Monday, July 19, 2010

वैपुल्य आणि वैफल्य

वैपुल्य आणि वैफल्य
Source - loksatta
छाया दातार , शनिवार, १७ जुलै २०१०


‘फास्ट, कन्व्हिनव्हिनियंट आणि चीप’ हे अमेरिकन खाद्यशैलीचे आजचे परवलीचे शब्द झाले आहेत. तेथील ग्राहक या जीवनशैलीचे गुलाम बनले आहेत. अमेरिकेतील विपुलतेमुळेच तेथील माणसे निसर्गनियमांच्या, खाण्यापिण्यासंबंधींच्या पारंपरिक विधिनिषेधांच्या पलीकडे पोहोचली आहेत. आणि आपण काय गमावत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाहीये..दरवेळी अमेरिकेत जाऊन आले की अस्वस्थ व्हायला होते. एका बाजूला तेथील ऐश्वर्य आणि वैपुल्य यामुळे दिपून जायला होते. त्याचबरोबर तेथील ‘सिस्टीम्स’ कशा वैशिष्टय़पूर्ण काम करत असतात आणि न चुकता सुरळीत चालू राहतात, तसेच त्या हाताळण्याचे तेथील नागरिकांचे कसब, याबद्दलही कौतुक पाझरत राहते. दुसऱ्या बाजूला सारखं असंही वाटत राहतं की, ही किती उधळमाधळ चालली आहे. ऊर्जेचा प्रचंड प्रवाह हे सर्व सौंदर्य, ऐश्वर्य आणि विपुलता टिकविण्यासाठी आणि पुनर्निर्माण करण्यासाठी राबविला जात असला पाहिजे. महाजालावर गेले असते तर मला सर्व प्रकारचे स्टॅटिस्टिक्स मिळालेही असते. पण कोणाही सुज्ञ माणसाला हा ऊर्जेचा प्रश्न सांख्यिकी भाषेत न शिरतासुद्धा समजू शकेल. मी माझी काही निरीक्षणेच येथे मांडणार आहे.मला मजा एवढीच वाटते की, हा ऊर्जेचा विषय काढला की अमेरिकेतील भारतीय माणसे पटकन म्हणतात की, तुम्ही नोकरांची ऊर्जा वापरता. एक प्रकारे ही मानवी ऊर्जा वापरणे म्हणजे गुलामी पद्धती स्वीकारणे आहे. आम्ही जास्तीत जास्त ऑटोमॅटिक यंत्रेच वापरतो. अगदी रोजच्या खाण्याचे पदार्थही प्रक्रिया केलेले असतात. त्यामुळे हाताखालच्या नोकरांची गरज लागत नाही. ही गोष्ट खरी आहे की, भारतामध्ये नोकर मंडळी फारच स्वस्तात मिळतात. किमान वेतनाचे कायदे धांब्यावर बसविले जातात आणि स्थलांतरीचे लोंढे येत असल्याने नोकरांचा भरपूर पुरवठा मध्यम व उच्च मध्यमवर्गाच्या पथ्यावर पडतो. परंतु माझ्या मनात आले की, या प्रक्रिया केलेल्या अन्नासाठी, वाहतुकीसाठी, कारखान्यांमध्ये उत्पादनासाठी, त्याच्या आधी शेते, जनावरे यांच्या उत्पादनासाठी किती मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा लागते, याचा विचार या लोकांनी केलाय का? ऊर्जेचा महापूर असल्याशिवाय हे ‘ऑटोमॅटिक’ प्रकरण शक्यच नाही.मोठाली घरे- मॅन्शन्स, माणशी एक गाडी, १६ वर्षांच्या मुलामुलींना गाडी चालवायला परवानगी.. घरे दूरदूर पसरलेली असल्यामुळे शाळा, कॉलेज, सिनेमा, मित्र-मैत्रिणी सर्वासाठी गाडी हवीच. न्यूयॉर्क शहर सोडले तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळजवळ नाहीच आणि परवडणारही नाहीच. अमेरिकेला प्रचंड जागा, अवकाश मिळालेला असल्यामुळे दूर दूर पसरलेली उपनगरे हेच तेथील वैशिष्टय़. कोपऱ्यावरचे पानपट्टीचे दुकान ही संकल्पनाच नाही. युरोपमध्ये काही प्रमाणात अजूनही ती आहे. त्यामुळे गाडीत बसल्याखेरीज ब्रेड, दूध, भाजी या रोजच्या गोष्टीसुद्धा आणता येत नाहीत. त्यामुळे घरातही सर्व गोष्टी फ्रिजमध्ये साठवून ठेवायच्या. प्रचंड मोठे फ्रीज, फूड मॉल्समध्येही सर्व मांस, मासे आणि प्रक्रिया केलेले अन्न फ्रोझन स्थितीत मिळते. याचा अर्थ वाहतूक करतानाही फ्रिझिंग ट्रक वापरले जात असणार आणि हा माल उत्पादन होऊन विक्री होईतोवर सहा सहा महिने टिकत असणार, त्यासाठी लागणारी ऊर्जा. म्हणजे आपण मानवी ऊर्जेचा वापर करतो, तर अमेरिकन अर्थव्यवस्था खनिज ऊर्जा, अणुशक्ती, काही प्रमाणात जलस्रोतावरील ऊर्जा यांचा वापर करते. आणि या प्रचंड ऊर्जेचा वापर करता यावा म्हणून ‘क्लायमेट चेंज’सारख्या महत्त्वाच्या विषयाला त्यांना बगल द्यावीशी वाटते. आपली सौंदर्यशाली अतिश्रीमंती राहणी, ऊर्जेला मध्यनजर ठेवून आखलेली नगररचना, रोजच्या खाण्यापिण्यात असणारी खाद्यशैली (ज्यामध्ये पुन्हा भरपूर ऊर्जेचा वापर) या सर्वाचा जगातील ऊर्जा-साठय़ांवर विशेषत: खनिज तेलांच्या साठय़ांवर कब्जा मिळविण्यासाठी खेळले जाणारे राजकारण आणि युद्धमोहिमा- अशी ही साखळी आहे, हे लक्षात येणे खरे म्हणजे सहजशक्य आहे. अर्थात हे नाते इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक धाग्यांनी व्यामिश्र झाल्यामुळे लपविले जाते, हे कबूल. पण पर्यावरण- प्रश्न सध्या ऐरणीवर येऊन ठेपला असताना सर्वसाधारण समंजस माणसाच्या हे सहज लक्षात येणे शक्य आहे; परंतु बाजारपेठ, विशेषत: साखळी पद्धतीचे मॉल्स व त्यांच्या एकमेकांशी असलेल्या स्पर्धेतून स्वस्त मिळत जाणारे अन्न याची मोहिनी पडणे स्वाभाविक आहे. या वेळी तर असे लक्षात आले की, उच्च-मध्यमवर्गाचे प्रमाण लोकसंख्येत वाढल्यामुळे क्वालिटी फूड, ऑरगॅनिक फूड व विविध देशोदेशींचे फूड यासाठी असलेल्या स्पेशल साखळी मॉल्सचे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच पुन्हा वाहतुकीसाठी लागणारी ऊर्जा वाढली आहे.आजचे पर्यावरणीय प्रश्न हे ऊर्जेच्या चुकीच्या वापराने, अकार्यक्षम पद्धतीच्या वापराने आणि ऊर्जा साधने निर्माण करताना वापराव्या लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पद्धतीमुळे (उदा. समुद्राखालील खोदल्या जाणाऱ्या विहिरींमुळे आणि संभाव्य धोक्यांमुळेच) निर्माण झाले आहेत. यावर उपाय म्हणून अधिक कार्यक्षम पद्धतीने ऊर्जेचा वापर, उदा. हायब्रीड मोटारगाडय़ा वगैरे उत्तरे पुढे येत आहेत, परंतु ऊर्जेची गरज कशी कमी होईल याकडे लक्ष देणारी चर्चा, उदाहरणे जवळजवळ ऐकू आली नाहीत. अमेरिकन्स आणि भारतीय अमेरिकन्स या प्रश्नाकडे पाठच फिरवतात, असे सतत लक्षात येत होते.एक बारीकसे निरीक्षण. अतिशय स्वच्छ, नीटनेटके फूटपाथ, दोन्ही बाजूला हिरवळ, नुकताच रोलर फिरविलेला, काही ठिकाणी खास वसंतासाठी लावलेली फुले उमललेली असा, तेथे आम्ही उतरलो होतो त्या कॉलनीचा परिसर. आलिशान मॅन्शन्सची ही कॉलनी. सकाळी फिरायला बाहेर पडलो. आदल्या दिवशीच छान पाऊस पडून गेला होता. आजही पुन्हा पावसाची चिन्हे होतीच आणि लक्षात आले की, सगळ्यांच्या समोरच्या हिरवळीवर पाण्याची छोटी कारंजी उडत होती. स्प्रिंक्लर्स. मजा वाटली. घरी येऊन विचारले तर लक्षात आले की ही कारंजी टाइमवर लावलेली असतात. कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेले असते. ती ठराविक वेळा उडणारच. पाऊस असो की नसो. थंडीत बर्फ पडतो तेव्हा बंद. बंद करा, चालू करा यासाठी माणूस ठेवणे परवडत नाही. पण वीज जास्त जळली तरी चालते. पाणी तर भरपूरच आहे.दुसरे निरीक्षण- हायलॅन्ड फार्म, होल फूडस्, वर्ल्ड मार्केट अशा जरा उच्च दर्जाच्या फूड मॉल्समध्ये जायचा योग आला. २०० प्रकारचे ताजे ब्रेड, फेटलेल्या मोहरी सॉसचे २० प्रकार, २९० प्रकारचे चीज, डुकराचे मांस, गाईचे मांस, तेही १५-२० प्रकारच्या वेगवेगळ्या प्रक्रियांनी बनविलेले, सॅन्डविचमध्ये घालण्यासाठी पातळ काप, तेही ३-४ प्रकारचे, स्टेक, व्हील.. दिसायला आकर्षक पद्धतीने मांडलेले, वरून चांदी मिठाईला असते तशी. आपल्याकडे टांगलेल्या धडाचे तुकडे शोधून घ्यावे लागतात. येथे एखाद्या नवख्या माणसाला कळणार नाही की हा मांसाहाराचा पदार्थ आहे. सर्व स्वच्छ, शुद्ध. काप कापणारी बाई हातात प्लॅस्टिकचे मोजे घालते. आपण कशालाही हात न लावता चिमटय़ाने पदार्थ काढून घ्यायचे. आणि दुकान किती मोठे? शिवाजी पार्कचे अर्धे मैदान. वातानुकूलित आणि फ्रोझन फूडच्या शीतपेटय़ा. कोणतेही शेल्फ थोडेसुद्धा रिकामे नव्हते. ठोसून भरलेले. एक तर जरा एखादा माल विकला गेला की लगेच तेथे गोडाऊनमधून नवीन माल आणून भरला जात असावा. बहुतेक ठिकाणी ‘ऑरगॅनिक’च्या (सेंद्रिय) पाटय़ा होत्या. मला असं कळलं की, सर्वसाधारण सुपर मार्केट मध्यमवर्गीयांसाठी, स्वस्त अन्न घेण्यासाठी चालविली जातात; परंतु गेल्या काही वर्षांत अधिक जाणीवपूर्वक खरेदी करणारा ग्राहक पुरेशा संख्येने तयार झालाय. म्हणून ही खास साखळी मार्केटस्. म्हणजे थोडक्यात तिथेही श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढलीय. अशा प्रकारच्या मार्केटमध्ये गेल्यावर विविधता व वैफल्य आपल्या पायाशी लोळतंय, म्हणून आनंद होत असे. पण त्याबरोबर छाती दडपूनही जात असे. श्रीकृष्णाने तोंड उघडून विराट जगाचे दर्शन द्यावे आणि आपण अचंबित होऊन पाहावे, तसे. आणि भारतासारख्या देशातील ४० टक्के जनतेने किडा-मुंगीसारखे जीवन जगत राहावे, ही तीव्र विषमता विषण्ण करीत असे. हा ऊर्जेचा महापूर कसा आला आणि हा शाश्वत रहाणार आहे का? सूर्यऊर्जा, वायूऊर्जा हे पर्यायी स्रोत अजून मोठय़ा प्रमाणावर उभे राहत नाहीत. राहिले तरी त्यामध्ये बरीच भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे.हे सगळे अनुभवत, फिरता फिरता एक पुस्तक हाती लागले- ‘ऑम्निव्होरस् डायलेमा’- मायकेल पोलान आणि वाचता वाचता या सगळ्या जादूई वैफल्याची, विशेषत: हारीने लागलेल्या अन्नपदार्थाच्या चळतीच्या मागची पाश्र्वभूमी अधिकाधिक प्रकाशमय होत गेली. मला जाणवणारा अस्वस्थपणा, ऊर्जेचा अपव्यय आणि अन्नाच्या गुणवत्तेबद्दलचा संशय या सर्वाचे निरसन होत गेले. अन्नासारखी जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट, शरीराला ऊर्जा पुरविणारे साधन, हे बाजारपेठेच्या आणि दोन-तीन सर्वात मोठय़ा धान्य कंपन्यांच्या नफ्याच्या विळख्यात कसे सापडले आहे, याची कळ उघडत गेली. या पुस्तकातील दोन-तीन महत्त्वाच्या गोष्टी नोंदवाव्याशा वाटतात.कार्गिल आणि जनरल मिल्स या सगळ्यात मोठय़ा धान्याचा व्यापार करणाऱ्या कंपन्या. त्यांनी सरकारवर दबाव आणून गेल्या काही वर्षांत मक्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले गेले. मका पिकविणाऱ्या शेतकऱ्याला सबसिडी दिली गेली आणि मक्याचा वापर कल्पवृक्षासारखा करून (भरपूर संशोधन करून मक्याचे विघटन करून त्याच्यातून अनेक प्रकारचे ‘फ्रॅक्शन्स’ (केमिकल्स) काढण्यात आली.) मग वेगवेगळ्या स्वरूपात मक्यातून निघालेले हे फ्रॅक्शन्स अन्नपदार्थामध्ये मिसळण्याचे तंत्र सुरू झाले. मुख्य म्हणजे गाई-बैल, डुकरे, कोंबडय़ा या सर्वाना मोठमोठय़ा फीडलॉटमध्ये कोंडून ठेवून २४ तास मका खायला लावण्याची किमया त्यांनी करून दाखविली. माळावर गवत खात फिरणारी ही जात कापण्यासाठी तयार व्हायला ३-४ वर्षे लागायची. ती या नव्या तंत्राने १४ महिन्यांत, तेवढे मांस उत्पादन करायला लागली. इतरही अनेक हार्मोन्सची औषधे वगैरे देत देत जनावरांना धष्टपुष्ट करून दिवसाला शेकडो जनावरे मारण्याची सोय असलेली यंत्रे आणि त्यांना सामावून घेणारे कत्तलखाने बांधले गेले. गाईच्या पोटात अनेक प्रकारचे जिवाणू असतात आणि गवत खाऊन पोटात गेले की ते कामाला लागतात. त्यातूनच गाईंचे आरोग्य चांगले रहाते व प्रतिकारशक्ती निर्माण होते (देशी गाईच्या दुधाचे तूप जास्त गुणकारी असते, कारण त्यांच्या पोटातील जिवाणू चांगले असतात, गवतावर चरतात.) मक्याचा खाद्यपदार्थ म्हणून गरजेहून जास्त वापर झाल्याने या जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाली. मग त्यांना दणादण अ‍ॅन्टिबायोटिक्स खाण्यातूनच देण्याची पद्धत निघाली. जनावराची व्यक्ती म्हणून निगा न होता ‘मास कमोडिटी’च्या पद्धतीने वाढ केल्यामुळे गुणवत्तेकडे लक्ष न देता आजारी, थकलेली, दमलेली जनावरे चांगल्याच्या बरोबरीने कत्तलखान्याकडे नेली जातात आणि सरसकट सगळे मांस मिसळले जाते. ऑटोमॅटिकचा प्रभाव येथेही आहेच- हेच आजचे ‘फास्ट’ फूड.पोलानने पुस्तकात या सर्व ‘औद्योगिक सिस्टीम’चा छानच मागोवा घेतला आहे. परंतु त्याने या कंपन्यांच्या नफेखोरीबरोबरच ग्राहकांनाही दोषी धरलंय. ‘फास्ट, कनव्हिनियंट आणि चीप’ हे आजचे परवलीचे शब्द झाले आहेत. अर्थात भांडवलशाहीनेच जाहिरातींच्या माध्यमातून हे शब्द आणि त्यांच्यातून प्रतीत होणाऱ्या जीवनशैलीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्या जीवनशैलीचे सर्वच ग्राहक, विशेषत: स्त्रिया या गुलाम बनल्या आहेत.झटपट जेवण, सोयीस्कररीत्या बनविलेले, पॅक केलेले आणि स्वस्त अन्न जर मिळाले तर आजच्या धावपळीच्या जगात, पैशाच्या मागे लागलेल्या आणि इतर अनेक इंद्रिय सुखाच्या अधीन होऊ इच्छिणाऱ्या जनतेला आणखी काय हवे? ‘मॅक्डोनाल्ड’ ही स्वस्त अन्न विकणारी पहिली अमेरिकन कंपनी. त्यांचे बर्गर कसे बनतात, त्यात कोणते पदार्थ असतात, ते कुठून येतात, कसे उत्पादन होतात वगैरे काही माहिती असायची गरज ग्राहकांना वाटत नाही. आज अमेरिकेत ‘जाडेपणा’ हा रोग पसरला आहे, याचे एक कारण ज्यात त्यात मका घालून, कॉर्न सिरप घालून भरपूर कबरेदके असलेले अन्नच गरीब माणसांच्या पोटात जाते आहे. मांस खाल्ले तरी ते कबरेदकांवर पोसलेले मांस आहे आणि हा मकासुद्धा रासायनिक खते व पेस्टिसाईड यांच्यावर पोसलेला आहे.अन्न जेव्हा औद्योगिक पद्धतीने तयार केले जाते, तेव्हा पोलान ऊर्जेचा मुद्दा पुन:पुन्हा मांडतो. आज अमेरिकेत एक कॅलरी देणारा खाद्यपदार्थ निर्माण करण्यासाठी १० कॅलरी ऊर्जा- मुख्यत: खनिज तेलापासून मिळणारी वापरली जातेय. माणसाचे श्रम कमीत कमी खर्च होत आहेत. जवळजवळ सर्वच स्त्रिया ऑफिसमध्ये किंवा कारखान्यात काम करतात, पण घरात अन्नपदार्थ निर्माण करण्यात त्यांचाही फारसा हात नसतो आणि पुरुषांचा तर नसतोच नसतो. बाई पुरुषासारखी बनतेय. याउलट पुरुषांनाही घरकाम, विशेषत: खाद्यपदार्थ बनविण्याचे काम करण्यासाठी प्रवृत्त करायला ती असमर्थ ठरली आहे. अमेरिकन शेतकऱ्याने तर हाताने काम करणे केव्हाच सोडून दिलंय. तो कार्गिल आणि जनरल मिल्सचा ‘बाँडेड लेबर’ म्हणूनच काम करतो. कारण कर्ज मिळविणे वगैरे कामात त्याच मदत करतात. शेतावरचा माल त्याच उचलून घेऊन जातात. प्रचंड कारखान्यांसारख्या गुरांच्या कोंडवाडय़ात काम करायला स्थलांतरित मजूरच कमी पगारावर घेतले जातात. एकूणच ‘स्वस्त अन्न’, ‘सोयीस्कर अन्न’, ‘झटपट अन्न’ या तिन्ही आकर्षक संकल्पनांमध्ये गुणवत्तेचीही स्वताई आहे, संख्येला मान आहे आणि माणसाचे आरोग्य, त्याची प्रतिकारशक्ती आणि जीवनशैली प्रचंड प्रमाणात बदलवण्याची ताकद आहे.एक सुविचार आहे- ‘आपण जे खातो, तसे आपण होतो’. पोलानच्या मते- या विपुलतेमुळेच येथील माणसे निसर्गनियमांच्या, खाण्यापिण्यासंबंधींच्या पारंपरिक विधिनिषेधांच्या पलीकडे पोहोचली आहेत आणि आपण काय गमावत आहोत, हे लक्षात यायला अजून वेळ लागणार आहे.म्हणूनच मला भारतीय अमेरिकन बंधू-भगिनींना सांगावेसे वाटते की, आम्ही आमच्या नोकराचाकरांना, मानवी ऊर्जेला जास्त मोल देणे आवश्यक आहे हे कबूल; परंतु तुम्हीही तुमच्या ‘खाद्यशैली’कडे तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. ऊर्जेचा वापर कमी कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. आणि ‘क्लायमेट चेंज’च्या ठरावावर शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment