Showing posts with label Brain. Show all posts
Showing posts with label Brain. Show all posts

Wednesday, September 11, 2013

वनऔषधी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी

अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
अशोकाचे साल, ब्राह्मी पूड समप्रमाणात एकत्र करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ एक कप दुधाबरोबर नियमितपणे काही महिने घेतल्याने बुद्धीत वाढ होते.
शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होण्यास मदत होते. ३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरण शक्ती वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.
सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.
दूध,तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५० मिलीग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापर्यंत किंवा किमान एक महिन्यापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. १० ग्रॅम वचा पूड २५० ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १० ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.


Source -Loksatta.com

Wednesday, August 28, 2013

भयगंड : फोबिया

Source - loksatta.com

वॉर अँड पीस - भयगंड : फोबिया
एक पालक दाम्पत्य आपल्या एकुलत्या एक ‘प्रिन्सला’ माझ्याकडे घेऊन आले. वडील बारीक, आई मजबूत स्थूल, उंच. औषध कोणाला? तुम्हाला का? असे वडिलांना मी विचारले. दोघांनी मुलाकडे बोट केले. मुलगा, उंची ५’.१०’’, वजन ७२ किलो. ‘मुलगा खूप घाबरतो, एकटा शाळेत जायलासुद्धा भितो. आता पुढच्यावर्षी कॉलेजमध्ये एकटा मी जाणार नाही. असे आत्तापासूनच सांगत असतो.’ रात्री झोपताना जवळ आई लागते. मित्रमंडळीत मिसळण्याऐवजी त्यांना टाळतो. मनाने निर्मळ, अभ्यासात हुशार, शाळेमध्ये नेहमी पहिल्या पाचात क्रमांक पटकविणारा पण कसल्यातरी अनामिक भीतीने पछाडलेला, वाडीतल्या, गल्लीतल्या मुलांच्यात खेळायलाही तयार होईना. दूरदर्शनवर वेगवेगळ्या खेळांच्या मालिका बघण्याची मोठी हौस! विशेषत: फुटबॉल, बॉक्सिंग, फाईटिंग अशा सिरीयल बघतो. अशी माहिती पालकांनी दिली. माझे उपचार सुचविण्याचे काम सोपे झाले. माझे रुग्ण पाहण्याचे नेहमीचे दिवस सोडून एक दिवस मुलाला विश्वासात घेऊन तपासले. त्याची लिंग, अंडाची वाढ अपुरी लक्षात आली. खूप खोलात न जाता, त्याचा स्वत:चा आत्मविश्वास वाढावा म्हणून, लहानपणी मी ऐकलेल्या एका लोकप्रिय गाण्याच्या ओळी सांगितल्या. ‘मन शुद्ध तुझे, गोष्ट आहे पृथवी मोलाची! तू चाल पुढे, तुलारं गडय़ा भीती कुणाची’ त्याच्या लिंगसमस्येची चिंता लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले. शास्त्रकारांचा सांगावा असा आहे की, उंच धिप्पाड शरीरबांध्यापेक्षा ओज, शुक्र, वीर्य हे नेहमी कोणत्याही कामाकरिता आत्मविश्वास देत असते.
सुवर्णमाक्षिकादि, चंद्रप्रभा, शृंग, पुष्टीवटी, आम्लपित्तवटी प्र. ३ दोनवेळा, आस्कंदचूर्ण रात्री १ चमचा, भोजनोत्तर अश्वगंधारिष्ट अशी औषधयोजना. सायंकाळी लवकर, कमी जेवण; त्यानंतर अर्धा तास फिरून येणे. सकाळी पुरेसा व्यायाम, अशा चिकित्सेने दीड महिन्यातच ‘फोबिया’ केव्हा गेला हे त्याचे त्यालाच कळले नाही. ‘भित्यापोटी ब्रह्मराक्षसावर’ हमखास उतारा ओजवर्धन!

- वैद्य प. य. वैद्य खडीवाले

Monday, August 12, 2013

आइन्स्टाइनचे‘पहिले प्रेम’

Source - Loksatta.com

डॉ. शशांक सामक जेसिका सामक
Published: Saturday, August 3, 2013
‘सेक्स’ ही समस्त प्राणीजगतातील ‘मूलभूत’ भावना असून ‘शृंगारिक प्रेम’ ही मानवामधील ‘विकसित’ भावना आहे. अर्थात ‘प्रेम’ आणि ‘सेक्स’ या वेगवेगळय़ा गोष्टी असल्या तरी एकमेकांमध्ये गुंफल्या गेल्याने, त्यांच्या संमिश्रभावांमुळे प्रेमात विविध छटा आढळतात. आणि अशा वेगवेगळय़ा छटांमुळे आइन्स्टाइनचे ‘पहिले प्रेम’ एकापेक्षा जास्त वेळा होऊ शकते.
‘सर, तुमचं ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ शिकणारा तुमचा शिष्य त्या ज्ञानाला फारच सार्वत्रिक करतोय,’ नेहा मला तिचा नवरा मधुरबद्दल सांगत होती.
‘सार्वत्रिक? म्हणजे?’ मी थोडा बुचकळय़ात पडलो.
‘बघा ना, सकाळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याने मला जादू की झप्पी दिली खरी, पण ‘आय लव्ह यू’ म्हणताना ‘आय लव्ह यू.. टू’ असं म्हणाला.’ नेहा.
‘मग तू काय म्हणालीस? चिडलीस की काय?’ मी.
‘छे. मग मीपण त्याला ‘मी टू’ असं म्हणाले.’ नेहाने सांगितले.
‘गुड. मग झाली ना फिटम्फाट?’ मी तिला विचारले.
‘पण सर मला याच्याबद्दल संशयच आहे. परवा त्याच्या ऑफिसमध्ये मी अचानक गेले होते त्या वेळी त्याच्या केबिनमधून त्याची सेक्रेटरी खुशीत बाहेर येताना दिसली. मला जाम राग आलाय मधुरचा.’ नेहाच्या ठिणग्या अजून जाणवत होत्या.
मी प्रश्नार्थक नजरेने मधुरकडे पाहिले. तो हसत म्हणाला, ‘सर, तुम्हाला माहीतच आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे आणि त्यालाही आता एक वर्ष होत आलंय. आणि सर, ती नेहमीच माझ्यावर संशय घेत असते. कारण या सेक्रेटरीच्या अगोदर नेहाच माझी सेक्रेटरी होती!’
‘ओऽ’ नेहाच्या संशयाचे मूळ कारण लक्षात आले.
‘तसं नाही सर, मुळात हाच तसा वागतो. अतिप्रेमळ.’ नेहा.
‘सर, पण तुम्हीच मला सांगा, आपण सर्वाशी प्रेमाने वागलं पाहिजे की नाही? तरच ते आपल्याशीही प्रेमाने वागतील, नीट कामं करतील, हो की नाही?’ मधुर.
‘हो ना, अगदीऽ’ नेहा थोडी घुश्शातच. ‘सर, आणि परवा मला म्हणाला की आपलं तर सात नंबरचं प्रेम आहे ना? मग काळजी कशाला करतेस?’
‘सात नंबरचं प्रेम? म्हणजे तू सातवी ?’ मी.
‘नाही सर. तुम्ही ते प्रेमाचे आठ प्रकार सांगितले आहेत ना, त्यातलं ते सात नंबरचे, असोसिएशन लव्ह, सहवासोत्तर प्रेम. वारंवार संपर्काने, व्यक्तीची निगेटिव्ह बाजू मान्य करून होणारं. मी मधुरची बरीच र्वष सेक्रेटरी होते ना! म्हणून म्हणाला.’ नेहाने विश्लेषण केले.
‘बरं हे बघ, या गोष्टी फार गंभीरपणे नको घ्यायला. आणि तूही त्याला मी टू, म्हणालीस की.’ मी.
‘ते मी गमतीने म्हटलं होतं. पण खरंच सर, पुरुषांना असं पुन:पुन्हा प्रेमात पडता येतं?’ नेहा.
‘अहो सर, मी एरवी तिला काहीही गंभीरपणे म्हटलं तर ती ते कधीही गंभीरपणे घेत नाही, पण हे तिला मजेने म्हटलं आणि तिने ते गंभीरपणे घेतलं. आता माझी ही सेक्रेटरी आहे. आकर्षक आहे, पण प्रेम वगरे कल्पना काही माझ्या मनात अजून तरी आल्या नाहीयेत. पण नेहा अशीच संशय घेत राहिली तर मात्र..’ मधुरने हुशारीने वाक्य अर्धवटच सोडलं. नेहा फुत्कारली, ‘तर काय? बोल, बोल ना!’
‘तर काही नाही, मला दुसरी सेक्रेटरी बघावी लागेल.’ धूर्त मधुर सुस्कारा टाकत बोलला.
मी सर्व पाहत होतो. ऐकत होतो. मधुर नेहाची फिरकी घेण्यात पटाईत दिसत होता. ते पेल्यातले वादळ होते आणि पेल्यातच शमले. पण मला मात्र प्रेम, आकर्षण, शरीरसंबंध या निसर्गनिर्मित भावांचा, प्रेरणांचा विचार पडला. आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे एक वाक्य आठवले.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी एकदा म्हटले होते, ‘भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या भाषेत जीवशास्त्रीय ‘पहिल्या प्रेमा’ची परिभाषा कशी काय करता येईल?’ (हाऊ ऑन अर्थ आर यू एव्हर गोइंग टू एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड केमिस्ट्री अ‍ॅन इम्पॉर्टट बायॉलॉजिकल फिनॉमेनॉन अ‍ॅज फर्स्ट लव्ह?) ही विचारणा करताना त्यांना हेच सुचवायचे होते की, अशी गोष्ट अशक्य आहे. आणि त्याचबरोबर आइन्स्टाइन यांना बहुतेक जीवशास्त्रीय ‘दुसरे प्रेम’, ‘तिसरे प्रेम’ वगैरे होऊ शकतात याची कल्पना असल्यानेच त्यांनी ‘पहिले प्रेम’ हा शब्दप्रयोग वापरला असणार!
वेगवेगळय़ा वैद्यकीय क्षेत्रातील मॉलेक्युलर बायॉलॉजीच्या आधुनिक संशोधनांचा सखोल अभ्यास करून त्यांचे कामशास्त्रीय संदर्भीकरण व विश्लेषण (सेक्सॉलॉजिकल इंटरप्रिटेशन) करून तसेच ‘प्रेम व सेक्स’ या दोन्हींचे वैद्यकीय परिभाषेत सुसूत्रीकरण करून, मी आइन्स्टाइन यांच्या ‘पहिल्या प्रेमा’चे स्पष्टीकरण सर्वसामान्यांसाठी करत आहे. त्यामुळे ‘पाऊले चालती प्रेमपंढरीची वाट’ हे कसे घडते, हे लक्षात येईल.
गुरुत्वाकर्षणासारखाच तुल्यबळ प्रेमाकर्षणाचा जोर निसर्गाने पृथ्वीवर निर्माण करून मानववंश गुरुत्वाकर्षणामुळे या पृथ्वीशी आणि तर प्रेमाकर्षणामुळे तो आपसात एकमेकांशी बांधील राहील असे पाहिलेले दिसते. पाहिलेल्या आकर्षक व्यक्तीविषयीच्या संवेदना पहिल्यांदा मेंदूतील दृष्टिज्ञान मेंदूतून मानवाच्या वैचारिक मेंदूच्या प्रीफ्रंटल भागात जातात. क्षणार्धात तिथे त्या व्यक्तीविषयीच्या निर्माण झालेल्या मोहमयी भावना तपासून त्या मेंदूत इतरत्रही विश्लेषणासाठी पाठवल्या जातात. पुरुषामध्ये ‘मॅमीलरी बॉडी’ या मेंदूभागामध्ये त्या व्यक्तीचे शारीरिक आकर्षणही मापले जाते. पुरुष वयात येतानाच सेक्स हॉर्मोन टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावाने सुरू झालेली ही क्रियाशीलता मेंदू जिवंत असेपर्यंत चालूच असते. (रसिकता अमर असते!) स्त्रीमध्ये सेक्स हॉर्मोन इस्ट्रोजेनमुळे घनिष्टतेच्या भावुक आकर्षणाशी संबंधित भागांचा (इन्शुला व अँटीरीयर सिंग्युलेट कॉर्टेक्स) प्रभाव असतो.
या सर्व भागांच्या प्रतिसादात्मक माहितीने त्या संवेदनांमधील र्सवकष मोहकता (अ‍ॅट्रॅक्शन) पारखून त्या व्यक्तीचा आकर्षणभाव (अ‍ॅट्रॅक्टीवनेस) मेंदूकडून ठरवला जातो. आकर्षण भावातील उत्कटता जास्त वाटल्यास (हाय, मार डाला) त्या संवेदना लगेचच मेंदूतील खोलवर भागातील व्हेंट्रल टेगमेंटल एरिया (व्हीटीए) येथे पाठवल्या जातात. व्हीटीए इथे फेनिलएथिलअमाइन (पीईए) हे मेंदू पेशींतील संवेदन, कम्युनिकेशन जलद करणारे रसायन कार्यान्वित होते. आणि मग पीईए जिच्यामुळे तयार होते त्या व्यक्तीबद्दल आसक्ती निर्माण होते. पीईए हेच प्रेमाकर्षणाचे मूळ आसक्ती-रसायन.
नंतर लॅटरल टेगमेंटल भागात नॉरएपिनेफ्रीन रसायन वाढून ते पसरते. त्यामुळे उत्तेजन, एक्साइटमेंट होऊन धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे यासारख्या ‘दिल धकधक करने लगा’सारख्या गोष्टी क्षणार्धात घडतात. पीईए व नॉरएपिनेफ्रीन या रसायनांनी मेंदूतील न्यूक्लिअस अ‍ॅक्युबन्स या आनंदकेंद्रात व कॉडेट न्यूक्लिअस या भागात डोपामाइन हे आनंद-रसायन पसरते. कॉडेट न्यूक्लिअस हा भाग सौंदर्यपारखी आहे. त्याच्या उत्तेजनामुळे प्रेमपात्राविषयीच्या विचारांशी, नजरभेटीशी आनंद-संवेदना जोडली जाते. मग तिच्या आठवणीनेही मन प्रफुल्लित व उत्साही होऊ लागते.
