Wednesday, December 26, 2012

प्रसन्न बुद्धीची किमया

Source- loksatta.com
URL- Loksatta.com - प्रसन्न बुद्धीची किमया
Author - प्रशांत दीक्षित : prashant.dixit@expressindia.com
Published: Tuesday, December 25, 2012

आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी..
विरामापूर्वीचा हा अखेरचा लेख..
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी तीन मुख्य तत्त्वे सांगितली आहेत. १) जगताना झुंज देणे अपरिहार्य आहे. म्हणून हताश न होता झुंज देण्यास सतत सज्ज राहावे. संकल्प चांगले असून भागत नाही. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी झुंजावेच लागते. २) लोकसंग्रह करीत राहण्याने जगणे अर्थपूर्ण होऊ शकते. किंबहुना लोकसंग्रह हे बुद्धिमान माणसाचे कर्तव्य आहे. ३) वरील दोन तत्त्वे साध्य होण्यासाठी बुद्धीची स्थिरता अत्यावश्यक आहे आणि बुद्धीच्या स्थिरतेसाठी मनाची प्रसन्नता अनिवार्य आहे.
प्रसन्न बुद्धीने झुंज दे, असे परस्परविरोधी वाक्य करणे ही श्रीकृष्णांची खासियत. यातील झुंज द्यावी, लोकसंग्रह करावा हे मनाला पटते. पण त्यासाठी आधी बुद्धी प्रसन्न करा, असे सांगितले. हे पटत नाही. झुंज व लोकसंग्रह साधला की त्यातून यश मिळते. आणि यश मिळाले की मन प्रसन्न होते. प्रसन्नता शेवटी आहे असे आपण मानतो, तर प्रसन्नता प्रथम असे श्रीकृष्ण सांगतात. यातील खरे काय?
श्रीकृष्णांचे म्हणणे खरे आहे असे हार्वर्ड विश्वविद्यालयातील संशोधन सांगते. अर्थात श्रीकृष्णांची तत्त्वे तपासण्यासाठी हे संशोधन झालेले नाही. ते झाले आहे आर्थिक मंदीसारख्या जगासमोरील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी. परंतु, त्या संशोधनातून काढलेले निष्कर्ष हे गीतेतील वर उल्लेख केलेल्या तीन तत्त्वांशी तंतोतंत जुळतात.
शॉन अॅकोर या तरुण संशोधकाने हा विषय हाती घेतला व त्याला साधी, सोपी पण अद्भुत सामथ्र्यशाली अशी तत्त्वे सापडली. अमेरिका हा प्रयोगनिष्ठ देश आहे. तत्त्वे मांडून तेथे चालत नाही. ती प्रयोगाने सिद्ध करावी लागतात. त्यासाठी डेटा जमा करावा लागतो. शॉनने तसे केले. केवळ अमेरिकेतील नव्हे तर ४२ देशांतील निरीक्षणे घेतली. हजारो लोकांची परीक्षा केली. २२५ शोधनिबंधांचा अभ्यास केला. शॉनला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट दिसून आली. समस्येवर मात करण्यासाठी मनाची प्रसन्नता ही पूर्वअट आहे.
समस्येसमोर आपण चिंताग्रस्त होतो. काळजीत पडतो. मनावर ताण येतो. या प्रतिक्रिया समस्येतील गुंतागुंत आणखी वाढवितात. याउलट मन प्रसन्न असले की समस्या सोडविण्याचा मार्ग लवकर दिसतो. स्थिर व प्रसन्न मनाला समस्येचे आकलन चटकन होते.
विज्ञानाच्या भाषेत बोलायचे तर चिंता, काळजी वाढली की भयाला प्रतिसाद देणारे मेंदूतील क्षेत्र उद्दीपित होते. हे केंद्र उद्दीपित झाले की मेंदूतील सर्व ऊर्जा या केंद्राकडे वळते. शरीराची सुरक्षा जपणारे हे केंद्र समस्या सोडविण्यासाठी निरुपयोगी असते. समस्या सोडविण्यासाठी मेंदूतील 'प्रीफ्रन्टल कोर्टेक्स' हा भाग उद्दीपित होणे अत्यावश्यक असते. चिंता वाढली की हा भाग उद्दिपित होत नाही व माणूस गोंधळात पडतो. मात्र मन स्थिर व प्रसन्न असेल तर हाच भाग जास्त उद्दीपित होतो. डोपामाइन व सेरोटोनिन हे स्राव मेंदूत वाहू लागतात आणि समस्येतून मार्ग निघतो. मेंदूत हे स्राव वाहात असले की उत्पादनक्षमता, सर्जनशीलता व समाधान यामध्ये लक्षणीय वाढ कशी होते याची विस्तृत आकडेवारी शॉनच्या शोधनिबंधात मिळते.
मात्र बहुतेकांच्या मेंदूत हे स्राव चटकन वाहात नाहीत. बहुसंख्य माणसे काळजीत पडतात. मेंदूतील भयाचे केंद्रच उद्दीपित होते. पण निराश होण्याचे कारण नाही. यावर सहजसोपा उपाय शॉनने दाखवून दिला आहे. न्यूरोप्लास्टिसिटी या क्षेत्रातील संशोधन असे दाखवून देते की नवीन गोष्ट शिकणे हे मेंदूला कोणत्याही वयात शक्य आहे. मेंदूतील केंद्रे एकमेकांशी व शरीराच्या पंचेंद्रियांशी जोडलेली असतात. परस्परांशी असलेल्या मेंदूतील या जोडण्यांमध्ये परिवर्तन करणे शक्य असते. त्यासाठी एक लहानसा मानसिक व शारीरिक व्यायाम शॉनने सुचविला आहे.
रोज पाच गोष्टी करा, असे शॉन सांगतो. १) कृतज्ञता वाटण्याजोग्या तीन घटना लिहून काढा. २) मित्र वा सहकाऱ्यांना उत्साह वाटेल अशी एखादी कृती सकाळीच करा. ३) अधूनमधून फक्त दोन मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा. ४)दिवसातील एका महत्त्वपूर्ण घटनेवर डायरी लिहून चिंतन करा. ५) दहा मिनिटे व्यायाम करा.
मेंदूची कार्यपद्धती लक्षात घेऊन शॉनने हे उपाय सुचविले आहेत. आसपासच्या परिस्थितीची मेंदू सतत चाळणी करीत असतो. मात्र तो एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करू शकतो. सर्वसाधारणपणे नकारात्मक गोष्टींकडे मेंदूचे आधी लक्ष जाते. सावध राहण्यासाठी ते आवश्यक असते. मात्र यामुळे फक्त नकारात्मक गोष्टीच पाहण्याची सवय मेंदूला लागते. नकारात्मक गोष्टीच मनावर ठसतात, सकारात्मक नजरेतून निसटतात. त्यातून नकारात्मक भावना निर्माण होतात. 'टेट्रीस इफेक्ट' असे शॉन याला म्हणतो. याचे तपशीलवार विवेचन त्याने केले आहे. मात्र नकारात्मक भावनांप्रमाणे मेंदूला 'पॉझिटिव्ह टेट्रीस इफेक्ट'ही तयार करता येतात. ती सवय लावण्यासाठी वरील व्यायाम प्रकार उपयोगी पडतात.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या लोकप्रिय पुस्तकांमधील विवेचनासारखे हे वाटेल. पण शॉन पुराव्यानिशी बोलतो. बहुराष्ट्रीय कंपनीतील व्यवस्थापकांना वरील प्रकार सलग २१ दिवस करण्यास त्याने सांगितले. कार्यक्षमता, अचूकता व समाधान या प्रत्येक आघाडीवर प्रयोग करणाऱ्यांमध्ये तीन आठवडय़ांत मोठा फरक दिसून आला. आश्चर्य म्हणजे चार महिन्यांनंतरही या प्रयोगाचा सकारात्मक परिणाम अनुभवास येत होता. मेंदूला सकारात्मक काम करण्याची सवय लावता येते व अशी सवय लावली तर पुढील बरेच महिने तो उत्साहात काम करतो. अर्थात सकारात्मक भावना निर्माण होतील असे वातावरणही कंपनीत असावे लागते. गुगल, व्हर्जिन, अशा कंपन्यांत असे वातावरण मुद्दाम निर्माण करतात व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवितात.
गीतेमध्ये श्रीकृष्ण पंचेंद्रियांना वळण लावून बुद्धी स्थिर करण्यास सांगतात. शॉनच्या व्यायाम प्रकारात तेच अभिप्रेत आहे. या पाच प्रकारांपैकी दुसऱ्याशी संपर्क ठेवण्याच्या सवयीचा मनाच्या प्रसन्नतेशी सर्वात घनिष्ठ संबंध असतो, असे शॉनला आढ़ळले. कुटुंबाचे, मित्रांचे, समाजाचे सहकार्य आणि शरीरस्वाथ्य याचा थेट संबंध आहे. समाजात रममाण झालेला माणूस जास्त जगतो. याउलट एकटेपणाचा शरीरावर होणारा परिणाम हा उच्च रक्तदाबाइतका घातक असतो. याबाबत खूप संशोधन अन्य समाजशास्त्रज्ञांनीही केले आहे. मात्र आपलेपणाचे असे सुख सर्वानाच मिळते असे नाही. बहुतेक लोक याबाबत कमनशिबी असतात. यावर उपाय म्हणजे स्वत:हून लोकांच्या संपर्कात जाणे व त्यांना मदत करणे. शॉनच्या पाहणीनुसार स्वत:हून घेतलेल्या अशा पुढाकारामुळे मेंदूची कार्यक्षमता खूप वाढते. पुढाकार घेणारे लोक व उदासीन राहणारे लोक यांच्या कार्यक्षमतेतील फरक शॉनने प्रयोगातून दाखवून दिला आहे. लोकांशी स्वत:ला जोडून घेण्याचे फायदे अनेक आहेत. लोकसंग्रहाचा आग्रह गीतेमध्ये का धरला आहे हे यावरून लक्षात येते.
लोकसंग्रह व प्रसन्नता साधली म्हणून सर्वकाही सोपे होत नाही. आयुष्यात अनेक विपरीत गोष्टी घडतच असतात. फसवणूक, गैरसमज, द्वेष, शत्रुत्व, हेवा, असूया अशा अनेक भावनांशी माणसाला सामना करावा लागतो. यातून ताण येतो. ताण सहन झाला नाही की माणूस स्वत:ला शक्तिहीन मानू लागतो आणि मग वेगाने एकटा पडत जातो. ताणाच्या वाईट परिणामांवर आता भरपूर संशोधन झाले आहे. पण त्यामुळे आपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी, असा शॉनचा सल्ला आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज द्या, असे तो सांगतो व हा सल्लाही पुन्हा प्रयोगातून सिद्ध करून दाखवितो. आर्थिक मंदीत बँका गटांगळ्या खात होत्या व सर्वत्र नैराश्याचे वातावरण होते. तेव्हा 'यूबीएस'मध्ये शॉनने प्रयोग केला. ताणाचे शरीरावरील वाईट परिणाम दाखविणारी चित्रफीत एका गटाला वारंवार दाखविली तर ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिल्यास मेंदू व शरीराला नवी शक्ती कशी मिळते हे सांगणारी चित्रफीत दुसऱ्या गटाला दाखविली. काही दिवसांनंतर दोन्ही गटांची तपासणी केली असता ताणाकडे आव्हान म्हणून पाहणाऱ्यांची मानसिक व शारीरिक ऊर्जा वाढलेली आढळली. आरोग्याच्या कुरबुरी तर जवळपास नाहीशा झाल्या. कामातील आनंद व आत्मविश्वास वाढला. फायझर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शॉनने दुसरा प्रयोग केला. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या पाच घटना आयुष्यातून निवडण्यास सांगितले. तेव्हा या पाचही वेळा हे अधिकारी खूप ताण सहन करीत होते असे दिसले. ताणामुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व सुदृढ झाले. ताणाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर माणसाची उत्पादनक्षमता कमालीची वाढते असे शॉन ठामपणे सांगतो. ताण म्हणजे सामथ्र्य वाढविण्याची संधी असे समीकरण आहे.
आयुष्यात संघर्ष टाळता येत नाही. मात्र बुद्धीची प्रसन्नता व लोकसंग्रह ही दोन आयुधे हाती असली तर संघर्ष असूनही जगण्याचा आनंद लुटता येतो. मात्र त्यासाठी मेंदूला सकारात्मक विचार करण्याची सवय मुद्दाम लावून घ्यावी लागते. सध्या आजूबाजूला सतत त्रासदायक गोष्टी कानावर येत असताना अशी सवय लावून घेणे अत्यंत कठीण असले तरी सकारात्मक विचार करणे हाच उपाय त्यावर आहे. गीतेमध्ये मांडलेल्या तत्त्वांचा वैज्ञानिक आधार शॉनच्या प्रयोगातून मिळतो. शॉनला भगवद्गीता माहीत नाही तरीही तो श्रीकृष्णांप्रमाणेच सल्ला देतो.
शॉन म्हणतो, 'आनंदाचा मुखवटा चढवा असे मी अजिबात सांगत नाही. समस्या नाहीच अशी स्वत:ची खोटी समजूत घालण्यासही मी सांगत नाही. प्रत्येक घटना ही सुवर्णसंधी माना असला खुळा उपदेशही मी करीत नाही. वेगळ्या सवयी लावून मेंदूमध्ये बदल घडवून आणता येतो व अशा बदलाचे फायदे प्रत्यक्ष दिसतात इतकेच मी सांगू इच्छितो. आपण बदलू शकत नाही अशी समजूत आपल्या मनात समाजाने रुजविली आहे. ती खोटी आहे असे माझे प्रयोग सांगतात. विपरीत परिस्थितीतही चांगल्या गोष्टी शोधून प्रसन्नतेला अग्रक्रम द्या, तशी सवय मेंदूला लावा आणि त्याच्या उत्तम परिणामांचा अनुभव घ्या.'
नवीन वर्षांची सुरुवात शॉनच्या प्रयोगाने करण्यास हरकत नसावी. त्यानिमित्ताने भगवद्गीताही नव्या नजरेने तपासता
येईल.
(मुख्य संदर्भ :  हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्य़ूतील 'पॉझिटिव्ह इंटलिजन्स' हा शोधनिबंध-  जानेवारी २०१२)

No comments:

Post a Comment