सुवर्णकाळ सोन्याचा!
शनिवार, २८ ऑगस्ट २०१०
ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटातला खलनायक हा सोन्याची तस्करी करणारा दाखविला जात असे. कालांतराने सोन्याच्या आयातीवरील र्निबध सैल झाले आणि सोन्याच्या तस्करीत काही ‘दम’ राहिला नाही. त्यामुळे तस्करीने आपला मोर्चा अमली पदार्थाच्या दिशेने वळवला. चित्रपटातला हा कलही बदलत गेला. त्या काळी आपला हा खलनायक काही लाखांची तस्करी करीत असे. आता काळ बदलत गेला तसे त्याच्या तोंडीही करोडोची भाषा येऊ लागली. रुपयाचे मूल्य वाढल्याने हिऱ्याच्या चोऱ्याही आता लाखाच्या नव्हे तर करोडोंच्या होऊ लागल्या आहेत. सोन्याची तस्करी थांबली असली तरीही सोन्याच्या खरेदीतील ‘चार्म’ काही कमी झालेला नाही. दिवसेंदिवस सोन्याच्या किमती आपला नवनवा उच्चांक गाठत आहेत. गेल्या काही वर्षांत मंदीने डोके वर काढल्यावर सोन्याची खरेदी कमी झाली, मात्र किमती काही त्या तुलनेत कमी झाल्या नाहीत. म्हणजेच सोन्याची लकाकी कायम टिकली आहे. अमेरिकेतील मंदी दूर झाल्याने आपल्याकडेही सोन्याच्या बाजारपेठेला पुन्हा एकदा उभारी येऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यांत वाहनांची खरेदी-विक्री वाढली, तशीच ती सोन्याचीही वाढली आहे. यासंबंधीची आकडेवारी ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने प्रसिद्ध नुकतीच केली आहे. मोटार वा सोन्याची खरेदी ही प्रामुख्याने हातात चांगला पैसा खुळुखुळु लागला की करण्यात येते. आता ती वाढली, याचा अर्थच मुळी आता मंदी ओसरली आहे असा होतो. सोन्याच्या खरेदीचा हा कल निश्चितच अर्थव्यवस्थेला सुखावह आहे. यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशातील सोन्याची विक्री जवळपास ९४ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात सुमारे ६० हजार कोटी रुपयांची सोने खरेदी झाली. जगातील श्रीमंत म्हणून समजल्या गेलेल्या विकसित देशात सोन्याची व्यक्तीगत खरेदी फारशी होत नाही, तिथे सरकारच सोन्याची खरेदी करते. या उलट नेमके चित्र विकसनशील देशांत आहे. भारतासह अनेक विकसनशील देश सोन्याची खरेदी मर्यादित स्वरूपात करतात. मध्यंतरी आपल्या देशाने २०० टन सोन्याची खरेदी केली, त्या वेळी ही एक मोठी बातमी झाली होती. दोन दशकांपूर्वी आर्थिक उदारीकरण सुरू होण्याअगोदर आपल्यावर सोने गहाण टाकण्याची नामुष्की आली होती. विकसनशील देशांतील सरकारे जरी सोन्याची खरेदी मर्यादेत ठेवत असली तरी तेथील लोक मात्र सोन्याची खरेदी भरपूर करतात. चीन व भारत ही सोने खरेदीची मोठी बाजारपेठ! आपल्याकडे सोन्यातील गुंतवणूक ही सर्वसामान्य माणसापासून ते श्रीमंत वर्गात अशी सर्व थरांत केली जाते. सोन्याची गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असल्याने, तसेच यातील तरलतेमुळे लोकांना फायदेशीर ठरते. गेल्या दोन दशकांत देशात झपाटय़ाने वाढलेल्या मध्यमवर्गाने गुंतवणुकीसाठी समभागातील गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असली तरीही त्यांची सोन्यातील गुंतवणूक तेवढय़ाच प्रमाणात असते. भविष्यातील तरतुदीसाठी किंवा लग्नाच्या निमित्ताने सोन्याची खरेदी करणारे आपल्याकडे मोठय़ा संख्येने दिसतात. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित म्हणून केली जात असली तरीही त्याची गुंतवणूक ही एक प्रकारे ‘मृत’च असते. कारण या गुंतवणुकीत कोणतीही उत्पादकता असत नाही, परंतु गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना याचे काही देणेघेणे नसते. त्यांना एक सुरक्षित गुंतवणूक हवी असते आणि सोने ही गरज भागविते. त्याच जोडीला सोन्याच्या दागिन्यांची एक मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या गुंतवणुकीचे म्युच्युअल फंड बाजारात आल्यावर तिकडे गुंतवणूकदार आकर्षित झाला आहे. या फंडात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. प्रामुख्याने ज्या गुंतवणूकदाराला सोने सांभाळण्याची जबाबदारी नको आहे आणि त्या जोडीला सोन्यातील नफाही मिळवायचा असतो, त्याच्यासाठी ही एक उत्तम संधी असते. आपल्याकडे उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांसाठी जे अनेक नवीन पर्याय खुले झाले, त्यात सोन्याच्या म्युच्युअल फंडांचा एक उत्तम पर्याय ठरला आहे. म्हणूनच यातील गुंतवणूक सुमारे ४०० टक्क्यांनी वाढली आहे. सोन्यातला गुंतवणूकदार हा अनेकदा ‘भावनात्मक’ गुंतवणूक करणारा असतो. म्हणजे तो सोन्याची खरेदी करतो, पण विक्री करण्यास सहसा पुढे येत नाही. सोन्याच्या म्युच्युअल फंडाकडे अशी मानसिकता असलेला गुंतवणूकदार जात नाही, हेदेखील वास्तव आहे. चीनमध्येही सोन्याच्या खरेदीबाबत आपल्यासारखाच कल आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीची सर्वात मोठी जागतिक बाजारपेठ आशिया खंडात आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या या बाजारपेठेद्वारे लाखो लोकांना रोजगारही मिळतो. ग्रामीण भागात सोन्याची मोठी बाजारपेठ दडलेली आहे. सर्वसामान्य शेतकरी असो वा श्रीमंत, तो दरवर्षी आपल्या कुवतीनुसार थोडी का होईना सोन्याची खरेदी करतोच! कारण कठीण प्रसंगी हेच सोने विकून वेळ निभावून नेता येते. गेल्या वर्षी पावसाळा कमी झाल्याने पिकांची स्थिती वाईट होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, सोन्याची खरेदी मंदावली होती. यंदा मात्र पावसाळा पुरेसा झाल्याने शेतकऱ्याच्या हातात चांगला पैसा खुळखुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी सोन्याच्या खरेदीत निश्चितच वाढ होईल. सोन्याच्या खालोखाल आता शहरी ग्राहकांमध्ये खरेदीसाठी हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढतो आहे. गेल्या तीन वर्षांत मंदीचा मोठा फटका हिऱ्यांच्या उद्योगाला बसला. आफ्रिकेतून कच्च्या हिऱ्यांची आयात करून त्याला पैलू पाडून निर्यात करण्याची मोठी बाजारपेठ आपल्याकडे आहे. त्याचे प्रमुख केंद्र सुरतमध्ये आहे. मात्र गेल्या मंदीत हे केंद्र पूर्णपणे झोपले होते. येथील लाखो कामगार बेकार झाले, परंतु आता पुन्हा एकदा या उद्योगाने भरारी घेतली आहे. चालू वर्षांच्या अखेरीस हिऱ्याची ही बाजारपेठ आता तब्बल ३१ अब्ज डॉलरवर म्हणजेच रुपयाच्या भाषेत बोलायचे झाल्यास १.४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. अमेरिका, चीन, हाँगकाँग, युनायटेड अरब अमिरात व राष्ट्रकुल देशांतली हिऱ्याची मागणी वाढल्याने आपल्याकडील या बाजारपेठेला नवा तजेला आला आहे. हिऱ्याला पैलू पाडण्याच्या उद्योगात जागतिक पातळीवरील विचार करता भारताचा वाटा ७० टक्के आहे. दिवसेंदिवस ही बाजारपेठ विस्तारतच जाणार असल्याने आपल्याकडील हिऱ्याला पैलू पाडणाऱ्या उद्योगास चांगले दिवस आले आहेत. प्रशिक्षित कामगारांना मोठय़ा प्रमाणात रोजगार देणारा हिऱ्याला पैलू पाडण्याचा हा उद्योग भारतात चांगलाच विकसित झाला आहे. जगाने अगदी चीनने देखील या उद्योगाकडे विशेष लक्ष पुरविलेले नाही. याचे कारण म्हणजे यासाठी आवश्यक असलेले कारागीर आपल्याकडे मोठय़ा संख्येने आहेत. या उद्योगामुळे देशाला अमूल्य असे विदेशी चलन मिळते. गेल्या दोन दशकांत गुंतवणुकीची साधने बदलत गेली असली तरीही सोन्याचे व हिऱ्याचे महत्त्व कमी झालेले नाही. समभागात गुंतवणूक करून झटपट नफा कमविण्याचा मार्ग अनेकांनी स्वीकारला असला तरी यात धोकाही असतो. त्या तुलनेत सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित व निश्चित भांडवलवृद्धी करणारी असते हे काळाने सिद्ध केले आहे. आपल्याकडे सोन्याची मागणी व पुरवठा याची तफावत फार मोठी आहे. सोन्याच्या खाणी आपल्या देशात नाहीत. त्या बहुतांशी आफ्रिकेत आहेत. त्यामुळे आपल्याला सोन्याची आयातच करावी लागते. त्याहून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आशिया खंडात सोन्याची सर्वात मोठी मागणी असली तरीही सोन्याचे दर ठरतात ते लंडन येथील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत! आणि नंतर जगात त्या दरानुसार किमतींची वध-घट होते. खरे तर सोन्याचे हे दर मुंबईत ठरले पाहिजेत, परंतु त्यादृष्टीने मार्केट विकसित करण्याचा सरकारने प्रयत्न केलेला नाही. मुंबई हे आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र झाल्यास सोन्या-चांदीची जागतिक बाजारपेठ मुंबईला हलू शकते. तसे झाल्यास देशाच्या विकासाच्या दृष्टीनेही तो एक सोन्याचा दिवस ठरेल. सोन्याची खरेदी काही लोक ‘व्यसन’ म्हणून करतात, तर काही एक निश्चित लाभाचे एक सुरक्षित साधन म्हणून! प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगवेगळे असले तरीही यातून एका मोठय़ा बाजारपेठेची निर्मिती झाली आहे. सोन्याच्या किमती कितीही वाढल्या तरी ही बाजारपेठ वाढतच जाणार हे निश्चित!
Wednesday, September 1, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment