Source- loksatta
link-
भारतीची ‘आफ्रिकन सफारी’
गुरुवार, १ एप्रिल २०१०
भारती एअरटेल ही टेलिकॉम उद्योगातील आघाडीची कंपनी आता खऱ्या अर्थाने भारतीय टेलिकॉम बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाईल. सायकलच्या सुटय़ा भागांच्या विक्री व्यवसायापासून आपल्या उद्योजकतेला प्रारंभ करणाऱ्या भारती एअरटेलचे मुख्य प्रवर्तक सुनील भारती मित्तल यांनी आपल्या कंपनीला केवळ पंधरा वर्षांत १८ देशात मोबाइल सेवा पुरविणारी जगातली पाचवी मोठी कंपनी बनविली आहे. मित्तल यांच्या प्रगतीचा हा आलेख केवळ देशातच नव्हे तर जागतिक कॉर्पोरेट जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, याबाबत शंका नाही. भारती एअरटेलने टेलिकॉम उद्योगातल्या झैन समूहाची आफ्रिकन देशातली मालमत्ता १०.७ अब्ज डॉलरला खरेदी केल्याने या उद्योगातले हे देशातले सर्वात मोठे ‘टेकओव्हर’ ठरले आहे. यापूर्वी टाटांनी १३ अब्ज डॉलरला कोरसचे केलेले ‘टेकओव्हर’ हे सर्वात मोठे ठरले होते. त्याखालोखाल आता भारतीचे ‘डील’ ठरले. मित्तल यांचे स्वप्न खरे तर मोठे होते. त्यांच्या डोळ्यापुढे आफ्रिकेची एम.टी.एन. ही सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी टेकओव्हर करण्याचे स्वप्न होते. याबाबत दोन वेळा त्यांच्या चर्चाही झाल्या. सुमारे २३ अब्ज डॉलरचा हा व्यवहार गेल्या वर्षी फिसकटला. हे ‘डील’ प्रत्यक्षात उतरले असते तर भारती जागतिक टेलिकॉम क्षेत्रातली तिसरी मोठी कंपनी झाली असती. मात्र हा व्यवहार फिसकटल्यामुळे मित्तल निराश झाले नाहीत. टेलिकॉम उद्योगात केवळ भारतीय बाजारपेठ हेच लक्ष्य न ठेवता जगात आपल्याला पसारा वाढवायचा आहे, हे त्यांनी निश्चित केले होते. त्यामुळे त्यांच्या टेकओव्हर टार्गेटपुढे झैन आली. त्यांनी जी कंपनी एकेकाळी ताब्यात घेण्याचे ठरविले होते, त्या एम.टी.एन.शी त्यांना आफ्रिकन देशात स्पर्धा करावी लागणार आहे. अशा प्रकारच्या ‘कॉर्पोरेट बॅटल्स’ या जगभर चालतात. भारतीलादेखील बाजारपेठ काबीज करण्यासाठी अशा ‘बॅटल’चा सामना आता करावा लागणार आहे. झैनच्या आफ्रिकन मालमत्ता भारतीच्या ताब्यात आल्याने १५ देशातील सुमारे चार कोटी २० लाख ग्राहक भारती एअरटेलच्या नेटवर्कशी जोडले गेले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारती हाच ब्रँड जगात भारती एअरटेल पोहोचविणार आहे. आफ्रिकेतील १५ देशांपैकी १० देशांत झैनचे स्थान पहिल्या क्रमांकावर आहे. तर अन्य पाच देशांत ते चौथ्या स्थानावर आहे. भारत, श्रीलंका व बांगलादेशातील त्यांचे अस्तित्व गृहीत धरल्यास भारती हा ब्रँड आता १८ देशांत उपलब्ध असेल. त्यापाठोपाठ लवकरच त्यांचा विस्तार २१ देशांत पोहोचेल. सध्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १.८ अब्ज लोकांपर्यंत भारती पोहोचली आहे. भारतीचे वैशिष्टय़ म्हणजे १९९५ साली भारतात ज्यावेळी त्यांनी मोबाइल सेवा सुरु केली त्यावेळी अनेक कंपन्यांनी आपले चांगले बस्तान बसविले होते. अशा वेळी बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारतीने कमी किंमतीचा फंडा वापरला. कॉर्पोरेट भाषेत बोलायचे झाल्यास ‘लो कॉस्ट मॉडेल’ प्रथम राबविले. भारतीच्या प्रवेशामुळे मोबाइल सेवेच्या दरात घट होत गेली. पुढे काही काळाने रिलायन्सने ज्यावेळी या बाजारपेठेत प्रवेश केला त्यावेळी ‘पोस्ट कार्डाच्या दरात कॉल’ ही अभिनव संकल्पना राबविली आणि कॉल दरांचे युध्द अधिकच तीव्र केले. त्यामुळे सुरुवातीला भारती व नंतरच्या काळात रिलायन्स यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत मोबाइल पोहोचविण्याच्या क्रांतीला मोठा हातभार लावला. आता झपाटय़ाने वाढत जाणारी आफ्रिकन बाजारपेठ काबीज करण्यासाठी कमी कॉल दर ठेवण्याचाच फंडा भारतीला तिकडे वापरावा लागणार आहे. हा फंडा वापरला तरच भारतीची ही ‘आफ्रिकन सफारी’ यशस्वी होईल. दहा वर्षांपूर्वी आपल्याकडे ज्या गतीने मोबाइल फोनचे जाळे वाढत होते आज तीच स्थिती आफ्रिकन देशांत आहे. आफ्रिकेतील मोबाइलची ही बाजारपेठ झपाटय़ाने वाढत चालली आहे. आजच्या घडीला आफ्रिकेत ३६ टक्के लोकांपर्यंत मोबाइल पोहोचले आहेत. काहींच्या मते आफ्रिकेतील बाजारपेठेत आज प्रवेश करणे कुठल्याही कंपनीला सोपे नाही. मात्र सध्या जगात झपाटय़ाने वाढणारी बाजारपेठ आफ्रिकेव्यतिरिक्त दुसरी कोणतीही नाही, हेदेखील तेवढेच वास्तव आहे. भारतात आता मोबाइल ग्राहकांची संख्या ५० कोटींच्या घरात गेली असताना अजून काही वर्षांनी आपल्याकडील मोबाइलची बाजारपेठही कुंठित होऊ शकते. अशा वेळी भारतीय मोबाइल कंपन्यांनी नवीन बाजारपेठ न शोधल्यास या कंपन्यांच्या वृध्दीवर र्निबध येणार हे उघड आहे. अमेरिका व युरोपातील मोबाइल कंपन्यांवर अशीच पाळी सध्या आली आहे. भारतीय मोबाइल बाजारपेठ वाढत होती, त्यावेळी युरोप व अमेरिकेतील मोबाइल कंपन्या भारतात येण्यासाठी धडपडत होत्या. ही पाळी अजून काही वर्षांनी आपल्यावर येणार आहे हे ओळखूनच सुनील भारती यांनी आजच आफ्रिकन देशात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यासाठीच त्यांनी झैनची आफ्रिकन मालमत्ता बाजारभावापेक्षा जास्त किंमत मोजून घेण्याचे ठरविले. मित्तल यांचे हे व्यावसायिक धारिष्टय़ आहे परंतु असे धाडस दाखविणाऱ्याच कंपन्या जगातिक कॉर्पोरेट नकाशात आघाडीवर येतात, असा आजवरचा इतिहास आहे. आता टेकओव्हरनंतर जागतिक टेलिकॉम कंपन्यांत भारतीचा पाचवा क्रमांक लागतो. लवकरच हा क्रमांक पहिल्या तीनमध्ये आल्यास आश्चर्य वाटू नये. भारतीने भारतीय बाजारपेठ मोठय़ा आक्रमकरीत्या काबीज केली. आज त्यांचे देशात १० कोटीहून जास्त ग्राहक आहेत. त्यांनी वाढत्या स्पर्धेतही ग्राहकसंख्येत देशात आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. आता विदेशातही त्यांची आक्रमक वाटचाल होईल यात काहीच शंका नाही. भारतीच्या या ‘डील’मुळे देशातील टेलिकॉम क्रांतीचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. देशात पंचवीस वर्षांपूर्वी घरात टेलिफोन असणे हे मोठे प्रतिष्ठेचे मानले जाई. सर्वसामान्यांच्या दृष्टीने फोन ही एक चैन होती. मोबाईलची ‘एन्ट्री’ अजून व्हायची होती. लँडलाइन फोन मिळण्यासाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी असायची. पंतप्रधानपदी राजीव गांधी असताना त्यांनी सॅम पित्रोडा यांना सोबत घेऊन टेलिकॉम क्रांतीची बीजे रोवली. देश जोडण्यासाठी दळणवळण हे महत्त्वाचे साधन आहे हे त्यांना पटले होते. म्हणूनच त्यांनी गावोगावी टेलिफोन बूथ पोहोचविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोग जबरदस्त यशस्वी झाला. त्यानंतर मोबाइलचे युग अवतरले आणि देशातील दळणवळणाचे सर्व चित्रच पालटले. सुरुवातीला मोबाइल हा श्रीमंतानाच परवडणारा होता. परंतु एवढय़ा मर्यादेत बाजारपेठेपुरते राहणे देशातील खासगी कंपन्यांना परवडणारे नव्हते. त्यातून कंपन्यांचे ‘किंमती युध्द’ सुरू झाले. आपली बाजारपेठ मोठी असल्याने या क्षेत्रात कंपन्याही वाढत गेल्या आणि प्रति कॉल्सचे दरही त्याच गतीने कोसळत गेले. यातून मोबाइल सर्वसामान्यांच्या हातात दिसू लागले. एवढेच नव्हे तर आता शहरांपासून ते ग्रामीण भागातही मोबाइलशिवाय कुणाचे पानही हलत नाही, अशी स्थिती आहे. आपण दोन दशकांपूर्वी आर्थिक उदारीकरण स्वीकारल्यापासून देशातील कॉर्पोरेट जगत पूर्णत: बदलले आहे. आघाडीच्या उद्योगसमूहाने आपले पंख जागतिक स्तरावर विस्तारले आहेत. अर्थात मोठय़ा समूहांना बदलत्या आर्थिक परिस्थितीत केवळ भारतीय बाजारपेठेपुरते आपले मर्यादित अस्तित्व ठेवणे परवडणारे नाही. म्हणूनच टाटांनी कोरस घेऊन जागतिक पातळीवर भरारी घेतली. भारतीय कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांतल्या मंदीचा पुरेपूर फायदा घेऊन आपली आर्थिक स्थिती बळकट केली. कामगार कपात, आधुनिकीकरण तसेच कर्जाची फेररचना केल्यामुळे भारतीय उद्योग आता जागतिक पातळीवर झेप घेऊ लागला आहे. उदारीकरणाचे दिवस आपण पाहिले नसते तर भारतीय कंपन्यांना जगात आपला ठसा उमटविणे शक्य झाले नसते. टेलिकॉम उद्योगात भारती, टाटांची वाहन व पोलाद उद्योगातील वाटचाल, पेट्रोकेमिकल्स उद्योगात रिलायन्स यांची नोंद जागतिक पातळीवर घेतली जात आहे. आपल्यापेक्षा मोठय़ा कंपन्या ताब्यात घेऊन त्यांना आपल्यात समावून घेण्याचे तंत्र आता भारतीय उद्योगसमूहांनी आत्मसात केले आहे. त्यांच्या या यशस्वी तंत्रामुळेच त्यांची वाटचाल यशस्वीरीत्या व आक्रमकरीत्या सुरू आहे. भारतीच्या डोक्यावर आता अब्जावधी रुपयांचे कर्ज असणार आहे. मात्र हे कर्ज उभारून ते फेडण्याचा त्यांच्यांत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. भारतीय उद्योगात हा आत्मविश्वास गेली काही वर्षे वाढतो आहे. केवळ आत्मविश्वासामुळे अडचणींवर मात करता येत नाही हे खरे, पण आत्मविश्वासच नसेल तर भरारीच घेणे अशक्य असते. भारतीच्या ‘आफ्रिकन सफारी’त भरारीची तशी उमेद दिसते आहे.
Wednesday, April 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment