आमची सुंदरी
सुनंदा देशमुख
Tuesday, September 13, 2011 AT 09:27 AM (IST)
Tags: muktpeeth
Source - http://72.78.249.107/esakal/20110913/5657985859218269250.htm
ती लहान बाळासारखी वडिलांच्या गळ्यात हात टाकून बिलगली. वडील तिला हळूहळू थोपटत राहिले. थोड्या वेळाने तिचे गळ्यातले हात काढायला लागले तर...
ही घटना खूप जुनी म्हणजे 1952-53 ची आहे. तेव्हा आम्ही इंदोरला राहत होतो. माझे वडील कंपनीत वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना प्राणी पाळायची फार हौस होती. एकदा तर इंदोरला सर्कशीतील वाघीण मेली. तिचा छावा वडिलांनी घरी आणला होता. आई त्याला बाटलीने दूध पाजायची. पुढे सर्कसवाले त्याला घेऊन गेले.
माझे वडील धारहून घरी येत होते, तेव्हा मोटारीच्या टपावर काहीतरी पडल्याचा आवाज आला. आमच्या ड्रायव्हरने पाहिले तर माकडाचे एक पिलू टपावर पडले होते. ते जिवंत होते. वडिलांनी मोटार कडेला उभी करायला सांगितली व ते ड्रायव्हरसह लांब जाऊन उभे राहिले. त्यांना वाटले की पिल्लाची आई त्याला घेऊन जाईल. तास, दोन तास थांबले; पण पण पिल्लाला न्यायला त्याची आई काही आली नाही. मग वडिलांनी पिल्लाला टॉवेलमध्ये ठेवले व घरी घेऊन आले.
माझी आई वैतागली, कारण माझा लहान भाऊ सहा महिन्यांचा होता. त्याला सांभाळायचे व पिल्लाचे पण करायचे. पिल्लू अगदी एक दोन दिवसांचे असावे. पण आईला वडिलांचे ते प्राणिप्रेम माहीत होते. मग काय, दुधाच्या दोन दोन बाटल्या, जुना रग, दुपटी वगैरे सर्व तयारी केली. आई आधी भावाचे करायची; मग पिल्लाचे करायची. भावाबरोबर तिचेही अंथरूण तयार करायची. (ती माकडीण होती) माणसांच्या बाळापेक्षा प्राणी लवकर मोठे होतात.
आईने तिचे नाव "सुंदरी' ठेवले. आईने भावाला मांडीवर घेऊन बाटलीने दूध पाजायला घेतले, की ही पण दुपट्यावर झोपून दोन्ही हातांनी बाटली धरून दूध प्यायची. आई माझ्या भावाला दोन- तीन तासांनी "शू' करायला चौकातल्या मोरीत धरायची. ही पण मोरीच्या कोपऱ्यात उभे राहून "शू' करायची. सुंदरीला बांधून ठेवत नसत. घरभर फिरायची. पण कधीही नुकसान केले नाही. एकदा तिने घरभर लेंड्या टाकल्या. आई चिडली. तिने सुंदरीचे बकोट धरले आणि मोरीपाशी नेऊन एक जोराची थप्पड मारली व ओरडली, ""कळत नाही "शी' कुठे करायची.'' त्यानंतर परत सुंदरीने घरात घाण केली नाही.
एकदा माझ्या भावाला बरे नव्हते. आई त्याला मांडीवर थोपटून निजवत होती. सुंदरीची लहर फिरली. तिने दुपटे अंथरले. तरा तरा जाऊन भावाला उचलले व दुपट्यावर ठेवले आणि पटकन आईच्या मांडीवर निजली. भाऊ जोरजोरात रडायला लागला. आईने चिडून तिला खाली ठेवले व दोन फटके मारले. झाले! सुंदरी तेव्हापासून कोठे गेली कळले नाही. संध्याकाळ व्हायला आली; पण सुंदरीचा पत्ता नाही. आईला तिचे व भावाचे करायची इतकी सवय झाली होती... लळा लागला होता. त्यामुळे आम्ही मुले, नोकर, आई, सर्व जण "सुंदरे' "सुंदरे' हाका मारत सुटलो; पण सुंदरीचा पत्ता नाही. आईचे डोळे वाहायला लागले. आईने कळवळून हाक मारली, ""सुंदरे कुठे आहेस तू? ये ना गं बाळ,'' आणि काय आश्चर्य दारावरच्या छतावर बसलेल्या सुंदरीने वरून आईच्या अंगावर झेप घेतली व आईच्या पदरावर डोके घासत राहिली. आई म्हणाली, ""सुंदरे मी तुला कधीही मारणार नाही.''
माझे वडील रिटायर झाले. मोठ्या बंगल्याचे चार ब्लॉक्स करून एक भाग आमच्याकडे ठेवला व तीन ब्लॉक्स भाड्याने दिले; पण सुंदरीमुळे लोक घाबरायला लागले तेव्हा तिला सरदार पळशीकरांच्या बागेत ठेवायचे ठरले. वडिलांनी एका मोठ्या बैठ्या झाडावर खाट बांधून, रग-दुपटी अंथरून जेवायचे ताट ठेवून सुंदरीला पहिल्यांदा साखळीने बांधले. सुंदरीलाही कळले होते. ती जणू रडत होती. वडील जड अंतःकरणाने घरी आले. कुणालाही करमत नव्हते. आई तर जेवलीच नाही. दोन- तीन दिवसांनी पळशीकरांचा माणूस वडिलांना बोलवायला आला. वडील गेले तर सुंदरी कशीबशी उठून उभी राहिली. वडिलांनी तिची साखळी काढली आणि ती लहान बाळासारखी वडिलांच्या गळ्यात हात टाकून बिलगली. वडील तिला हळूहळू थोपटत राहिले व थोड्या वेळाने तिचे गळ्यातले हात काढायला लागले तर... सुंदरी गेली होती.
Tuesday, September 13, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment