Wednesday, December 26, 2012

प्रसन्न बुद्धीची किमया

Source- loksatta.com
URL- Loksatta.com - प्रसन्न बुद्धीची किमया
Author - प्रशांत दीक्षित : prashant.dixit@expressindia.com
Published: Tuesday, December 25, 2012

आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी..
विरामापूर्वीचा हा अखेरचा लेख..
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी तीन मुख्य तत्त्वे सांगितली आहेत. १) जगताना झुंज देणे अपरिहार्य आहे. म्हणून हताश न होता झुंज देण्यास सतत सज्ज राहावे. संकल्प चांगले असून भागत नाही. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी झुंजावेच लागते. २) लोकसंग्रह करीत राहण्याने जगणे अर्थपूर्ण होऊ शकते. किंबहुना लोकसंग्रह हे बुद्धिमान माणसाचे कर्तव्य आहे. ३) वरील दोन तत्त्वे साध्य होण्यासाठी बुद्धीची स्थिरता अत्यावश्यक आहे आणि बुद्धीच्या स्थिरतेसाठी मनाची प्रसन्नता अनिवार्य आहे.
प्रसन्न बुद्धीने झुंज दे, असे परस्परविरोधी वाक्य करणे ही श्रीकृष्णांची खासियत. यातील झुंज द्यावी, लोकसंग्रह करावा हे मनाला पटते. पण त्यासाठी आधी बुद्धी प्रसन्न करा, असे सांगितले. हे पटत नाही. झुंज व लोकसंग्रह साधला की त्यातून यश मिळते. आणि यश मिळाले की मन प्रसन्न होते. प्रसन्नता शेवटी आहे असे आपण मानतो, तर प्रसन्नता प्रथम असे श्रीकृष्ण सांगतात. यातील खरे काय?
श्रीकृष्णांचे म्हणणे खरे आहे असे हार्वर्ड विश्वविद्यालयातील संशोधन सांगते. अर्थात श्रीकृष्णांची तत्त्वे तपासण्यासाठी हे संशोधन झालेले नाही. ते झाले आहे आर्थिक मंदीसारख्या जगासमोरील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी. परंतु, त्या संशोधनातून काढलेले निष्कर्ष हे गीतेतील वर उल्लेख केलेल्या तीन तत्त्वांशी तंतोतंत जुळतात.
शॉन अॅकोर या तरुण संशोधकाने हा विषय हाती घेतला व त्याला साधी, सोपी पण अद्भुत सामथ्र्यशाली अशी तत्त्वे सापडली. अमेरिका हा प्रयोगनिष्ठ देश आहे. तत्त्वे मांडून तेथे चालत नाही. ती प्रयोगाने सिद्ध करावी लागतात. त्यासाठी डेटा जमा करावा लागतो. शॉनने तसे केले. केवळ अमेरिकेतील नव्हे तर ४२ देशांतील निरीक्षणे घेतली. हजारो लोकांची परीक्षा केली. २२५ शोधनिबंधांचा अभ्यास केला. शॉनला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट दिसून आली. समस्येवर मात करण्यासाठी मनाची प्रसन्नता ही पूर्वअट आहे.
समस्येसमोर आपण चिंताग्रस्त होतो. काळजीत पडतो. मनावर ताण येतो. या प्रतिक्रिया समस्येतील गुंतागुंत आणखी वाढवितात. याउलट मन प्रसन्न असले की समस्या सोडविण्याचा मार्ग लवकर दिसतो. स्थिर व प्रसन्न मनाला समस्येचे आकलन चटकन होते.
विज्ञानाच्या भाषेत बोलायचे तर चिंता, काळजी वाढली की भयाला प्रतिसाद देणारे मेंदूतील क्षेत्र उद्दीपित होते. हे केंद्र उद्दीपित झाले की मेंदूतील सर्व ऊर्जा या केंद्राकडे वळते. शरीराची सुरक्षा जपणारे हे केंद्र समस्या सोडविण्यासाठी निरुपयोगी असते. समस्या सोडविण्यासाठी मेंदूतील 'प्रीफ्रन्टल कोर्टेक्स' हा भाग उद्दीपित होणे अत्यावश्यक असते. चिंता वाढली की हा भाग उद्दिपित होत नाही व माणूस गोंधळात पडतो. मात्र मन स्थिर व प्रसन्न असेल तर हाच भाग जास्त उद्दीपित होतो. डोपामाइन व सेरोटोनिन हे स्राव मेंदूत वाहू लागतात आणि समस्येतून मार्ग निघतो. मेंदूत हे स्राव वाहात असले की उत्पादनक्षमता, सर्जनशीलता व समाधान यामध्ये लक्षणीय वाढ कशी होते याची विस्तृत आकडेवारी शॉनच्या शोधनिबंधात मिळते.
मात्र बहुतेकांच्या मेंदूत हे स्राव चटकन वाहात नाहीत. बहुसंख्य माणसे काळजीत पडतात. मेंदूतील भयाचे केंद्रच उद्दीपित होते. पण निराश होण्याचे कारण नाही. यावर सहजसोपा उपाय शॉनने दाखवून दिला आहे. न्यूरोप्लास्टिसिटी या क्षेत्रातील संशोधन असे दाखवून देते की नवीन गोष्ट शिकणे हे मेंदूला कोणत्याही वयात शक्य आहे. मेंदूतील केंद्रे एकमेकांशी व शरीराच्या पंचेंद्रियांशी जोडलेली असतात. परस्परांशी असलेल्या मेंदूतील या जोडण्यांमध्ये परिवर्तन करणे शक्य असते. त्यासाठी एक लहानसा मानसिक व शारीरिक व्यायाम शॉनने सुचविला आहे.
रोज पाच गोष्टी करा, असे शॉन सांगतो. १) कृतज्ञता वाटण्याजोग्या तीन घटना लिहून काढा. २) मित्र वा सहकाऱ्यांना उत्साह वाटेल अशी एखादी कृती सकाळीच करा. ३) अधूनमधून फक्त दोन मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा. ४)दिवसातील एका महत्त्वपूर्ण घटनेवर डायरी लिहून चिंतन करा. ५) दहा मिनिटे व्यायाम करा.
मेंदूची कार्यपद्धती लक्षात घेऊन शॉनने हे उपाय सुचविले आहेत. आसपासच्या परिस्थितीची मेंदू सतत चाळणी करीत असतो. मात्र तो एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करू शकतो. सर्वसाधारणपणे नकारात्मक गोष्टींकडे मेंदूचे आधी लक्ष जाते. सावध राहण्यासाठी ते आवश्यक असते. मात्र यामुळे फक्त नकारात्मक गोष्टीच पाहण्याची सवय मेंदूला लागते. नकारात्मक गोष्टीच मनावर ठसतात, सकारात्मक नजरेतून निसटतात. त्यातून नकारात्मक भावना निर्माण होतात. 'टेट्रीस इफेक्ट' असे शॉन याला म्हणतो. याचे तपशीलवार विवेचन त्याने केले आहे. मात्र नकारात्मक भावनांप्रमाणे मेंदूला 'पॉझिटिव्ह टेट्रीस इफेक्ट'ही तयार करता येतात. ती सवय लावण्यासाठी वरील व्यायाम प्रकार उपयोगी पडतात.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या लोकप्रिय पुस्तकांमधील विवेचनासारखे हे वाटेल. पण शॉन पुराव्यानिशी बोलतो. बहुराष्ट्रीय कंपनीतील व्यवस्थापकांना वरील प्रकार सलग २१ दिवस करण्यास त्याने सांगितले. कार्यक्षमता, अचूकता व समाधान या प्रत्येक आघाडीवर प्रयोग करणाऱ्यांमध्ये तीन आठवडय़ांत मोठा फरक दिसून आला. आश्चर्य म्हणजे चार महिन्यांनंतरही या प्रयोगाचा सकारात्मक परिणाम अनुभवास येत होता. मेंदूला सकारात्मक काम करण्याची सवय लावता येते व अशी सवय लावली तर पुढील बरेच महिने तो उत्साहात काम करतो. अर्थात सकारात्मक भावना निर्माण होतील असे वातावरणही कंपनीत असावे लागते. गुगल, व्हर्जिन, अशा कंपन्यांत असे वातावरण मुद्दाम निर्माण करतात व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवितात.
गीतेमध्ये श्रीकृष्ण पंचेंद्रियांना वळण लावून बुद्धी स्थिर करण्यास सांगतात. शॉनच्या व्यायाम प्रकारात तेच अभिप्रेत आहे. या पाच प्रकारांपैकी दुसऱ्याशी संपर्क ठेवण्याच्या सवयीचा मनाच्या प्रसन्नतेशी सर्वात घनिष्ठ संबंध असतो, असे शॉनला आढ़ळले. कुटुंबाचे, मित्रांचे, समाजाचे सहकार्य आणि शरीरस्वाथ्य याचा थेट संबंध आहे. समाजात रममाण झालेला माणूस जास्त जगतो. याउलट एकटेपणाचा शरीरावर होणारा परिणाम हा उच्च रक्तदाबाइतका घातक असतो. याबाबत खूप संशोधन अन्य समाजशास्त्रज्ञांनीही केले आहे. मात्र आपलेपणाचे असे सुख सर्वानाच मिळते असे नाही. बहुतेक लोक याबाबत कमनशिबी असतात. यावर उपाय म्हणजे स्वत:हून लोकांच्या संपर्कात जाणे व त्यांना मदत करणे. शॉनच्या पाहणीनुसार स्वत:हून घेतलेल्या अशा पुढाकारामुळे मेंदूची कार्यक्षमता खूप वाढते. पुढाकार घेणारे लोक व उदासीन राहणारे लोक यांच्या कार्यक्षमतेतील फरक शॉनने प्रयोगातून दाखवून दिला आहे. लोकांशी स्वत:ला जोडून घेण्याचे फायदे अनेक आहेत. लोकसंग्रहाचा आग्रह गीतेमध्ये का धरला आहे हे यावरून लक्षात येते.
लोकसंग्रह व प्रसन्नता साधली म्हणून सर्वकाही सोपे होत नाही. आयुष्यात अनेक विपरीत गोष्टी घडतच असतात. फसवणूक, गैरसमज, द्वेष, शत्रुत्व, हेवा, असूया अशा अनेक भावनांशी माणसाला सामना करावा लागतो. यातून ताण येतो. ताण सहन झाला नाही की माणूस स्वत:ला शक्तिहीन मानू लागतो आणि मग वेगाने एकटा पडत जातो. ताणाच्या वाईट परिणामांवर आता भरपूर संशोधन झाले आहे. पण त्यामुळे आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी, असा शॉनचा सल्ला आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज द्या, असे तो सांगतो व हा सल्लाही पुन्हा प्रयोगातून सिद्ध करून दाखवितो. आर्थिक मंदीत बँका गटांगळ्या खात होत्या व सर्वत्र नैराश्याचे वातावरण होते. तेव्हा 'यूबीएस'मध्ये शॉनने प्रयोग केला. ताणाचे शरीरावरील वाईट परिणाम दाखविणारी चित्रफीत एका गटाला वारंवार दाखविली तर ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिल्यास मेंदू व शरीराला नवी शक्ती कशी मिळते हे सांगणारी चित्रफीत दुसऱ्या गटाला दाखविली. काही दिवसांनंतर दोन्ही गटांची तपासणी केली असता ताणाकडे आव्हान म्हणून पाहणाऱ्यांची मानसिक व शारीरिक ऊर्जा वाढलेली आढळली. आरोग्याच्या कुरबुरी तर जवळपास नाहीशा झाल्या. कामातील आनंद व आत्मविश्वास वाढला. फायझर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शॉनने दुसरा प्रयोग केला. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या पाच घटना आयुष्यातून निवडण्यास सांगितले. तेव्हा या पाचही वेळा हे अधिकारी खूप ताण सहन करीत होते असे दिसले. ताणामुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व सुदृढ झाले. ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर माणसाची उत्पादनक्षमता कमालीची वाढते असे शॉन ठामपणे सांगतो. ताण म्हणजे सामथ्र्य वाढविण्याची संधी असे समीकरण आहे.
आयुष्यात संघर्ष टाळता येत नाही. मात्र बुद्धीची प्रसन्नता व लोकसंग्रह ही दोन आयुधे हाती असली तर संघर्ष असूनही जगण्याचा आनंद लुटता येतो. मात्र त्यासाठी मेंदूला सकारात्मक विचार करण्याची सवय मुद्दाम लावून घ्यावी लागते. सध्या आजूबाजूला सतत त्रासदायक गोष्टी कानावर येत असताना अशी सवय लावून घेणे अत्यंत कठीण असले तरी सकारात्मक विचार करणे हाच उपाय त्यावर आहे. गीतेमध्ये मांडलेल्या तत्त्वांचा वैज्ञानिक आधार शॉनच्या प्रयोगातून मिळतो. शॉनला भगवद्गीता माहीत नाही तरीही तो श्रीकृष्णांप्रमाणेच सल्ला देतो.
शॉन म्हणतो, 'आनंदाचा मुखवटा चढवा असे मी अजिबात सांगत नाही. समस्या नाहीच अशी स्वत:ची खोटी समजूत घालण्यासही मी सांगत नाही. प्रत्येक घटना ही सुवर्णसंधी माना असला खुळा उपदेशही मी करीत नाही. वेगळ्या सवयी लावून मेंदूमध्ये बदल घडवून आणता येतो व अशा बदलाचे फायदे प्रत्यक्ष दिसतात इतकेच मी सांगू इच्छितो. आपण बदलू शकत नाही अशी समजूत आपल्या मनात समाजाने रुजविली आहे. ती खोटी आहे असे माझे प्रयोग सांगतात. विपरीत परिस्थितीतही चांगल्या गोष्टी शोधून प्रसन्नतेला अग्रक्रम द्या, तशी सवय मेंदूला लावा आणि त्याच्या उत्तम परिणामांचा अनुभव घ्या.'
नवीन वर्षांची सुरुवात शॉनच्या प्रयोगाने करण्यास हरकत नसावी. त्यानिमित्ताने भगवद्गीताही नव्या नजरेने तपासता
येईल.
(मुख्य संदर्भ :  हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्य़ूतील 'पॉझिटिव्ह इंटलिजन्स' हा शोधनिबंध-  जानेवारी २०१२)

Friday, November 2, 2012

फिरणं सकाळच्या उन्हातलं




alt
संगीता वझे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
अलीकडे लोकांची जीवनशैली अशी होतेय की, पुरेसा सूर्यप्रकाश शरीराला मिळतच नाही. खूप लवकर ऑफिसला जाऊन खूप उशिरा घरी परतणाऱ्या आणि दिवसभर ए.सी.त राहणाऱ्यांना मग अशक्तपणा, निरुत्साह वाटू लागतो. यातून बाहेर पडण्यासाठी हवं ‘व्हिटॅमिन डी’ जे शरीरातील कॅल्शियम शोषून घेते. कॅल्शियमचा कमी झालं तर हाडांची घनता (बळकटपणा) कमी होते, हाडे ठिसूळ होतात आणि मोडू लागतात आणि मग ऑस्टिओपोरॅसिस अर्थात हाडांची घनता कमी होण्याच्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागतं.  जागतिक ऑस्टिओपोरॅसिस दिन नुकताच झाला त्यानिमित्ताने..
म ध्यंतरी कोलावरी ‘डी’ या गाण्यानं सर्वानाच वेड लावलं होतं. हे गाणं सुरू झालं की, मनात सहजच ताल धरला जायचा किंवा जातोही आणि आपलं शरीरही मग गाण्याच्या ठेक्यावर डोलू लागतं आणि गाणं संपल्यावर शरीराला व मनाला खूप उत्साही वाटतं. असा शरीर आणि मनाचा उत्साह कायम टिकवायचा असेल तर कोलावरी ‘डी’च्या संगीताप्रमाणे शरीराला कायम ‘व्हिटॅमिन डी’ची आवश्यकता असते. दिवसातून एकदा काही मिनिटं जरी एखादं आवडतं गाणं कानावर पडलं तरी दिवस कसा खूप छान जातो तसंच हे ‘व्हिटॅमिन डी’ (जीवनसत्त्व) नियमितपणे अल्प मात्रेत शरीराला मिळालं की शरीर तंदुरुस्त राहते, पण हेच अल्प प्रमाणात लागणारं व्हिटॅमिन डी शरीराला मिळालं नाही तर मात्र थोडं काम करूनही थकवा येणं, निरुत्साही वाटणं, चिडचिडेपणा वाढणं, केस गळणं, नकारात्मक विचार सातत्यानं येणं, डिप्रेशन आल्यासारखं वाटणं इ. गोष्टी दिसून येतात.
या लक्षणांवरून तुम्हाला वाटेल इतक्या प्रकारचं मानसिक आरोग्य बिघडवणारं तसंच शारीरिक कमजोरी निर्माण करणाऱ्या ‘व्हिटॅमिन डी’चं नेमकं कार्य काय आणि ते किती प्रमाणात शरीराला लागते?
आपण जाणतोच आपलं शरीर हे हाडा-मांसाचं बनलेलं असतं. या हाडांचं आरोग्य चांगलं असेल म्हणजेच ती बळकट असतील तरच प्रकृती चांगली राहते आणि हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. हे कॅल्शियम आपल्या शरीराला आपण खातो त्या अन्नपदार्थातूनच मिळते आणि आहारातले कॅल्शियम शोषून घेण्यासाठीच ‘व्हिटॅमिन डी’ या घटकाची आवश्यकता असते. थोडक्यात, तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थाचा कितीही आहार घेतलात किंवा नुसत्याच कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्यात आणि ‘व्हिटॅमिन डी’ हा घटक तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात तयार होत नसेल तर त्या कॅल्शियमचा शरीराला योग्य तो उपयोग होत नाही. योग्य प्रमाणात कॅल्शियम शरीराला मिळाले नाही की शरीरात असलेल्या कॅल्शियमच्या राखीव साठय़ातून कॅल्शियम काढून घेऊन शरीर आपली गरज भागवते. असं काही काळ चालू राहिलं की शरीरातील कॅल्शियमचा साठा कमी होऊ लागतो. त्या हाडांची घनता (बळकटपणा) कमी होते, हाडे ठिसूळ होतात आणि मोडू लागतात आणि मग ऑस्टिओपोरॅसिस अर्थात हाडांची घनता कमी होण्याच्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागतं. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कॅल्शियमची गरज जास्त प्रमाणात लागते, कारण स्त्रियांना गरोदरपण, स्तनपान चालू असताना कॅल्शियमची गरज प्रचंड प्रमाणात लागते. अनेकदा आपण म्हणतो, आमचा आहार चांगला आहे तरीही कॅल्शियमची कमतरता का? तर त्याचं कारण ‘व्हिटॅमिन डी’ डी योग्य प्रमाणात शरीरात तयार होत नाही. आपल्या शरीराला दर दिवशी सुमारे १००० ते १५०० मि. ग्रॅम कॅल्शियम व १००० युनिट ‘व्हिटॅमिन डी’ची गरज असते, पण एवढी गरज असतानाही आपल्या भारतीय लोकसंख्येत ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असलेल्या लोकांची मोठी फौजच आहे, अशी धक्कादायक माहिती एका अभ्यासातून मिळालीय. एका अभ्यासानुसार भारतीय लोकसंख्येचा विचार करता उन्हाळ्याच्या मोसमात ८२ टक्के लोकांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दिसून आली, तर हेच प्रमाण थंडीच्या मोसमात ९२ टक्के इतकं प्रचंड होतं. ही स्थिती फक्त भारतातच नाही तर सर्व जगात दिसून येते. या अंदाजावरून आपण वेळीच काळजी घेतली नाही तर ‘व्हिटॅमिन डी’ कमतरतेची साथच काही वर्षांत येईल.
इतर आजारांप्रमाणे याची लक्षणं चटकन सर्वसामान्य माणसाला समजत नाहीत म्हणून तो डॉक्टरांकडे जात नाही, पण शारीरिक, मानसिक अस्वस्थपणा रोजच्या कामात अडथळा निर्माण करू लागला की मग डॉक्टरी सल्ला घेतला जातो. अनेकदा शारीरिक लक्षणांवरून औषधोपचार दिले जातात. रुग्णाला बरेही वाटते, पण पूर्वीसारखा उत्साह नाही, एनर्जी नाही हे जाणवतेच. ‘‘यासाठी रुग्णाची योग्य आरोग्य तपासणी, व्यवसायाचे स्वरूप, मानसिक अस्वास्थ्याचे कारण,  त्याचं वय, व्यायाम-आहार सवयी, कामाच्या वेळा याचा योग्य अभ्यास करून, योग्य चाचण्या करून मगच आजाराचं निदान केलं तरच योग्य उपचार करता येतात,’’ अशी माहिती आरोग्य सल्लागार, एम.डी. डॉ. पुष्कर शिकारखाने यांनी सांगितलं.
‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता नुसता रुग्ण बघून लगेच सांगता येत नाही. त्यासाठी रक्त तपासणी करावी लागते. यासंबंधी एका रुग्णाचे उदाहरण देताना डॉ. शिकारखाने म्हणाले, खासगी कंपनीत काम करणारा मध्यमवयीन तरुण नुकताच माझ्याकडे  येऊन गेला. कामात एकाग्रता न होणं, भीती वाटणं, सतत नकारात्मक विचार येणं, अंगदुखी, अस्वस्थता अशा तक्रारी घेऊन तो आला होता. कामासंबंधी विचारताना तो म्हणाला, सकाळी ८ ते रात्री ८ अशा त्याच्या कामाच्या वेळा आहेत. त्यांच्या वैद्यकीय तपासणीत काही वेगळं आढळलं नाही. त्याची लक्षणं मानसिक आजाराकडे जास्त झुकणारी होती, पण त्याच्याकडून आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घेतल्या आणि त्यात त्या रुग्णाला तीव्र स्वरूपाची ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता होती असं निदान आलं. त्याला ‘व्हिटॅमिन डी’चा उपचार दिल्यावर दोन महिन्यांत त्याची वरील लक्षणं निघून गेली. या रुग्णाची शहरी जीवनशैली आणि सूर्यप्रकाशच शरीरावर न घेण्याच्या सवयीने या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. याबरोबरच ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेसाठी देशाच्या भौगोलिक सीमा, पावसाळा- थंडीचा ऋतू, काळ्या रंगाची त्वचा, संपूर्ण त्वचा झाकून टाकणारे कपडे घालणं, नियमित सन स्किन लोशनचा उपयोग करणं, वाढतं वय, अयोग्य आहार, लठ्ठपणा, लीव्हर व मूत्रपिंडाचे आजार इ. गोष्टी कारणीभूत होतात. म्हणूनच आपली नियमीत वैद्यकीत तपासणी होणं गरजेचं आहे. ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता रक्त तपासणीतून कळते.
‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण योग्य असेल तर कोणत्या आजारांपासून संरक्षण मिळते? त्याविषयी सांगताना डॉ. शिकारखाने म्हणाले, ‘‘यामुळे कॅल्शियमची व फॉस्फरसची चयापचय क्रिया चांगली होते. मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, स्ट्रोक, स्नायूंचा अशक्तपणा, केस गळणं, कर्करोग आदी आजार टाळण्यास मदत होते.’’
अशा महत्त्वाच्या आजारांना दूर ठेवायचं असेल तर शरीरामध्ये ‘व्हिटॅमिन डी’चं प्रमाण वाढवायचं कसं? यावर डॉ. शिकारखाने म्हणाले, ‘‘दिवसातून फक्त एकदा १०-१५  मिनिटं सूर्याची किरणं संपूर्ण शरीरावर घेतली की या सूर्यकिरणांमुळे त्वचेखाली ‘व्हिटॅमिन डी’ तयार होते.’’ आपली त्वचा जेवढी जास्त कपडय़ांनी झाकली गेली असेल तेवढे ‘व्हिटॅमिन डी’ कमी तयार होते. आपल्याला दिवसाला सुमारे १००० युनिट ‘व्हिटॅमिन डी’ची आवश्यकता असते, तर १०-१५ मिनिटांचा सूर्यप्रकाश संपूर्ण त्वचेवर घेतला तर १०,००० युनिट ‘व्हिटॅमिन डी’ तयार होते. हे ऊन शक्यतो सकाळी ७ ते ११ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत घ्यावं, असं सुचविलं जातं. याशिवाय गरजेप्रमाणे गोळ्या, इंजेक्शन, पूड या माध्यमांतून दिलं जातं. अर्थात, याचा जास्त डोस झाल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून औषधं डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यावीत, पण सूर्यप्रकाश घेण्यास काहीच हरकत नाही. शिवाय आहारातून ‘व्हिटॅमिन डी’ घेता येते. शाकाहारात अळंबी, दूध, दही, ताक यातून मिळते. मांसाहारात अंडी, बांगडा, तेलकट मासे यातून मिळते. याबरोबरच कॅल्शियमयुक्त पदार्थ जेवणात ठेवले तर हाडं, स्नायू आयुष्यभर बळकट राहतीलच, पण मानसिक आरोग्यही त्यामुळे तंदुरुस्त राहील.
मग काय शारीरिक-मानसिक तंदुरुस्तीसाठी सक्काळी, सक्काळी ‘सन बाथ’ घेणार ना? सन बाथ या किंवा भारतीय परंपरेप्रमाणं सूर्यासमोर उभं राहून गायत्री मंत्र म्हणा. दिवसाच्या सुरुवातीला शरीराची बॅटरी एकदा का चार्ज करून घेतली की मग दिवस कसा उत्साहाने सळसळतो, ते पाहा! मग काय आपलं जीवन उत्साहाने न्हाण्यासाठी सकाळच्या उन्हात न्हाणार ना?


Source - Loksatta.com
URL- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257854:2012-10-26-11-27-28&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

Monday, February 20, 2012

अभ्यासाशी मैत्री : हवे खेळांचे ब्रेक्स ..



आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. नियती चितलिया - शनिवार, १८ फेब्रुवारी २०१२

Chaturang@expressindia.com
altआपण चूल पेटवितो तेव्हा जर त्यात खूप लाकडं घातली तर विस्तव चोंदतो, पण त्यातली लाकडं जरा कमी केली की तो विस्तव मस्त पेटू लागतो. हेच होतं अभ्यासाचं. मुलांना फक्त अभ्यास एके अभ्यास करायला दिला तर ते कंटाळतात. त्यांना मध्येमध्ये खेळाचे, कलेचे ब्रेक द्यायला हवेत.मुलांकडून पालकांच्या अपेक्षा अगदी मुलं जन्मल्यापासूनच चालू होतात. मलांनी शांत   झोपावं, मोठी झाली की मस्ती करू नये, अभ्यास नीट करावा, मार्क्‍स उत्तम मिळवावेत, सांगितलेली सगळी कामं नीट करावीत, पण मुलांना जगू देण्याकडे कोणाचा कल नसतो. पालकांचा त्रागा असतो, दिवसभर नोकरी करून राबतो, पैसे मिळवितो आणि यांना साधा अभ्यास करायचाय तोसुद्धा नीट करता येत नाही!
फक्त अभ्यास करायचाय- तोसुद्धा नीट करता येत नाही- का? याची कारणमीमांसा आजच्या लेखात आपण शोधणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या मुलांनी नीट अभ्यास करायला हवा असेल तर हा त्रागा दूर करा. त्यासाठी पालकहो, तुमचा १०० टक्के सहभाग लागेल आणि मग बघा मुलांमध्ये किती फरक होतो, बदल होतो ते. लक्षात घ्या- किती सुधारणा होते हा शब्दप्रयोग मी केलेला नाही. कटाक्षानेच, कारण माझ्या दृष्टीने मुलं सुधारलेलीच असतात. आजूबाजूचं वातावरण, पालकांची वागणूक याचा परिणाम त्यांच्यावर होतो आणि म्हणून ती जशी वागतात तशी मुले वागतात.
पालकांचं वागणं चुकीचं, पण मुलांचं बरोबरच आणि योग्यच असायला हवं- हे कसं शक्य आहे? पालक जसं बोलतात, वागतात त्याची छाप मुलांवर पडते; किंबहुना पहिली छाप जी मुलांवर पडते ती पालकांच्याच वागणुकीची. म्हणून प्रथम मुलांची तक्रार करताना पालकांनी स्वत:ची वागणूक तपासून पाहावी. आपण मुलांकडून काय अपेक्षा करतो त्याचा नीट विचार करावा. उदा. एक आई-बाबा त्यांच्या मुलाला माझ्याकडे घेऊन आले. ते असं सांगत की, त्याच्या काही लक्षात राहात नाही. मी नीट खोलात जाऊन विचारल्यावर असं लक्षात आलं की, पालक नोकरीला जातात आणि मूल घरात असतं. त्याला सकाळी पालक निघताना कामवाल्या बाईकडून काय काय काम करवून घ्यायचं ते सांगतात, ते त्या मुलाच्या लक्षात राहत नाहीत. आता वाचकहो, नीट विचार करा की, बाईला काय कामं सांगायची हे त्या मुलाचं काम नाही, पालकांचं आहे! मुलाची जबाबदारी मुळी लहानशा वयात घर सांभाळायची नाहीच! मी हे त्या पालकांना समजावून सांगितलं आणि बाईसाठी चिठ्ठी लिहून ठेवायला सांगितली. लहानपणी मुलांनी खेळावं, बागडावं, वाचावं आणि गोष्टी ऐकाव्यात, गाणी गावीत आणि या सगळ्या गोष्टींमधून ज्ञान प्राप्त करावं. पण खरं तर होतं उलटंच. पालकत्व ही एक जबाबदारी आहे, एक कला आहे ती आनंदाने पार पाडावी. अंगावर येऊन पडलेल्या बोजाप्रमाणे उरकून टाकू नये. सांगायचा मुद्दा हाच की, या अशा पद्धतीने अपेक्षांची सुरुवात होते. मग अभ्यासाबाबतची अपेक्षा, मार्काची अपेक्षा आणि मग या अपेक्षांच्या डोंगराखाली ते मूल साफ गाडलं जातं. त्यात आणि माणूस स्वभाव असा असतो की, मूल पालकांना खुष करायला मग स्वत:ला रेटत रेटत आवडत असो नसो वाट्टेल ते करू लागते. पालकांच्या ‘आम्ही दिवस-रात्र राबतो तुझ्यासाठीच, तुझ्या आनंदासाठी!’ या वाक्याच्या बोजा इतका जड असतो की, तो मुलांना आयुष्यभर पुरतो. आपल्याकडे मी तुझ्यासाठी अमुक आणि एवढं केलं, तर तू माझ्यासाठी करायलाच हवं! ही वृत्ती, ही विचारसरणीच मुळी चुकीची आहे. वाचकांच्या लक्षात आलं असेल की, ही अपेक्षा किती आधीपासून सुरू होते आणि जसजसे दिवस जातात तसतशी अपेक्षा वाढतच जाते. त्यामुळे अभ्याससुद्धा अपेक्षेनेच केला जातो. आनंदासाठी नाही- मार्कासाठी!
मुलांची आवड-निवड तुमच्यासारखीच असावी असा आग्रह कशाला. म्हणूनच अगदी शाळा सुरू होण्यापूर्वी घरात मुलांना छोटय़ा छोटय़ा गोष्टी शिकवायला सुरुवात करायची असते. त्या त्यांना पुढचा अभ्यास कळावा, सोपा जावा याच्यासाठीच मुलं लहान असताना त्यांना पुष्कळ गोष्टी सांगाव्यात. लहान मुलांची पुष्कळ मासिकं बाजारात मिळतात. जर तुम्हाला गोष्टी सुचत नसतील तर त्या गोष्टी मुलांना वाचून दाखवा. त्यातील जी गोष्ट त्यांना आवडेल ती गोष्ट पुन:पुन्हा अगदी १०० वेळासुद्धा वाचून दाखवा. या अशा वाचनाने मुलांची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती खूप वाढते. इतिहासातल्या गोष्टी सांगाव्यात, पण एक गोष्ट कटाक्षाने टाळावी. ती म्हणजे, टी. व्ही.समोर बसविणे आणि फक्त गोष्टींच्या तयार कॅसेट ऐकविणे. तयार गोष्टी ऐकवाव्यात, पण त्या अगदी कमीत कमी. स्वत: गोष्टी सांगणे, त्या सांगता सांगता आवाज बदलणे, हातवारे करून सांगणे हे मुलांच्या मनावर खोलवर छाप पाडतं.
जसजसं मूल शिशूवर्गातून बालवर्गात जातं तसातसा अभ्यास वाढत जातो. त्यातील इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास हे विषय मुलांना नेहमीच गोष्टीरूपाने सांगावेत. हे विषय त्यांची कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्या या विषयातील पुस्तकांचे धडे अगोदरच घरी वाचून मग त्यांच्या गोष्टी बनवून त्या मुलांना सांगितल्या तर मुलांना तो अभ्यास झाल्यासारखा वाटतही नाही. पण अभ्यास होतो आणि मगच अभ्यासाशी मैत्री होते.
शाळेतून जो गृहपाठ दिला जातो त्याचं दोन भागांत विभाजन करावं. एक अशा प्रकारचा अभ्यास असतो जो नुसता पुस्तकातून उतरवून काढायचा असतो आणि एक गणितासारखा जो वेगळा असतो आणि विद्यार्थ्यांनी सोडवायचा असतो. जो पुस्तकातून उतरवून काढायचा असतो तो परत दोन प्रकारांनी करायचा असतो. एक- ती उत्तरं मुलांकडून सोप्या भाषेत पाठ करून घ्यायची. मजकूर समजला असेल तर पाठांतर सोपं जातं. जरी शिक्षक आणि शिक्षणपद्धती पुस्तकातीलच शब्द मागत असली तरी मुलांना स्वत:च्या आणि सोप्या भाषेतच उत्तर लिहायला प्रोत्साहन द्यावं. नाहीतर मुलांचा शब्दसंग्रह वाढणार नाही! मार्काना महत्त्व देणंच मुळी सोडा. मार्क समजा शंभरापैकी शंभर असतील, पण स्वत:च्या भाषेत साधा निबंध लिहिता आला नाही तर त्या गुणांचा का उपयोग. पैकीच्या पैकी मार्क मिळवून जीवनात उपयोग काय? म्हणून पालकहो, ‘लुक अ‍ॅट द बिग पिक्चर’. मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं असं वाटत असेल तर शिक्षण पद्धतीपासून वेगळे व्हा!
दोन - मुलांना लिहायला सांगून तुम्ही सोप्या भाषेत त्यांना ‘डिक्टेट’ करा आणि ती लिहितील. मग ते उत्तर पाठ करायला सांगा. आज तर इंटरनेटवर इतिहास, भूगोल, इंग्रजी या विषयांचे जे धडे असतात त्याची सखोल माहिती मिळते. ती माहिती आपण स्वत: वाचून ठेवून मुलांना सांगता येते किंवा त्याची कॉपी प्रिंटरमधून काढून ती मुलांना वाचायला द्यावी. हा असा अभ्यास केला तर ती मुलांना गंमत वाटते.
समजा पालकहो, तुम्हाला दिवसभर एकच एक काम महिनोन् महिने करायला सांगितलं तर तुम्हाला आवडेल का? मग मुलांना सकाळी शाळा, मग टय़ुशन, मग शाळेचा अभ्यास, मग शिकवणीचा अभ्यास, दिवसभर नुसता अभ्यास एके अभ्यास. त्यांना नाही का येणार कंटाळा? माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला शाळेत कमी मार्क मिळतात म्हणून घेऊन आले. त्या मुलाचा दिनक्रम विचारला तर असाच शाळा, शिकवणी मग दोघांचा गृहपाठ. पालकांना मी असा सल्ला दिला की, शिकवणी प्रथम बंद करा. मुलाला व्यायामशाळेत किंवा फुटबॉल, क्रिकेट तुमच्या आजूबाजूला जे असेल त्याच्यात घाला. मुलाला सांगितलं शाळेत फ्री असशील तेव्हा गृहपाठ तिथेच करून यायचा प्रयत्न कर. त्यांच्या घराजवळच एक सुप्रसिद्ध व्यायामशाळा होती. तिथे मुलगा जाईल, पण पालकांना प्रश्न असा होता की, जर शाळा, शिकवणी असून मुलाला मार्क कमी पडतात तर अभ्यास कमी करून मार्क कसे वाढतील. त्यांना सबंध अभ्यास प्रक्रिया समजावून सांगितली. एक तर मूल जरी खूप वेळ अभ्यास करीत असलं तरी त्याचं लक्ष त्यात आहे का? परत आपण चूल पेटवितो तेव्हा जर त्यात खूप लाकडं घातली तर विस्तव चोंदतो, पण त्यातली लाकडं जरा कमी केली की तो विस्तव मस्त पेटू लागतो. हेच होतं अभ्यासाचं. पालकांना सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे करा आणि बघा मुलाचे मार्क वाढतील. त्याला शाळा, अभ्यास सगळंच आवडायला लागेल आणि अगदी असंच झालं. लगेच चाचणी परीक्षा होती त्यात प्रत्येक विषयात ५-७ मार्क वाढले. मग फायनल परीक्षा होती त्याच्यात तर १५-२० मार्क प्रत्येक विषयात वाढले. आता ज्या मुलाला ६०-६५ टक्के मार्क मिळत होते त्याला ९० टक्के मार्क मिळायला लागले आहेत. शिवाय व्यायामशाळेत जात असल्याने उंची छान वाढते आहे आणि सगळेच खूश आहेत.
नुसता जास्त वेळ अभ्यास केला तर जास्त अभ्यास होत नाही, पण तो लक्षपूर्वक केला पाहिजे. मग अगदी तासभर केला तरी हरकत नाही, पण तो मन लावून करावा.  पालकांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की, शाळा मुलांसाठी आहे, मुलं शाळेसाठी नाहीत. त्यांना रेटून रेटून अभ्यास करून घेण्याने त्यांचे मार्क वाढतील आणि त्यामुळे शाळेची सरासरी वाढेल. म्हणून शाळा पालकांच्या मागे लागून मुलांकडून अभ्यास करून घ्यायला लावतात आणि पालक पण याला बळी पडून मुलांकडून मागे लागून लागून अभ्यास करून घेतात, पण त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान मुलांचंच होतं. पण अभ्यासाची सवय जायला नको म्हणून सुट्टीतसुद्धा मुलांकडून अभ्यास करवून घेणारे पालक बघितले की, त्या पालकांना काय म्हणावं कळत नाही आणि त्या मुलांना कोणी सोडवणारा मिळेल का? की त्याचं आयुष्य हे असंच वाया जाणार हे कळत नाही, पण मन सुन्न मात्र होऊन जातं.    

Source- loksatta.com

Thursday, February 2, 2012

शिजविलेलाटोमॅटो खा, कर्करोग टाळा!

प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असल्याचा अभ्यासकांचा दावा पी.टी.आय. लंडन टोमॅटो ही दैनंदिन आहारात कोशिंबीर आणि पूरक तोंडी लागणारी फळभाजी अधिक प्रमाणात घेण्याची वेळ आली आहे. आमसर चवीव्यरिक्त शरीरात पूरस्थ ग्रंथींचा कर्करोग (प्रोस्टेट कॅन्सर ) निर्माण करणाऱ्या घातक पेशी नष्ट करण्यामध्ये शिजविलेल्या टोमॅटोतील पोषणतत्त्वे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरीत असल्याचे नव्या अभ्यासातून पुढे आले आहे. पोर्टस्माऊथ विद्यापीठाच्या भारतीय वंशीय संशोधक डॉ. मृदूला चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाहणीमध्ये टोमॅटोच्या या गुणांचे महत्त्व लक्षात आले. कर्करोगांच्या पेशी शरीरातील रक्तामध्ये शिरून पसरू लागतात. शिजविलेल्या टोमॅटोमधील लायकोपेन या पोषणतत्त्वाद्वारे या पेशींना पसरण्यात अटकाव केला जातो. तसेच त्यांना नष्ट करण्यात मदत होते असे या अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. या पोषणतत्त्वाद्वारेचे टोमॅटोला तांबडा रंग येतो. रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यातही या पेशींचा खूप उपयोग होतो. मानवी शरीरात आता या पोषणतत्त्वांचा उपयोग कसा करता येईल यावर अभ्यासक पुढील संशोधन करीत असल्याचे, डेली टेलिग्राफने म्हटले आहे. प्रयोगशाळेमध्ये पूरस्थ ग्रंथी कर्करोगाच्या पेशींवर या पोषणतत्त्वांनी सर्वाधिक परिणाम केल्याचे या अभ्यासकांना लक्षात आले. ही पोषणतत्त्वे सर्वच लाल रंगांची फळे आणि फळभाज्यांमध्ये आढळतात. मात्र त्यांचे प्रमाण शिजविलेल्या टोमॅटोमध्ये सर्वाधिक असतात. शिजविलेल्या टोमॅटोमध्ये असलेली ही पोषणतत्त्वे आहारातून सहजपणे शरीरास लाभदायक ठरत असल्याचा दावा चोप्रा यांनी केला आहे. या अभ्यासाचा तपशील ‘ब्रिटिश जरनल ऑफ न्यूट्रिशन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. 


Source- loksatta.com
url- http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=208298:2012-02-01-15-56-12&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4

Sunday, January 1, 2012


वर्तमानाची निवड...Bookmark and SharePrintE-mail
altचित्रा बेडेकर , शनिवार , ३१ डिसेंबर २०११
मेंदू याच विषयात शास्त्रज्ञ असणाऱ्या डॉ. जिल टेलरला अचानक मेंदूच्या स्ट्रोकला बळी पडावं लागलं. स्मृती नष्ट झालेल्या अवस्थेत नऊ वर्षे असताना तिला मेंदूच्या शक्तीचा साक्षात्कार झाला. जाणिवेपलीकडच्या अद्भुत जगाचं घडलेलं दर्शन तिने शब्दबद्ध केलं आणि भूतकाळ हा अपघात असतो. वर्तमान ही निवड असते, हा साक्षात्कार तिने जगाला घडविला.
कळत-नकळत हातून घडलेले प्रमाद मागे टाकून ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ म्हणत आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करणं बऱ्याचदा शक्य असतं; पण प्रत्यक्ष मरणाच्या दारी पोहोचण्याचा अनुभव घेतलेल्यांनी नवी सुरुवात कशी करावी? याचं उत्तर अमेरिकेतल्या डॉ. जिल टेलर हिच्या अनुभवात आणि जिद्दीत सापडेल.
मेंदूविज्ञान किंवा ज्याला न्यूरो सायन्स म्हणतात, त्या क्षेत्रातल्या संशोधनाला वाहून घेतलेली डॉ. जिल टेलर १९९३ पासून सामाजिक कार्यातही आघाडीवर होती. अमेरिकेतल्या सिझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांच्या ‘नामी’ संघटनेच्या कार्यकारिणीतली ती सर्वात तरुण सभासद होती. मेंदूच्या या विशिष्ट आजाराच्या संदर्भातल्या संशोधनासाठी मृत्यूनंतर अशा रुग्णांचे मेंदू मिळविण्यासाठी तिने मेंदूदानाच्या प्रचाराची एक मोहीमसुद्धा हाती घेतली होती. वयाच्या ३७ वर्षांंपर्यंत काम, काम आणि फक्त काम करणाऱ्या डॉ. जिलला नियतीच्या एका फटकाऱ्यात आपल्या बऱ्याचशा क्षमता गमवाव्या लागल्या.
१० डिसेंबर १९९६ च्या सकाळी जिलच्या मेंदूच्या डाव्या भागात अचानक रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर अवघ्या चार तासात आपलं चालणं, बोलणं, वाचणं, लिहिणं, गतायुष्यातल्या आठवणी, सातत्याने स्वत:चा स्वत:शी चालणारा आत्मसंवाद आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव अशा एकेक क्षमता ती गमावून बसली होती. बाहेरच्या जगाच्या तुलनेत आपलं शरीर नेमकं कुठे सुरू होतंय आणि कुठे संपतंय याचं भान गेलं होतं. स्वत:च्या घनरूप अस्तित्वाची, वेगळेपणाची जाणीव नष्ट झाली होती. त्याऐवजी आपण द्रवस्थितीत असल्याचा अनुभव ती घेत होती. फक्त एकाच बाबतीत ती सुदैवी ठरली होती. स्ट्रोक येताना किंवा त्यानंतर ती कधीच बेशुद्ध पडली नव्हती. यामुळे आपल्या मेंदूत काय चाललंय हे आतून तिला समजत होतं.
त्यानंतर आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी जिद्दीने डॉ. जिलने आपल्या मेंदूच्या गमावलेल्या बहुतेक सर्व क्षमता परत मिळवल्या. आजसुद्धा ती मेंदूरचनाशास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहे. त्यासोबतच त्या क्षेत्रातली सल्लागार आणि मनोरुग्णांची राष्ट्रीय पातळीवरची प्रवक्ती या जबाबदाऱ्यासुद्धा ती समर्थपणे पार पाडत आहे. ‘नामी’ संघटनेची अजूनही ती खंदी कार्यकर्ती आहे. एवढंच नव्हे, तर ‘टाइम मॅगेझिन’च्या जगात सर्वात प्रभावी असणाऱ्या २००८ सालातल्या १०० माणसांच्या यादीतसुद्धा डॉ. जिल टेलरचं नाव आहे.
स्वत:ला बरं करण्याच्या त्या आठ वषार्ंत जिलच्या आयुष्यात योग्य वेळी चालून आलेल्या संधी आणि प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तिला भेटलेली योग्य माणसं यांचा महत्त्वाचा वाटा होता, हे ती स्वत:च मान्य करते. मुख्य म्हणजे तिच्या कर्तबगार, समंजस, कर्तव्यदक्ष आणि बालसंगोपनात निष्णात असणाऱ्या आईची अत्यंत मोलाची खंबीर साथ तिला मिळाली होती. अशी आई लाभणं हे आपलं भाग्यच आहे, असं जिल अभिमानाने सांगते.
जिल स्वत: मेंदूशास्त्रज्ञ असल्यामुळे स्ट्रोकने आपल्या मेंदूत नेमका काय बिघाड झालाय आणि तो कसा दुरुस्त करायला हवा, याचं संपूर्ण शास्त्रशुद्ध ज्ञान तिला होतं. त्याचा आतून प्रत्यक्ष अनुभव मात्र स्ट्रोकमुळेच तिला मिळाला. मेंदूच्या आकलनापलीकडे असणाऱ्या काही सामथ्यार्ंचा साक्षात्कार, जाणिवांपलीकडील जागृतावस्थेचा विलक्षण अनुभव जिलने या काळात घेतले व शब्दबद्ध केले.
या सर्वांहून आणखी एका बाबतीत जिलचं वेगळेपण लक्षात घ्यावं लागेल. माणसाचा मेंदू म्हणजे सतत बदलत जाणारा एक विलक्षण गतिशील अवयव आहे. बाहेरून येणाऱ्या संवेदनांनुसार मेंदूपेशींच्या म्हणजेच न्यूरॉन्सच्या आपापसातल्या जोडण्या बदलण्याची अद्भुत क्षमता मेंदूकडे असते. मेंदूच्या या लवचिकतेमुळे म्हणजेच ‘प्लास्टिसिटी’मुळे मेंदू आपल्या हरवलेल्या बऱ्याचशा क्षमता पुन्हा परत मिळवू शकतो. मेंदूच्या या निसर्गदत्त क्षमतेवर डॉ. जिलने संपूर्ण विश्वास टाकला. स्वत:च स्वत:ला बरं करण्याच्या मेंदूच्या या नैसर्गिक प्रक्रियेत होऊ शकणारा अवास्तव वैद्यकीय हस्तक्षेप जाणीवपूर्वक टाळण्यासाठी जिलने स्वत:च्या अखत्यारित काही धाडसी निर्णय घेतले होते. स्वत: न्यूरो सायटिंस्ट असणं ही जिलची सर्वात मोठी जमेची बाब होती.
एखाद्या दुर्घटनेतून किंवा धक्कादायक प्रसंगातून निर्धाराने बाहेर येण्यासाठी माणसाला तीव्र जीवनेच्छा आणि पुढच्या आयुष्याचं भरभक्कम उद्दिष्ट असावं लागतं. जिलकडे या दोन्ही गोष्टी होत्या. स्ट्रोक आला त्या क्षणापासून स्वत:ला कायमचं अपंग होण्यापासून वाचविण्याची तिला आतून तीव्रतेने निकड वाटत होती. त्यामुळे तातडीने वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी तिने जिवाच्या कराराने धडपड केली. स्ट्रोकग्रस्त रुग्णाला हानीकारक ठरू शकणारी प्रस्थापित वैद्यकीय शुश्रूषा निर्भीडपणे नाकारून आपल्या पुनर्वसनाचं सुकाणू तिने स्वत:च्या हाती घेतलं. स्ट्रोकमुळे आपल्या मेंदूच्या पेशींना पोहोचलेला जबरदस्त आघात लक्षात घेऊन त्यांना आवश्यक ती विश्रांती देणं आणि त्यांच्या नैसर्गिक गतीने बरं होण्याची त्यांना उसंत देणं याला जिलने सर्वोच्च प्राधान्य दिलं.
उरलेल्या आयुष्यात कोणत्या उद्दिष्टांसाठी आपल्याला झटायचंय याची जिलला स्पष्ट जाणीव होती. स्ट्रोकमुळे आपल्याला आलेला अनुभव इतरांपर्यंत पोहोचवून स्ट्रोक येण्यापासून स्वत:ला वाचविणं त्यांना शक्य व्हावं म्हणून स्वत:चा अनुभव शब्दबद्ध करणं हे जिलचं नवं उद्दिष्ट होतं. स्ट्रोकनंतरच्या सात-आठ, वर्षांत ती बहुतांशी आपल्या मेंदूच्या उजव्या अर्धगोलाच्या प्रभावाखाली होती. असा अनुभव घेणारी ती जगातली बहुधा एकमेव व्यक्ती असावी. त्या काळात तिला एक प्रकारची आंतरिक शांतता लाभली होती आणि विश्वाशी आपण एकरूप असल्याचा अनुभव आला होता. प्रत्येकाने परिश्रमपूर्वक आपल्या मेंदूच्या उजव्या भागाच्या प्रभावाखाली वर्तमान क्षणात जगायचं ठरवलं तर स्ट्रोक न येतासुद्धा असा अनुभव कुणालाही घेता येतो. मेंदूचं हे रहस्य स्ट्रोकमुळेच जिलला उमगलं होतं. स्ट्रोकने तिला घडवलेला हाच खरा साक्षात्कार होता. तो साक्षात्कारसुद्धा इतरांसमोर तिला मांडायचा होता.
आपलं पूर्वायुष्य विसरून आयुष्याची नवी सुरुवात एखादी व्यक्ती जेव्हा करू बघते, त्या वेळी आजूबाजूची माणसं आणि समाज यांनीसुद्धा पुरेसा समंजसपणा दाखवणं आवश्यक असतं. आपलं स्ट्रोकपूर्वीचं व्यक्तिमत्त्व तसंच तंतोतंत पुन्हा लाभणार नाही हे सत्य जिलने स्वीकारलं होतं. इतरांनीसुद्धा ते स्वीकारून पुढच्या आयुष्यात तिला जे काय करायचं आहे त्याचा आदर बाळगून तिला सहकार्य द्यावं, अशी जिलची अपेक्षा होती. स्ट्रोकच्या अनुभवाने तिला जितकं मेंदूच्या आंतरिक सौंदर्याचं आणि लवचिकतेचं मनोहारी दर्शन घडलं होतं. तितकंच मानवी मनाचं औदार्यसुद्धा दिसून आलं होतं. आयुष्यात तिला पुन्हा कार्यक्षम बनविणाऱ्या या सर्व घटकांबद्दल जिल कृतज्ञता बाळगून आहे.
जिलच्या या अनोख्या अनुभवाचं मुक्तकथन लोकवाङ्मयगृहाने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘मेंदूच्या अंतरंगात’ या पुस्तकातून करताना मला तिच्यातली पराकोटीची जिद्द आणि चिकाटी स्तिमित करून गेली. स्वत:च्या हरवलेल्या क्षमता परत मिळविण्याच्या प्रयत्नात आपल्या व्यक्तिमत्त्वातले नकोसे वाटणारे पैलू तिने शर्थीने प्रत्येक क्षणी माघारी परतवले. स्वत:ला नव्याने मनाजोगतं घडविताना क्षणोक्षणी स्वत:शी करावा लागणारा हा संघर्ष आयुष्याच्या अंतापर्यंत सुरू ठेवण्याची जिलची मानसिक तयारी आहे.
Source - loksatta.com Url - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=202584:2011-12-30-07-35-32&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194