मेंदूच्या पेशींना पोहोचलेला जबरदस्त आघात लक्षात घेऊन त्यांना आवश्यक ती विश्रांती देणं आणि त्यांच्या नैसर्गिक गतीने बरं होण्याची त्यांना उसंत देणं याला जिलने सर्वोच्च प्राधान्य दिलं. उरलेल्या आयुष्यात कोणत्या उद्दिष्टांसाठी आपल्याला झटायचंय याची जिलला स्पष्ट जाणीव होती. स्ट्रोकमुळे आपल्याला आलेला अनुभव इतरांपर्यंत पोहोचवून स्ट्रोक येण्यापासून स्वत:ला वाचविणं त्यांना शक्य व्हावं म्हणून स्वत:चा अनुभव शब्दबद्ध करणं हे जिलचं नवं उद्दिष्ट होतं. स्ट्रोकनंतरच्या सात-आठ, वर्षांत ती बहुतांशी आपल्या मेंदूच्या उजव्या अर्धगोलाच्या प्रभावाखाली होती. असा अनुभव घेणारी ती जगातली बहुधा एकमेव व्यक्ती असावी. त्या काळात तिला एक प्रकारची आंतरिक शांतता लाभली होती आणि विश्वाशी आपण एकरूप असल्याचा अनुभव आला होता. प्रत्येकाने परिश्रमपूर्वक आपल्या मेंदूच्या उजव्या भागाच्या प्रभावाखाली वर्तमान क्षणात जगायचं ठरवलं तर स्ट्रोक न येतासुद्धा असा अनुभव कुणालाही घेता येतो. मेंदूचं हे रहस्य स्ट्रोकमुळेच जिलला उमगलं होतं. स्ट्रोकने तिला घडवलेला हाच खरा साक्षात्कार होता. तो साक्षात्कारसुद्धा इतरांसमोर तिला मांडायचा होता. आपलं पूर्वायुष्य विसरून आयुष्याची नवी सुरुवात एखादी व्यक्ती जेव्हा करू बघते, त्या वेळी आजूबाजूची माणसं आणि समाज यांनीसुद्धा पुरेसा समंजसपणा दाखवणं आवश्यक असतं. आपलं स्ट्रोकपूर्वीचं व्यक्तिमत्त्व तसंच तंतोतंत पुन्हा लाभणार नाही हे सत्य जिलने स्वीकारलं होतं. इतरांनीसुद्धा ते स्वीकारून पुढच्या आयुष्यात तिला जे काय करायचं आहे त्याचा आदर बाळगून तिला सहकार्य द्यावं, अशी जिलची अपेक्षा होती. स्ट्रोकच्या अनुभवाने तिला जितकं मेंदूच्या आंतरिक सौंदर्याचं आणि लवचिकतेचं मनोहारी दर्शन घडलं होतं. तितकंच मानवी मनाचं औदार्यसुद्धा दिसून आलं होतं. आयुष्यात तिला पुन्हा कार्यक्षम बनविणाऱ्या या सर्व घटकांबद्दल जिल कृतज्ञता बाळगून आहे. जिलच्या या अनोख्या अनुभवाचं मुक्तकथन लोकवाङ्मयगृहाने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘मेंदूच्या अंतरंगात’ या पुस्तकातून करताना मला तिच्यातली पराकोटीची जिद्द आणि चिकाटी स्तिमित करून गेली. स्वत:च्या हरवलेल्या क्षमता परत मिळविण्याच्या प्रयत्नात आपल्या व्यक्तिमत्त्वातले नकोसे वाटणारे पैलू तिने शर्थीने प्रत्येक क्षणी माघारी परतवले. स्वत:ला नव्याने मनाजोगतं घडविताना क्षणोक्षणी स्वत:शी करावा लागणारा हा संघर्ष आयुष्याच्या अंतापर्यंत सुरू ठेवण्याची जिलची मानसिक तयारी आहे. |