नीलगिरीच्या पानांतून सळसळत काहीतरी वर चढल्याचे जाणवले.... किर्र काळोखात हिंमत करून झाडाजवळ जाऊन काय आहे ते पाहायचा प्रयत्न केला आणि....... पाय जमिनीत थिजले,....! झाडावरून दोन पांढरी बुबुळे माझ्याकडे रोखून पाहत होती.... रोखून पाहणाऱ्या बुबुळांकडून नजर फिरवून जमेल तेवढ्या जोरात पाय ओढत पळत रस्त्यावर गेलो... पण,.... गाडी नव्हतीच तिथे!! गाडी गायब झाली होती...! गाडी लावलेल्या ठिकाणी लाल रिंगण झाले होते...... मी पुरता भांबावलो होतो!! काय करावे सुचत नव्हते!!
त्या मंतरलेल्या वातावरणामुळे ते लाल रिंगण अजूनच भेसूर वाटत होते, गाडीशिवाय परतणे शक्यच नव्हते. मी टायर च्या खुणा पाहून त्यामागे जायचे ठरवले!! साधारण १-२ किलोमीटर चालताना सतत मागून कोणीतरी येत आहे असा भास होत होता. एका वळणावर पाण्याच्या साचलेल्या डबक्याजवळ माझी गाडी दिसली आणि डोकंच सुन्न झालं...
पाणवठ्यावर पिशाच्चांचा वावर असतो असे ऐकले होते... कसाबसा गाडीपर्यंत गेलो, दरवाजा उघडून आत बसलो. संपूर्ण गाडीत फिकटसर धूर साचलेला होता. किल्ली लावून गाडी सुरू केली आणि शक्य तितक्या वेगाने पुन्हा हायवेकडे निघालो.
टोल नाक्याजवळ पोलिसांचे बॅरिकेडस दिसले तेव्हा जिवात जीव आला. गाडी स्लो करून सीट बेल्ट लावायला बेल्ट ओढला तर एक जाडसर केसांची जटाच हातात आली.... शुद्ध हरपण्या आधी कोणा एकालातरी काय झाले हे माहीत असावे असे वाटले, आणि मग मात्र तडक टोल पोलिस चौकीत जाऊन सगळा प्रकार सांगितला!!
इन्स्पेक्टर चव्हाणांनी मला बसायला खुर्ची दिली, पाणी दिले. तिथल्या २ हवालदारांना गाडी चेक करायला आणि जरा आजूबाजूला पाहणी करून येण्यास सांगितले.... आणि मला म्हणाले जे झाले ते नीट सविस्तर सांगा....
मी आणि माझे २ मित्र गोव्याला अजून एका मित्राच्या लग्नासाठी गेलो होतो... तो मूळचा गोव्याचा म्हणून मग तिथेच लग्न करणार होता, गोवा हे खास हॉलिडे डेस्टिनेशन तर आहेच... पण तरीही ते जास्त प्रसिद्ध आहे ते मद्यार्क/आणि मद्यपींचा स्वर्ग म्हणून... काल रात्री रिसेप्शन झाले आम्हाला निघेपर्यंत ११ वाजले होते.. शेवटचे चिअर्स करून आम्ही तिघेही बाहेर पडलो....... --
एक मिनिट!! म्हणजे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होतात? -
इं. चव्हाणांच्या ह्या प्रश्नाने खरं तर मी बावरलो होतो पण जो घडला तो प्रकार अतिभयानक होता त्यामुळे खरे बोलण्यावाचून गत्यंतर नव्हते. मी म्हणालो " साहेब मी पार्ट्यांना जातो पण कधीच पीत नाही, म्हणजे अगदीच आग्रह केला तर एखादा स्मॉल, पण शक्यतो नाहीच - कारण बहुदा मीच माझ्या बाकी मित्रांना घरी सोडायला जातो.... मला मध्येच थांबवत चव्हाण उठले, खिडकीतून बाहेर रस्त्यांवर नजर फिरवत मला म्हणाले -माझ्या प्रश्नाचे साधे उत्तर द्या - हो किंवा नाही! मी हो म्हणालो.
लगेच त्यांचा पुढचा प्रश्न - मग तुमचे ते मित्र कुठे गेले आता? गाडीत आहेत की लुडकले कुठे येता येता?
मी पुन्हा उत्तर देऊ लागलो, -> प्रशांत आणि विकास चुलतं भाऊ, गोवा महामार्गावर एक गाव आहे पिंदळे - तिथे त्याचा एक वाडा आहे तो अर्धा ओनरशिप केलाय, त्या फ्लॅट वर त्यांना सोडले आणि परत येता येताच हे सगळे... -
तेवढ्यात हवालदार वानखेडे आत येत म्हणाले - साहेब आक्खी गाडी चेक केली - कसलातरी मास-मच्छी/सडलेले कांदे वगैरे सारखा घाण वास मारतोय, वडाची एक छोटी पारिंबी सिट बेल्ट वर अडकली होती कुठेतरी गाडी ठोकली वाटतं.. तेव्हा अडकली असावी - तिचा हातात घेऊन हे साहेब ओरडत चौकीत आले होते की हो...! -- चव्हाणांनी हातानेच हवालदारांना थांबवले.
इं. चव्हाण पुन्हा समोर येऊन बसले - ग्लास पाण्याने पाण्याने पुन्हा भरून मला म्हणाले - पुढे बोला,
"त्यांना फ्लॅट वर सोडले, आणि परत येता येता जाणवत होते की आज आपण जास्त प्यायलो, मित्राने, त्याच्या बायकोने आणि इतर गँग ने लग्नाच्या रिसेप्शनच्या कारणाने जवळ जवळ एक खंबा आम्हा तिघांमध्ये २ तासात रिकामा केला होता... एका वळणावर मला जबरदस्त प्रेशर आले (लघवी करणे भाग होते) - मी गाडीतून बाहेर उतरलो.
लोकलाजेखातर हाय-वेपासून फर्लांगभर लांब आडरानाच्या बाजूने गेलो, आणि लघुशंकेचे निरसन करताना समोर नीलगिरीच्या पानांतून सळसळत काहीतरी वर चढल्याचे जाणवले.... किर्र काळोखात हिंमत करून झाडाजवळ जाऊन काय आहे ते पाहायचा प्रयत्न केला आणि....... पाय जमिनीत थिजले,....! झाडावरून दोन पांढरी बुबुळे माझ्याकडे रोखून पाहत होती....
माझी चढलेली होती -नव्हती तेवढी सगळी दारू एका क्षणात उतरली.... तिथून मागे फिरलो तर गाडी गायब, २-३ किलोमीटर नक्की आठवत नाही किती चाललो - पण मग एका पाणवठ्यावर मला गाडी ह्या अवस्थेत दिसली...
पानाची पिंक बाहेर थुंकत वानखेडे हवालदार म्हणाले -" साहेब म्हणजे त्या गोवाड्याच्या तलावाजवळ, अहो काही वर्षांपूर्वी चांगला तलाव होता आता बिल्डर लोकांच्या अतिक्रमणाने पार डबकं झालंयसा... "
"साहेब.. साहेब... ह्यांचा गाडीला पुढे उजवीकडून सगळे रक्त लागले आहे, मी आताशीच गाडी नीटं पाहून आत आलो"- असे म्हणत दुसरे हवालदार कळसे यांनी येऊन जवळजवळ माझी बखोटीच धरली.
चव्हाण इतका वेळ शांत होते पण हे ऐकून ते ताडकन उठले, मला एक मुस्कटात लगावून म्हणाले - हरामखोरा खरं सांग काय झालंय नाहीतर लई मार खाशील...!
मी पुरता हवालदिल झालो होतो... हवालदारांच्या दांडगाईने शर्टाची दोन बटण पण तुटली होती - मी गयावया करत चव्हाणांच्या पाया पडलो - म्हणालो जे झाले ते सगळे सांगितले आहे, मी गुन्हेगार नाही, मी निर्दोष आहे... मी कोणालाही उडवले नाही, रक्त कसे आले मला माहीत नाही - परंतु माझे काही एक न ऐकता दोन्ही हवालदार मला पकडून बाहेर गाडीजवळ घेऊन आले.
चव्हाण गाडी पाहून म्हणाले, नक्की काहीतरी झाले आहे! कळसे-वानखेडे - टाका ह्याला गाडीत.. चला परत मागे जिथे हे सगळं घडलं अस ह्याच म्हणणं आहे.. आणि हो, मोठ्या चौकीत फोन करून अजून कुमक मागवा आणि अँब्युलन्स पण मागवा... चला!
पोलिसांच्या गाडीत बसून परत त्या रानच्या दिशेने निघालो पण १० फूट जातो न जातो तोच पोलिस व्हॅन चे पुढचे दिवे फ्यूज झाले आणि गाडी अचानक बंद पडली!
आता मात्र चव्हाणांना वेगळीच शंका येऊ लागली, ते मला म्हणाले - तुमच्या बोलण्यात तथ्य आहे किंवा नाही ते तिथे जाऊनच कळेल - तपास करावा लागेल - मग माझ्याच गाडीतून तिकडे परत जायचे ठरले, इं नि हवालदारांना डायरी, टॉर्च आणि दंडुके घेऊन मागे बसायला सांगितले, आणि मला म्हणाले "उतरली आहे का नक्की तुमची? चला शेजारी बसा - आमचा जीव जायचा तुमच्या मूर्खपणाने - मी चालवतो, चला ती जागा दाखवा!
मी निमूटपणे बसलो, त्या भयानक वातावरणात परत जाण्याची इच्छा नव्हती तरीही नाईलाजास्तव माझे खरेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा जावे लागत होते...
२०-२५ मिनिटे गाडी चालवल्यावर इं. म्हणाले किती लांब आहे अजून? - माझ्याकडे उत्तर नव्हते, कारण गाडीत बसल्यानंतर मी किलोमीटर वा घड्याळ काहीच न पाहता तसाच जीव वाचवायला बेफाम निघालो होतो...
१-२ मिनिटेच झाली असतील -- गाडीत पुन्हा धूर साचला... इं. चव्हाण ओरडले-- अरे ब्रेक का लागत नाही??
हवालदार कळसेंनी हँडब्रेक ओढला परंतु त्याची केबल तुटून ते मागच्या सिट वर जोरात फेकले गेले... गाडी भरकटली, हमरस्ता सोडून साईडलाईन चे बॅरिकेडस तोडून रानात घुसली... एका मोठा दगडावरून अगदी सपशेल फूटभर वर उडाली आणि तशीचं जमिनीवर आदळली - मागची काच फुटली आणि बेसावध फेकले गेलेले हवालदार कळसे मागच्या फुटक्या काचेतून बाहेर त्याच दगडावर निपचीत पडले.
माझ्याभोवतीचा सीटबेल्ट अधिकच घट्ट आवळला गेला, गाडीला वेग प्रचंड होता, गाडी हेलकावे खात थेट एका नीलगिरीच्या झाडावर जाऊन आदळली ति धडक इतकी भीषण होती की इन्स्पेक्टर चव्हाण पुढच्या काचेला फोडून नीलगिरीच्या खोडाला डोक्यावर धडकले... क्षणात मृत्यू कसा होतो ते तेव्हा मला समजले, गाडीचे बंपर आणि नीलगिरीचे खोड ह्यामध्ये सापडून चव्हाणांच्या डोक्याची शकले'च झाली होती.... फाटलेल्या बॉनेटवर त्यांची मलूल मान पडली आणि तोंडातून येणाऱ्या रक्ताच्या ओघळामुळे गाडीची संपूर्ण उजवी बाजू रक्ताने माखली!
सीटबेल्ट मुळे थोडेफार सावरलेला मी.. आजूबाजुची एकही गोष्ट स्पष्ट दिसत नव्हती, त्या ढवळाढवळीमुळे माझ्या डोळ्यात रक्त जमा झाले होते, चव्हाणांचा हा असा मृत्यू साक्षात समोर पाहून दातखीळ बसली, आणि बसल्या जागीच २ सणसणीत उलट्या झाल्या..
कसाबसा बेल्ट सोडवून बाहेर आलो -एक पाय सिट आणि अर्धवट निखळलेल्या दरवाज्यात सापडून पुरता जायबंदी झाला होता, कपडे म्हणजे तर लक्तरंच झाली होती -- बाहेर पाहतो तो दुसरीकडून उतरलेले हवालदार वानखेडे आपले डोके धरून चव्हाणांजवळ उभे होते, माझे लक्ष जाताच ते क्षणार्धात ४-५ फूट वर उंच हवेत उचलले गेले आणि तसेच तळ्याकडे भिरकावले गेले.... पोहता येत नसल्याने २-३ वेळा अस्पष्ट वाचवा.. वाचवा.. एवढेच ऐकू आले... आणि नंतर उरले ते फक्त पाण्यावर येणारे बुडबुडे...!
मी लंगडत- रांगत हमरस्त्यावर आलो - एका मिनिटात होत्याचे नव्हते झाले, पिशाच्चं, भुतं वगैरे बद्दल भ्रामक कल्पना आहेत असे ठामपणे सांगणारा मी ह्या ३ विचित्र मृतदेहांना पाहून पांढराफटक पडलो होतो... शुद्ध हरपणार असे वाटत होते पण तरीही पाय ओढत, फरफटत रस्त्यावरून टोल चौकीच्या दिशेने पळत सुटलो.... कितीतरी वेळ पळत होतो.... मध्ये मध्ये पडत होतो.. सरपटत होतो... एक सावली मागे येत आहे असा सारखा भास....
चव्हाणांचा मरणाआधीचा चेहरा, कळसेंचा दुर्दैवी दगडावर आपटून छिन्नविछिन्न झालेला देह, वानखेडेंची वाचवा ची हाळी.... सगळे सगळे आपला पाठलाग करत आहेत असे वाटत होते.... कपडे, बूट सर्वकाही फाटले, राहिला केवळ जीव वाचवण्याचा प्रयत्न....
बेशुद्ध होईपर्यंत पळत होतो... दूर गावच्या वेशीजवळ थोडा कंदिलाचा उजेड दिसला... आणि मी गलितगात्र होऊन तिथेच कोसळलो!!
-- आई-? बाबा? तुम्ही इथे कसे... आणि मी कुठे आहे? अहो काल रात्री काय भयानक प्रकार.... । आईने मला शांत केले, बाबा बाहेर जाऊन गावच्या सरपंचांना आत घेऊन आले, सरपंच, गावकरी आत आले -- सरपंचांनी मला पाणी दिले आणि आमच्या तिघांकडे पाहत म्हणाले - साहेब, हा मुलगा पहाटे गावच्या वेशीजवळ पडलेला आमच्या गावकऱ्यांना सापडला, अंगावर फाटके कपडे, एका पायांत चिंध्या झालेला बूट, फक्त जीन कापडाच्या पँट च्या खिशात मोबाईल सापडला आणि आम्ही तडक तुम्हाला फोन करून बोलावले.. लेकरू फार बिथरलेलं दिसतंय.. आता काय आहे नाही ते तुम्ही बघा...!
मग मी पुन्हा सगळी घडलेली गोष्ट गावकरी, सरपंचांसोबत आई-बाबांना सांगितली! - सरपंच गंभीर होत म्हणाले, "पोरा तू म्हणतोस ते अर्धवट सत्य आहे-- तुला "चकवा" लागला होता"!
अकरा-बारा वर्षांपूर्वी, हा हमरस्ता म्हणजे कच्चा रस्ता होता, गावचे पोलिस पाटील चव्हाण, हवालदार-कळसे आणि वानखेडे गस्तीला असताना एक ट्रक टोलनाक्याजवळ भरधाव वेगाने आला... थांबवण्यासाठी गेलेल्या चव्हाणांना फरफटतं काही कळायच्या आत ट्रक आणि रस्त्याजवळच्या झाडाची टक्कर झाली - चव्हाण नाहक चिरडले गेले, हवालदार कळसे साहेबांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडले, आणि पत्र्याच्या शेडवरून जाणारी विजेची तार वानखेडेंच्या अंगावर पडून जबरदस्त झटक्यामुळे गोवाड्याच्या तलावात फेकले गेले... आणि तिथेच ते बुडाले!
तिघांचा हा दुर्दैवी अंत पाहून साऱ्या गावाने सुतक पाळले, जुनी गस्तीची जागा रद्द केली गेली तिथे मोठा हमरस्ता बांधायच्या काँट्रँक्ट मध्ये गोवाड्याचा तलाव सुद्धा नाहीसा होत आला.... दुसऱ्या दिवशी पोलिस रिपोर्टात कळले की त्या ट्रकचा चालक दारूच्या नशेत धुंद होता, त्याच्या निष्काळजीपणाने ३ कुटुंबांची राख झाली!
तेव्हापासून ते आजतागायत...
तुमच्यासारखे अनेक लोक जे दारू पिऊन गाडी चालवतात त्यांना हा चव्हाण-कळसे-वानखेडेंचा "च-क-वा" लागतो!
पोलिसपाटील भली माणसं होती- त्यांनी कोणाला जिवानिशी मारले नाही, परंतु त्यांच्यासारखे अजून कोणी काळाच्या पडद्या-आड जाऊ नये म्हणून ते अश्या चालकांना जन्मभराची अद्दल घडवतात..!
सरपंच म्हणाले, -> तुम्ही बोलता ते खोटे आहे असे मी म्हणणार नाही कारण मला हे सगळे माहीत होते, आणि एकंदर तुमची दशा पाहून हा अंदाज आला होता, पण फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो - तुम्ही काल मध्यरात्रीपासून वेशीवर येईस्तोवर ५०-५५ किलोमीटर पळत आला असाल -- जिथे ही घटना घडली होती त्याच्या आल्याड पल्याड ५०-६० किलोमीटरांपर्यंत कोणतीच चौकी नाही की टोल नाका नाही....! जे घडले तो च-क-वा होता. ! विसरून जा पण अनुभवातून शहाणे व्हा... तुमची गाडी बी ठीकं ठाक असलं तिथेच, फक्त बंद पडली असलं तेव्हा मॅकॅनिक घेऊन जा दिवसाउजेडीला.
आई बाबा आणि मी सुन्न झालो -- निरोप घेताना सरपंचांच्या देवघरात मी साष्टांग नमस्कार केला, म्हणालो - पुन्हा अशी चूक होणार नाही...! सरपंचांनी काळजी घ्यायला सांगून आम्हाला निरोप दिला - आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
मित्रांनो तात्पर्य एकच, DONT DRINK & DRIVE - तुम्ही कोण्या एका माणसाला नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला देशोधडीला लावण्यास कारण ठरू शकता!
मद्यपान करून चुकूनही गाडी चालवू नका - नाहीतर...... तुम्हालादेखील लागू शकतो हा च-क-वा!!
००
आशुतोष दीक्षित
No comments:
Post a Comment