माधुरी ताम्हणे - chaturang@expressindia.com
Published: Saturday, June 15, 2013
Source - loksatta.com
असाध्य रोगामुळे आपला अकाली शेवट अटळ आहे, हे त्यालाही माहीत होतं आणि त्याच्या वडिलांनाही; मात्र तरीही दोघांनी तो स्वीकारला, पचवला. पंधरा वर्षे कणाकणाने मरणाऱ्या, पण शेवटपर्यंत उत्स्फूर्त आयुष्य जगणाऱ्या ट्रेकर, सॉफ्टवेअर इंजिनीयर निखिलच्या या प्रवासात त्याला सांभाळणारे त्याचे हळवे, पण कणखर वडील सच्चिदानंद झाले त्याच्या आयुष्याचे सारथी. एकेक अवयव साथ सोडत असताना त्याला धीराने साथ देणाऱ्या या ‘बापा’ची हृदयस्पर्शी, हळवी गोष्ट खास उद्याच्या (१६ जून) फादर्स डे अर्थात पितृदिनानिमित्त.. अशा असंख्य पित्यांना आमचा सलाम! मानवी नातेसंबंधात प्रत्येक नात्याने स्वत:ची एक विवक्षित जागा मुक्रर केलेली असते. त्याची पक्की गृहीतकं प्रत्येकाच्या मनात घट्ट रुजलेली असतात. पण कधी कधी नियती एखाद्याच्या आयुष्याच्या पटावर असा अगम्य खेळ मांडते की नात्यांची जागा बदलते. गृहीतकांची साफ मोडतोड होते आणि आपल्या हातात अवाक् होऊन हा खेळ साक्षीभावाने बघत राहण्याखेरीज काहीच उरत नाही. अशाच एका हृद्य नातेसंबंधाची विलक्षण गुंतागुंत बघण्याचं भाग्य (की दुर्भाग्य!) आमच्या वाटय़ाला आलं. निखिल आणि सच्चिदानंद कारखानीस! नातं खरंतर पिता-पुत्राचं. पण एका घटनेने निखिलचे हे वडील क्षणार्धात त्याचे माता, पिता, बंधू, सखा, सोबती आणि खरंतर सर्वस्वच बनून गेले. वेळ संध्याकाळची! शाळेतल्या स्पर्धेत पहिले बक्षीस पटकावून छोटा निखिल हातातली ट्रॉफी उंचावत उडय़ा मारत तीरासारखा घरात घुसला आणि गोंधळून उभाच राहिला. घरात भरपूर गर्दी आणि खाली जमिनीवर आजोबा शांत झोपलेले. काय झालंय ते कळण्याचं वय नव्हतं. तरी निखिलनं ट्रॉफी उंचावून आजोबांना दाखवली आणि आतल्या खोलीत घुसला ती आईला दाखवायला. आई पलंगावर झोपली होती. डोळे मिटलेले आणि श्वास मंद मंद! निखिलने हातातली ट्रॉफी आईसमोर धरली आणि ती न बघताच आईने मान टाकली. जमलेल्या लोकांना कळलंच नाही की कारखानीसांच्या घरासमोर एक नव्हे दोन दोन अंत्यसंस्कारांची तयारी का चाललीय? दादा कोलमडले. एका तासाच्या अंतरानं त्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र आणि निखिलच्या डोक्यावरचं मातृछत्र हरवलं होतं. त्यांच्यातला ‘मुलगा’ मूक झाला अन् ‘बाप’ जागा झाला. त्यांनी निखिलला पोटाशी घेतलं आणि त्या क्षणापासून ते सर्वस्वाने त्याचे त्राते झाले. पण ते त्रातेपण निभावणं सोपं नव्हतं. काळ उलटला तसं दादांनी पुनश्च संसार मांडावा, लग्न करावं यासाठी दडपणं येऊ लागली. साठीतल्या आईला आपल्या संसाराचं ओझं पेलणं कठीण जातंय हे त्यांना कळत होतं, पण लग्न केलं आणि सावत्र आईने निखिलचा दुस्वास केला तर? निदान तिला स्वत:चं मूल झाल्यावर ती त्याचं संगोपन तितक्या प्रेमानं करेल की त्याचं बालपण चुरगाळून टाकेल? त्यापेक्षा नकोच ते लग्न. त्यांनी निर्णय पक्का केला. एकदा एक तरुणी ओळखीतून पुढे आली. लग्नासाठी हट्ट धरून बसली. निखिलला सांभाळण्याची वचनं देऊ लागली. आईकडून, मित्रांकडून दबाव येऊ लागला. पण दादा आपल्या निर्णयावर ठाम होते. ते बधले नाहीत. कालांतराने कळलं की त्यांच्याच एका विधुर परिचितानं तिच्याशी लग्न केलं. पुढे त्या मुलीनं त्यांची संपूर्ण मालमत्ता हडप केली. मानसिक छळाने त्यांच्या मुलानं आत्महत्या केली. हे ऐकलं मात्र, दादांनी निखिलला उराशी कवटाळलं. त्यांच्या एका निर्णयाने निखिलला जीवदान मिळालं होतं. त्या अजाण वयात बाबांचा त्याग निखिलला कळला नसेल कदाचित, पण आपल्या तापट वडिलांची आपल्यावरील अपार शांत माया त्याला निश्चितपणे जाणवत होती. तेवढी तरल बुद्धिमत्ता आणि समंजसपणा त्या लहान वयातही त्याच्यात पुरेपूर होता. त्याने वडिलांजवळ कधीही आईची आठवण काढली नाही. कधी कुठले प्रश्न विचारले नाहीत की अनाठायी हट्ट केले नाहीत. निखिलच्या जीवनात निर्माण झालेली आईची पोकळी भरून काढणं आवश्यक आहे हे दादांना जाणवत होतं. त्यांना स्वत:ला ट्रेकिंगचा छंद होता. एका शनिवारी रात्री दादा निखिलला घेऊन ‘राजमाची’ सर करायला निघाले. पहाटे तीनला लोणावळ्याला उतरले. ज्या स्नेह्य़ाने हा बेत ठरवला होता तो आयत्या वेळी गायब झालेला. कुठे जायचं ठाऊक नाही. पण छोटा निखिल मात्र उत्तेजित झालेला. दादांनी ठरवलं, त्याला नाराज करायचं नाही. ते स्टेशनबाहेर पडले. रस्त्यालगत दोन तरुण उभे होते. दादांनी ‘राजमाची’च्या रस्त्याची चौकशी केली. ते म्हणाले, ‘‘आम्हीही तिथेच चाललोय. चला आमच्याबरोबर’’. दादा निधडय़ा छातीचे. छोटय़ा निखिलचा हात पकडून निघाले. भल्या पहाटे राजमाचीला पोहोचले. निखिलचे उत्सुकतेने भिरभिरणारे, सभोवतालचा परिसर टिपणारे चिमणे डोळे पाहिले आणि दादा हरखून गेले. हे मूल गिर्यारोहणात रमणार हे दादांनी अचूक ओळखले. तिथून पुढे कित्येक शनिवार-रविवार ही जोडगोळी गडकिल्ले पालथे घालत फिरू लागली. पुढे तर निखिलने आपल्या मित्रांसोबत ‘भन्नाट ट्रॅकर्स’तर्फे किल्ले रायगड, रोहिडा, केंजळगड, कुमळगड, रोहिडेश्वर अगदी रायगडच्या टकमक टोकापर्यंत रॅपलिंग, ट्रेकिंग केले. पंधराव्या वर्षी कुलू-मनाली, पर्वती व्हॅली येथे ट्रेकिंग करून आला. त्याचबरोबर त्याने रॉक क्लायंबिंगचाही छंद जोपासला. दादा संस्काराचं मूल्य आणि ते रुजवण्यातली आईची भूमिका, तिचं महत्त्व जाणत होते. शिस्तीचा बडगा उचलून निखिलचं मन दुखावण्याऐवजी दादांनी वेगळाच मार्ग निवडला. आपल्या नात्यांतील ज्या लोकांकडे विशेष गुण आहेत त्यांच्या घरी ते निखिलला न्यायचे. त्यांच्या सहवासातून निखिल अलगद त्यांचे गुण टिपू लागला. त्याने अनेकांना लिहिलेल्या पत्रांतून, लिखाणातून तो ते मांडू लागला. आणि आपले प्रयत्न अचूक होते. याचा दादांना प्रत्यय आला. उदा. दादांचे एक मित्र पिलूकाका! निखिलनं स्वच्छ चारित्र्याचा संस्कार त्यांच्याकडून उचलला. उच्चपदस्थ पिलूकाकांना लोक विचारत, ‘पैसे न खाऊन तुम्ही काय मिळवलंत?’ यावर काका उत्तर देत, ‘रात्रीची शांत झोप!’ पिल्लूकाकांवरील लेखात निखिलने लिहून ठेवलंय, ‘या शब्दांचं मोल गैरमार्गाने पैसे कमावून ‘एसी’ शयनगृहातही झोपेच्या गोळ्या खाऊन निद्रेची आराधना करणाऱ्यांना नक्कीच कळेल. पण कळले तरी वळणे कर्मकठीण!’ गड, किल्ले सर करत असताना त्या त्या स्थळांविषयी, व्यक्तीविषयी आपली निरीक्षणं नोंदण्याची सवय त्याला वडिलांनीच लावली. त्यातूनच निखिलचा हात लिहिता झाला. लेखन दर्जेदार झालं. (याच लेखनावर आधारित ‘ब्रेव्हहार्ट’ हे पुस्तक नंतर त्यांनी प्रकाशित केलं.) गडांवरील एका हुतात्म्याची समाधी शोधण्याचं साहस निखिलने केलं. त्याचा प्रेरणास्रोत होता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. संवेदनशील आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला निखिल म्हणूनच मित्रांना सांगतो, ‘‘ज्या असंख्य वीरांनी आपलं रक्त गडावर सांडलं तिथे कचरा सांडू नका. या गडासाठी लढण्याऱ्यांची नावं गडावर कुठेही सापडणार नाहीत. कोळशाने, खडूने आपली नावं कुठे लिहू नका.’’ तर अशी गडकिल्ल्यांवर चढाई करताना एकदा अचानक त्याला डाव्या पायातला जोर गेल्याचं जाणवलं. घरी परतल्यावर सगळ्या तपासण्या झाल्या. निष्कर्ष बापलेकाला हादरवणारा होता. निखिलला ‘न्यूरोफायब्रोमा’ हा असाध्य रोग झाला होता. बी.एस्सी.ची परीक्षा झाल्याबरोबर त्याच्या पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन करण्यात आलं. ते यशस्वी झालं नाही. होणारही नव्हतं. निखिलने नेटवरून या रोगाची संपूर्ण माहिती गोळा केली. या असाध्य रोगाचं गांभीर्य, आपलं भविष्य त्याला लख्खपणे जाणवलं. पण त्याने आपले दु:ख, आपला त्रास कधीही चेहऱ्यावर दाखवला नाही. अश्रू गाळले नाहीत की नकारात्मक विचार केले नाहीत. ‘हे तुला कसे रे जमतं?’ या बाबांच्या प्रश्नावर तो हसतमुखाने म्हणायचा, ‘बाबा, तुमचं निस्सीम प्रेम, आंतरिक जिव्हाळा यांच्या जोरावरच मी माझ्या जीवनाची वाटचाल सुकरतेने करू शकतो.’ हे केवळ बाबांची समजूत काढणारे उद्गार नव्हते. ती वस्तुस्थिती होती. आता जिगरबाज दादांनी याही संकटाशी धैर्याने सामना करायचं ठरवलं. ‘व्हाय मी?’ या अनुत्तरित प्रश्नाला अडगळीत टाकलं आणि जो कळेल तो उपाय करायचा सपाटा लावला. अॅलोपॅथी झालंच होतं. आयुर्वेद, होमिओपॅथी झाली. अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, चायना थेरपी करून झाली. पाण्यासारखा पैसा ओतला. उपाय शून्य. तरीही दादा खचले नाहीत. एका उपचारासाठी दादा स्वत: गाडी घेऊन त्याला सकाळी सात वाजता घेऊन जात. तिथे त्याला जागोजागी सुया टोचल्या जात. सुयांना इलेक्ट्रिक शॉक दिला की त्याचा चेहरा वेदनेने पिळवटून जाई. आपला रोग असाध्य आहे हे ठाऊक असूनही केवळ वडिलांच्या चिवट आशेला जिवंत ठेवण्यासाठी तो सर्व सहन करत असे. दरम्यान, वास्तुशास्त्राचे उपाय झाले. देवधर्म झाला. पण निखिलच्या तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी त्याच्या एकेका अवयवातला जोर नाहीसा होऊ लागला. पण तरीही निखिलमधला चैतन्याचा स्रोत काही कमी झाला नाही. त्याचा उदंड उत्साह तिळभर कमी झाला नाही. आपल्या लाडक्या ‘बॉडीगार्ड’ आजीला रिजन्सीत नेऊन जेऊ घालणं, आइस्क्रीम खिलवणं, नातलगांकडे जाणं, लग्नसमारंभांना जाणं यात खंड पडला नाही. दादा उत्साहाने त्याला सर्व ठिकाणी स्वत: घेऊन जात. निखिलला नाटकाचं खूप आकर्षण. नाटकांचे संवाद अभिनयासकट म्हणून दाखवत मित्रांची करमणूक करणं हा त्याचा आवडता छंद. आपण आनंदाने जगायचं आणि इतरांनाही आनंदी करायचं हा जणू त्याचा ध्यास होता. म्हणूनच दादा म्हणतात, ‘निखिलची सकारात्मक ऊर्जा मला ताकद द्यायची. लढायचं बळ द्यायची.’ दरम्यान, निखिल ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून लागला. तिथून ‘सिस्टाइम’मध्ये त्याची प्रोग्रामर म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ‘टेक-महिंद्र’ने त्याला घेतलं. पुढची पंधरा वर्षे असाध्य रोगाशी झगडत असतानाही त्याच्या व्यावसायिक प्रगतीचा आलेख मात्र उंचावत रहिला. त्याच्या कामातील गुणवत्तेमुळे कंपनीनं त्याला लंडनच्या ब्रिटिश टेलिकॉममध्ये पाठवलं. चार वर्षे तो लंडनमध्ये राहिला. तिथे त्यानं काय केलं नाही? सुग्रण आजीकडून फोनवरून टिप्स घेत उत्तम स्वयंपाक शिकला. इंग्लंडचा कानाकोपरा पालथा घातला. भर कडाक्याच्या थंडी-वारा-पावसात तिकिटासाठी रात्रभर लायनीत उभं राहून विम्बल्डनची मॅच पाहण्यातला रोमांच अनुभवला. मुख्य म्हणजे वडिलांना तीन वेळा युरोपवारी घडवली. लंडनवारीत त्यांच्यासह ‘लंडन आय’ आणि ‘रोलर कोस्टर’चा थरार अनुभवला. चविष्ट ऑक्टोपसचा आस्वाद घेतला. युरोपातील अनवट जागा शोधून त्यांची सैर घडवली आणि त्यांची आवडती चॉकलेट्स त्यांना मनमुराद खाऊ घातली. याच काळात या पिता-पुत्राच्या आयुष्याला कलाटली मिळाली. त्याने आयटी क्षेत्रातल्या मैत्रिणीशी प्रेमविवाह केला. आपल्या मुलाच्या आजाराची कल्पना असूनही त्याला स्वीकारणाऱ्या मुलीचा दादांना अभिमान वाटला. आनंद झाला. पण दुर्दैवाने हाही आनंद फार काळ टिकला नाही. कारण त्या मुलीने दादांना त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर काढलं. हे हताशपणे बघण्याखेरीज निखिल काहीच करू शकला नाही. फक्त रोज वडिलांशी फोनवरून बोलणं आणि कधीतरी इमारतीखाली उभं राहून त्यांची भेट घेणं बस्स! एकदा तर निखिल कमोडवरून पडला. डोक्याला खोक पडली. पण त्याला उचलायलासुद्धा घरात कोणी नव्हतं. असं काही ऐकलं की त्याच्या काळजीनं दादांचा जीव अर्धमेला होई. पण दादांनी हेही प्राक्तन केवळ निखिलचा संसार टिकावा म्हणून स्वीकारलं. पण शेवटी निखिलचा संसार मोडलाच! दादा पुन्हा निखिलच्या सेवेला रुजू झाले.. २००५ साल उजाडलं आणि त्याच्या आजाराने खरं रूप दाखवायला सुरुवात केली. आता तो नीट उभंही राहू शकत नव्हता. व्हिलचेअर निखिलची सोबतीण झाली. दादा त्याचे सारथी झाले. स्वत:च्या मोडलेल्या हातात रॉड असूनही दादा त्याला दररोज गाडीने ऑफीसमध्ये नेऊ लागले. गाडीतून त्याची व्हिलचेअर (वजन ८० किलो) बाहेर काढायची. त्यावर त्याला बसवायचं. ती ढकलत लिफ्टपर्यंत न्यायची. लिफ्टमधून वर चढवायची आणि ऑफीसमधल्या खुर्चीत त्याला नेऊन बसवायचं. ही दादांची डय़ुटी झाली. दादा गमतीने स्वत:ला निखिलचे सारथी म्हणायचे. पण खरोखरच लढवय्या निखिलच्या आयुष्याचे सारथ्य करणारे ते श्रीकृष्णासारखे सारथी बनले होते. आता निखिलच्या हाता-पायांनी कडक बंड पुकारलं. कंपनीचा नाइलाज झाला. ‘आऊटपूट दे नाहीतर राजीनामा दे’ अशी ऑर्डर आली. पण एचआर विभागातल्या अधिकारी नयना शेट्टीने वरिष्ठांची समजूत घातली. या मुलाचे हात-पाय चालत नसले तरी तोंड आणि मेंदू कार्यक्षम आहे. तो ट्रेनर म्हणून चांगली कामगिरी करेल. तिचा विश्वास निखिलने सार्थ ठरवला. त्याचे ट्रेनिंग प्रोग्राम एवढे यशस्वी झाले की त्याला कंपनीकडून ट्रेनिंग प्रोफिशिअन्सीचं अॅवॉर्डही मिळालं. हे ट्रेनिंग देण्यासाठी निखिलला त्याही अवस्थेत भोर, पुणे येथे जावं लागे. दादा सावलीसारखे त्याच्या सोबत असत. पुढे पुढे तर त्याला स्वतंत्रपणे कोणतीच गोष्ट करता येत नव्हती. जेवण भरवण्यापासून आंघोळ, कपडे, शी-सू सगळं काही दादांच्या हाती आलं. निखिल व्हिलचेअरवर आणि दादांचं आयुष्य व्हिलचेअरभोवती बंदिस्त झालं. पण तरीही बापलेकाची थट्टामस्करी, विनोदी चुटके सांगून एकमेकांना हसवणं, नकला करणं चालूच होतं. त्याच वेळी त्याने सावरकरांचं ‘माझी जन्मठेप’ वाचलं आणि अंदमानला जायचं ठरवलं. बापलेक जिद्दीने अंदमानला जाऊन आले. आता त्याला हिमशिखरांचे वेध लागले होते. दादांनी त्याला डेहराडूनवरून ‘ऑली’च्या ग्लेशिअपर्यंत नेण्याचा बेत केला. वाटेतल्या सगळ्या नद्यांची आणि हिमशिखरांची नावं त्याला मुखोद्गत होती. आणि समोरच्या माणसाला घाम फुटावा असा प्रवास या बहाद्दराने व्हिलचेअरवरून केला आणि त्या प्रवासाचा आनंद लुटला. आता मात्र एकेक करून त्याचे अवयव त्याची साथ सोडू लागले. आपल्या असाध्य आजाराचा प्रवास एका अटळ शेवटाकडे चाललाय हे बापलेकाने मनोमन जाणलं, पण कोणीही त्याचा उच्चार स्वत:शीसुद्धा केला नाही. आता वाचा गेली. बोलणं बंद पडलं. श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ लागला. अखेर चार दिवसांत ४ एप्रिल २०१२ ला हा झंझावात शांत झाला. दादांच्या आयुष्यात भयाण पोकळी निर्माण झाली. पण ते हरले नाहीत. त्यांनी निखिलचे लेख, पत्र, टिपणं, निरीक्षणं गोळा केली. आपल्या परममित्र रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते निखिलच्या पहिल्या पुण्यतिथीला त्याचं ‘ब्रेव्हहार्ट’ हे पुस्तक प्रसिद्ध केलं. त्या प्रकाशन सोहळ्याला टेक महेंद्रतील संपूर्ण स्टाफ, त्याचा मित्र आणि नातेवाईकांचा परिवार आवर्जून हजर होता. निखिलनं अनाथालयातील, सिंधुताई सकपाळांच्या संस्थेतील मुलगी दत्तक घेतली होती. आता दादांनी ती जबाबदारी उचलली. निखिलच्या तेराव्याला रितीप्रमाणे गच्चीत पान ठेवलं गेलं. कावळा काही केल्या शिवेना. कोणीतरी म्हणालं, दादा त्याला भरवताना तो पहिला घास तुमच्या मुखात घालायचा. आजही तो वाट बघतोय. क्षणाचाही विलंब न लावता दादांनी त्या पानांतल्या वडय़ाचा तुकडा मोडला. तोंडात टाकला आणि झपकन कावळ्याने उरलेला अर्धा वडा उचलला. ज्यांनी हे पाहिलं, अनुभवलं, त्यांचे डोळे पाणावले. या काकस्पर्शाने एकच सिद्ध केलं- ह्य़ा पितापुत्राचं नातं शाश्वत आहे. चिरंतन आहे. कुणा एकाचा मृत्यू हे नातं नाही संपवू शकत...