शेकडो वर्षांपूर्वीच्या सिद्धयोगीश्वर रचित ध्यानधारणेच्या विज्ञानभरव तंत्रातील धारणा ४६, श्लोक ६९ मध्ये याचा विचार केलेला आढळतो. कामसुखाच्या नुसत्या कल्पनांनी, केवळ ध्यानाने (फॅण्टसीने) व्यक्तीचे मन आनंदाने प्रफुल्लित होते. (‘लेहनामन्थनाकोटै .. भवेदानन्दसंप्लव’)
मोहमयी संवेदनांनी अशा प्रकारे मेंदूतील हायपोथॅलॅमसमध्ये ऑक्सिटोसीन व व्हाजोप्रेसीन निर्माण होऊन वासनानिर्मिती होते. इन्शुला व अँटीरीयर सिंग्युलेट कॉर्टेक्स भागांमध्ये ऑक्सिटोसीनच्या परिणामांनी जिव्हाळय़ाचे, तर व्हेंट्रल पॅलिडम भागात व्हाजोप्रेसीनचा प्रभाव होऊन बांधीलकीचे, कमिटमेंटचे भाव निर्माण होऊ लागतात.
सेक्स आणि प्रेम यांची निर्मिती यंत्रणा वेगवेगळी असली तरी संलग्न असते. ऑक्सिटोसीन हा त्यांच्यातील महत्त्वाचा दुवा. म्हणूनच शृंगारिक प्रेमाकर्षणाला लैंगिकतेचा स्पर्श असतो. या गोष्टी लैंगिक हॉर्मोनच्या प्रभावाखाली घडत असतात. म्हणूनच शृंगारिक प्रेम हे लैंगिकतेविना नसते.
व्हाजोप्रेसीनचा प्रभाव जितका जास्त, तितकी बांधीलकीची जाणीव जास्त. मधुरच्या ‘प्रेमळ’ स्वभावाचा पुरेपूर अनुभव असल्याने नेहाला मधुरच्या ‘आकर्षति’ सेक्रेटरीचा धोका वाटणे साहजिकच होते; परंतु त्यांचे जर ‘सात नंबर’चे प्रेम होते तर मधुरनेही नेहाबरोबर इंटीमसी वाढवून ते प्रेम ‘आठ नंबर’चे करून (कंपॅनियनशिप, साहचर्य) तिची प्रेमातील ‘असुरक्षितते’ची भावना घालवणे गरजेचे होते हे मात्र खरे. (आणि तो तोच प्रयत्न करीत होता. म्हणूनच ते वादळ पेल्यातले ठरले.)
पीईए, नॉरएपिनेफ्रीन, डोपामाइन, ऑक्सिीटोसीन, व्हाजोप्रेसीन ही पंच महा-प्रेमरसायने मज्जासंस्थेमार्फत शरीरात इतरत्र प्रभाव करू लागतात. वाढलेल्या डोपामाइनचा परिणाम मेंदूतील अ‍ॅमिग्डाला भागावरही होऊन भीतीभाव नष्ट होतो व प्रेमात ‘बिनधास्तपणा’ व धोके पत्करण्याची प्रवृत्ती उफाळून येते. (अब चाहे सर फुटे या माथा, मैंने तेरी बाह पकडम् ली).
डोपामाइन वाढल्याने मेंदूत वैचारिक संतुलनाचे सेरोटोनीन रसायन कमी होऊन प्रेमाचे ‘वेड’ लागते (दिल तो पागल है). प्रेमात तारतम्य उडून जाते. प्रेमाची व्यक्ती ही अत्यंत आदर्श व दोषविरहित असल्याचा साक्षात्कार होत राहतो आणि ‘जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे, तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे’ असा अव्यवहारीपणा उफाळून येतो. (अर्थात लग्न झाल्यावरच त्या व्यक्तीतील उणिवा व दोष दिसू लागतात, हे वेगळे!)
‘सेक्स’ ही समस्त प्राणीजगतातील ‘मूलभूत’ भावना असून ‘शृंगारिक प्रेम’ ही मानवामधील ‘विकसित’ भावना आहे. अर्थात ‘प्रेम’ आणि ‘सेक्स’ या वेगवेगळय़ा गोष्टी असल्या तरी एकमेकांमध्ये गुंफल्या गेल्याने, त्यांच्या संमिश्रभावांमुळे प्रेमात विविध छटा आढळतात. आणि अशा वेगवेगळय़ा छटांमुळे आइन्स्टाइनचे असे ‘पहिले प्रेम’ एकापेक्षा जास्त वेळा होऊ शकते. (व्यावहारिक जगात मात्र एक प्रेम सुरळीतपणे होणे मुश्कील!). रोमँटिक प्रेमाचे अधिष्ठान असल्यास सेक्सच्या क्रियेचा आनंद हा दोघांचेही मन विभोर करणारा ठरतो हे खरे.
म्हणूनच प्रसिद्ध उर्दू शायर जाँनिसार अख्तर यांनी एका शेरमध्ये चपखलपणे सांगितले आहे,
‘सोचो तो बडी चीज़्‍ा है तहज़ीब (संस्कृती) बदन की.. वर्ना तो ये बदन आग बुझाने के लिये है’
shashank.samak@gmail.com

Monday, February 11, 2013

त्रिबंध नाते - कामस्वास्थ्य



सेक्स म्हणजे प्राणिजगतात निर्माण झालेली र्सवकष त्रिबंध (शारीरिक, मानसिक, भावनिक बंध) तत्त्वशक्ती आहे हे ध्यानात घ्यायला हवे. मानवात ती सवार्ंत जास्त उत्क्रांत झाली आहे म्हणून आपण जरी जगात येतो एकटे, जातो एकटे तरी राहतो मात्र या त्रिबंध नात्यातच, हे विसरता कामा नये. म्हणून सेक्सला नाकारून जगणे हे या तिन्ही स्तरांवर समस्या निर्माण करणारे ठरते.

Wednesday, December 26, 2012

प्रसन्न बुद्धीची किमया

Source- loksatta.com
URL- Loksatta.com - प्रसन्न बुद्धीची किमया
Author - प्रशांत दीक्षित : prashant.dixit@expressindia.com
Published: Tuesday, December 25, 2012

आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी..
विरामापूर्वीचा हा अखेरचा लेख..
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी तीन मुख्य तत्त्वे सांगितली आहेत. १) जगताना झुंज देणे अपरिहार्य आहे. म्हणून हताश न होता झुंज देण्यास सतत सज्ज राहावे. संकल्प चांगले असून भागत नाही. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी झुंजावेच लागते. २) लोकसंग्रह करीत राहण्याने जगणे अर्थपूर्ण होऊ शकते. किंबहुना लोकसंग्रह हे बुद्धिमान माणसाचे कर्तव्य आहे. ३) वरील दोन तत्त्वे साध्य होण्यासाठी बुद्धीची स्थिरता अत्यावश्यक आहे आणि बुद्धीच्या स्थिरतेसाठी मनाची प्रसन्नता अनिवार्य आहे.
प्रसन्न बुद्धीने झुंज दे, असे परस्परविरोधी वाक्य करणे ही श्रीकृष्णांची खासियत. यातील झुंज द्यावी, लोकसंग्रह करावा हे मनाला पटते. पण त्यासाठी आधी बुद्धी प्रसन्न करा, असे सांगितले. हे पटत नाही. झुंज व लोकसंग्रह साधला की त्यातून यश मिळते. आणि यश मिळाले की मन प्रसन्न होते. प्रसन्नता शेवटी आहे असे आपण मानतो, तर प्रसन्नता प्रथम असे श्रीकृष्ण सांगतात. यातील खरे काय?
श्रीकृष्णांचे म्हणणे खरे आहे असे हार्वर्ड विश्वविद्यालयातील संशोधन सांगते. अर्थात श्रीकृष्णांची तत्त्वे तपासण्यासाठी हे संशोधन झालेले नाही. ते झाले आहे आर्थिक मंदीसारख्या जगासमोरील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी. परंतु, त्या संशोधनातून काढलेले निष्कर्ष हे गीतेतील वर उल्लेख केलेल्या तीन तत्त्वांशी तंतोतंत जुळतात.
शॉन अॅकोर या तरुण संशोधकाने हा विषय हाती घेतला व त्याला साधी, सोपी पण अद्भुत सामथ्र्यशाली अशी तत्त्वे सापडली. अमेरिका हा प्रयोगनिष्ठ देश आहे. तत्त्वे मांडून तेथे चालत नाही. ती प्रयोगाने सिद्ध करावी लागतात. त्यासाठी डेटा जमा करावा लागतो. शॉनने तसे केले. केवळ अमेरिकेतील नव्हे तर ४२ देशांतील निरीक्षणे घेतली. हजारो लोकांची परीक्षा केली. २२५ शोधनिबंधांचा अभ्यास केला. शॉनला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट दिसून आली. समस्येवर मात करण्यासाठी मनाची प्रसन्नता ही पूर्वअट आहे.
समस्येसमोर आपण चिंताग्रस्त होतो. काळजीत पडतो. मनावर ताण येतो. या प्रतिक्रिया समस्येतील गुंतागुंत आणखी वाढवितात. याउलट मन प्रसन्न असले की समस्या सोडविण्याचा मार्ग लवकर दिसतो. स्थिर व प्रसन्न मनाला समस्येचे आकलन चटकन होते.
विज्ञानाच्या भाषेत बोलायचे तर चिंता, काळजी वाढली की भयाला प्रतिसाद देणारे मेंदूतील क्षेत्र उद्दीपित होते. हे केंद्र उद्दीपित झाले की मेंदूतील सर्व ऊर्जा या केंद्राकडे वळते. शरीराची सुरक्षा जपणारे हे केंद्र समस्या सोडविण्यासाठी निरुपयोगी असते. समस्या सोडविण्यासाठी मेंदूतील 'प्रीफ्रन्टल कोर्टेक्स' हा भाग उद्दीपित होणे अत्यावश्यक असते. चिंता वाढली की हा भाग उद्दिपित होत नाही व माणूस गोंधळात पडतो. मात्र मन स्थिर व प्रसन्न असेल तर हाच भाग जास्त उद्दीपित होतो. डोपामाइन व सेरोटोनिन हे स्राव मेंदूत वाहू लागतात आणि समस्येतून मार्ग निघतो. मेंदूत हे स्राव वाहात असले की उत्पादनक्षमता, सर्जनशीलता व समाधान यामध्ये लक्षणीय वाढ कशी होते याची विस्तृत आकडेवारी शॉनच्या शोधनिबंधात मिळते.
मात्र बहुतेकांच्या मेंदूत हे स्राव चटकन वाहात नाहीत. बहुसंख्य माणसे काळजीत पडतात. मेंदूतील भयाचे केंद्रच उद्दीपित होते. पण निराश होण्याचे कारण नाही. यावर सहजसोपा उपाय शॉनने दाखवून दिला आहे. न्यूरोप्लास्टिसिटी या क्षेत्रातील संशोधन असे दाखवून देते की नवीन गोष्ट शिकणे हे मेंदूला कोणत्याही वयात शक्य आहे. मेंदूतील केंद्रे एकमेकांशी व शरीराच्या पंचेंद्रियांशी जोडलेली असतात. परस्परांशी असलेल्या मेंदूतील या जोडण्यांमध्ये परिवर्तन करणे शक्य असते. त्यासाठी एक लहानसा मानसिक व शारीरिक व्यायाम शॉनने सुचविला आहे.
रोज पाच गोष्टी करा, असे शॉन सांगतो. १) कृतज्ञता वाटण्याजोग्या तीन घटना लिहून काढा. २) मित्र वा सहकाऱ्यांना उत्साह वाटेल अशी एखादी कृती सकाळीच करा. ३) अधूनमधून फक्त दोन मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा. ४)दिवसातील एका महत्त्वपूर्ण घटनेवर डायरी लिहून चिंतन करा. ५) दहा मिनिटे व्यायाम करा.
मेंदूची कार्यपद्धती लक्षात घेऊन शॉनने हे उपाय सुचविले आहेत. आसपासच्या परिस्थितीची मेंदू सतत चाळणी करीत असतो. मात्र तो एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करू शकतो. सर्वसाधारणपणे नकारात्मक गोष्टींकडे मेंदूचे आधी लक्ष जाते. सावध राहण्यासाठी ते आवश्यक असते. मात्र यामुळे फक्त नकारात्मक गोष्टीच पाहण्याची सवय मेंदूला लागते. नकारात्मक गोष्टीच मनावर ठसतात, सकारात्मक नजरेतून निसटतात. त्यातून नकारात्मक भावना निर्माण होतात. 'टेट्रीस इफेक्ट' असे शॉन याला म्हणतो. याचे तपशीलवार विवेचन त्याने केले आहे. मात्र नकारात्मक भावनांप्रमाणे मेंदूला 'पॉझिटिव्ह टेट्रीस इफेक्ट'ही तयार करता येतात. ती सवय लावण्यासाठी वरील व्यायाम प्रकार उपयोगी पडतात.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या लोकप्रिय पुस्तकांमधील विवेचनासारखे हे वाटेल. पण शॉन पुराव्यानिशी बोलतो. बहुराष्ट्रीय कंपनीतील व्यवस्थापकांना वरील प्रकार सलग २१ दिवस करण्यास त्याने सांगितले. कार्यक्षमता, अचूकता व समाधान या प्रत्येक आघाडीवर प्रयोग करणाऱ्यांमध्ये तीन आठवडय़ांत मोठा फरक दिसून आला. आश्चर्य म्हणजे चार महिन्यांनंतरही या प्रयोगाचा सकारात्मक परिणाम अनुभवास येत होता. मेंदूला सकारात्मक काम करण्याची सवय लावता येते व अशी सवय लावली तर पुढील बरेच महिने तो उत्साहात काम करतो. अर्थात सकारात्मक भावना निर्माण होतील असे वातावरणही कंपनीत असावे लागते. गुगल, व्हर्जिन, अशा कंपन्यांत असे वातावरण मुद्दाम निर्माण करतात व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवितात.
गीतेमध्ये श्रीकृष्ण पंचेंद्रियांना वळण लावून बुद्धी स्थिर करण्यास सांगतात. शॉनच्या व्यायाम प्रकारात तेच अभिप्रेत आहे. या पाच प्रकारांपैकी दुसऱ्याशी संपर्क ठेवण्याच्या सवयीचा मनाच्या प्रसन्नतेशी सर्वात घनिष्ठ संबंध असतो, असे शॉनला आढ़ळले. कुटुंबाचे, मित्रांचे, समाजाचे सहकार्य आणि शरीरस्वाथ्य याचा थेट संबंध आहे. समाजात रममाण झालेला माणूस जास्त जगतो. याउलट एकटेपणाचा शरीरावर होणारा परिणाम हा उच्च रक्तदाबाइतका घातक असतो. याबाबत खूप संशोधन अन्य समाजशास्त्रज्ञांनीही केले आहे. मात्र आपलेपणाचे असे सुख सर्वानाच मिळते असे नाही. बहुतेक लोक याबाबत कमनशिबी असतात. यावर उपाय म्हणजे स्वत:हून लोकांच्या संपर्कात जाणे व त्यांना मदत करणे. शॉनच्या पाहणीनुसार स्वत:हून घेतलेल्या अशा पुढाकारामुळे मेंदूची कार्यक्षमता खूप वाढते. पुढाकार घेणारे लोक व उदासीन राहणारे लोक यांच्या कार्यक्षमतेतील फरक शॉनने प्रयोगातून दाखवून दिला आहे. लोकांशी स्वत:ला जोडून घेण्याचे फायदे अनेक आहेत. लोकसंग्रहाचा आग्रह गीतेमध्ये का धरला आहे हे यावरून लक्षात येते.
लोकसंग्रह व प्रसन्नता साधली म्हणून सर्वकाही सोपे होत नाही. आयुष्यात अनेक विपरीत गोष्टी घडतच असतात. फसवणूक, गैरसमज, द्वेष, शत्रुत्व, हेवा, असूया अशा अनेक भावनांशी माणसाला सामना करावा लागतो. यातून ताण येतो. ताण सहन झाला नाही की माणूस स्वत:ला शक्तिहीन मानू लागतो आणि मग वेगाने एकटा पडत जातो. ताणाच्या वाईट परिणामांवर आता भरपूर संशोधन झाले आहे. पण त्यामुळे आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी, असा शॉनचा सल्ला आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज द्या, असे तो सांगतो व हा सल्लाही पुन्हा प्रयोगातून सिद्ध करून दाखवितो. आर्थिक मंदीत बँका गटांगळ्या खात होत्या व सर्वत्र नैराश्याचे वातावरण होते. तेव्हा 'यूबीएस'मध्ये शॉनने प्रयोग केला. ताणाचे शरीरावरील वाईट परिणाम दाखविणारी चित्रफीत एका गटाला वारंवार दाखविली तर ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिल्यास मेंदू व शरीराला नवी शक्ती कशी मिळते हे सांगणारी चित्रफीत दुसऱ्या गटाला दाखविली. काही दिवसांनंतर दोन्ही गटांची तपासणी केली असता ताणाकडे आव्हान म्हणून पाहणाऱ्यांची मानसिक व शारीरिक ऊर्जा वाढलेली आढळली. आरोग्याच्या कुरबुरी तर जवळपास नाहीशा झाल्या. कामातील आनंद व आत्मविश्वास वाढला. फायझर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शॉनने दुसरा प्रयोग केला. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या पाच घटना आयुष्यातून निवडण्यास सांगितले. तेव्हा या पाचही वेळा हे अधिकारी खूप ताण सहन करीत होते असे दिसले. ताणामुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व सुदृढ झाले. ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर माणसाची उत्पादनक्षमता कमालीची वाढते असे शॉन ठामपणे सांगतो. ताण म्हणजे सामथ्र्य वाढविण्याची संधी असे समीकरण आहे.
आयुष्यात संघर्ष टाळता येत नाही. मात्र बुद्धीची प्रसन्नता व लोकसंग्रह ही दोन आयुधे हाती असली तर संघर्ष असूनही जगण्याचा आनंद लुटता येतो. मात्र त्यासाठी मेंदूला सकारात्मक विचार करण्याची सवय मुद्दाम लावून घ्यावी लागते. सध्या आजूबाजूला सतत त्रासदायक गोष्टी कानावर येत असताना अशी सवय लावून घेणे अत्यंत कठीण असले तरी सकारात्मक विचार करणे हाच उपाय त्यावर आहे. गीतेमध्ये मांडलेल्या तत्त्वांचा वैज्ञानिक आधार शॉनच्या प्रयोगातून मिळतो. शॉनला भगवद्गीता माहीत नाही तरीही तो श्रीकृष्णांप्रमाणेच सल्ला देतो.
शॉन म्हणतो, 'आनंदाचा मुखवटा चढवा असे मी अजिबात सांगत नाही. समस्या नाहीच अशी स्वत:ची खोटी समजूत घालण्यासही मी सांगत नाही. प्रत्येक घटना ही सुवर्णसंधी माना असला खुळा उपदेशही मी करीत नाही. वेगळ्या सवयी लावून मेंदूमध्ये बदल घडवून आणता येतो व अशा बदलाचे फायदे प्रत्यक्ष दिसतात इतकेच मी सांगू इच्छितो. आपण बदलू शकत नाही अशी समजूत आपल्या मनात समाजाने रुजविली आहे. ती खोटी आहे असे माझे प्रयोग सांगतात. विपरीत परिस्थितीतही चांगल्या गोष्टी शोधून प्रसन्नतेला अग्रक्रम द्या, तशी सवय मेंदूला लावा आणि त्याच्या उत्तम परिणामांचा अनुभव घ्या.'
नवीन वर्षांची सुरुवात शॉनच्या प्रयोगाने करण्यास हरकत नसावी. त्यानिमित्ताने भगवद्गीताही नव्या नजरेने तपासता
येईल.
(मुख्य संदर्भ :  हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्य़ूतील 'पॉझिटिव्ह इंटलिजन्स' हा शोधनिबंध-  जानेवारी २०१२)

Sunday, January 1, 2012


वर्तमानाची निवड...Bookmark and SharePrintE-mail
altचित्रा बेडेकर , शनिवार , ३१ डिसेंबर २०११
मेंदू याच विषयात शास्त्रज्ञ असणाऱ्या डॉ. जिल टेलरला अचानक मेंदूच्या स्ट्रोकला बळी पडावं लागलं. स्मृती नष्ट झालेल्या अवस्थेत नऊ वर्षे असताना तिला मेंदूच्या शक्तीचा साक्षात्कार झाला. जाणिवेपलीकडच्या अद्भुत जगाचं घडलेलं दर्शन तिने शब्दबद्ध केलं आणि भूतकाळ हा अपघात असतो. वर्तमान ही निवड असते, हा साक्षात्कार तिने जगाला घडविला.
कळत-नकळत हातून घडलेले प्रमाद मागे टाकून ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ म्हणत आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करणं बऱ्याचदा शक्य असतं; पण प्रत्यक्ष मरणाच्या दारी पोहोचण्याचा अनुभव घेतलेल्यांनी नवी सुरुवात कशी करावी? याचं उत्तर अमेरिकेतल्या डॉ. जिल टेलर हिच्या अनुभवात आणि जिद्दीत सापडेल.
मेंदूविज्ञान किंवा ज्याला न्यूरो सायन्स म्हणतात, त्या क्षेत्रातल्या संशोधनाला वाहून घेतलेली डॉ. जिल टेलर १९९३ पासून सामाजिक कार्यातही आघाडीवर होती. अमेरिकेतल्या सिझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांच्या ‘नामी’ संघटनेच्या कार्यकारिणीतली ती सर्वात तरुण सभासद होती. मेंदूच्या या विशिष्ट आजाराच्या संदर्भातल्या संशोधनासाठी मृत्यूनंतर अशा रुग्णांचे मेंदू मिळविण्यासाठी तिने मेंदूदानाच्या प्रचाराची एक मोहीमसुद्धा हाती घेतली होती. वयाच्या ३७ वर्षांंपर्यंत काम, काम आणि फक्त काम करणाऱ्या डॉ. जिलला नियतीच्या एका फटकाऱ्यात आपल्या बऱ्याचशा क्षमता गमवाव्या लागल्या.
१० डिसेंबर १९९६ च्या सकाळी जिलच्या मेंदूच्या डाव्या भागात अचानक रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर अवघ्या चार तासात आपलं चालणं, बोलणं, वाचणं, लिहिणं, गतायुष्यातल्या आठवणी, सातत्याने स्वत:चा स्वत:शी चालणारा आत्मसंवाद आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव अशा एकेक क्षमता ती गमावून बसली होती. बाहेरच्या जगाच्या तुलनेत आपलं शरीर नेमकं कुठे सुरू होतंय आणि कुठे संपतंय याचं भान गेलं होतं. स्वत:च्या घनरूप अस्तित्वाची, वेगळेपणाची जाणीव नष्ट झाली होती. त्याऐवजी आपण द्रवस्थितीत असल्याचा अनुभव ती घेत होती. फक्त एकाच बाबतीत ती सुदैवी ठरली होती. स्ट्रोक येताना किंवा त्यानंतर ती कधीच बेशुद्ध पडली नव्हती. यामुळे आपल्या मेंदूत काय चाललंय हे आतून तिला समजत होतं.
त्यानंतर आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी जिद्दीने डॉ. जिलने आपल्या मेंदूच्या गमावलेल्या बहुतेक सर्व क्षमता परत मिळवल्या. आजसुद्धा ती मेंदूरचनाशास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहे. त्यासोबतच त्या क्षेत्रातली सल्लागार आणि मनोरुग्णांची राष्ट्रीय पातळीवरची प्रवक्ती या जबाबदाऱ्यासुद्धा ती समर्थपणे पार पाडत आहे. ‘नामी’ संघटनेची अजूनही ती खंदी कार्यकर्ती आहे. एवढंच नव्हे, तर ‘टाइम मॅगेझिन’च्या जगात सर्वात प्रभावी असणाऱ्या २००८ सालातल्या १०० माणसांच्या यादीतसुद्धा डॉ. जिल टेलरचं नाव आहे.
स्वत:ला बरं करण्याच्या त्या आठ वषार्ंत जिलच्या आयुष्यात योग्य वेळी चालून आलेल्या संधी आणि प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तिला भेटलेली योग्य माणसं यांचा महत्त्वाचा वाटा होता, हे ती स्वत:च मान्य करते. मुख्य म्हणजे तिच्या कर्तबगार, समंजस, कर्तव्यदक्ष आणि बालसंगोपनात निष्णात असणाऱ्या आईची अत्यंत मोलाची खंबीर साथ तिला मिळाली होती. अशी आई लाभणं हे आपलं भाग्यच आहे, असं जिल अभिमानाने सांगते.
जिल स्वत: मेंदूशास्त्रज्ञ असल्यामुळे स्ट्रोकने आपल्या मेंदूत नेमका काय बिघाड झालाय आणि तो कसा दुरुस्त करायला हवा, याचं संपूर्ण शास्त्रशुद्ध ज्ञान तिला होतं. त्याचा आतून प्रत्यक्ष अनुभव मात्र स्ट्रोकमुळेच तिला मिळाला. मेंदूच्या आकलनापलीकडे असणाऱ्या काही सामथ्यार्ंचा साक्षात्कार, जाणिवांपलीकडील जागृतावस्थेचा विलक्षण अनुभव जिलने या काळात घेतले व शब्दबद्ध केले.
या सर्वांहून आणखी एका बाबतीत जिलचं वेगळेपण लक्षात घ्यावं लागेल. माणसाचा मेंदू म्हणजे सतत बदलत जाणारा एक विलक्षण गतिशील अवयव आहे. बाहेरून येणाऱ्या संवेदनांनुसार मेंदूपेशींच्या म्हणजेच न्यूरॉन्सच्या आपापसातल्या जोडण्या बदलण्याची अद्भुत क्षमता मेंदूकडे असते. मेंदूच्या या लवचिकतेमुळे म्हणजेच ‘प्लास्टिसिटी’मुळे मेंदू आपल्या हरवलेल्या बऱ्याचशा क्षमता पुन्हा परत मिळवू शकतो. मेंदूच्या या निसर्गदत्त क्षमतेवर डॉ. जिलने संपूर्ण विश्वास टाकला. स्वत:च स्वत:ला बरं करण्याच्या मेंदूच्या या नैसर्गिक प्रक्रियेत होऊ शकणारा अवास्तव वैद्यकीय हस्तक्षेप जाणीवपूर्वक टाळण्यासाठी जिलने स्वत:च्या अखत्यारित काही धाडसी निर्णय घेतले होते. स्वत: न्यूरो सायटिंस्ट असणं ही जिलची सर्वात मोठी जमेची बाब होती.
एखाद्या दुर्घटनेतून किंवा धक्कादायक प्रसंगातून निर्धाराने बाहेर येण्यासाठी माणसाला तीव्र जीवनेच्छा आणि पुढच्या आयुष्याचं भरभक्कम उद्दिष्ट असावं लागतं. जिलकडे या दोन्ही गोष्टी होत्या. स्ट्रोक आला त्या क्षणापासून स्वत:ला कायमचं अपंग होण्यापासून वाचविण्याची तिला आतून तीव्रतेने निकड वाटत होती. त्यामुळे तातडीने वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी तिने जिवाच्या कराराने धडपड केली. स्ट्रोकग्रस्त रुग्णाला हानीकारक ठरू शकणारी प्रस्थापित वैद्यकीय शुश्रूषा निर्भीडपणे नाकारून आपल्या पुनर्वसनाचं सुकाणू तिने स्वत:च्या हाती घेतलं. स्ट्रोकमुळे आपल्या मेंदूच्या पेशींना पोहोचलेला जबरदस्त आघात लक्षात घेऊन त्यांना आवश्यक ती विश्रांती देणं आणि त्यांच्या नैसर्गिक गतीने बरं होण्याची त्यांना उसंत देणं याला जिलने सर्वोच्च प्राधान्य दिलं.
उरलेल्या आयुष्यात कोणत्या उद्दिष्टांसाठी आपल्याला झटायचंय याची जिलला स्पष्ट जाणीव होती. स्ट्रोकमुळे आपल्याला आलेला अनुभव इतरांपर्यंत पोहोचवून स्ट्रोक येण्यापासून स्वत:ला वाचविणं त्यांना शक्य व्हावं म्हणून स्वत:चा अनुभव शब्दबद्ध करणं हे जिलचं नवं उद्दिष्ट होतं. स्ट्रोकनंतरच्या सात-आठ, वर्षांत ती बहुतांशी आपल्या मेंदूच्या उजव्या अर्धगोलाच्या प्रभावाखाली होती. असा अनुभव घेणारी ती जगातली बहुधा एकमेव व्यक्ती असावी. त्या काळात तिला एक प्रकारची आंतरिक शांतता लाभली होती आणि विश्वाशी आपण एकरूप असल्याचा अनुभव आला होता. प्रत्येकाने परिश्रमपूर्वक आपल्या मेंदूच्या उजव्या भागाच्या प्रभावाखाली वर्तमान क्षणात जगायचं ठरवलं तर स्ट्रोक न येतासुद्धा असा अनुभव कुणालाही घेता येतो. मेंदूचं हे रहस्य स्ट्रोकमुळेच जिलला उमगलं होतं. स्ट्रोकने तिला घडवलेला हाच खरा साक्षात्कार होता. तो साक्षात्कारसुद्धा इतरांसमोर तिला मांडायचा होता.
आपलं पूर्वायुष्य विसरून आयुष्याची नवी सुरुवात एखादी व्यक्ती जेव्हा करू बघते, त्या वेळी आजूबाजूची माणसं आणि समाज यांनीसुद्धा पुरेसा समंजसपणा दाखवणं आवश्यक असतं. आपलं स्ट्रोकपूर्वीचं व्यक्तिमत्त्व तसंच तंतोतंत पुन्हा लाभणार नाही हे सत्य जिलने स्वीकारलं होतं. इतरांनीसुद्धा ते स्वीकारून पुढच्या आयुष्यात तिला जे काय करायचं आहे त्याचा आदर बाळगून तिला सहकार्य द्यावं, अशी जिलची अपेक्षा होती. स्ट्रोकच्या अनुभवाने तिला जितकं मेंदूच्या आंतरिक सौंदर्याचं आणि लवचिकतेचं मनोहारी दर्शन घडलं होतं. तितकंच मानवी मनाचं औदार्यसुद्धा दिसून आलं होतं. आयुष्यात तिला पुन्हा कार्यक्षम बनविणाऱ्या या सर्व घटकांबद्दल जिल कृतज्ञता बाळगून आहे.
जिलच्या या अनोख्या अनुभवाचं मुक्तकथन लोकवाङ्मयगृहाने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘मेंदूच्या अंतरंगात’ या पुस्तकातून करताना मला तिच्यातली पराकोटीची जिद्द आणि चिकाटी स्तिमित करून गेली. स्वत:च्या हरवलेल्या क्षमता परत मिळविण्याच्या प्रयत्नात आपल्या व्यक्तिमत्त्वातले नकोसे वाटणारे पैलू तिने शर्थीने प्रत्येक क्षणी माघारी परतवले. स्वत:ला नव्याने मनाजोगतं घडविताना क्षणोक्षणी स्वत:शी करावा लागणारा हा संघर्ष आयुष्याच्या अंतापर्यंत सुरू ठेवण्याची जिलची मानसिक तयारी आहे.
Source - loksatta.com Url - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=202584:2011-12-30-07-35-32&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194