Tuesday, May 25, 2010

परवशतेचा पाश

परवशतेचा पाश
बुधवार, २६ मे २०१०
Source - loksatta.
पिरामल हेल्थकेअर लिमिटेड ही देशातील एक आघाडीची औषध कंपनी आहे. म्हणजे ‘होती’ असे आता म्हणावे लागेल. कारण या कंपनीचा संपूर्ण फॉम्युलेशन उत्पादन विभाग अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी अ‍ॅबट लॅबोरेटरिजने तब्बल ३.७२ अब्ज डॉलरला म्हणजे भारतीय चलनात सुमारे १७ हजार कोटी रुपयांना खरेदी करून भारतीय कॉर्पोरेट जगताला एक प्रकारे धक्काच दिला आहे. तसे पाहिले तर धक्का तसा मर्यादितच आहे, कारण पिरामल हेल्थकेअरने पूर्ण कंपनी विकलेली नाही, तर त्याचे काही भाग विकले आहेत. त्यामुळे ‘पिरामल हेल्थकेअर’ या शेअरबाजारात नोंद असलेल्या कंपनीचे अस्तित्त्व यापुढेही असेलच. अ‍ॅबटने पिरामलचा हा विभाग ताब्यात घेण्यासाठी फार मोठय़ा प्रमाणावर अधिमूल्य देण्याची तयारी दाखविली. म्हणजे पिरामलच्या एकूण उलाढालीच्या आठ पट जास्त रक्कम त्यांना दिली. कॉर्पोरेट जगतातील सर्वसाधारण नियमांचा विचार करता उलाढालीच्या तीन ते चार पट रक्कम एकादी कंपनी ताब्यात घेण्यासाठी मोजली जाते. मात्र अ‍ॅबटने पिरामलचा हा विभाग आपल्यालाच मिळाला पाहिजे यासाठी इरेला पेटून ही ‘अवास्तव’ रक्कम मोजली. अ‍ॅबट हा विभाग खरेदी करण्यासाठी २.१२ अब्ज डॉलरची रोख तातडीने पिरामलला देणार आहे. तर अन्य रक्कम पुढील चार वर्षे दरवर्षी ४०० दशलक्ष डॉलर अशी देणार आहे. पिरामल हेल्थकेअरचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्या सांगण्यानुसार, आपल्या पोटच्या मुलीचे लग्न करून द्यावे तसा हा करार आहे. मुलीचे लग्न करून दिले तरी तिच्याशी नाते टिकतेच. काही विभाग विकून शिल्लक राहिलेल्या पिरामल हेल्थकेअरचा ताबा त्यांच्याकडेच राहाणार असल्याने आता त्यांना जे पैसे मिळणार आहेत, त्याद्वारे ते याच कंपनीचा विस्तार हाती घेतील. पिरामलने आपल्या कंपनीचा काही भाग विकूनही अजूनही त्यांच्याकडे ११ प्रकल्प व ३५० ब्रँड शिल्लक राहिले आहेत. यात सॅरिडॉनसारख्या अनेक नामवंत ब्रँडचा समावेश आहे. त्यामुळे पिरामलने आपले अस्तित्त्व टिकवित आपल्या कडील काही मालमत्ताच विकल्या आहेत, असा या ‘डील’चा अर्थ लावता येईल. याउलट देशातील एके काळची औषध उद्योगातली पहिल्या क्रमांकाची कंपनी रॅनबॅक्सीच्या प्रवर्तकांनी गेल्या वर्षी ती पूर्णपणेच जपानच्या डायचीला विकली होती. सुमारे चार अब्ज डॉलरला झालेल्या या रॅनबॅक्सीच्या ‘डील’ मध्ये ही कंपनी डायचीची उपकंपनीच झाली. तिची १०० टक्के मालकी या जपानी कंपनीकडे गेली. पिरामल हेल्थकेअरच्या दृष्टीने त्यांना आता नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी रोख रक्कम उपलब्ध झाली आहे. याद्वारे ही कंपनी आणखी वेगात आपली प्रगती करू शकेल. मात्र अ‍ॅबटसारखी जगात आपले अस्तित्त्व असलेली बहुराष्ट्रीय कंपनी एवढी मोठी रक्कम मोजण्यासाठी प्रवृत्त का झाली? अ‍ॅबटने ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी सुमारे १७ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या गुंतवणुकीची वसुली करण्यासाठी त्यांना किमान पुढील २० वर्षे वाट पाहावी लागेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दृष्टीने असा विचार करणे ही चुकीची बाब आहे. कारण त्यांना काबीज करायची असते ती बाजारपेठ. एकदा बाजारपेठ काबीज केली की मग ते नफा कमविण्यास मोकळे! जगातील अनेक भागांत त्यांनी हा ‘प्रयोग’ राबविला आहे. अ‍ॅबटने बाजारपेठ काबीज करण्याचे आपले उद्दिष्ट मात्र या ‘डील’मुळे सहजरीत्या साध्य केले आहे. अ‍ॅबटच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या टेकओव्हरमुळे आज ती देशातील उलाढालीत सर्वात मोठी कंपनी झाली आहे. त्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिप्ला व रॅनबॅक्सी या कंपन्यांच्या तुलनेत आपला बाजारपेठेतील वाटा सात टक्के जास्त कमविला आहे. या टेकओव्हरनंतर अ‍ॅबटची उलाढाल सरासरी २० टक्क्यांनी वाढेल, असे गृहीत धरले तरी २०२० साली कंपनीची उलाढाल २.५ अब्ज डॉलरवर पोहोचेल. त्यामुळे अ‍ॅबटच्या वाढीला सध्या तरी लगाम लागणे कठीण दिसत आहे. सध्या आठ अब्ज डॉलरची उलाढाल असलेली देशातील औषध उद्योगांची बाजारपेठ सरासरी २० टक्क्यांनी विस्तारत आहे. याउलट अमेरिका, युरोपची औषध बाजारपेठ सरासरी दोन ते तीन टक्क्यांनी वाढते आहे. विकसित देशातील बाजारपेठा पेटंटमुळे ‘सुरक्षित’ असल्या तरी त्या बाजारपेठा कुंठित झालेल्या असल्यामुळे अशा बाजारपेठांमध्ये या कंपन्यांना रस राहिलेला नाही. भारतीय औषध बाजारपेठेचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्याकडे २५ कोटी मध्यमवर्गीय आहेत. त्याबरोबरच पेटंट कायदा लागू होऊनही पाच वर्षे लोटली आहेत. त्यामुळे श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय-ज्यांची लोकसंख्या सुमारे दहा कोटीहून जास्त आहे, हीदेखील पेटंटची औषधे परवडणारी बाजारपेठ आहे. आपल्याकडे गरिबांची संख्याही मोठी असली तरी जेनिरिक औषधांची बाजारपेठदेखील विकसित देशांहूनही मोठी ठरावी इतकी आहे. केवळ पेटंटच्याच औषधांसाठी नाही तर जेनिरिक औषधांच्या विक्रीतही या बहुराष्ट्रीय कंपन्यांना रस आहे. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेकडे औषध उद्योगांतील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आकर्षित झाल्या आहेत. या बाजारपेठांमध्ये प्रवेश केल्याशिवाय त्या आपला विकास करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. नव्याने कंपनी स्थापन करून बाजारपेठ काबीज करण्यापेक्षा अस्तित्त्वात असलेल्या मोठय़ा भारतीय कंपन्या ताब्यात घेणेच त्यांना फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे औषध उद्योगातील बहुराष्ट्रीय कंपन्या वाटेल ती किंमत मोजून भारतीय कंपन्या खरेदी करीत आहेत. रॅनबॅक्सी, पिरामल यांच्या ‘विकेट’ यामुळेच गेल्या आहेत. एवढेच नव्हे तर भविष्यात आणखीही काही औषध कंपन्यांच्या ‘विकेट’ या बहुराष्ट्रीय कंपन्या घेणार आहेत. सध्या आघाडीच्या दहा कंपन्यांपैकी पाच कंपन्या या बहुराष्ट्रीय आहेत आणि त्यांच्याकडे बाजारपेठेतील ५० टक्क्यांहून जास्त वाटा आहे. त्यामुळे भारतीयांच्या आरोग्याची दोरी आता बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती गेली आहे. परवशतेचा हा पाश आरोग्यव्यवस्थेच्या नव्हे, तर अर्थव्यवस्थेच्याही गळ्याभोवती पडत आहे. हा कल धोकादायक ठरावा. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे अशीच स्थिती होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांची सत्ता असताना अमेरिकन व ब्रिटीश बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुक्तद्वार होते. इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी देशातील औषध कंपन्यांच्या वाढीला प्रोत्साहन दिले. बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना देखील ‘पेटंट’ कायदा अस्तित्त्वात नसल्याने भारतीय बाजारात स्वारस्य राहिले नव्हते. या काळात भारतीय औषध कंपन्या प्रामुख्याने ‘जेनिरिक’ औषधांचे उत्पादन करून झपाटय़ाने वाढल्या. आपल्याकडील गरिबांना हीच औषधे परवडणारी होती. मात्र उदारीकरणाचे युग सुरू झाल्यापासून हे चित्र पालटू लागले. देशातील कंपन्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया विदेशी कंपन्यांसाठी सोपी झाली. तसेच भारतीय कंपन्यांनीही विदेशी कंपन्या ताब्यात घेऊन आपली पताका विदेशात फडकविण्यास प्रारंभ केला. पाच वर्षांपूर्वी डाव्यांचा पाठिंबा असताना कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील पुलोद आघाडीने पेटंटचा कायदा संमत केला आणि विदेशी औषध कंपन्यांना पुन्हा एकदा भारतीय बाजारात रस वाटू लागला. सध्याच्या खुल्या आर्थिक धोरणानुसार, भारतीय कंपन्यांना आपले भांडवल विदेशी कंपन्यांना विकण्यासाठी कुणीच रोखू शकणार नाही. ज्याप्रमाणे टाटांना कोरस, जग्वार घेताना वा मित्तल यांना आर्सेलर ताब्यात घेताना ‘भावनिक’ विरोध झाला होता. पण त्यांना या कंपन्या टेकओव्हर करण्यापासून कोणी रोखू शकले नव्हते. तसेच आता औषध उद्योगातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या देशात कोणी रोखू शकणार नाही. एवढय़ा चढत्या किंमतीला अ‍ॅबटने भारतात केलेली गुंतवणूक लक्षात घेता त्यांना आपल्या औषधांच्या किंमती वाढवाव्या लागतील. ५० टक्क्यांहून बाजारातील वाटा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात गेल्याने या कंपन्या आपले सिंडिकेट करून अनेक औषधांच्या किंमती वाढविण्याचाही घाट घालू शकतात. अशा प्रकारे जगात अनेक देशांत बहुराष्ट्रीय कंपन्यांनी औषधांच्या किंमती वाढविल्या आहेत. आपल्या देशातही ते गडगंज नफा कमविण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गाचा अवलंब करू शकतात. यासाठी ते राजकारण्यांपासून ते नोकरशहांपर्यंत सगळ्यांभोवती आपला पाश आवळू शकतात. हा धोका वेळीच ओळखत सरकारने, औषधांच्या किंमती कशा नियंत्रणात राहातील आणि सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत औषधे कशी उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे.

अमेरिकेचा ऱ्हास?

अमेरिकेचा ऱ्हास?
डॉ. अनंत लाभसेटवार , बुधवार, २६ मे २०१०
latalabh@aol.com
राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचा वाढता हिस्सा सीमारक्षणाच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी खर्च केला जातो. हे जेव्हा पेलत नाही तेव्हा साम्राज्याच्या व्याप्तीवर मर्यादा येतात व देशाचं उन्नयन थांबून अधोगती सुरू होते. ती एकदा सुरू झाली की साम्राज्याचा लय होण्यास उशीर लागत नाही..
अगदी अलीकडचीच बातमी. १५ मार्च रोजी अमेरिकन टीव्हीवर झळकलेली. वर्तमानपत्रात चघळलेली. एका विश्वासार्ह सर्वेक्षणात असं आढळून आलं की अमेरिकन लोक आपल्या भवितव्याविषयी निराश झाले आहेत. त्यांच्यापैकी ६८टक्के म्हणतात की पुढील पिढीचं राहणीमान आपल्यापेक्षा कमी दर्जाचं असणार. या समजुतीमुळे बव्हंशी अमेरिकन लोकांना देश चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे असं वाटतं.
काही महिन्यांपूर्वी मी भारतात आलो असताना आपल्या लोकांना नवीन पिढीचं भवितव्य आपल्यापेक्षा उज्ज्वल आहे, असा आत्मविश्वास वाटतो, असं वाचलं. म्हणजे सध्या महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या मानसिकतेचा आलेख खाली जात आहे तर विकसनशील देशाचा वर, असं अनुमान काढण्यास हरकत नाही. ‘एकविसावं शतक भारताचं’ (व चीनचं) असं जे म्हणतात त्यात तथ्य असलं पाहिजे, असं या उदाहरणानं पक्कं वाटतं.
कुठल्याही साम्राज्याचा अभ्यास केला तर इतिहासात असं आढळून येतं की ते चिरकाल टिकत नाही. आजपर्यंत कुठल्याच साम्राज्याला चिरंजीवित्व लाभलेलं नाही. कधी ना कधी ते अस्ताला जातंच. रोमन, चिनी, स्पॅनिश, पोर्तुगीज व ब्रिटिश साम्राज्य आपापल्या काळात उदयास आली, शिखरस्थ झाली व मग त्या सर्वाना उतरण लागून ती इतिहासाच्या पानांत अदृश्य झाली.
अमेरिकेचं जगावरील प्रभुत्व दुसऱ्या महायुद्धापासून सुरू झालं. त्यावेळी ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळू लागला होता आणि त्याची जागा अमेरिकेनं घेतली. तसंच पहिल्या महायुद्धानंतर रशियामध्ये बोल्शेविक क्रांती होऊन लेनिननं सोव्हियत युनियनचं साम्राज्य प्रस्थापित केलं. त्याचा ७० वर्षांतच निकाल लागला..
साम्राज्यं लयाला का जातात याचा अनेक इतिहासकारांनी अभ्यास केला आहे. त्यावरून काही स्थूल निष्कर्ष काढता येतात. अमेरिकेचे अध्यक्ष नेहमी घोषणा करतात की या महासत्ताक देशात अजून पहाट सुरू असून उज्ज्वल भविष्य पुढे पसरलं आहे. परंतु गेल्या काही वर्षांतल्या घडामोडींमुळे इथे संध्याकाळ सुरू झाली की काय अशी शंका व्यक्त करण्यात येते.
जसजसा देशाचा औद्योगिक पाया वाढतो तसतशी त्या देशाची विस्ताराची महत्त्वाकांक्षा वाढीस लागते. ते राष्ट्र इतर देशांवर प्रभुत्व गाजवू लागतं व साम्राज्य जन्माला येतं असं इतिहास सांगतो. या प्रभुत्वामागे आर्थिक व शैक्षणिक मदत लपलेली असते. या साम्राज्यवादी प्रवृत्तीची परिणती लवकरच वाढत्या लष्करी खर्चात होते. राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचा (ॅऊढ) वाढता हिस्सा या परदेशी जबाबदाऱ्या पेलण्यासाठी खर्च केला जातो. हे जेव्हा पेलत नाही तेव्हा साम्राज्याच्या व्याप्तीवर मर्यादा येतात व देशाचं उन्नयन थांबून अधोगती सुरू होते. ती एकदा सुरू झाली की साम्राज्याचा लय होण्यास उशीर लागत नाही.
याचं परिचित उदाहरण म्हणजे ब्रिटिश साम्राज्य. ते एवढं विस्तारलेलं होतं की त्यावर कधी सूर्य मावळत नाही असं मोठय़ा अभिमानानं म्हटलं जाई. त्यांनी १५० वर्षे भारतावर राज्य केलं. पण जेव्हा त्याला ग्रहण लागलं तेव्हा थोडय़ाच वर्षांत ते लयाला गेलं. दुसऱ्या महायुद्धामुळे या अफाट साम्राज्याला धक्का बसला. हिटलरचा पराभव करण्यासाठी ग्रेट ब्रिटनला वसाहतींसह आपली तिजोरी अक्षरश: रिकामी करावी लागली. युद्धात अमेरिकेच्या मदतीनं विजय मिळवल्यावर ब्रिटनला आपण कफल्लक झालो असं आढळून आलं.
स्वातंत्र्याच्या संग्रामात मग्न असलेल्या भारताला त्याची कल्पना देखील नव्हती. युद्धामुळे होरपळलेल्या देशात अन्नान्न दशा निर्माण झाली. त्या देशाजवळ स्वत:चं पोट भरण्यासाठी अन्न नसताना पराभूत जर्मनीचा काही भाग त्याच्या ताब्यात आला. तिथली लोकसंख्या पोसण्याची जबाबदारी ब्रिटनच्या अंगावर पडली. वसाहतींना अगोदरच लुटल्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नव्हती. भारतात व ब्रिटनमध्ये तर त्यावेळी शिधा नियंत्रण (१ं३्रल्ल्रल्लॠ) होतं. याउलट आता त्या वसाहती ब्रिटनच्या तिजोरीवर मोठा बोजा टाकू लागल्या. त्या सर्वाना ताब्यात ठेवण्यासाठी त्या साम्राज्यवादी देशाला अफाट लष्करी खर्च करावा लागत होता. तो त्याला पेलेनासा झाला.
याप्रमाणे आर्थिक कोंडीत सापडल्यामुळे लष्करी बोजा हलका करण्यासाठी ब्रिटननं आपल्या साम्राज्याचं विघटन करण्यास सुरुवात केली. गांधींची स्वातंत्र्यचळवळ तेव्हा जोरात होती. भारतीय दृष्टिकोनातून गांधींच्या नैतिक बळाला इंग्लिश अधिकारी शरण गेले असं असलं तरी त्या राज्यकर्त्यांची भूमिका निराळी होती. त्यांना भारताला वसाहत म्हणून ठेवणं आर्थिकदृष्टय़ा परवडेनासं झालं होतं. म्हणून आपल्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी त्यांना भारताची मुक्ती करणं भाग पडलं. (संदर्भ : डॉलर्सच्या फुलवाती, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई २०१०).
उरलेलं साम्राज्य तरून नेण्यासाठी ब्रिटनला कर्जासाठी अमेरिकेचे पाय धरावे लागले. त्या ऋणाच्या अटी एवढय़ा कठोर व प्रतिकूल होत्या की त्यामुळे ब्रिटनच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. त्यातली एक अट अशी होती की त्या वेळी जागतिक चलन म्हणून मान असलेला पौंड डॉलरमध्ये परिवर्तनीय व्हावा. त्या वेळी सर्व जागतिक व्यापार पौंडातून होत. ही अट ब्रिटनच्या गळ्याखाली अमेरिकेनं उतरवताच साऱ्या जगानं राष्ट्रीय संचिताचं डॉलरमध्ये रूपांतर केलं. कारण युद्धानं कंबर खचलेल्या ब्रिटनची आर्थिक परिस्थिती केविलवाणी होती. त्यामुळे पौंडाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरली. त्या मानानं अमेरिका बलशाली ठरली. लवकरच पौंड जागतिक चलनाच्या सन्माननीय जागेवरून पदच्युत झाला. आता ब्रिटनला इतर देशाप्रमाणे पौंडाऐवजी डॉलरमध्ये माल विकत घेणं भाग पडलं. स्वस्त पौंडामुळे ते महाग पडू लागलं. अफाट नौदल पोसणं अशक्य झाल्यानं, लष्कर संकुचित केल्यानं, साम्राज्य हळूहळू बुडू लागलं. वसाहतींना स्वातंत्र्य मिळून ब्रिटिश साम्राज्य नामशेष झालं.
दुसरं उदीहरण चीनमधील प्राचीन साम्राज्य मिंग वंशावळीचं. तिनं विघटीत चीनचं संघटन करून ३०० र्वष राज्य केलं. ती इतिहासातली सर्वाधिक सुसंस्कृत संस्कृती समजण्यात येते. (संदर्भ: चीनमधील चैन, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, २०१०). परंतु १७५०च्या सुमारास या साम्राज्याला तडा गेला. कशामुळे? त्याला राजकीय गटबाजी, दुष्काळ, रोगांची साथ अशी अनेक कारणं दिली जातात. पण त्यातलं सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे आर्थिक अरिष्ट. साम्राज्य संघटित ठेवण्यासाठी लष्करी बळ लागतं. हा खर्च वाढत राहिला की शेवटी तो खिशाला परवडत नाही. कुठच्याही साम्राज्याचं बळ बंदुकीच्या टोकातून उगम पावत असल्यामुळे लष्कर दुबळं झालं की साम्राज्य गेलं हे समीकरण डोकं वर काढतं. चीनमधील इतर वंशावळींचे असेच तीन तेरा वाजले.
साम्राज्य लयास गेल्याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे सोव्हिएत युनियनचा साम्यवादी पसारा. पूर्व युरोपियन वसाहती आपल्या मुठीत ठेवण्यासाठी त्या देशानं त्यांना अफाट लष्करी मदत केली. खनिज तेल पुरवलं. पण शेवटी हा खर्च त्या देशाला पेलेनासा झाला. महासत्तेची झूल व मिजास स्वस्त नाही हे त्याला कळलं आणि गोर्बाचेव्ह यांना शेवटी साम्राज्याचं विघटन करणं भाग पडलं. अवघ्या ७० वर्षांत या साम्राज्याचा नाश झाला.
आता फक्त एकच साम्राज्य उरलं आहे. ते म्हणजे भांडवलशाहीप्रणीत अमेरिका. तो देश पश्चिम युरोप, जपान, दक्षिण कोरिया, इस्रायल वगैरे देशांवर प्रत्यक्ष राज्य करीत नसला तरी त्या राष्ट्रांना आपल्या दबावाखाली ठेवण्यासाठी त्यांना लष्करी छत्र पुरवतो. त्यासाठी या एकमेव महासत्तेला अफाट लष्करी खर्च करावा लागतो. ब्रिटिश साम्राज्य शिखरस्थ असताना त्याला करावा लागे तसा. परंतु ग्रेट ब्रिटनला ते सोपं होतं कारण वसाहतींना लुटून तो तिजोरी भरीत असे. अमेरिकेला ते डॉलर कमवावे लागतात. त्याचे मित्र देश हा संरक्षणभार उचलत नाहीत. परिणामी अमेरिका सध्या आपल्या संरक्षण खात्यावर ६५० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम खर्च करते. जगातल्या सर्व संरक्षण खात्यांचा एकूण खर्च तेवढा नाही. इतिहासात मानवानं एवढी बलशाली, तांत्रिकदृष्टय़ा सुसंस्कृत, अफाट व अद्ययावत संहारक यंत्रणा कधी निर्माण केलेली नाही.
परंतु अर्थसंकल्पात हिमालय मावण्याएवढी दरी असताना अमेरिकेला एवढा खर्च कुठपर्यंत सोसवेल याविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात प्रत्येक डॉलरमधले ४२ सेंट्स उसने घेऊन अमेरिकेला तोंडमिळवणी करावी लागते.
सध्या सुरू असलेल्या तीन युद्धांमुळे (इराक, अफगाणिस्तान व पाकिस्तान) या महान राष्ट्राचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे. सप्टेंबर २०१० मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षांत १४०० अब्ज डॉलरची व पुढील वर्षांत १६०० अब्ज डॉलरची म्हणजे राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या ११.२ टक्के त्रुटी आहे. भारतात तेच प्रमाण ५.५% आहे. म्हणजे अख्ख्या भारताच्या ढोबळ उत्पन्नापेक्षाही (१२०० अब्ज डॉलर) अधिक पैसा अमेरिका इतर देशांकडून (मुख्यत: चीन, जपान व सौदी अरेबिया) उसने घेऊन महासत्तेचं सोंग करते.
चलनाबाबतही तेच. पौंडाचं जसं अवमूल्यन झालं तसं सध्या डॉलरचं होत आहे. ते बघून चीन व रशिया या सावकार देशांनीच नव्हे, तर फ्रान्ससारख्या मित्र देशानंदेखील ‘डॉलर’ हे जागतिक चलन म्हणून वापरू नये अशी मागणी केली आहे. त्याऐवजी संयुक्त राष्ट्रांनी नवीन चलन काढावं, अशी विनंतीही केली आहे. ही अमेरिकेला मारलेली चपराक आहे. आंतरराष्ट्रीय चलन म्हणून मिळालेला मान एकदा अपहृत केला की त्या देशाचं अध:पतन होण्यास उशीर लागत नाही. पण अमेरिका काळाची ही हाक ऐकण्याच्या धुंदीत नाही. मद्यधुंद खलाशाप्रमाणे तो देश पैसा खर्च करण्यात मग्न आहे.
ब्रिटनला अमेरिकेनं कर्ज देऊन तारलं होतं. आता चीन तेच करीत आहे. तो अमेरिकेचा सर्वात मोठा सावकार (८९० अब्ज डॉलर) झाला आहे. याप्रमाणे अमेरिकेची मान चीनच्या मुठीत आहे.
सध्या अमेरिका जे आर्थिक मार्गक्रमण करीत आहे ती वाट मळलेली आहे. यापूर्वी अनेक साम्राज्यवादी देशांनी त्यावर वाटचाल केलेली आहे. त्यावरचे लाल कंदील अमेरिकेने वेळीच ओळखले नाहीत आणि संरचनात्मक बदल केले नाहीत तर ब्रिटनची जी स्थिती झाली ती अवस्था अमेरिकेवर ओढवण्यास वेळ लागणार नाही.

Thursday, May 6, 2010

वैद्यकाच्या दाही दिशा : ‘प्रतिमा’तंत्र

वैद्यकाच्या दाही दिशा : ‘प्रतिमा’तंत्र
डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, ६ मे २०१०
Source - loksatta.com
URL- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=67395:2010-05-05-14-57-51&catid=240:2009-10-30-08-22-29&Itemid=240
अमेरिकेतील टेक्सास विश्वविद्यालयातील क्ष-किरण चिकित्सक डॉ. ओ. कार्ल सिमॉनटन यांनी १९७१ साली वर्णन केलेल्या ६१ वर्षांच्या घशाच्या असाध्य कर्करोगाने ग्रस्त रुग्णाची ही कहाणी ‘शरीर-मन वैद्यकाच्या’ इतिहासात एक नवीन अध्याय सुरू करण्यास कारणीभूत ठरली असं म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. या रुग्णाचा कर्करोग हा अंतिम अवस्थेत होता, त्याला गिळताही येत नव्हते, त्याचे वजन जवळजवळ ४० पौडांनी उतरले होते आणि डॉक्टरांनी सर्व प्रकारच्या उपचारांनंतर (उदा. औषधोपचार, रेडिएशन व जमल्यास शल्यक्रिया) तो पाच वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता केवळ ५ टक्के असेल असे जाहीर केले होते. पण तो इतका खंगला होता की, रेडिएशनसमोर तो टिकाव धरू शकेल असे डॉ. सिमॉनटनना अजिबात वाटत नव्हते. एक शेवटचा उपाय म्हणून डॉक्टरांनी त्याला रेडिएशनला मदत म्हणून ‘प्रतिमा’तंत्राचा अवलंब करावयास सांगितले. प्रथम त्याला आपला कर्करोग ‘निश्चित स्वरूपात’ डोळ्यासमोर कल्पिण्यास सांगितले. नंतर त्याला भावणाऱ्या एखाद्या प्रतिमेचा वापर करून (Guided Imagery) त्याच्या श्वेतपेशी त्याच्या कर्करोगावर हल्ला चढवीत असून कालांतराने त्या कर्कपेशींना पूर्णपणे त्याच्या शरीराबाहेर हाकलून देत आहेत असे दृश्य (Visualisation) त्याने डोळ्यासमोर जाणीवपूर्वक आणावे असे त्याला सुचविण्यात आले.
त्या रुग्णाने आपला कर्करोग म्हणजे एखादा काळा खडक असून तो हळूहळू वरून पडणाऱ्या शुभ्र हिमवर्षांवाने (श्वेतपेशी) झाकला जात आहे अशी दृश्य कल्पना (Visualisation) करण्यात सुरुवात केली. डॉ. सिमॉनटन यांनी त्या रुग्णाला घरी पाठविले व दिवसातून काही वेळा या तंत्राचा वापर करण्यास सांगितले. कालांतराने त्याला आपली कर्करोगाची गाठ कमी होत असल्याचे आढळू लागले. काही आठवडय़ाने ती गाठ अगदी लहान झाली. या दरम्यान, रेडिएशनचे कोणतेही दुष्परिणाम त्याच्यावर झाले नाहीत आणि दोन महिन्यांनी कर्करोग पूर्ण नाहीसा झाला!
डॉ. सिमॉनटनकरिता हे एक महद्आश्चर्यच होते. अर्थात रुग्णाला त्यात काही फारसे आश्चर्य वाटले नाही. त्याने डॉक्टरना पुढे जाऊन असेही विचारले की, ‘‘आता घशाची गाठ गेलीच आहे तर त्याला कित्येक वर्षे सतावणाऱ्या सांध्याच्या विकारावरही त्याने असा प्रयोग करावा का?’’ व त्यांच्याच सल्ल्याने त्याने या तंत्राचा वापर करून आपल्या सांध्यांच्या विकारावरही मात केली व नदीत मासेमारी करण्याचा आपला छंद पुढेही जोमाने चालू ठेवला.
सहा वर्षांच्या फॉलोअपनंतरही त्याच्यात या दोन्ही रोगांची लक्षणे परत उद्भवताना आढळली नाहीत. शरीर मन वैद्यकाचे एक अग्रगण्य पुरस्कर्ते, आधुनिक वैद्यकाचे उच्चविद्याविभूषित डॉ. दीपक चोप्रानी आपल्या ‘क्वाँटम हिलिंग’ या पुस्तकात या सर्व प्रकरणाचे बहारदार वर्णन केले आहे. शरीर मन वैद्यकाच्या क्षेत्रात डॉ. सिमॉनटन यांच्या या रुग्णाकडे एक महत्त्वाचा टप्पा, ‘लँडमार्क केस’ म्हणून पाहिले जाते.
प्रतिमातंत्र म्हणजे नेमके काय?
उपरोल्लेखित केसमध्ये डॉ. सिमॉनटन यांनी ज्या तंत्राचा वापर केला त्यास चित्रप्रतिमा तंत्र (Visualisation) असे म्हणतात. प्रतिमातंत्र याचा अर्थ एखाद्या विशिष्ट अथवा सर्व संवेदनांवर आधारित अशा विचारांचा प्रवाह सतत काही वेळ मनात खेळविणे व त्याचा उपचारांकरिता वा एखाद्या कृतीकरिता परिणामकारक वापर करणे. चित्रप्रतिमा तंत्रात एखाद्या दृश्याचा उदा. शरीरमनाच्या शिथिलीकरणाकरिता शांत जलाशयांच्या किंवा हिरवाकंच रानाच्य दृश्याचा विचार करणे, वापर केला जातो तर ध्वनिप्रतिमातंत्रात विशिष्ट आवाजाचा उदा. गाभाऱ्यातील मंत्रोच्चार वा दूरवरून सायंकाळी ऐकू येणारा घंटानाद इ., गंधप्रतिमातंत्रात एखाद्या विशिष्ट गंधाचा उदा. आरतीच्या वेळी वापरावयाच्या धूप, मध्यरात्रीचा रातराणीचा गंध इ. स्पर्श प्रतिमातंत्रात एखाद्या विशिष्ट स्पर्शाचा उदा. वाऱ्याची झुळूक, रेशमीवस्त्राचा स्पर्श इ.चा; तर रसप्रतिमा तंत्रात एखाद्या विशिष्ट चवीचा. उदा. कोकणातील हापूस आंबा, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी इ.चा वापर केला जातो. काही वेळा या सर्व संवेदनांचा वापर करून एखादी र्सवकष प्रतिमा वापरली जाते. त्या त्या प्रतिमेशी मन एकाग्र झाले की, त्या त्या प्रतिमेशी निगडीत संवेदनामुळे मेंदूतील ती ती केंद्रे उत्तेजित होतात. उदा. दृश्यांमुळे Visual Cortex इ. व त्यांचा प्रभाव पुढे अनिच्छावर्ती मज्जासंस्था, प्रतिरक्षाप्रणाली व अंतस्त्र्रावी ग्रंथी यावर पडून त्या त्या संस्थाच्या कार्यात सकारात्मक बदल घडून शरीरस्वास्थ्याची निर्मिती होते असे या तंत्राचे शास्त्र सांगते. या सर्व प्रणाली अक्षाला विचार-मेंदू- ??अनिच्छावर्ती मज्जासंस्था. प्रतिरक्षाप्रणाली. अंत:स्त्र्रावी ग्रंथी अक्ष किंवा psychoneuro Immune Endocrine Axis (PNIE Axis)असे भले मोठे नाव आहे. थोडक्यात सांगावयाचे तर संवेदनाप्रतिमांचा वापर करून मनाची एकाग्रता साधून वर उल्लेखिलेल्या अक्षाचा वापर करून मन, शरीराचे असंतुलन ठीक करते. संमोहन व जैवप्रतिज्ञापन ही उपचारपद्धतींची दोन टोके कल्पिली तर प्रतिमातंत्र कोठेतरी मध्यभागी ठेवावे लागेल.
प्रतिमातंत्राचा वापर कोठे होतो?
तसे पाहिले तर झोपेत किंवा दिवास्वप्न पाहतानाही आपण क्वचित याच प्रतिमातंत्राचा वापर करतो. यातूनच अनेकदा नवनवीन कल्पना (किंवा अगदी शास्त्रीय शोधही!) स्फुरतात. बेंझीनचा रेणू कसा असेल याचा विचार करण्यात ककुले या शास्त्रज्ञाने कित्येक रात्री तळमळत काढल्या. मग एके दिवशी त्याला डुलकी लागली असताना, त्याला दिसली की सहा साप रिंगण करून गोलगोल फिरत आहेत, एकाची शेपटी दुसऱ्याने तोंडात धरली आहे तर दुसऱ्याची शेपटी तिसऱ्याने तोंडात धरली आहे! असं करता करता शेवटच्याची शेपटी पहिल्याच्या तोंडात!! त्यांचा हा खेळ पाहून बेंझिनच्या रेणूची रचना अशी मंडलाकार असेल असे त्याला वाटले व पुढे ते अचूक ठरले.
विविध प्रतिमातंत्राचा उपयोग मुख्यत: शिथिलीकरण साधणे व ताणतणाव कमी करणे याकरिता केला जातो. साहजिकच तणावजन्य अनेक विकारांमध्ये प्रतिमातंत्रोपचारांचा उपयोग होताना दिसतो. उदा. तणावजन्य उच्च रक्तदाब, निद्रानाश, स्नायू वेदना, अकारण चिंता, नैराश्य, त्वचेवरील काही विशिष्ट प्रकारचे पुरळ, अतिसंवेदनशील पोट (Irritable Bowel Syndrome), दीर्घकालिक अॅलर्जी व अॅलर्जीजन्य अस्थमा इ. काही शास्त्रज्ञांना Rheumatoid Arthritis, Crohn's Diseaseइ. गंभीर विकारातही प्रतिमातंत्राचा उपयोग होताना आढळले आहे. वर उल्लेखलेल्या डॉ. सिमॉनटन यांच्या केससारख्या घटना मात्र तुरळकच आढळतात. अमेरिकेतील Academy for Guided Imagery (अ.ॅ.क.) या संस्थेने
या बाबतीत (हे तंत्र कोठे, कोणी व कसे वापरावे इ. संबंधी) काही निश्चित मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. अभ्यासूंनी या संस्थेच्या बेवसाईटवर ती जरूर पाहावीत.
या तंत्रोपचारांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत असं या उपचारांचे प्रवर्तक सांगतात. मात्र त्यांचा वापर निदान सुरुवातीस तरी चांगल्या मार्गदर्शकाच्या सहाय्याने करावा. अॅक या संस्थेने या दृष्टीने Professional Certification Training Program ही चालू केला आहे.
या उपचारांचे एक वैशिष्टय़ म्हणजे ते स्वतंत्ररित्या किंवा अन्य उपचारांचा एक भाग, उदा. जैवप्रतिज्ञापन, संमोहन, गेस्टाल्ट थेरपी, एन.एल.पी., आर.ई.बी.टी. इ. म्हणूनही वापरता येतात. काही पाश्चात्य शल्यविशारदांनी, शल्यक्रियांचे काही दुष्परिणाम टाळण्यासाठी, शल्यक्रियेनंतर लवकर बरे होण्याकरिता व प्रतिकारक्षमता वाढविण्याकरिताही या तंत्राचा वापर केला आहे.
आपल्या भावनांची गुणवत्ता सुधारण्याकरिताही या तंत्राचा वापर करता येतो हे एक वैशिष्टय़च म्हणता येईल. या तंत्राच्या वापराची एक सोपी पद्धत सोबतच्या तक्त्यात दिली आहे.
शरीर-मन वैद्यकाच्या भविष्यकालीन वाटचालीत या प्रतिमातंत्राचा उपचारात व रोगप्रतिबंधनातही फार मोठा वाटा असणार आहे एवढे निश्चित!

प्रतिमातंत्र कसे वापराल?
अ. १) तुमची रोगी लक्षणे अथवा रोग म्हणजे एक वितळणारा बर्फाचा तुकडा आहे अशी कल्पना करा.
२) रोगग्रस्त अवयव उत्तम काम करीत आहे अशी कल्पना करा.
३) मन शांत करण्याकरिता शांत जलाशय, घनगंभीर दरी इ. दृश्ये डोळ्यासमोर आणा.
ब या गोष्टीदिवसातून किमान ३ वेळा करा.
१) अपेक्षित परिणामाची कल्पना करा.
२) शांत बसा किंवा पहुडा आणि शिथिल व्हा.
३) श्वासावर लक्ष केंद्रीत करा व दीर्घ श्वसन करून शिथिल व्हा.
४) जी प्रतिमा निवडली असेल तिच्यावर लक्ष केंद्रीत करा.
५) दृश्य, ध्वनी, स्पर्श, चव, गंध अशा सर्व संवेदनांचा प्रतिमेवर लक्ष केंद्रीत करताना वापर करा.