Wednesday, April 7, 2010

आता होऊ डिजिटल!

Source- loksatta
date - 6 April 2010
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=60040:2010-04-05-15-20-37&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7


आता होऊ डिजिटल!
मंगळवार, ६ एप्रिल २०१०
डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्ताला गेल्या वर्षी दीडशे वर्षे पूर्ण झाली. ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या न्यायाने निसर्गात होणाऱ्या बदलांमध्ये टिकून राहण्याची क्षमता असलेला जीव जगतो. कारण तो निसर्गातील बदलांनुसार स्वतमध्ये काही बदल घडवून आणतो. जो असे बदल घडवून आणत नाही, तो फार काळ टिकत नाही. तो नाश किंवा ऱ्हास पावतो. हा सिद्धान्त आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांत छपाईच्या व्यवसायाला युरोप-अमेरिकेत अवकळा आली आहे. वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके साऱ्यांचे खपाचे आकडे घसरत आहेत. परिणामी त्याचा मोठा आर्थिक फटका या उद्योगाला सहन करावा लागत असून त्यामुळेच अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. अनेक बदल एकाच वेळेत होत आहेत. छपाईच्या व्यवसायाला आलेल्या अवकळेबद्दल इंटरनेटवर दोषारोप होत आहेत. इंटरनेटमुळे छपाईच्या व्यवसायावर गंडांतर आल्याचे म्हटले जात आहे. युरोप-अमेरिका ही प्रगतीच्या बाबतीत आघाडीवर असते, असे जगभर मानले जाते. असे असले तरी तिथे इंटरनेटवर किंवा डिजिटल पद्धतीने प्रकाशन करण्याला सर्व प्रकाशकांकडून मोठय़ा प्रमाणावर विरोध झाला. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थिती बदलली आहे. डिजिटल मार्गाचा स्वीकार करण्यावाचून पर्याय नाही, याचा साक्षात्कार प्रकाशकांना झाला आहे. नव्या मार्ग चोखाळताना अनेकदा भीती वाटते त्यामुळे प्रकाशकांनी एकत्रितपणे या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेली जगभरातील ही सर्वात महत्त्वाची आणि भविष्याचे दिशादर्शन करणारी अशी घटना असल्याने जगप्रसिद्ध नियतकालिक ‘द इकॉनॉमिस्ट’नेही अलीकडेच ‘आयदर पब्लिश ऑर पेरिश’ असे म्हणत त्याची दखल घेतली आहे. खरे तर हेन्री रॉबर्ट्स यांनी संगणकाचा शोध लावला त्यावेळेस हे यंत्र साऱ्या जगाचे भविष्य बदलणार आहे, याची त्यांनाही कल्पना नसावी. सुरुवातीस संपूर्ण इमारतीएवढय़ा आकाराचा, नंतर एक खोली ्व्यापणारा असे करत त्याचा आकार कमी होत गेला आणि त्याची क्षमता मात्र अनेक पटींनी वाढत गेली. आता हाती खेळणारा ‘ब्लॅकबेरी’ म्हणजे तर या मोठय़ा संगणकाचे लघुरूपच असतो. संगणक आला, वेगात प्रसार पावला, त्याहीपेक्षा वेगात इंटरनेटचा प्रसार झाला. सुरुवातीस संगणकामुळे किंवा इंटरनेटमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे सांगत त्या विरोधात डाव्या आणि उजव्यांनीही आंदोलने केली. आता तेच या दोन्हींचा वापर सर्वाधिक करताना दिसतात. आता तर या दोन्ही गोष्टींमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी संपूर्ण भारताच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरल्या आहेत. जागतिक मंदीचा मोठा फटका भारताला बसला नाही, याची अनेक कारणे आता समोर आली आहेत. त्यात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राने दिलेला हात ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे, असेही लक्षात आले आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान हा आता नाके मुरडण्याचा विषय राहिलेला नाही. किंबहुना आता इथून पुढचे भविष्य घडणार आहे ते हाच विषय आत्मसात करण्यामुळे. जागतिकीकरणानंतर आता युरोप-अमेरिका आणि भारत यातही फार अंतर राहिलेले नाही आणि माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटने तर काळ, काम आणि वेगाचे सारे गणितच बदलून टाकले आहे. हा विषय आपल्यापर्यंत येईल तेव्हा पाहू असे आता भारतीयांना म्हणून चालणार नाही तर युरोप-अमेरिकेला लागलेल्या ठेचेतून आपण तात्काळ शिकणे गरजेचे आहे. फार वेळ दवडूनही चालणार नाही. संगणक आणि इंटरनेटमुळे लोकांचे वाचनाचे वेड कमी झाले आहे, असा आरोप होत होता. हाच आरोप टीव्हीच्या आगमनानंतरही झाला होता. मात्र इंटरनेटमुळे पुन्हा एकदा लोक वाचनाकडे वळले, याकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. ते वाचन नाहीच, असेही सांगण्यात आले. खरे तर पुस्तकांची जागा इंटरनेटने घेतली होती. तरीही लोकांना आवडणारे असे ते रूप नव्हते आणि पुस्तक हातात धरल्याप्रमाणे वाटत नव्हते. काही तरी कमी आहे, असे वाटत होते. ही कमतरता ‘किंडल’ने भरून काढली. गेल्या वर्षअखेरीस याच ठिकाणी आम्ही तंत्रज्ञानाचा झपाटा अतिशय विलक्षण असल्याचे म्हटले होते. आता ‘किंडल दशक’ अवतरले आहे, असे सांगतानाच तंत्रज्ञानाचा झपाटा असल्याने त्याहीपेक्षा नवीन काही तरी लगेचच येईल आणि सारे जग त्याकडे आकर्षिले जाईल, असे म्हटले जात होते. किंडलने आता पुन्हा एकदा साऱ्यांना वाचनाकडे वळविण्याचे काम केले आहे. पुस्तकाला आता त्याचे नव्या युगातील रूप सापडले आहे. गेल्या खेपेस किंडलपुढच्या क्रांतीसाठी आम्ही सहा महिन्यांचा अंदाज व्यक्त केला होता. पण त्याहीपूर्वी म्हणजे अवघ्या दोनच महिन्यांत आयपॅडची घोषणा झाली आणि जागतिक बाजारपेठेतील लॅपटॉपच्या किंमती घसरल्या. दोनच दिवसांपूर्वी आयपॅडचे आगमनही झाले आणि त्यापाठोपाठ लॅपटॉपच्या किंमतीतल्या घसरणीलाही वेग आला! आता ही क्रांती केवळ डिजिटल राहिलेली नाही. तर तिने आपल्या आयुष्याशी निगडित असलेली सर्व क्षेत्रे काबीज करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे पारिणाम आता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये दिसू लागले आहेत. हा विषयही आता केवळ एकाच वर्गापुरता म्हणजे पैसेवाल्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर ही क्रांती ही फारसे पैसे हाती नसलेल्यांसाठीही मोठी संधी ठरते आहे. ही संधी आपण कधी स्वीकारणार एवढाच मुद्दा आता उरला आहे. जगाचे भविष्य लक्षात घेऊन आपण त्यानुसार आपल्या वर्तनात बदल करणार का? किंडलवर एवढी उलटसुलट चर्चा सुरू होती, त्यावेळेस आपण त्यापासून काही बोध घेतला का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. कारण गेल्याच महिन्यात नवी दिल्ली येथे भारतीय किंडल अर्थात भारतीय ई-रीडर बाजारपेठेत अवतरले. खरेतर ते आज ना उद्या येणार याची आपल्याला पूर्ण कल्पना होती. मात्र आजही आपण त्याच्या स्वागतासाठी तयार नाही. कारण गेल्या महिन्यात भारतीय भाषांमधील ई-रीडरसाठी केवळ एकच मराठी पुस्तक तयार होते. आणि आज हे लिहीत असतानाही ई-रीडरसाठी तयार असलेल्या मराठी पुस्तकांची संख्या एकच्या पुढे गेलेली नाही. भविष्य आपल्याला कळत नाही की, आपण ते नाकारण्याचा प्रयत्न करतोय? माहिती तंत्रज्ञानाच्या या क्रांतीने साऱ्या जगाचे भविष्य बदलते आहे, त्याला भारत अपवाद नाही. चीनसारखा बलाढय़ देशही ही क्रांती रोखू शकणार नाही. कारण ती रोखणे कोणाच्याच हातात नाही. आपल्याला हवे तसे गुगलने वागावे, असे चीनला वाटत होते. किंबहुना अजूनही तसे वाटते आहे. मात्र तंत्रज्ञानाला कधीच कोणते बंधन नसते. जगाच्या संस्कृतिकरणापासून ते सामाजिक, शैक्षणिक सर्व परिमाणांना अर्थशास्त्राचे बंधन असते. अर्थशास्त्रावर माणसाच्या संस्कृतीचा डोलारा उभा असतो. आता या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने अर्थसत्तेची गणितेच पार बदलून टाकली आहेत. आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाइप करतो आणि खात्यातून पैसे वळते होतात. आपण मोबाइलवरच बिलेही भरतो. मोबाइलवरच रेल्वे आणि एसटीची तिकिटेही खरेदी करतो. मोबाइलवरच ई-तिकीटही येते. यात प्रत्यक्ष नोटा किंवा नाण्यांचा वापर आपण कुठेही करत नाही. सारे होते डिजिटली! यातली ही मेख चीनबरोबरच आपणही लक्षात घेतली पाहिजे. चीनने नाकारल्यानंतर आता हाँगकाँगमधून सारे व्यवहार आणि कार्यवाही करण्याची तयारी गुगलने केली आहे. हाँगकाँग हा चीनचाच भाग आहे. पण चीन सेन्सॉरशिप मानतो, याचा अर्थ ते चिनी जनतेला मान्य आहे, असे होत नाही. किंबहुना चीनमधील तरुणाई ही गुगलच्या बाजूने आहे, असे वेबपेजेस चाळताना लक्षात येते. जे हॅकिंग भारतातील तरुणाईला जमते ते चिनी तरुणाईलाही जमणारच. त्यामुळे सेन्सॉरशिप लादून ज्या गोष्टी आपल्या जनतेपर्यंत जाऊ नयेत, असे चिनी सत्ताधाऱ्यांना वाटते आहे, त्याच गोष्टी हॅकिंगच्या माध्यमातून सहज उघड होऊ शकतात, नव्हे होत आहेत. चीनमधील हँकिंगची माहिती घेतल्यानंतर हे पुरते स्पष्ट होते. यातील बहुतांश हॅकिंग हे सरकारी माहिती उघड करण्यासाठीच होत असते. तंत्रज्ञान राजकारण जाणत नाही, ते निरपेक्ष असते हेच यातून सिद्ध झाले आहे. शिवाय अर्थशास्त्र हे चीन, युरोप, जपान, अमेरिका आणि भारत यापैकी कुणालाच सुटलेले नाही. उद्याच्या नव्हे तर आता आपल्यापर्यंत येऊन ठेपलेल्या अर्थशास्त्राचे धडे हे ‘बिट आणि बाइट्स’ मधले आहेत. थोडक्यात काय तर डार्विनच्या सिद्धान्ताला स्मरून आपण बदलते जग समजून घेतले पाहिजे, त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणले पाहिजेत आणि नव्या उत्क्रांतीसाठी सज्ज झाले पाहिजे.

No comments:

Post a Comment