Sunday, June 2, 2013

कट्टा मुलांचा - कोवळ्या आई-बाबांसाठी : बाळाची आंघोळ - एक आनंदसोहळा


डॉ. लीली जोशी - drlilyjoshi@gmail.com
Published: Saturday, June 1, 2013
Reference - Loksatta.com
सु ' जा ' ण ' पा ' ल ' क ' त्व

आंघोळ स्वच्छतेसाठी आवश्यक आहेच, पण स्पर्शातून संवाद साधण्याची, प्रेम व्यक्त करण्याची, जलक्रीडेचा आनंद लुटायला बाळाला शिकवण्याची ती अमूल्य संधीसुद्धा आहे. कोवळय़ा आईबाबांनो, दिवसभर तुम्ही कितीही कामात असलात, तुमच्या बाळाला अन्य व्यक्तींनी सांभाळलं असलं तरी त्याला आंघोळ घालण्याचा हा अत्यंत जवळिकीचा आनंदसोहळा तुम्ही आवर्जून पार पाडावा असं वाटतं.
न्हाऊमाखू घातलेलं, काजळतीट लावलेलं गोजिरवाणं बाळ म्हणजे साऱ्या घरादाराचा आनंदाचा ठेवा! त्याच्या आंघोळीसाठी केवढी बडदास्त, केवढी पूर्वतयारी! आंघोळ घालणारे आणि पाहणारे दोघेही उत्सुक. आंघोळीआधीचं तेल लावणं, ऊन ऊन पाणी, दुधात कालवलेलं बेसन किंवा मसूरपीठ, नंतरची शेकशेगडी.. पण ज्याच्यासाठी हे सगळं चाललंय त्या बाळाला त्यात मजा येतेय का, हसतंय का ते आंघोळ घालताना?
पूर्वापार बाळाची आंघोळ व्यावसायिक सुईणींवर सोपवली जायची. अजूनही तीच पद्धत अनेक ठिकाणी आहे. दिवसाकाठी अनेक घरी जाणाऱ्या या बायका त्यांच्या सोयीनुसार येणार, बाळ झोपलेलं असेल, भुकेलेलं असेल किंवा नुकतंच प्यायलेलं असेल तरी त्याला पटकन पायावर घेणार. तेलानं रगडून हातपाय ताणून गरमगरम पाण्याचे तांबे ओतणार. डाळीचं पीठ खसखसून लावणार, मग आणखी पाणी. बाळ बहुतेक वेळा भोकांड पसरतं, रडून लाल होतं. अशातच अंग पुसून त्याला कपडे चढवले जातात. कष्टकरी भेगाळलेली बोटं डोळय़ांत काजळ भरतात. बाळ अजूनच रडतं. अश्रूंबरोबर काजळाचे ओघळ गालांवर येतात. बाळाला पाळण्यात घालून जोरात झोके दिले जातात. हुंदके देत दमून भागून बाळ डोळे मिटतं, ही यशस्वी आंघोळ समजायची?
खरंच, हे दृश्य बदलता येणार नाही का? आंघोळ स्वच्छतेसाठी आवश्यक आहेच, पण स्पर्शातून संवाद साधण्याची, प्रेम व्यक्त करण्याची, जलक्रीडेचा आनंद लुटायला बाळाला शिकवण्याची ती अमूल्य संधीसुद्धा आहे.
नवजात बाळाची नाळ पूर्ण पडून जाऊन बेंबी कोरडी होईपर्यंत (जन्मानंतर सुमारे ८-१० दिवस) आंघोळ घालूच नये. टप्प्याटप्प्यानं एक-एक भाग उघडा करत डोक्यापासून पायापर्यंत अंग नुसतं पुसून घ्यायचं. बाळाचा लंगोट बेंबीला घासणार नाही ही काळजी घेऊन कपडे घालायचे. एकदा नाळ पडून गेली की मग आंघोळीची सुरुवात. त्यासाठी आवश्यक गोष्टींची जमवाजमव अगोदरच करायची. आंघोळ घालणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ पाहिजेत आणि नखं कापलेली. बाळाची झोप झालीय, दूध पिऊनही तासभर झालाय अशी वेळ आंघोळीसाठी उत्तम. सकाळच्या घाईत नाही जमलं तर संध्याकाळीसुद्धा चालेल. त्यासाठी गादीवर एक रबर पसरा.  एका बास्केटमध्ये तेलाची बाटली, बेबी लोशन, कंगवा, एक-दोन आवडीची खेळणी किंवा पुस्तक, 'शी'च्या जागी लावण्याचं क्रीम हे सगळं जवळ ठेवा. दुसऱ्या बाजूला पंचा, आंघोळीनंतर घालण्याचे कपडे मांडून ठेवा. आता बादलीत समशीतोष्ण पाणी काढा. (कोपर बुडवून तपासून पाहा.) छोटासा मग ठेवा. बेबी सोप, शाम्पू तयार ठेवा.
एवढी तयारी झाली की खोलीच्या खिडक्या, दारं बंद करा म्हणजे बाळाच्या ओल्या अंगावर वारा बसणार नाही. आता बाळाशी खेळत, गप्पा मारत त्याला रबरावर निजवा. कपडे काढा. लंगोट सगळय़ात शेवटी काढा. हातावर तेल घेऊन त्याला आवडेल एवढाच जोर लावून त्याचं डोकं, छाती, पोट, हातपाय चोळा. चेहऱ्याला तेल लावू नका. नाकात, कानात तेल घालू नका. नंतर त्याला पालथं ठेवा. डोकं एका बाजूला वळवून ठेवा. मान, पाठ, पायाची मागची बाजू यांना मसाज करा. हे करताना बोटं वर्तुळाकार फिरवा. हळूहळू दाब द्या. बाळाला आराम वाटला पाहिजे. बरोबरच्या व्यक्तीनं या वेळी एखादा खुळखुळा वाजवून, चित्र दाखवून त्याला आनंदात ठेवावं. 
आजकाल बाळाला आंघोळ घालण्यासाठी एका बाजूला उतरते असलेले खास टब मिळतात किंवा साधा घरातला प्लॅस्टिक टबसुद्धा चालेल. बाळ घसरू नये म्हणून त्यावर एक टॉवेल अंथरा आणि कोमट पाणी घालून तो टब ५ ते १० सेंमी (बाळाच्या आकारानुसार) इतका भरा आणि बाळाच्या मानेखाली हात देऊन त्याला हळूच पाण्यात उतरवा. छोटय़ा मगनं पाणी घालून हळूहळू त्याचं अंग, डोकं ओलं करा. चेहरा, नाक, डोळे, कान, कानामागची बाजू हातानं चोळून स्वच्छ करा. साबण वापरायचा नाही. डोळे स्वच्छ करण्यासाठी र्निजतुक कापसाचे ओले बोळे वापरू शकता. केसांना शाम्पूसुद्धा आठवडय़ातून एक-दोन वेळा पुरे. डोक्यावर पाणी घालताना ते नाका-डोळय़ांत जाणार नाही अशी काळजी घ्या. यासाठी मानेखाली हात देऊन डोकं पलीकडे वाकवू शकता (ब्युटी पार्लरमध्ये केस धुतात त्याप्रमाणे) किंवा कपाळावर हात धरून मग डोक्यावर पाणी घालू शकता. यानंतर गळा, छाती, हात, पोट हे धुऊन काढा. तळहातांना साबण लावा. हेच तळवे रांगताना जमिनीवर आपटतात किंवा सरळ तोंडात घातले जातात. नंतर पाय धुवा. शेवटी 'शू'ची जागा आणि त्यानंतर 'शी'ची जागा धुवा. इथे साबण लागेल. आता बाळाला पालथे झोपवून पाठीकडचा भाग स्वच्छ करा. बाळ मान सावरायला लागेपर्यंत आंघोळीच्या वेळी तुमचा एक हात सतत बाळाच्या मानेला, डोक्याला आधार द्यायला वापरा. म्हणूनच या काळात एका वेळी दोन व्यक्तींची आंघोळ घालताना गरज पडते. बाळाला क्षणभरही पाण्यात एकटं ठेवू नका.
आता शरीराची स्वच्छता करून झाली. बाळाला पाण्यातून बाहेर काढण्यापूर्वी आणि आंघोळीदरम्यानही पाण्याशी खेळायला शिकवा. टबमधल्या पाण्यावर हात आपटणं, पाण्यात तरंगणारी मासा, बदक यांसारखी खेळणी यात बाळाला खूप मजा वाटते. नंतर बाळाला पाण्यातून बाहेर काढा. मऊ पंचामध्ये अंग गुंडाळून घ्या. दुसऱ्या छोटय़ा पंचानं त्याचं डोकं, चेहरा, कानामागची जागा, गळा पुसून घ्या. नंतर बाकीचं अंग पुसा, काखा, जांघा, मांडय़ा, गुडघे याकडे विशेष लक्ष द्या. सर्वागाला बेबी लोशन लावा. बेबी पावडरचा उपयोग बाळाला घामोळं असेल, हवा खूप गरम असेल तरच करा. 'शी'ची जागा लाल असेल तर क्रीम लावा. बहुतेक बालरोगतज्ज्ञांच्या मते काजळ घालू नये. घालायचंच तर ते घरी केलेलं मऊ ताजं, शुद्ध असावं. घालणारीचे हात स्वच्छ धुतलेले असावेत.
त्यानंतर बाळाला अनेकवार धुतलेले रुंद गळय़ाचे, मऊ सुती कपडे घालावेत. आपल्या देशात रोज डिसपोजेबल डायपर वापरण्याची गरज नाही. त्याचा खर्चही खूप आणि पर्यावरणाच्या दृष्टीनंही ते योग्य नाही. 'डायपर रॅश' टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वच्छ सुती धुऊन वापरण्याचे लंगोट. दिवसातून साधारण २० लंगोट लागू शकतात. बाळाला तेल, हळद, पीठ, साबण, शाम्पू, काजळ या कशाचीही अ‍ॅलर्जी येऊ शकते. लाल पुरळ दिसल्यास हे सगळं थांबवावंच, पण पाणीही अगदी कोमट वापरावं.
बाळ आजारी, अशक्त, कमी वजनाचं किंवा अपुऱ्या दिवसांचं असेल तर आंघोळ न घालता अंग पुसून घेणं चांगलं. बेबी बड वापरून बाळाचे कान, नाक स्वच्छ करू नका, त्यामुळे इजा होऊ शकते. नखं मऊ असतात, पण वाढतात भराभर. बाळ झोपलेलं असताना छोटय़ा कात्रीनं आईबाबांनी ती कापावीत. नाहीतर बाळ स्वत:ला ओरबाडून घेतं.
बाळाला दात यायच्या आधीपासून मऊ मलमलच्या स्वच्छ कपडय़ानं त्याच्या हिरडय़ा दिवसातून तीन-चार वेळा पुसून घ्याव्यात. दात येऊ लागले की बेबी ब्रश वापरायला सुरुवात करा. हे ब्रश अगदी मऊ, जखमा न करणारे असतात. बाळाची टूथपेस्टसुद्धा वेगळी असते. ती पोटात गेली तरी सुरक्षित असते. बाळाला चुळा भरता येत नाहीत. म्हणून त्याला वारंवार, विशेषत: खाणं झाल्यावर पाणी प्यायला द्यावं.
पाण्याचा स्पर्श, पाण्यातला खेळ यामुळे अनेक सुखद संवेदना होतात. बाळाची पाण्याशी मैत्रीच जडते. काही आईबाबा थोडय़ा मोठय़ा बाळाबरोबर स्वत:ही आंघोळ करून या मैत्रीला अजून एक परिमाण देतात. टबमध्ये खेळणारं, खिदळणारं बाळ पुढेही पाण्याची भीती बाळगत नाही. आंघोळ ही क्रीडा ठरते. कोवळय़ा आईबाबांनो, दिवसभर तुम्ही कितीही कामात असलात, तुमच्या बाळाला अन्य व्यक्तींनी सांभाळलं असलं तरी त्याला आंघोळ घालण्याचा हा अत्यंत जवळिकीचा आनंदसोहळा तुम्ही आवर्जून पार पाडावा असं वाटतं.

No comments:

Post a Comment