सागरा प्राण तळमळला
loksatta - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=83978:2010-07-07-14-27-14&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10
स्वैर अनुवाद: राजेंद्र येवलेकरडॉ. श्रीरंग गोडबोले ,गुरुवार, ८ जुलै २०१०
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदान लोकांच्या सदैव स्मरणात राहील. त्यांनी नेहमीच क्रांतिकारी मार्गावर विश्वास ठेवून इंग्रज सरकारविरुद्धच्या स्वातंत्र्यलढय़ाचे स्फुल्लिंग धगधगते ठेवले. स्वत: मागे राहून इतरांना पुढे करणाऱ्या सेनापतींसारखे ते नव्हते. त्यांनी ८ जुलै १९१० रोजी फ्रान्समधील मार्सेलिसच्या समुद्रात मारलेली उडी ही त्यांच्या जीवनप्रवासातीलच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय घटना होती. त्या घटनेला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. सावरकरांनी मारलेली ती साहसी उडी, नंतर फ्रान्समध्ये पुन्हा झालेली अटक हा घटनाक्रम साधा नव्हता, त्याला अनेक पैलू होते. परदेशातील भूमीवर हे नाटय़ घडले होते, त्यामुळे त्याबाबतचा खटला हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालला व त्याला ‘सावरकर केस’ असे म्हटले गेले होते. सरदार सिंग राणा यांनी जाहीर केलेली शिवाजी फेलोशिप मिळाल्यामुळे सावरकर २६ मे १९०६ रोजी भारतातून इंग्लंडला गेले. या फेलोशिपसाठी त्यांचे नाव श्यामजी कृष्णवर्मा यांना लोकमान्य टिळकांनी सुचवले होते. श्यामजींच्या सूचनेवरून टिळकांनी सावरकरांना चारशे रुपये बरोबर देऊन पाठवले. वरकरणी ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले, असे दिसत होते. पण नंतर ते इंग्लंडमधील भारतीय क्रांतिकारकांच्या चळवळीचे अग्रणी बनले. त्या काळात इंडिया हाऊसचे राजकीय नेतृत्व सावरकरांकडे आले आहे, ही बाब ब्रिटिशांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. १३ मे १९०९ ग्रेज इनच्या बेंचर्सनी त्यांच्यावर राजद्रोहासह अनेक आरोप ठेवले होते. भारतातील सरकार उलथवून टाकण्याच्या कटाचा आरोपही होता. त्यांच्यावरील हे आरोप सिद्ध झाले नाहीत. ग्रेज इनच्या शिस्तभंग समितीला व्हॉइसरॉयने एक तार पाठवून सावरकरांवर कारवाईची शिफारस केली होती. त्यांचा राजद्रोहाच्या कारवायांशी संबंध असल्याची काही कागदपत्रेही पाठवण्यात आली होती. सावरकरांनी त्या वेळी मदनलाल धिंग्रा यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे सावरकर हे ब्रिटिशांच्या डोळय़ांत खुपत होते. खरे तर तो काळ सावरकरांसाठी व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात कसोटीचा होता. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंची रवानगी अंदमानात जन्मठेपेसाठी झाली होती. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. सावरकरांचे लहान बंधू नारायण यांना अटक होण्याची शक्यता होती. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी येसूवहिनी व पत्नी यमुनाबाई यांच्यावर येऊन पडली होती. सावरकरांचा मुलगा प्रभाकर वयाच्या चौथ्या वर्षी वारला होता. धिंग्रा यांच्यावरचा खटला व त्यांना मृत्युदंडाची झालेली शिक्षा यामुळे इंडिया हाऊसवर मळभ आले होते. श्यामजी कृष्णवर्मा यांनी त्या वेळी असे म्हटले होते, की सावरकर आता इंग्लंडमध्ये सुरक्षित राहू शकत नाहीत, त्यांना विनाविलंब बाहेर नेले पाहिजे. बऱ्याच प्रयत्नांनंतर सावरकरांचे मन पॅरिसला जाण्यासाठी वळवण्यात आले. तत्पूर्वी सावरकरांनी २४ ऑक्टोबर १९०९ रोजी लंडनमध्ये दसरा साजरा केला होता. त्या कार्यक्रमास गांधीजी उपस्थित होते. सावरकरांच्या सहवासाचा योग हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे, असे गांधीजी म्हणाले होते. त्या सुमारास सावरकरांना न्यूमोनिया झालेला होता तरीही त्या अवस्थेत त्यांनी शिखांच्या इतिहासावर आधारित मराठी पुस्तक लिहिले होते. ६ जानेवारी १९१० रोजी सावरकरांनी लंडन सोडले.नोव्हेंबर १९०९ पासूनच तत्कालीन मुंबई प्रांताचे सरकार सावरकरांच्या अटकेचा विचार करीत होते. नाशिकला जॅक्सनचा खून झाला, त्यानंतर अनेकांची धरपकड करण्यात आली. १ फेब्रुवारी १९१० रोजी जॅक्सनच्या खुनाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली. त्या खुनात जे शस्त्र वापरले होते ते सावरकरांनी लंडनहून पाठवले होते, हे त्यात निष्पन्न झाले होते. दंडाधिकाऱ्यांनी सावरकरांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्याचे आदेश जारी केले होते. त्यांच्यावर फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स अॅक्ट १८८१ अन्वये कारवाई करण्यास सांगण्यात आले होते व त्या आदेशाची प्रत बो स्ट्रीट दंडाधिकाऱ्यांना पाठवली होती, जेणेकरून सावरकरांना लंडनमध्येच अटक करण्यात यावी. पण तेव्हा सावरकर पॅरिसमध्ये क्रांतिकारकांच्या बैठका घेत होते. तिथे त्यांनी गॅरिबाल्डीच्या चरित्राचा अभ्यास केला, मॅझिनीचे साहित्य वाचले. तिथून ते भारतातील क्रांतिकारकांना पत्रे, ब्राऊनिंग पिस्तुले पाठवत होते. ते श्यामजींना म्हणत की नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला भारतात जाऊ द्यावे. परंतु भारतात परतल्यास त्यांना प्रदीर्घ काळासाठी तुरुंगात जावे लागेल, याची कल्पना असल्याने श्यामजी व मॅडम कामा त्यांना परावृत्त करीत. श्यामजींनी सावरकरांना सांगितले, तुम्ही सेनापती आहात. तुम्ही प्रत्यक्ष रणभूमीवर उतरण्याची घाई करू नका. सावरकर त्यावर म्हणाले, की मी जर सेनापती आहे, तर प्रत्यक्ष पहिल्या फळीत लढून मला माझी योग्यता सिद्ध केली पाहिजे; मुख्यालयी बसण्यासाठी खोटे युक्तिवाद करीत भीतीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न मी करणार नाही. सरतेशेवटी मॅडम कामा यांनी सावरकरांना पुन्हा लंडनला परतण्याची परवानगी दिली. सावरकरांनी विचार केला की, भारतात नाही तर इंग्लंडला जायला हरकत नाही, आपण मातृभूमीसाठी कुठल्याही हालअपेष्टा सहन करू शकतो हे दाखवून दिले पाहिजे. आपल्याकडून क्रांतीचे धडे घेऊन जे निधडय़ा छातीने वधस्तंभाकडे गेले त्यांना, त्यांचा गुरूच असा देशामागून देश भटकत स्वत:ला वाचवतो आहे असे वाटू नये, त्यामुळे वाईटात वाईट घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आपली तयारी असली पाहिजे. फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स अॅक्ट अन्वये कारवाईचा हुकूम असताना लंडनला परतणे जोखमीचे होते. १३ मार्च १९१० रोजी त्यांनी पॅरिस सोडले. ते इंग्लंडमधील न्यू हेवन येथे पोहोचले. तिथून ते रेल्वेने लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशनला उतरले. लगेच त्यांना अटक करण्यात आली. त्यांना भारतातून आलेले वॉरंट दाखवण्यात आले. त्यांच्यावर राजद्रोह व खुनास प्रवृत्त केल्याचा आरोप होता. सावरकर हसले व म्हणाले, येस सर! नंतर त्यांना बो स्ट्रीट दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. त्यांची झडती घेण्यात आली. त्यात काही राष्ट्रवादी विचारांची पुस्तके, वृत्तपत्रांची कात्रणे, छायाचित्रे, मॅझिनी, मदनलाल धिंग्रा यांची छायाचित्रे, गॅरिबाल्डीवरचे लिखाण तसेच सांकेतिक भाषेत लिहिलेला कागद सापडला. पोलिसांनी बऱ्याच यातना देऊनही सावरकरांनी त्या कागदावर काय लिहिले आहे ते सांगितले नाही.त्या वेळचे एक ख्यातनाम लेखक डेव्हिड गार्नेट हे सावरकरांचे चांगले मित्र होते. त्यांनी असे म्हटले होते, की नाशिक येथे जॅक्सनचा खून झाला त्या प्रकरणात सरकारकडे सावरकर यांच्याविरुद्ध पुरावे होते, पण हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळावे लागणार होते. जॅक्सनचा खून झाला तेव्हा सावरकर लंडनमध्ये होते, त्यामुळे तेथेच त्यांच्यावर खटला चालवावा असा एक मतप्रवाह होता. पण लंडनमध्ये खटला चालला असता तर त्यांना २-३ वर्षांचीच शिक्षा झाली असती. अधिकाऱ्यांचा सावरकरांना भारतात आणण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांना पुरावे गोळा करावे लागणार होते. ते भारतात असताना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा, प्रक्षोभक भाषणांचा शोध घ्यावा लागणार होता. त्यांना तशी काही प्रक्षोभक भाषणे सापडली व त्या पुराव्यांच्या आधारे सावरकरांना भारतात आणण्यासाठी अर्ज करण्यात आला. ब्रिटिश अधिकारी सावरकरांना भारतात पाठवण्यास तयार झाले होते. मुंबई पोलिसातील सहायक पोलीस निरीक्षक गायडर यांनी उपअधीक्षक सीआयडी, चार्ल्स जॉन पॉवर यांना पाठवलेल्या पत्रातून ते स्पष्ट झाले होते. सावरकरांना ताब्यात घेण्यासाठी पॉवर हे अटक वॉरंट घेऊन निघणार होते. त्यांच्यासमवेत अमरसिंग सखारामसिंग परदेशी (सावरकरांच्या मित्रमेळय़ाचे पूर्वीचे सदस्य), महंमद सादिक व उस्मान खान हे तीन जमादार असणार होते. १० फेब्रुवारी १९१० रोजी पॉवर यांना सावरकरांच्या अटकेचे वॉरंट मिळाले. इंग्लंडमध्ये सावरकर तुरुंगात अगदी शांत होते. सहकारी निरंजन पाल यांना याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले, की अटक व्हावी म्हणूनच मी लंडनला आलो. त्याचे परिणाम भोगण्याची माझी तयारी आहे. ब्रिक्स्टनच्या तुरुंगात असताना त्यांनी ‘माझे मृत्युपत्र’ ही मराठी कविता लिहिली, त्या वेळी व्हीव्हीएस अय्यर यांनी सावरकरांना सांगितले होते, की स्वातंत्र्यलढा असाच चालू ठेवला जावा.सावरकरांना ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी २० मार्च १९१० रोजी अय्यर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होती. सावरकरांचे मित्र गार्नेट यांनीही त्यांच्या सुटकेची एक योजना मांडली होती. रिमांडसाठी सावरकरांना दर आठवडय़ाला बो स्ट्रीट न्यायालयात नेले जात असे. त्यांच्यासमेवत काही डिटेक्टिव्ह असत. त्यांना नेण्याचा- आणण्याचा क्रम ठरलेला होता, त्यामुळे त्यांना तुरुंगाच्या दारातच ताब्यात घेऊन सुटका करावी, असा गार्नेट यांचा मनसुबा होता. गार्नेट यांनी असे ठरवले, की सावरकरांना सोडवण्यासाठी दोन माणसे पॅरिसहून बोलवायची, त्यांना सकाळीच ब्रिक्स्टनला न्यायचे. सावरकरांना ताब्यात घ्यायचे व नंतर त्यांना फ्रान्सला रवाना करायचे. सावरकरांनी ही योजना मान्य केली. गार्नेट यांनी सावरकरांसाठी महिला मोटरिस्ट घालत तसा पोशाख म्हणजे हॅट व बुरखा आणला. ती योजना अखेर फसली, पण सावरकर शांत राहिले. सावरकरांनी गार्नेट यांना सांगितले, की चिंता करू नका. मी पर्यायी योजना आखली आहे. ब्रिक्स्टन तुरुंगातील भेटीत ते अय्यरना म्हणाले होते, सगळे सुरळीत पार पडले तर मार्सेलिसमध्ये भेटू. एप्रिल १९१०मध्ये स्कॉटलंड यार्डने अय्यर यांना अटक करण्याचे ठरवले होते. शेवटची भेट म्हणून सावरकर व अय्यर दोघेही त्या भेटीत भावविवश झाले. त्यानंतर अय्यर पॅरिसला गेले. अय्यर व कामा यांनी सावरकरांना मार्सेलिस येथे सोडवण्याची योजना आखली होती. कारण सावरकर यांना भारतात घेऊन जाणारी बोट तेथे थांबणार होती. स्कॉटलंड यार्डला सावरकरांच्या सुटकेसाठी चाललेल्या प्रयत्नांची खबरबात होती. सावरकर कुठल्या बोटीतून येणार आहेत, याची माहिती अय्यर व मंडळी काढत आहेत, त्यामुळे सावध राहावे, असे स्कॉटलंड यार्डने लंडन पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी शेवटी त्यांना न्यायालयात आणले तेव्हा हातकडय़ा घातल्या होत्या व कडक सुरक्षा ठेवली होती. अखेर २१ जून १९१०रोजी विन्स्टन चर्चिल यांनी अखेरचे अटक वॉरंट जारी केले. सावरकरांना खटल्यासाठी भारतात पाठवण्याचे पक्के झाले. स्कॉटलंड यार्डचे डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर एडवर्ड पार्कर, उपअधीक्षक सीआयडी- चार्ल्स जॉन पॉवर व दोन देशी राखणदार सावरकरांबरोबर मोरिया या बोटीतून जाणार होते. ३० जून १९१० रोजी सावरकरांना ब्रिक्स्टन तुरुंगातून बाहेर काढून कॅनन रो पोलीस चौकीत नेण्यात आले. नंतर तेथूनच मोरिया बोट असलेल्या टिलबरी नदीकडे नेण्यात आले. बोटीत सावरकरांना सेकंड क्लासमध्ये बसवले होते. एडवर्ड पार्कर यांनी पॉवर यांच्याबरोबर सेकंड क्लासने प्रवास करणे पसंत केले होते. डेकवरचे दोन पॅसेजेस भारतीय जमादारांना दिले होते. सावरकर, पॉवर व पार्कर हे सेकंड क्लासच्या केबिनमध्ये होते. त्यात पोर्टहोल नव्हते. चार बेड होते. सावरकर व पार्कर खालच्या बेडवर झोपत, तर पॉवर हे सावरकरांच्या वरच्या बेडवर झोपत असत. जेवणानंतर सावरकर केबिनमध्ये विश्रांती घेत असत. जेवताना पार्कर व पॉवर हे सावरकरांच्या बाजूने बसत. सावरकर रात्री नऊ वाजताच झोपी जात असत, पण त्यांना नऊ स्वच्छतागृहांपैकी कुठेही जाण्याची मुभा होती. त्यांच्याबाहेर भारतीय जमादार पहारा देत असत. सावरकरांना व्यायामासाठी अप्पर डेकवर नेले जात असे, तोपर्यंत त्यांना हातकडय़ा घातल्या जात नसत. कुठली बंदरे गेली हे सावरकर कधीच कुणाला विचारत नसत. बिस्केचा उपसागर खवळलेला असताना प्रवासी ढकलले जात होते, त्या संधीचा फायदा घेऊन सावरकरांनी पोर्टहोलची मापे घेतली. त्याचा व्यास बारा इंच होता. सावरकर पाच फूट अडीच इंच उंच होते व त्यांच्या छातीचा घेर ३२ इंच व कॉलर साइज १३ इंच होती. त्यांची ही मापे अपराधी म्हणून नंतर घेण्यात आली होती, ती त्यांच्या स्मरणात होती. मोरिया बोट ५ जुलै १९१० रोजी जिब्राल्टरला आली, तिथे तीन-चार तास थांबली. तेवढय़ा कालावधीत सुटका करून घेणे सावरकरांना शक्य नव्हते. त्यानंतर या बोटीचा एक रॉडच तुटला, तेव्हा ती मार्सेलिसच्या जवळ आली होती. तशातच ती बोट ७ जुलै १९१० रोजी मार्सेलिसला आली. दुरुस्तीसाठी बोट जरा किनाऱ्याच्या जास्तीच जवळ नेण्यात आली. ८ जुलै १९१० शुक्रवारचा दिवस होता. सावरकर सकाळी सहा वाजता उठले. पार्करही उठले होते. सावरकरांनी स्वच्छतागृहात जायची इच्छा दर्शवली. पार्कर हे त्यांच्या दोन बेडच्या मधोमध घडय़ाळ ठेवायचे. सावरकरांना त्यांनी वेळ विचारली. सावरकर म्हणाले, सव्वासहा. पार्कर म्हणाले, थोडा वेळ थांबा. सावरकर पुन्हा साडेसहाला म्हणाले, आता तरी न्या. सावरकरांनी त्या वेळी सारखा त्रागा केला नाही. नंतर पार्कर यांनी सावरकरांच्या विनंतीला प्रतिसाद दिला. सावरकरांनी नाईट ड्रेसवर ड्रेसिंग गाऊन घातला. जॉन पॉवर झोपलेले होते. दोघांना स्वच्छतागृहाकडे येताना बघून भारतीय रखवालदार सावध झाले. सावरकर दोन क्रमांकाच्या स्वच्छतागृहात गेले. पार्कर यांनी अमरसिंग व महंमद सादिक यांना सावरकरांवर लक्ष ठेवायला सांगितले. आत जाताच सावरकरांनी गाऊन काढून ठेवला व दार आतून लावून घेतले. नंतर त्यांनी पोर्टहोलमधून बाहेर जाण्यास सुरुवात केली. बाहेरचे दोन रक्षक सावरकर बाहेर येत नाहीत म्हणून अस्वस्थ होते. अमरसिंह व सादिक यांनी वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. खिडकीची काच फोडली, पण सावरकर पळाले होते. ते १०-१२ फूट अंतर पोहोत गेले व धक्क्याच्या भिंतीवर चढू लागले. सावरकरांवर त्या वेळी गोळीबार झाला, ते नग्नावस्थेत पोहत गेले असे सांगितले जाते, पण त्याला आधार नाही. सावरकर किती अंतर पोहून गेले, कसे गेले, याला महत्त्व नाही, पण अटक करवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला जबर हादरा देण्याचा केलेला तो प्रयत्न होता. सावरकर किनाऱ्याला लागले व पळू लागले. पण फ्रान्सच्या सागरी दलाच्या ब्रिगेडियर पास्की यांनी त्यांना अटक केली व पुन्हा बोटीवर आणले. तोपर्यंत बोटीवरील तीनजण पास्की यांच्या मदतीला आले होते. त्या बोटीतून एक इसम जवळजवळ नग्नावस्थेत पोर्टहोलमधून बाहेर पडताना आपण पाहिला, असे पास्की यांनी पोलिसांना सांगितले, ब्रिगेडियर पास्की यांनी पाचशे मीटर पळत जाऊन सावरकरांना पकडले व पुन्हा बोटीवर नेले. काही मिनिटांतच ही सगळी घटना घडली. ‘गॅलिक अमेरिकन’मध्ये या घटनेची माहिती देताना असे म्हटले होते, की सावरकर सुटले हे बघताच ब्रिटिश पोलिसांनी चोर. चोर. अशा आरोळय़ा दिल्या, त्यामुळे फ्रेंच पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांना आंतरराष्ट्रीय निकषानुसार वर्तणूक न देता पुन्हा बोटीवर नेण्यात आले. मार्सेलिसच्या ब्रिटिश दूतावासाने फ्रेंच पोलिसांना या कामगिरीबद्दल धन्यवाद दिले.सावरकरांच्या या साहसाचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी कौतुक केले होते. त्यानंतर श्यामजी, राणाजी व मॅडम कामा यांनी कार्ल मार्क्सचे जावई मोन्सिअर जां लोंगे व समाजवादी नेते मोन्सिअर जोरस यांच्याशी सावरकरांना फ्रान्सच्या परदेशी भूमीत अटक करण्यात आल्याच्या विषयावर चर्चा केली. मार्सेलिस पोलिसांनी सावरकरांना ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात देऊन चूक केली हे पटवून दिले. फ्रेंच सरकारला सावरकरांना पुन्हा फ्रान्सच्या ताब्यात देण्याची विनंती करण्यास भाग पाडले. तशी विनंती करण्यात आल्याची माहिती इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री एडवर्ड ग्रे यांनी त्या वेळी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये दिल्याचे ‘गॅलिक अमेरिकन’ने म्हटले आहे. फ्रान्समधील ला हय़ुमॅनाइटपासून जर्नल दा डिबेट या वेगवेगळय़ा विचारसरणीच्या वृत्तपत्रांनी सावरकरांना पुन्हा फ्रान्सच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. ‘द एक्लेअर’ने तर ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीवर टीकेची झोड उठवली होती. बळाचा वापर आम्हाला मान्य नाही, असे असले तरी आम्ही ते थांबवू शकत नाही, पण ब्रिटनच्या पोलिसांनी फ्रान्सच्या पोलिसांना मदत करायला नको होती. ‘द टेम्पस’ने सुद्धा असे म्हटले होते, की सावरकरांना त्यांचा पाठलाग करणाऱ्यांच्या ताब्यात देऊन फ्रेंच पोलिसांनी आश्रयाच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे.फ्रेंच सरकारने सावरकरांना परत ताब्यात देण्याची मागणी ब्रिटिश सरकारकडे केली. नंतर ब्रिटनने हे प्रकरण हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाकडे नेण्याचे मान्य केले, पण तेथे न्याय मिळणे शक्य नव्हते. लवादाने असा निर्णय दिला, की फ्रान्सचा त्या कैद्यावर कुठलाही अधिकार असू शकत नाही, त्यामुळे सावरकरांना पुन्हा फ्रान्सच्या ताब्यात देण्याचा प्रश्नच येत नाही. सावरकरांना पुन्हा मोरिया बोटीवर नेण्यात आले. त्यानंतर २२ जुलैला सकाळी त्यांना मुंबईत आणण्यात आले. नंतर टॅक्सीने व्हिक्टोरिया टर्मिनसला नेले. तेथून दिल्ली एक्स्प्रेस मेलच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून त्यांना नाशिकला आणले तेव्हा दुपार झाली होती. तेथे त्यांच्यावर खुनास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खटला चालला. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना लवकरात लवकर शिक्षा कशी देता येईल यावर सरकारचा भर होता. या घटनेची तुलना शिवाजीमहाराजांच्या आग्य््रााहून सुटकेशी करता येईल. शिवाजीमहाराज हे सार्वभौम हिंदू राजे होते, तर सावरकर हे भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जिवाचे रान करणारे क्रांतिकारक होते इतकाच काय तो फरक! सावरकरांचे हे असामान्य कर्तृत्व पुसून टाकण्याचा प्रयत्न काही हितसंबंधी लोक करतात, पण शिवाजी महाराजांप्रमाणेच सावरकरांचेही नाव हिंदूंच्या मन:पटलावरून कधीच पुसले जाणार नाही.‘कृतार्थ’ सावरकरस्वातंत्र्य मिळविण्यासाठी सावरकरांनी ‘अभिनव भारत’ ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संघटनेचे विसर्जन करण्यात आले. पुण्यात केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी सावरकरांनी केलेल्या भाषणातील अंश :‘काही लोक म्हणतात, माझे जीवन विफल आहे. त्यांना काही कळत नाही. माझ्यासारखे सफल जीवन फार थोडय़ांच्या वाटय़ाला येते. तरुणपणी, सर्व सोडून मी या खडतर मार्गावर इतर पुष्कळांच्या समवेत पाऊल टाकले. त्या वेळी मला स्वतंत्र भारत याचि देही याचि डोळा पाहायला मिळेल, ही आशा कुठे होती? माझ्या बरोबरीचे लोक पारतंत्र्यातच जग सोडून गेले. काही तुरुंगात झिजून मेले. आज मी जिवंत आहे. स्वतंत्र आहे. मला पन्नास वर्षांची शिक्षा झाली. मी बहुतेक तुरुंगातच मरेन, ही धास्ती मला होती. मी सुटलो. देश स्वतंत्र झाला. आज मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे. मला सरकार-दरबारी मान नाही. खरे आहे; पण आम्ही ज्या वेळी आपले प्राण पणाला लावले होते, त्या वेळी आम्ही दैवाशी सौदा केलेला नव्हता, की या त्यागाबद्दल आम्हाला सरकारी मान मिळाले पाहिजेत. मला माहीत आहे, की दिल्लीच्या दरबारात मला पट्टेवाल्याचीही जागा मिळायची नाही. तरीही मी आज संतुष्ट आहे. तृप्त आहे. कारण माझा देश स्वतंत्र आहे. मी स्वतंत्र आहे.’* धों. वि. देशपांडे यांच्या ‘राजमुद्रा’मधून साभार.
Thursday, July 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment