Monday, November 8, 2010

चिनी विकास - एक पाऊल एका वेळी

सतीश अनसिंगकर
Tuesday, November 09, 2010 AT 12:00 AM (IST)
Source- Esakal
http://www.esakal.com/esakal/20101109/4789328963042773115.htm

फार अवघड गोष्टीत सुरवातीला न पडता, साधी उत्पादने सचोटीने व स्वस्त पडतील अशा पद्धतीने करून त्या सगळ्याचा एका मोठ्या स्वरूपात बदल झाला. चीनच्या विकासाचे हेच महत्त्वाचे सूत्र मानावे लागेल.

चीन हा एकछत्री देश आहे. त्याच्या प्रगतीची कार्बनकॉपी करणे शक्‍य नाही आणि तो आंधळेपणा होईल. परंतु जागतिक स्पर्धेत उतरायचे ठरवले त्या वेळी चीनची आर्थिक, सामाजिक आणि औद्यागिक परिस्थिती जवळपास आपल्यासारखीच होती. भूकंप झाला, तर सुरवात कुठून करायची यावर चर्चा करायची, की कुठेतरी सुरवात करून त्यात सुधारणा करायची, यात सुरवात होणे महत्त्वाचे आहे. तसाच प्रकार उद्योगाच होता. अतिशय गुंतागुंतीची आणि काळाच्या पुढे असणारी मशिन्स किंवा तंत्रज्ञान यात जर्मनी व जपान इतके पुढे आहेत, की त्यांच्याशी स्पर्धा आज तरी शक्‍य नाही. मग काय करायचे? सर्वसामान्य वापरातल्या गोष्टीचे उत्पादन करणाऱ्या मशिन्स तयार करायच्या, त्यातून सर्वसामान्य वस्तू सर्वांत स्वस्त दरात तयार करायच्या आणि पावले पुढे टाकायची, असा योग्य मार्ग निवडला गेला.

उदाहरणादाखल, मी एका वर्षाला दोन हजार मशिन्स बनवणाऱ्या फॅक्‍टरीला भेट दिली. ते मशिन ५ द ७ द ५ बॉक्‍स साईजचे. जीन्स पॅन्टना असणाऱ्या ब्रास बटण बनवणारे हे मशिन. एका बाजूने एक ब्रासची पट्टी जी बटन्सची टॉप साईड पंच करते, दुसऱ्या बाजूने बटन्सची खालची बाजू. धान्य पडावे तसे बटन्स टप-टप करत कंटेनरमध्ये पडत असतात. याची सुरवात झाली ती मशिन विकत घेऊन बटन्स बनवून विकल्याने. आजही ती कंपनी जगातल्या कित्येक बहुराष्ट्रीय जीन्स कंपन्यांना बटन्स पुरवते. त्याचबरोबर तंत्र माहिती होऊन आता मशिन्सही पुरवते. ४० टक्के कमी दरात कुठलाही ग्राहक आकर्षित होणारच. परंतु यासाठी लागतो तो थोडासा वैयक्तिक त्याग. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज मी थोडा जास्त वेळ काम करीन आणि तेही उत्पादनाची किंमत मर्यादित राहील अशा पद्धतीने करायची तयारी ठेवून. हे करत असताना व्यावसायिक चातुर्य दाखवले गेले ते म्हणजे जगातल्या महाकाय कंपन्यांच्या प्रॉडक्‍ट्‌सचे छोटे छोटे पार्ट बनविण्याची ऑर्डर घेणे. मग ती सोनी सिस्टिमची छोटी मोटर असो, बार्बी डॉल्सचे पार्टस असोत, मॅक्‍डोनाल्ड्‌सची खेळणी असोत, तोशिबाचे प्लॅस्टिक कव्हर असो, व्हर्लपूलची कंट्रोल पॅनेलची पट्टी असो किंवा अर्मानी घड्याळाचे बेल्ट्‌स असोत.
२००९-२०१० ची भारताची स्थिती उत्तम दाखवली जाते आणि ती आहे. परंतु लाखोंनी दर वर्षी शिकून बाहेर पडणाऱ्या युवक वर्गाला दिशा मिळत नाही, तसेच एवढ्या सगळ्यांना सामावून घेणे खासगी, निमशासकीय अथवा शासकीय संस्थांना शक्‍य नाही. बेभरवशाची शेती या प्रकाराला युवक वर्ग कंटाळला आहे आणि स्पर्धेच्या युगात योग्य मार्गदर्शनाअभावी औद्योगिक जगात भरकटण्याचीही शक्‍यता आहे.


आर्थिक बाजू हा असा विषय आहे, की जो अतिशय काळजीपूर्वक बघायला पाहिजे. यात कुणीही कुणाचा नसतो. यात खरे तर इतिहासातील उदाहरण देत तरुणांची डोकी भडकवण्याचे व त्यांना अयोग्य दिशा दाखवण्याचे काम बरेच राजकीय पुढारी करतात. योग्य असे आहे, की आज ज्या लोकांकडे तंत्रज्ञान, पैसा व उद्योग क्षेत्रातली ओळख आहे, अशा लोकांना गुरू मानून स्वत:चे ज्ञान व स्थान बळकट करावे. भारतातल्या काय किंवा जगातल्या काय, कुठल्याही उद्योजकाला सचोटीने आणि मालकाच्या हिताचे काम करणारा मनुष्य हवासा आहे.


चीनमध्ये भ्रष्टाचाराविरोधात अतिशय कठोर शिक्षा दिली जाते. त्या भीतीने आज तेथील भ्रष्टाचार खूप कमी झाला आहे. भारतात मात्र यावर कसलाच उपाय दिसत नाही. युवक वर्गाला शिस्त लावण्याचा प्रकारही चीनमध्ये कठोर होता. चीनमध्ये भारतापेक्षा दुप्पट वाहने असून, आज भारतात चीनपेक्षा जास्त अपघात होतात व जास्त लोक मरण पावतात. चीनच्या बाबतीत सांगायचे झाले, तर त्यांनी शहरांमध्ये ठरवून बेशिस्त वाहतूक व वागण्यावर नियंत्रण आणले. या त्राग्याचे मुख्य कारण म्हणजे आपली अफाट सामाजिक कर्तव्ये. वर्षात किमान २५-३० कार्ये किंवा स्वत:च्या घरातले कार्य, त्यांची देणी-घेणी. ज्याला हे शक्‍य आहे त्यांची गोष्ट वेगळी; परंतु स्वत:चे वाहन धूर काढत असेल किंवा दात दुखत असेल तर प्रसंगी ते पुढे ढकलून सामाजिक बंधन पाळणे, हे कुणाच्या फायद्याचे आहे? आज आपल्याला हजार रुपयांत धुणे-भांडी-साफसफाई करणारी महिला पाहिजे असते. हे कुठल्या समाजव्यवस्थेत बसते? जगातल्या एकाही विकसित देशात घरकामाला महिला, पुरुष नसतो. ते ज्याचे त्याने करावे, अशी अपेक्षा असते. फक्त ज्येष्ठ नागरिकांना ती मदत केली जाते.


चीनचा अश्‍व सध्या चौखूर धावतो आहे. "जीडीपी' दहा टक्‍क्‍यांच्या वर आहे; परंतु येत्या आठ-दहा वर्षांत तेथील राहणीमानाचा खर्च वाढून उत्पादन खर्च वाढण्याची शक्‍यता आहे. त्या वेळी भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, रशिया इत्यादी देशांकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना वळावे लागेल. ते करताना त्या कंपन्या त्या त्या देशातील स्थैर्य, सामाजिक स्थिती, शिस्त, सचोटी अशा सर्व बाजू बघतील. पहिली संधी चीनने पटकावली. दुसरी आपल्याला पटकवायचिये!

No comments:

Post a Comment