सोमवार, ६ सप्टेंबर २०१०
source- loksatta.com
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=98634:2010-09-05-13-39-00&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7
चीनचा नेमका कोणता चेहरा खरा, असा प्रश्न भल्याभल्यांना नेहमीच पडत असतो. चीनच्या एका वरिष्ठ नेत्याने बीजिंगच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनामध्ये भारतीय दालनास भेट देऊन भारताविषयी गौरवोद्गार काढले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या देशाला ‘पंचशील’ दिले, असे त्या नेत्याने यावेळी स्पष्ट केले. चीनने आजपर्यंत आपल्या शेजारी देशांशी त्यानुसार आपले वर्तन ठेवले आहे, भारताबरोबरच नव्हे तर अन्य देशांबरोबरही ‘पंचशील’च्या तत्त्वज्ञानानुसार चीन वागतो, असेही त्यांनी म्हटले आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षात पाचव्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जाणारे ली चँगचुंग यांनी हे मत व्यक्त केले आहे. सध्याचा हा काळ प्रसारमाध्यमांमधून चीनविषयी संशय पेरणारा आहे. ‘लोकसत्ता’च्या कालच्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्येही आम्ही जो ‘चिनी ज्यादा’ हा चीनच्या हालचालींविषयी लेख प्रसिद्ध केला आहे, तोही या वातावरणाला अनुसरून आहे. ज्यांनी भारताविषयी आणि भारतीय तत्त्वज्ञानाविषयी आदरभाव व्यक्त केला ते ली हे चिनी कम्युनिस्ट पक्षामधले प्रचारप्रमुख मानले जातात. याचा अर्थ असा नव्हे की, ते प्रचारासाठी असे काही बोलले असतील. गौतम बुद्ध, रवीन्द्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी चांगले भाष्य केले की, भारतीय जनता हुरळून जाते, असे मानण्याचा काळ आता संपला आहे. आपणही आता बऱ्यापैकी व्यावहारिक भूमिका घ्यायला शिकलो आहोत. मात्र चीनविषयी धोरण ठरवताना आपल्याला कोणत्याही प्रचारी दृष्टिकोनाने वाहवून जाता येणार नाही. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चीनने आपले प्रचंड सैन्य आणून ठेवले आहे, या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीच्या आधारे आपल्या राजनैतिक धोरणाला दिशा देणे योग्य नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षामध्ये ज्याप्रमाणे दोन वा तीन मतप्रवाह आहेत, तसे ते आपल्या देशाचे धोरण ठरवणाऱ्यांमध्येही आहेत. चीन हा शत्रू क्रमांक एक म्हणणारे आता सत्तेच्या जवळपासही नाहीत, पण त्यांच्या सत्तेच्या काळातसुद्धा भारतीय पंतप्रधानांनी, अटलबिहारी वाजपेयी यांनी २००३ मध्ये चीनला भेट देऊन सामंजस्य कसे वाढेल, हे पाहिले होते. अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर द्यायचे असेल तर भारताशी कायमचे शत्रुत्व ठेवून चालणार नाही, हे ओळखणारा एक वर्ग चिनी कम्युनिस्ट पक्षात आहे. सध्याचा काळ हा ‘मार्केट फोर्सेस’नुसार चालणारा आहे, हे कळायला आपल्याला थोडा वेळ लागला तरी चीनला ते पक्के माहीत आहे. त्यामुळेही सामंजस्याने वागण्यात शहाणपण आहे, हे चिनी नेते समजून आहेत. विशेष हे की, चीनने यापूर्वीचे सिक्कीमसंबंधातले आपले मत बदलले आहे. १९७५ मध्ये सिक्कीममधल्या राजेशाहीला संपवून इंदिरा गांधी यांनी सिक्कीमला भारतात विलीन केले, तेव्हा सुरुवातीला चीनने त्याविषयी आपले मत राखून ठेवले होते. पण काही वर्षांपूर्वी चीनने भारताबरोबरचा व्यापार सिक्कीमच्या मार्गाने चालू करायचे जाहीर करून त्या सरहद्दीवर आपली व्यापारविषयक नाकी भारताबरोबर निश्चित केली. भारतानेही तिबेट हा चीनचाच प्रदेश असल्याचे फार पूर्वी मान्य करून भारतातून तिबेटविरुद्ध कोणताही प्रचार केला जाणार नाही, याबद्दलची हमी चिनी नेत्यांना दिली होती. तरीही भारतातून अधूनमधून त्याविषयी प्रचार चालतो आणि चिनी वकिलातीवर दिल्लीत मोर्चेही निघतात, हा भाग निराळा! अरूणाचल प्रदेशाला ‘१९६२ चा अपुरा राहिलेला भाग’ किंवा ‘दक्षिण टोकाचे तिबेट’ असे चीनने २००५ पूर्वी कधीही म्हटलेले नव्हते. चीनचा भारतीय अणुस्फोटाला असलेला विरोध आणि त्यानंतर पाकिस्तानला त्याने दिलेली अणुभट्टय़ांविषयीची मदत याबद्दल आपल्या माध्यमांमध्ये माहिती येत असते. तथापि भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अणुऊर्जा कराराविषयी चीनने आपली नाराजी जाहीर केलेली नाही. इतकेच नव्हे तर चीनने भारताबरोबर आतापर्यंत एकदाही आण्विक प्रश्नांवर अधिकृत वा अनधिकृत चर्चा केलेली नाही. तसे केल्याने भारताला आण्विक ताकद म्हणून आपली मान्यता मिळेल, या भीतीने चीनने या वाटेने जायचे टाळले आहे. याउलट भारत आणि पाकिस्तान यांनी अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर सही करावी, अशीच भूमिका चीनने आजवर घेतलेली आहे. पाकिस्तानी दहशतवादाचा धोका भारताला होत असतोच, त्याचा चीनलाही उपसर्ग झाला आहे. शिनजियांग (सिंकियांग) प्रांतात या दहशतवाद्यांचा धुमाकूळ चालूच असतो. कदाचित त्यामुळेही असेल, पाकिस्तानबरोबर अधिक मित्रत्वाचे संबंध राखणे अधिक चांगले असे चीनला वाटले तर नवल नाही. भारत आणि चीन हे दोन्ही देश यापुढल्या जागतिक आर्थिक शक्ती असतील, असे अमेरिकेला वाटते. चीनशी कोणत्याही मापदंडाने आर्थिक स्पर्धेत आपण सध्यातरी उतरू शकत नाही. कोणाला आवडो वा न आवडो, चीन मात्र जगाच्या नकाशावर आर्थिक महाशक्ती म्हणून उदयास आलेला आहे. जपानलाही मागे टाकून तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अशा स्थितीत चीनला आताच कोणत्याही देशाबरोबरचे शत्रुत्व ओढवून घ्यायची इच्छा असेल असे वाटत नाही. चीनने मागे टाकल्याने असेल किंवा अमेरिकेच्या मार्गदर्शनामुळेही असेल, दुसऱ्या महायुद्धानंतर शांत झालेला जपान आता बेताबेताने लष्करी ताकदीतही पुढे येऊ लागला आहे. कदाचित त्यामुळेही असेल, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व भारताला मिळावे असे चीनला वाटते. याबाबतीत चिनी कम्युनिस्ट पक्षातला एक गट भारताच्या पूर्ण बाजूने आहे. हे सदस्यत्व जपानला मिळणार असेल तर त्यास चीनचा विरोध राहील हे उघड आहे. अमेरिकेच्या आशियाविषयीच्या ‘इंटेलिजन्स कौन्सिल रिपोर्ट’नुसार २०१५ पर्यंत भारत आणि चीन यांच्या आर्थिक, राजकीय आणि लष्करी ताकदीला तोंड देता येणे जवळपास अशक्य आहे. या दोन देशांमध्ये वितुष्ट आणण्यासाठी बऱ्याच शक्तींचे प्रयत्न चालले असण्याची शक्यता आपण गृहीत धरायला हवी आहे. भारताशी वैर पत्करून अमेरिकेला भारताच्या अधिक जवळ आणायचे ‘पाप’ करू नये, असा एक मतप्रवाह चिनी कम्युनिस्ट पक्षात आहे, याचा विसर आपल्याला पडता कामा नये. भारत आणि चीन यांनी आपल्या सरहद्दीविषयीचा प्रश्न वाटाघाटींनी सोडवावा, असे दोन्ही देशांमध्ये ठरल्यानंतर उभय देशांच्या सचिव पातळीवर नियमित बैठका होत असतात. त्यात मतभेद झाले तरी चीनने जाहीररीत्या आपली नाराजी कधीही व्यक्त केलेली नाही. चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे, याबद्दल आपल्याला आक्षेप घेता येणार नाही तसाच तो भारत आणि अमेरिका वा अन्य कोणी यांच्यातल्या मैत्रीबद्दल चीनलाही घेता येणार नाही. चीनने तसा तो घेतलेला नाही. पाकिस्तानशी मैत्री असल्यानंतरही चीनने कारगिलच्या युद्धात पाकिस्तानच्या बाजूने कोणतेही मत प्रदर्शित केले नव्हते. या तटस्थ भूमिकेबद्दल खुद्द पाकिस्तानात नाराजीची भावना होती, याचा मात्र आपल्या राजकीय पंडितांना विसर पडत असतो. याउलट पाकिस्तानने भारताबरोबरचे सर्व प्रश्न वाटाघाटींनी सोडवावेत, अशा तऱ्हेचा दबाव पाकिस्तानवर चिनी नेत्यांकडून आणला जात असतो, याकडे हे राजकीय निरीक्षक कानाडोळा करत असतात. भारत आणि चीन यांच्यात चांगले संबंध असायला हवेत, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना वाटते. २००२ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदी हु जिंताओ यांची निवड झाली आणि ते चयांग जमिन यांच्यानंतर चीनच्या अध्यक्षपदी निवडले गेले. त्यांच्या हातात चीनची सर्वात मोठी सत्ता आहे. चीनमध्ये पक्ष, सरकार आणि लष्करी नोकरशाहीच्या हाती सत्तेच्या दोऱ्या असतात, हे लक्षात घेऊनच चिनी परराष्ट्र धोरण निश्चित होत असते. चिनी सत्ताकारणात सातत्याने दोन दशकांमध्ये असलेला आर्थिक विकासाचा दर त्यांच्या बाजूने आहे. तो दहा टक्क्यांच्या आसपास आहे. एखादे वर्ष सोडले तर तो दहाच्या आत कधीही आलेला नाही. चीनच्या या प्रगतीने अमेरिकेसारखा देश स्तंभित झाला असला तरी तो त्यास आळा घालू शकणार नाही. सध्याच्या जगात तसा तो कुणालाही घालता येणार नाही. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चिनी लष्कर आहे वा नाही, या मुद्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यापेक्षा चीनला अधिक जबाबदार देश असा चेहरा आहे, असे आपण मानणे अधिक योग्य ठरणार आहे. शांततापूर्ण सहजीवन हा तर पंचशीलच्या तत्त्वज्ञानाचा आत्माच आहे!
Sunday, September 5, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment