आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. नियती चितलिया - शनिवार, १८ फेब्रुवारी २०१२ Chaturang@expressindia.com आपण चूल पेटवितो तेव्हा जर त्यात खूप लाकडं घातली तर विस्तव चोंदतो, पण त्यातली लाकडं जरा कमी केली की तो विस्तव मस्त पेटू लागतो. हेच होतं अभ्यासाचं. मुलांना फक्त अभ्यास एके अभ्यास करायला दिला तर ते कंटाळतात. त्यांना मध्येमध्ये खेळाचे, कलेचे ब्रेक द्यायला हवेत.मुलांकडून पालकांच्या अपेक्षा अगदी मुलं जन्मल्यापासूनच चालू होतात. मलांनी शांत झोपावं, मोठी झाली की मस्ती करू नये, अभ्यास नीट करावा, मार्क्स उत्तम मिळवावेत, सांगितलेली सगळी कामं नीट करावीत, पण मुलांना जगू देण्याकडे कोणाचा कल नसतो. पालकांचा त्रागा असतो, दिवसभर नोकरी करून राबतो, पैसे मिळवितो आणि यांना साधा अभ्यास करायचाय तोसुद्धा नीट करता येत नाही! फक्त अभ्यास करायचाय- तोसुद्धा नीट करता येत नाही- का? याची कारणमीमांसा आजच्या लेखात आपण शोधणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या मुलांनी नीट अभ्यास करायला हवा असेल तर हा त्रागा दूर करा. त्यासाठी पालकहो, तुमचा १०० टक्के सहभाग लागेल आणि मग बघा मुलांमध्ये किती फरक होतो, बदल होतो ते. लक्षात घ्या- किती सुधारणा होते हा शब्दप्रयोग मी केलेला नाही. कटाक्षानेच, कारण माझ्या दृष्टीने मुलं सुधारलेलीच असतात. आजूबाजूचं वातावरण, पालकांची वागणूक याचा परिणाम त्यांच्यावर होतो आणि म्हणून ती जशी वागतात तशी मुले वागतात. पालकांचं वागणं चुकीचं, पण मुलांचं बरोबरच आणि योग्यच असायला हवं- हे कसं शक्य आहे? पालक जसं बोलतात, वागतात त्याची छाप मुलांवर पडते; किंबहुना पहिली छाप जी मुलांवर पडते ती पालकांच्याच वागणुकीची. म्हणून प्रथम मुलांची तक्रार करताना पालकांनी स्वत:ची वागणूक तपासून पाहावी. आपण मुलांकडून काय अपेक्षा करतो त्याचा नीट विचार करावा. उदा. एक आई-बाबा त्यांच्या मुलाला माझ्याकडे घेऊन आले. ते असं सांगत की, त्याच्या काही लक्षात राहात नाही. मी नीट खोलात जाऊन विचारल्यावर असं लक्षात आलं की, पालक नोकरीला जातात आणि मूल घरात असतं. त्याला सकाळी पालक निघताना कामवाल्या बाईकडून काय काय काम करवून घ्यायचं ते सांगतात, ते त्या मुलाच्या लक्षात राहत नाहीत. आता वाचकहो, नीट विचार करा की, बाईला काय कामं सांगायची हे त्या मुलाचं काम नाही, पालकांचं आहे! मुलाची जबाबदारी मुळी लहानशा वयात घर सांभाळायची नाहीच! मी हे त्या पालकांना समजावून सांगितलं आणि बाईसाठी चिठ्ठी लिहून ठेवायला सांगितली. लहानपणी मुलांनी खेळावं, बागडावं, वाचावं आणि गोष्टी ऐकाव्यात, गाणी गावीत आणि या सगळ्या गोष्टींमधून ज्ञान प्राप्त करावं. पण खरं तर होतं उलटंच. पालकत्व ही एक जबाबदारी आहे, एक कला आहे ती आनंदाने पार पाडावी. अंगावर येऊन पडलेल्या बोजाप्रमाणे उरकून टाकू नये. सांगायचा मुद्दा हाच की, या अशा पद्धतीने अपेक्षांची सुरुवात होते. मग अभ्यासाबाबतची अपेक्षा, मार्काची अपेक्षा आणि मग या अपेक्षांच्या डोंगराखाली ते मूल साफ गाडलं जातं. त्यात आणि माणूस स्वभाव असा असतो की, मूल पालकांना खुष करायला मग स्वत:ला रेटत रेटत आवडत असो नसो वाट्टेल ते करू लागते. पालकांच्या ‘आम्ही दिवस-रात्र राबतो तुझ्यासाठीच, तुझ्या आनंदासाठी!’ या वाक्याच्या बोजा इतका जड असतो की, तो मुलांना आयुष्यभर पुरतो. आपल्याकडे मी तुझ्यासाठी अमुक आणि एवढं केलं, तर तू माझ्यासाठी करायलाच हवं! ही वृत्ती, ही विचारसरणीच मुळी चुकीची आहे. वाचकांच्या लक्षात आलं असेल की, ही अपेक्षा किती आधीपासून सुरू होते आणि जसजसे दिवस जातात तसतशी अपेक्षा वाढतच जाते. त्यामुळे अभ्याससुद्धा अपेक्षेनेच केला जातो. आनंदासाठी नाही- मार्कासाठी! मुलांची आवड-निवड तुमच्यासारखीच असावी असा आग्रह कशाला. म्हणूनच अगदी शाळा सुरू होण्यापूर्वी घरात मुलांना छोटय़ा छोटय़ा गोष्टी शिकवायला सुरुवात करायची असते. त्या त्यांना पुढचा अभ्यास कळावा, सोपा जावा याच्यासाठीच मुलं लहान असताना त्यांना पुष्कळ गोष्टी सांगाव्यात. लहान मुलांची पुष्कळ मासिकं बाजारात मिळतात. जर तुम्हाला गोष्टी सुचत नसतील तर त्या गोष्टी मुलांना वाचून दाखवा. त्यातील जी गोष्ट त्यांना आवडेल ती गोष्ट पुन:पुन्हा अगदी १०० वेळासुद्धा वाचून दाखवा. या अशा वाचनाने मुलांची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती खूप वाढते. इतिहासातल्या गोष्टी सांगाव्यात, पण एक गोष्ट कटाक्षाने टाळावी. ती म्हणजे, टी. व्ही.समोर बसविणे आणि फक्त गोष्टींच्या तयार कॅसेट ऐकविणे. तयार गोष्टी ऐकवाव्यात, पण त्या अगदी कमीत कमी. स्वत: गोष्टी सांगणे, त्या सांगता सांगता आवाज बदलणे, हातवारे करून सांगणे हे मुलांच्या मनावर खोलवर छाप पाडतं. जसजसं मूल शिशूवर्गातून बालवर्गात जातं तसातसा अभ्यास वाढत जातो. त्यातील इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास हे विषय मुलांना नेहमीच गोष्टीरूपाने सांगावेत. हे विषय त्यांची कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्या या विषयातील पुस्तकांचे धडे अगोदरच घरी वाचून मग त्यांच्या गोष्टी बनवून त्या मुलांना सांगितल्या तर मुलांना तो अभ्यास झाल्यासारखा वाटतही नाही. पण अभ्यास होतो आणि मगच अभ्यासाशी मैत्री होते. शाळेतून जो गृहपाठ दिला जातो त्याचं दोन भागांत विभाजन करावं. एक अशा प्रकारचा अभ्यास असतो जो नुसता पुस्तकातून उतरवून काढायचा असतो आणि एक गणितासारखा जो वेगळा असतो आणि विद्यार्थ्यांनी सोडवायचा असतो. जो पुस्तकातून उतरवून काढायचा असतो तो परत दोन प्रकारांनी करायचा असतो. एक- ती उत्तरं मुलांकडून सोप्या भाषेत पाठ करून घ्यायची. मजकूर समजला असेल तर पाठांतर सोपं जातं. जरी शिक्षक आणि शिक्षणपद्धती पुस्तकातीलच शब्द मागत असली तरी मुलांना स्वत:च्या आणि सोप्या भाषेतच उत्तर लिहायला प्रोत्साहन द्यावं. नाहीतर मुलांचा शब्दसंग्रह वाढणार नाही! मार्काना महत्त्व देणंच मुळी सोडा. मार्क समजा शंभरापैकी शंभर असतील, पण स्वत:च्या भाषेत साधा निबंध लिहिता आला नाही तर त्या गुणांचा का उपयोग. पैकीच्या पैकी मार्क मिळवून जीवनात उपयोग काय? म्हणून पालकहो, ‘लुक अॅट द बिग पिक्चर’. मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं असं वाटत असेल तर शिक्षण पद्धतीपासून वेगळे व्हा! दोन - मुलांना लिहायला सांगून तुम्ही सोप्या भाषेत त्यांना ‘डिक्टेट’ करा आणि ती लिहितील. मग ते उत्तर पाठ करायला सांगा. आज तर इंटरनेटवर इतिहास, भूगोल, इंग्रजी या विषयांचे जे धडे असतात त्याची सखोल माहिती मिळते. ती माहिती आपण स्वत: वाचून ठेवून मुलांना सांगता येते किंवा त्याची कॉपी प्रिंटरमधून काढून ती मुलांना वाचायला द्यावी. हा असा अभ्यास केला तर ती मुलांना गंमत वाटते. समजा पालकहो, तुम्हाला दिवसभर एकच एक काम महिनोन् महिने करायला सांगितलं तर तुम्हाला आवडेल का? मग मुलांना सकाळी शाळा, मग टय़ुशन, मग शाळेचा अभ्यास, मग शिकवणीचा अभ्यास, दिवसभर नुसता अभ्यास एके अभ्यास. त्यांना नाही का येणार कंटाळा? माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला शाळेत कमी मार्क मिळतात म्हणून घेऊन आले. त्या मुलाचा दिनक्रम विचारला तर असाच शाळा, शिकवणी मग दोघांचा गृहपाठ. पालकांना मी असा सल्ला दिला की, शिकवणी प्रथम बंद करा. मुलाला व्यायामशाळेत किंवा फुटबॉल, क्रिकेट तुमच्या आजूबाजूला जे असेल त्याच्यात घाला. मुलाला सांगितलं शाळेत फ्री असशील तेव्हा गृहपाठ तिथेच करून यायचा प्रयत्न कर. त्यांच्या घराजवळच एक सुप्रसिद्ध व्यायामशाळा होती. तिथे मुलगा जाईल, पण पालकांना प्रश्न असा होता की, जर शाळा, शिकवणी असून मुलाला मार्क कमी पडतात तर अभ्यास कमी करून मार्क कसे वाढतील. त्यांना सबंध अभ्यास प्रक्रिया समजावून सांगितली. एक तर मूल जरी खूप वेळ अभ्यास करीत असलं तरी त्याचं लक्ष त्यात आहे का? परत आपण चूल पेटवितो तेव्हा जर त्यात खूप लाकडं घातली तर विस्तव चोंदतो, पण त्यातली लाकडं जरा कमी केली की तो विस्तव मस्त पेटू लागतो. हेच होतं अभ्यासाचं. पालकांना सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे करा आणि बघा मुलाचे मार्क वाढतील. त्याला शाळा, अभ्यास सगळंच आवडायला लागेल आणि अगदी असंच झालं. लगेच चाचणी परीक्षा होती त्यात प्रत्येक विषयात ५-७ मार्क वाढले. मग फायनल परीक्षा होती त्याच्यात तर १५-२० मार्क प्रत्येक विषयात वाढले. आता ज्या मुलाला ६०-६५ टक्के मार्क मिळत होते त्याला ९० टक्के मार्क मिळायला लागले आहेत. शिवाय व्यायामशाळेत जात असल्याने उंची छान वाढते आहे आणि सगळेच खूश आहेत. नुसता जास्त वेळ अभ्यास केला तर जास्त अभ्यास होत नाही, पण तो लक्षपूर्वक केला पाहिजे. मग अगदी तासभर केला तरी हरकत नाही, पण तो मन लावून करावा. पालकांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, शाळा मुलांसाठी आहे, मुलं शाळेसाठी नाहीत. त्यांना रेटून रेटून अभ्यास करून घेण्याने त्यांचे मार्क वाढतील आणि त्यामुळे शाळेची सरासरी वाढेल. म्हणून शाळा पालकांच्या मागे लागून मुलांकडून अभ्यास करून घ्यायला लावतात आणि पालक पण याला बळी पडून मुलांकडून मागे लागून लागून अभ्यास करून घेतात, पण त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान मुलांचंच होतं. पण अभ्यासाची सवय जायला नको म्हणून सुट्टीतसुद्धा मुलांकडून अभ्यास करवून घेणारे पालक बघितले की, त्या पालकांना काय म्हणावं कळत नाही आणि त्या मुलांना कोणी सोडवणारा मिळेल का? की त्याचं आयुष्य हे असंच वाया जाणार हे कळत नाही, पण मन सुन्न मात्र होऊन जातं.
Source- loksatta.com
|
Monday, February 20, 2012
अभ्यासाशी मैत्री : हवे खेळांचे ब्रेक्स ..
Thursday, February 2, 2012
शिजविलेलाटोमॅटो खा, कर्करोग टाळा!
प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असल्याचा अभ्यासकांचा दावा
पी.टी.आय. लंडन
टोमॅटो ही दैनंदिन आहारात कोशिंबीर आणि पूरक तोंडी लागणारी फळभाजी अधिक प्रमाणात घेण्याची वेळ आली आहे. आमसर चवीव्यरिक्त शरीरात पूरस्थ ग्रंथींचा कर्करोग (प्रोस्टेट कॅन्सर ) निर्माण करणाऱ्या घातक पेशी नष्ट करण्यामध्ये शिजविलेल्या टोमॅटोतील पोषणतत्त्वे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरीत असल्याचे नव्या अभ्यासातून पुढे आले आहे. पोर्टस्माऊथ विद्यापीठाच्या भारतीय वंशीय संशोधक डॉ. मृदूला चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाहणीमध्ये टोमॅटोच्या या गुणांचे महत्त्व लक्षात आले.
कर्करोगांच्या पेशी शरीरातील रक्तामध्ये शिरून पसरू लागतात. शिजविलेल्या टोमॅटोमधील लायकोपेन या पोषणतत्त्वाद्वारे या पेशींना पसरण्यात अटकाव केला जातो. तसेच त्यांना नष्ट करण्यात मदत होते असे या अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. या पोषणतत्त्वाद्वारेचे टोमॅटोला तांबडा रंग येतो. रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यातही या पेशींचा खूप उपयोग होतो. मानवी शरीरात आता या पोषणतत्त्वांचा उपयोग कसा करता येईल यावर अभ्यासक पुढील संशोधन करीत असल्याचे, डेली टेलिग्राफने म्हटले आहे.
प्रयोगशाळेमध्ये पूरस्थ ग्रंथी कर्करोगाच्या पेशींवर या पोषणतत्त्वांनी सर्वाधिक परिणाम केल्याचे या अभ्यासकांना लक्षात आले. ही पोषणतत्त्वे सर्वच लाल रंगांची फळे आणि फळभाज्यांमध्ये आढळतात. मात्र त्यांचे प्रमाण शिजविलेल्या टोमॅटोमध्ये सर्वाधिक असतात. शिजविलेल्या टोमॅटोमध्ये असलेली ही पोषणतत्त्वे आहारातून सहजपणे शरीरास लाभदायक ठरत असल्याचा दावा चोप्रा यांनी केला आहे. या अभ्यासाचा तपशील ‘ब्रिटिश जरनल ऑफ न्यूट्रिशन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Source- loksatta.com
url- http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=208298:2012-02-01-15-56-12&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4
Source- loksatta.com
url- http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=208298:2012-02-01-15-56-12&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4
Subscribe to:
Posts (Atom)