Monday, November 8, 2010

चिनी विकास - एक पाऊल एका वेळी

सतीश अनसिंगकर
Tuesday, November 09, 2010 AT 12:00 AM (IST)
Source- Esakal
http://www.esakal.com/esakal/20101109/4789328963042773115.htm

फार अवघड गोष्टीत सुरवातीला न पडता, साधी उत्पादने सचोटीने व स्वस्त पडतील अशा पद्धतीने करून त्या सगळ्याचा एका मोठ्या स्वरूपात बदल झाला. चीनच्या विकासाचे हेच महत्त्वाचे सूत्र मानावे लागेल.

चीन हा एकछत्री देश आहे. त्याच्या प्रगतीची कार्बनकॉपी करणे शक्‍य नाही आणि तो आंधळेपणा होईल. परंतु जागतिक स्पर्धेत उतरायचे ठरवले त्या वेळी चीनची आर्थिक, सामाजिक आणि औद्यागिक परिस्थिती जवळपास आपल्यासारखीच होती. भूकंप झाला, तर सुरवात कुठून करायची यावर चर्चा करायची, की कुठेतरी सुरवात करून त्यात सुधारणा करायची, यात सुरवात होणे महत्त्वाचे आहे. तसाच प्रकार उद्योगाच होता. अतिशय गुंतागुंतीची आणि काळाच्या पुढे असणारी मशिन्स किंवा तंत्रज्ञान यात जर्मनी व जपान इतके पुढे आहेत, की त्यांच्याशी स्पर्धा आज तरी शक्‍य नाही. मग काय करायचे? सर्वसामान्य वापरातल्या गोष्टीचे उत्पादन करणाऱ्या मशिन्स तयार करायच्या, त्यातून सर्वसामान्य वस्तू सर्वांत स्वस्त दरात तयार करायच्या आणि पावले पुढे टाकायची, असा योग्य मार्ग निवडला गेला.

उदाहरणादाखल, मी एका वर्षाला दोन हजार मशिन्स बनवणाऱ्या फॅक्‍टरीला भेट दिली. ते मशिन ५ द ७ द ५ बॉक्‍स साईजचे. जीन्स पॅन्टना असणाऱ्या ब्रास बटण बनवणारे हे मशिन. एका बाजूने एक ब्रासची पट्टी जी बटन्सची टॉप साईड पंच करते, दुसऱ्या बाजूने बटन्सची खालची बाजू. धान्य पडावे तसे बटन्स टप-टप करत कंटेनरमध्ये पडत असतात. याची सुरवात झाली ती मशिन विकत घेऊन बटन्स बनवून विकल्याने. आजही ती कंपनी जगातल्या कित्येक बहुराष्ट्रीय जीन्स कंपन्यांना बटन्स पुरवते. त्याचबरोबर तंत्र माहिती होऊन आता मशिन्सही पुरवते. ४० टक्के कमी दरात कुठलाही ग्राहक आकर्षित होणारच. परंतु यासाठी लागतो तो थोडासा वैयक्तिक त्याग. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज मी थोडा जास्त वेळ काम करीन आणि तेही उत्पादनाची किंमत मर्यादित राहील अशा पद्धतीने करायची तयारी ठेवून. हे करत असताना व्यावसायिक चातुर्य दाखवले गेले ते म्हणजे जगातल्या महाकाय कंपन्यांच्या प्रॉडक्‍ट्‌सचे छोटे छोटे पार्ट बनविण्याची ऑर्डर घेणे. मग ती सोनी सिस्टिमची छोटी मोटर असो, बार्बी डॉल्सचे पार्टस असोत, मॅक्‍डोनाल्ड्‌सची खेळणी असोत, तोशिबाचे प्लॅस्टिक कव्हर असो, व्हर्लपूलची कंट्रोल पॅनेलची पट्टी असो किंवा अर्मानी घड्याळाचे बेल्ट्‌स असोत.
२००९-२०१० ची भारताची स्थिती उत्तम दाखवली जाते आणि ती आहे. परंतु लाखोंनी दर वर्षी शिकून बाहेर पडणाऱ्या युवक वर्गाला दिशा मिळत नाही, तसेच एवढ्या सगळ्यांना सामावून घेणे खासगी, निमशासकीय अथवा शासकीय संस्थांना शक्‍य नाही. बेभरवशाची शेती या प्रकाराला युवक वर्ग कंटाळला आहे आणि स्पर्धेच्या युगात योग्य मार्गदर्शनाअभावी औद्योगिक जगात भरकटण्याचीही शक्‍यता आहे.


आर्थिक बाजू हा असा विषय आहे, की जो अतिशय काळजीपूर्वक बघायला पाहिजे. यात कुणीही कुणाचा नसतो. यात खरे तर इतिहासातील उदाहरण देत तरुणांची डोकी भडकवण्याचे व त्यांना अयोग्य दिशा दाखवण्याचे काम बरेच राजकीय पुढारी करतात. योग्य असे आहे, की आज ज्या लोकांकडे तंत्रज्ञान, पैसा व उद्योग क्षेत्रातली ओळख आहे, अशा लोकांना गुरू मानून स्वत:चे ज्ञान व स्थान बळकट करावे. भारतातल्या काय किंवा जगातल्या काय, कुठल्याही उद्योजकाला सचोटीने आणि मालकाच्या हिताचे काम करणारा मनुष्य हवासा आहे.


चीनमध्ये भ्रष्टाचाराविरोधात अतिशय कठोर शिक्षा दिली जाते. त्या भीतीने आज तेथील भ्रष्टाचार खूप कमी झाला आहे. भारतात मात्र यावर कसलाच उपाय दिसत नाही. युवक वर्गाला शिस्त लावण्याचा प्रकारही चीनमध्ये कठोर होता. चीनमध्ये भारतापेक्षा दुप्पट वाहने असून, आज भारतात चीनपेक्षा जास्त अपघात होतात व जास्त लोक मरण पावतात. चीनच्या बाबतीत सांगायचे झाले, तर त्यांनी शहरांमध्ये ठरवून बेशिस्त वाहतूक व वागण्यावर नियंत्रण आणले. या त्राग्याचे मुख्य कारण म्हणजे आपली अफाट सामाजिक कर्तव्ये. वर्षात किमान २५-३० कार्ये किंवा स्वत:च्या घरातले कार्य, त्यांची देणी-घेणी. ज्याला हे शक्‍य आहे त्यांची गोष्ट वेगळी; परंतु स्वत:चे वाहन धूर काढत असेल किंवा दात दुखत असेल तर प्रसंगी ते पुढे ढकलून सामाजिक बंधन पाळणे, हे कुणाच्या फायद्याचे आहे? आज आपल्याला हजार रुपयांत धुणे-भांडी-साफसफाई करणारी महिला पाहिजे असते. हे कुठल्या समाजव्यवस्थेत बसते? जगातल्या एकाही विकसित देशात घरकामाला महिला, पुरुष नसतो. ते ज्याचे त्याने करावे, अशी अपेक्षा असते. फक्त ज्येष्ठ नागरिकांना ती मदत केली जाते.


चीनचा अश्‍व सध्या चौखूर धावतो आहे. "जीडीपी' दहा टक्‍क्‍यांच्या वर आहे; परंतु येत्या आठ-दहा वर्षांत तेथील राहणीमानाचा खर्च वाढून उत्पादन खर्च वाढण्याची शक्‍यता आहे. त्या वेळी भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, रशिया इत्यादी देशांकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना वळावे लागेल. ते करताना त्या कंपन्या त्या त्या देशातील स्थैर्य, सामाजिक स्थिती, शिस्त, सचोटी अशा सर्व बाजू बघतील. पहिली संधी चीनने पटकावली. दुसरी आपल्याला पटकवायचिये!

Wednesday, October 6, 2010

कठपुतळ्यांचा कांगावा!

गुरुवार,७ ऑक्टोबर २०१०
loksatta.com- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105994:2010-10-06-15-26-54&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे दहशतवादी संघटनांबरोबरचे संबंध सर्वाना माहीत आहेतच, पण त्यांनी आता दहशतवादी गटांना पाकिस्तान सरकारकडून प्रशिक्षण देण्यात आल्याचे खुलेआम मान्य केले आहे. ओसामा बिन लादेन आणि त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा साथीदार आयमन अल जवाहिरी यांना पाकिस्तान सरकारनेच आश्रय दिल्याचे सांगणे त्यांनी बाकी ठेवले आहे. भारताविरूद्ध कारवाया करण्यासाठी पाकिस्तान सरकारने या दहशतवादी गटांना पुरस्कृत केल्याचे म्हणणे आहे. खुद्द मुशर्रफ आणि त्यांचे अन्य लष्करी अधिकारी यांनीही अशा दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना भेटी दिल्याचे कितीतरी पुरावे उपलब्ध आहेत. काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी आपल्या सरकारकडून त्यांना पाठिंबा दिला गेला होता, असे ते सांगत असले तरी त्यामागे अमेरिका आणि इंग्लंड यासारख्या देशांचे कारस्थान आहे हे विसरता येणार नाही. काश्मीरमध्ये अमेरिकेला खूपच रस असल्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या प्रश्नावर अमेरिकेने कधीही आग्रही भूमिका बजावलेली नाही. चीनवर कायमची नजर ठेवण्यासाठी त्यांना काश्मीरमध्ये जमल्यास पक्के स्थानही हवे आहे. तिबेटचा प्रश्न जिवंत ठेवून चीनला कोंडीत पकडायची संधी अमेरिका घेऊ पाहात असते. पाकिस्तानी कुरापतखोरांकडे त्यानंतरच अमेरिकेकडून दुर्लक्ष केले जाऊ लागले. स्वाभाविकच या मतलबामागचे सूत्रधार म्हणून अमेरिकेकडे पाहिले गेले पाहिजे. काश्मीरचा प्रश्न सोडवायचे अमेरिकेने फारसे मनावर घेतले नाही, म्हणून आम्ही काश्मिरी दहशतवाद्यांसाठी लष्करी प्रशिक्षण केंद्रे चालवतो, हा मुशर्रफ यांचा केवळ कांगावखोरपणा आहे. आपण ज्यांना सत्तेवरून हुसकावून लावले, त्या नवाझ शरीफ यांनीही काश्मीरच्या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही, तेव्हा आपल्या कारकीर्दीत दहशतवादी केंद्रे चालवणे आपल्याला भाग पडले, हे मुशर्रफ यांचे म्हणणे ही तर शुद्ध चालबाजी आहे. शरीफ असोत की बेनझीर भुत्तो किंवा त्या आधीचे झिया उल हक किंवा अन्य कुणी, ते सर्व अमेरिकेच्या सांगण्यावरूनच आपले काश्मीरविषयीचे डावपेच ठरवत होते, ही वस्तुस्थिती आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाची थेट कबुली देणारे मुशर्रफ आग्रा येथे शिखर परिषदेसाठी आले असताना संपादकांसमोर झालेल्या चर्चेत काश्मीरमध्ये जे लढत आहेत, ते ‘मुजाहिदीन’ (स्वातंत्र्यसैनिक) आहेत, त्यांचा पाकिस्तानशी संबंध नाही, असे म्हणाले होते. कारगिलच्या युद्धाला कारणीभूत असणारे मुशर्रफ त्या काळातही ‘तिथे लढणारे सैनिक नाहीत, ते काश्मिरी आहेत आणि त्यांचा तो ‘उठाव’ आहे,’ असेच जगाला सांगत होते. त्यांनी तसे म्हटले म्हणून तेव्हा पंतप्रधानपदी असणारे नवाझ शरीफ यांनीही तेच पालूपद आळवले होते. पुढे शरीफ यांनी अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या सांगण्यावरून कारगिलचे सैन्य मागे घ्यायचा आदेश दिला तेव्हा शरीफ यांचा सूड घ्यायचे मुशर्रफ यांच्या मनाने घेतले. जानेवारी १९९३ मध्ये क्लिंटन प्रशासनाने पाकिस्तानला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा पुरस्कर्ता’ म्हणून जाहीर केले तेव्हा नवाझ शरीफ यांनी अमेरिकेच्या मागणीनुसार ‘आयएसआय’ चे तेव्हाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जावेद नासीर यांना आणि त्यांच्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांना बडतर्फ केले आणि मगच क्लिंटन यांनी दहशतवादाच्या काळ्या यादीतून पाकिस्तानचे नाव कमी केले. अमेरिकेच्या हितसंबंधांच्या आड येणाऱ्यांना अमेरिकेच्या हवाली निमूटपणाने करायचे पाकिस्तानने त्यानंतरच ठरवले आणि अमेरिकेच्या ‘गिलोटिन’ पासून आपली सुटका करवून घेतली. ‘सीआयए’च्या दोघा अधिकाऱ्यांना ठार करणारा मीर आमीर कान्सी असो किंवा रमझी युसुफ, पाकिस्तानने यांसारख्या दहशतवाद्यांना अमेरिकेकडे सोपवले होते. ‘लष्कर ए तैयबा’, ‘हरकत उल मुजाहिदीन’ किंवा ‘जैश ए महमद’ या दहशतवादी संघटनांवर अमेरिकेच्या सांगण्यावरून पाकिस्तानने बंदी घातली तरी त्यांच्या भारतविरोधी कारवाया विनाअडथळा चालूच राहिल्या. ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या तऱ्हा’, या विषयावर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात २००० मध्ये पुन्हा पाकिस्तानचेच नाव आले. हा अहवाल त्यावेळचे परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांनी ३० एप्रिल २००१ मध्ये प्रकाशित केला होता. अमेरिकेने त्यावेळी तो अहवाल मनावर घेतला असता, तर त्यानंतरच्या काळात घडलेले ११ सप्टेंबर २००१ चे भीषण नाटय़ घडलेही नसते. ‘आयएसआय’चे तेव्हाचे प्रमुख जनरल मेहमूद अहमद हेच कसे त्या सूत्रधारांमध्ये होते, हे आम्ही याच स्तंभातून आणि अन्यत्र लिहिलेले आहे. म्हणूनच त्याची पुनरूक्ती करायचे टाळले आहे. अफगाणिस्तानात तालिबानांच्या हाती सत्ता असताना अन्य अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून मुशर्रफ यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती करायचा सल्ला अमेरिकेचा होता. तालिबानांच्या गोटात मुशर्रफ हे जवळचे मानले जात असल्याने अमेरिकेला त्या पदावर ते हवे होते. पुढे मुशर्रफ यांनी पाकिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतरही अमेरिकेने या लोकशाहीविरोधी पावलाविषयी बोटचेपी भूमिकाच बजावलेली होती. मुशर्रफ यांच्याच कारकिर्दीत बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकारच्या अधिकारशाहीविरोधात बलोच ‘स्वातंत्र्यलढा’ सुरू करण्यात आला, तेव्हा त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मुशर्रफ यांनी थेट तालिबानांनाच बलुचिस्तानात येण्याचे आवाहन केले होते. अफगाणिस्तानात जाण्या-येण्यासाठी सरहद्द खुली होतीच. अल काईदा आणि तालिबानांपासून पाकिस्तानला धोका नाही, असे त्याचे तेव्हा समर्थन करण्यात येत होते. त्यामागे असणारी ‘प्रेरणा’ मुशर्रफ यांचीच होती. लादेन आणि जवाहिरी कोणत्याही क्षणी पकडले जाणार, असे वातावरण असतांना २००६ मध्ये ‘आयएसआय’च्या मार्गदर्शनाखाली त्यांना ठिकठिकाणी हलवण्यात आले. अगदी आताही मुशर्रफ सत्तेवर नाहीत आणि लोकशाहीवादी आणि अमेरिकावादी सरकार पाकिस्तानात सत्तेवर आहे, तरीही दक्षिण वझिरीस्तानमध्ये अल काईदा आणि तालिबानांच्या विरोधात कारवाई केली जात असतांना या दहशतवादी संघटनांच्या प्रमुख नेत्यांना उत्तर वझिरीस्तानमध्ये जाऊ दिले जात होते. त्याच वेळी उत्तर वझिरीस्तानमध्ये कारवाई करायचे टाळण्यात येत होते. उत्तर वझिरीस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध पाकिस्तान काहीही करत नाही, ही अमेरिकेची तक्रार आहे. ‘व्हाइट हाऊस’च्या ताज्या अहवालातही त्याची दखल घेण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकेने काढता पाय घेतला की, या सर्व दहशतवाद्यांना भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी एकत्र करण्यात येईल यातही शंका नाही. भारताने पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांविषयी जगाच्या चव्हाटय़ावर पुराव्यानिशी माहिती दिलेली असताना त्याकडेही अमेरिकेने पाहायचे जाणीवपूर्वक टाळले आहे. पाकिस्तानी लष्करामध्ये कमांडो असणाऱ्या इलियास काश्मिरीला मुशर्रफ यांच्या अगदी जवळचे मानले जात होते. इलियास काश्मिरी हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या कोटली भागात राहात असे. त्याने अफगाणिस्तानात मुजाहिदीनांना सोव्हिएत सैन्याविरोधात लढायचे प्रशिक्षण दिले. त्याने सोव्हिएत सैन्याविरुद्ध लढतांना आपला एक डोळाही गमावला होता. नबी महमदच्या नेतृत्वाखाली त्याने मग ‘हरकत उल जिहाद इ इस्लामी’ या दहशतवादी संघटनेत आपले नाव दाखल केले. १९९८ मध्ये त्याच्यावर सरहद्दीला लागून असणाऱ्या भारतीय लष्करावर हल्ला करायची कामगिरी सोपवण्यात आली होती. २५ फेब्रुवारी २००० रोजी त्याने २५ जणांची तुकडी घेऊन भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि चौदा भारतीय जवानांना ठार केले. त्याने त्यावेळी एका लष्करी अधिकाऱ्यास पाकिस्तानी हद्दीत पळवून नेले आणि त्यास अतिशय वाईट पद्धतीने ठार केले. त्याने आपल्या बॅगेतून त्या अधिकाऱ्याचे डोके नेले आणि ते पाकिस्तानी अधिकाऱ्यास ‘अर्पण’ केले. मुशर्रफ यांनी अध्यक्षपदावरून इलियासचा एक लाख रुपये देऊन सत्कार केला होता, असे पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी लिहून ठेवले आहे. इलियास हा अमेरिकेच्या ‘ड्रोन’ विमानांच्या हल्ल्यात मारला गेला, तेव्हाच कुठे त्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. कोटलीमध्ये असणाऱ्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्राला अनेक वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. अशी अनेक केंद्रे आहेत, हेही मुशर्रफ यांना माहीत आहे. फरक एवढाच की आता ते स्वार्थी हेतूने बोलायला लागले आहेत. सध्या त्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे आणि त्यारूपाने पाकिस्तानी जनतेत आपली प्रतिमा उभी करायची आहे. त्यासाठी कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे त्यांच्या हालचाली चालू आहेत. त्यांचे सूत्रधार अर्थातच तिकडे वॉशिंग्टनमध्ये आहेत.

Sunday, September 26, 2010

जीवघेणी लाडीगोडी

जीवघेणी लाडीगोडी
loksatta.com, डॉ. अनिल भोरास्कर - रविवार, २६ सप्टेंबर २०१०


मोठी आकडेवारी सांगून घाबरवायचे नाही म्हटले तरी भारतात हृदयविकाराचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे, हे वास्तव लक्षात घेतलेच पाहिजे. सुमारे २०० कारणांमुळे हृदयविकार होऊ शकतो. या सर्वच कारणांची चिकित्सा एका पुरवणीमध्ये करणे शक्य नाही. परंतु हृदयविकाराचा धोका कसा टाळता येईल आणि तो झाल्यावर काय काळजी घ्यायला हवी, याचा ऊहापोह करणारे हे काही लेख, आजच्या जागतिक हृदयदिनानिमित्त..भारतात अमेरिकेच्या चौपट, तर जपानच्या वीसपट हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. अनेकांना लहान वयातच हृदयाचे विकार सुरू होतात आणि त्याची तीव्रताही भारतात इतर देशांच्या मानाने अधिक आढळते. हृदयविकार, विशेषत: हृदयरोहिणीविकार (Coronary Artery Disease) कुठल्या कारणांमुळे होतो, हे वैद्यकीय शास्त्राला माहीत असले तरी जवळजवळ २०० कारणांपैकी प्रत्येक रुग्णाला नेमके कुठले कारण हृदयविकाराला आमंत्रण देते, याविषयी मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. या कारणांना Risk Factors असे संबोधतात. यातील काही रिस्क फॅक्टर अनेकदा एकत्र आलेले आढळून येतात. उदा. मधुमेह, उच्चरक्तदाब, स्थूलपणा, सुटलेले पोट, व म्लेदाम्ले विकृती. या सर्व कारणांना एकत्रितपणे ‘मेटॅबॉलिक सिन्ड्रोम’ असे संबोधतात. या ‘मेटॅबॉलिक सिन्ड्रोम’चे प्रमाण समाजात अधिक प्रमाणात आहे. मधुमेहाचे निदान होण्याअगोदर हा ‘मेटॅबॉलिक सिन्ड्रोम’ होत असतो.महिलांना पुरुषांच्या मानाने हृदयविकार कमी प्रमाणात होतात; मात्र ज्यांना मधुमेह असतो, अशा महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिकआढळून येते. मधुमेहामुळे होणाऱ्या व्याधींमध्ये सर्वात अधिक प्रमाणात आढळून येणारी व्याधी म्हणजे हृदयविकार. जवळजवळ ६५ टक्के मधुमेही व्यक्ती हृदयविकारामुळे मृत्यू पावतात. भारतात २०२५ सालापर्यंत ५.७ कोटी लोकांना मधुमेह होईल आणि त्यातील २० लाख व्यक्ती हृदयविकाराला बळी पडतील, अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे. ती अनाठायी नसावी, असे वाटते.मधुमेहास Coronary Artery disease Equivalant म्हणतात. म्हणजे, ज्या व्यक्तीला एकदा हृदयरोहिणीविकार होऊन गेला असेल, त्याला तो विकार परत होण्याची जी शक्यता असते, तितकीच शक्यता केवळ मधुमेह आहे म्हणून हृदयरोहिणी विकार होण्याची असते. अनेकवेळा इन्श्युरन्स कंपन्या मधुमेही व्यक्तींना हृदयविकारासाठी केलेल्या उपचारांचा खर्च Pre-existing Disease म्हणून विमा पॉलिसी देण्याची टाळाटाळ करतात, असा अनेकांचा अनुभव आहे. मधुमेही व्यक्तींना इतरांपेक्षा अधिक तीव्र स्वरुपाचा हृदयविकार होऊ शकतो आणि त्याची सर्वप्रथम दिसणारी लक्षणेसुद्धा वेगळ्या स्वरूपाची असतात.हृदयविकाराची सर्वमान्य सर्वपरिचित लक्षणे म्हणजे छातीत दुखणे किंवा कळा येणे. ती कळ छातीपासून मानेपर्यंत व डाव्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत जाते, घाम फुटतो, अस्वस्थ वाटते, वगैरे. परंतु ज्या व्यक्तींना बरेच दिवस मधुमेह असतो, त्यांना मज्जातंतूंच्या बधिरपणामुळे वरील लक्षणे जाणवत नाहीत. छाती न दुखल्यामुळे मधुमेही रुग्ण गाफील राहतात आणि लगेच वैद्यकीय मदत घेत नाही. त्यामुळे नकळत हृदयरोहिणी विकार होऊन, हृदयाच्या स्नायूंवर ताण पडून, पंप नाकाम होतो. आपले हृदय शरीराच्या विविध भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या पंपाचे काम करत असते. त्याची कार्यक्षमता एका मिनिटाला पाच लीटर रक्त शरीराच्या महत्त्वाच्या इंद्रियांना पुरवण्यास समर्थ असते. ती कार्यक्षमता ४० टक्क्यांनी कमी होऊन दम लागणे, थकवा येणे, भोवळ येणे, डोळ्यापुढे अंधार येणे, हातापायातील ताकद कमी होणे वगैरे लक्षणे दिसू लागतात. मात्र ही लक्षणेसुद्धा ज्या व्यक्ती फक्त बैठया स्वरूपाची कामे करतात, चालण्याऐवजी गाडी वापरतात, जिने चढण्याऐवजी लिफ्टचा उपयोग करतात- त्यांना बरेच दिवस दिसून येत नाही.कित्येक वेळा हृदयविकाराचे निदान इतर काही कारणास्तव केलेल्या वैद्यकीय परीक्षेत होते. अगदी नियमित तपासणीचा भाग म्हणून ECG काढला असता त्यात काही बदल झालेले आहेत, असे लक्षात येते. कित्येक वेळा Silent Heart Attack येऊन गेला आहे, हेही समजते. अनेकवेळा ECG अगदी नॉर्मल असतो; पण त्याच व्यक्तीचा ECHO केला तर त्याच्या हृदयाची कार्यक्षमता ४० टक्क्यांनी कमी झाली आहे, असे आढळून येते. त्यानंतरची परीक्षा म्हणजे Stress Test. म्हणजे धावता धावता हृदयाची स्पंदने वाढवून काढलेला ECG . यात काही मधुमेही व्यक्ती पहिल्याच फेरीत बाद होतात. काही स्थूल व संधिवात असलेल्या मधुमेही व्यक्ती या टेस्टसाठी उभेच राहू शकत नाहीत. त्यासाठी Dobutamin Stress Test म्हणजे Dobutamine नावाच्या औषधाने हृदयाची स्पंदनक्रिया कृत्रीमरीत्या वाढवून (ECG) काढण्यात येतो आणि त्यावरून हृदयरोहिणी विकार झाला आहे, हे समजते.यानंतरची परीक्षा म्हणजे Angiography. त्यात एखाद्या मधुमेही व्यक्तीला कुठलीही ठळक लक्षणे दिसत नसतानासुद्धा ४-५ ब्लॉक्स आहेत, हे कळल्यानंतर सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसतो.कित्येक वेळा ‘मला काहीही होत नव्हते, पण रुटीन मेडिकल चेकमध्ये डॉक्टरांनी काहीतरी शोधून काढले. उगाचच मी या लफडय़ात पडलो,’ वगैरे विधाने कानावर पडतात. पण चाणाक्ष आणि सूज्ञ व्यक्ती मात्र, आपल्याला वेळीच धोक्याची सूचना मिळाली, याचा फायदा उठवावा असे मानून अ‍ॅंजिओप्लॅस्टी किंवा बायपास सर्जरीच्या सोहळ्याची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी सुरू करतात. काही मंडळी या वास्तवाकडे दुर्लक्ष करतात किंवा इतर अवैज्ञानिक मागार्ंचा अवलंब करतात. त्यातील काही अभागी व्यक्ती हृदयविकाराच्या शिकार होतात आणि पस्तावतात. काही निश्चयी मधुमेही मात्र कठोरपणे आपली जीवनशैली बदलून निरोगी राहू शकतात. परंतु ही जीवनशैली किती काळ टिकवू शकतील याचा भरवसा नसतो. अ‍ॅंजिओप्लॅस्टी किंवा बायपास सर्जरी मुळे अनेक मधुमेही व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे, यात शंकाच नाही.रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणास Endothelium असे म्हणतात. या अंत:स्थरावर अनेक प्रकारचे आघात होत असतात. त्यात सर्वात अधिक आघात म्हणजे Oxidative stress. आपल्या शरीरात सतत Oxygenfree radicals बनत असतात. हे पदार्थ अंत:स्थरावर इजा करतात व त्यावर कोलेस्टरॉलमधील कमी घनतेचे कोलेस्टरॉल (LDL-C) च्या कणांना Oxidised करून या थरावर पापुद्रे टाकू लागतात. त्यामुळे रक्तवाहिन्या आतून खराब होऊ लागतात. वाढलेली रक्तशर्करा LDL -कोलेस्टरॉल, Triglyceride नावाची मेदाम्ले हे थरावर थर टाकण्याचे काम करतात. वाढलेल्या रक्तदाबामुळेसुद्धा एडोथेलियमला इजा होते व त्यात रक्त गोठविण्यास मदत करणाऱ्या प्लेटलेट जमून रक्ताची व मेदाम्लेची एक गुठळी तयार होऊन, Atherothombosis होऊन, रक्तवाहिनी बंद पडू शकते. रक्तशर्करा अनियंत्रित असेल तर छऊछ व ट्रायग्लिसराईड वाढतात. रक्तामध्ये एक चांगले कोलेस्टरॉल असते जे कमी घनतेच्या कोलेस्टरॉलची पातळी कमी करते त्यास LDL कोलेस्टरॉल असे म्हणतात. त्याची निर्मितीसुद्धा अनियंत्रित रक्तशर्करेमुळे कमी होते. थोडक्यात म्हणजे वाढलेली रक्तशर्करा हे या सर्व व्याधींचे मूळ कारण आहे आणि तिचे नियंत्रण करणे हा एक महत्त्वाचा उपचार आहे.वाढलेल्या रक्तशर्करेबरोबरच वाढलेले LDL कोलेस्टरॉल, ट्रायग्लिसराईड आणि कमी झालेले HDL कोलेस्टरॉल हेसुद्धा महत्त्वाचे रिस्क फॅक्टर्स समजले जातात आणि त्यावर उपचार करणे तितकेच महत्त्वाचे असते.रक्तशर्करा जर नियंत्रित नसेलतर दुरुस्त केलेल्या हृदयरोहिण्यांवर लवकरच आघात होतो आणि त्या पहिल्यापेक्षा लवकर बंद पडू शकतात. याला Reoclussion असे म्हणतात. मधुमेही व्यक्तींमध्ये Reoclussion अधिक प्रमाणात आढळून येते.बायपासनंतर रुग्ण ICU मध्ये असताना रक्तशर्करेची पातळी सदैव १४० मि. ग्रॅमच्या खाली ठेवण्याची तारेवरची कसरत करण्यासाठी हृदयविकार इस्पितळात किंवा विभागात मधुमेह-तज्ज्ञांची टीमच कार्यरत असते. शस्त्रक्रियापश्चात उपचारात रक्तशर्करा नियंत्रण हे फार महत्त्वाचे असते आणि त्यासाठी केवळ इन्स्युलिनचाच वापर होतो. दर तासातासाला रक्तपरीक्षा करण्यात येते व त्यानुसार इन्स्युलिनचा डोस ठरविण्यात येतो.रक्तशर्करा उपाशीपोटी १४० च्या खाली आणि जेवणानंतर १६० च्या खाली ठेवणे जसे महत्त्वाचे असते तितकेच रक्तातील ग्लायकोहिमोग्लोबिन, ज्याला HbA1C असे संबोधतात तेसुद्धा ७% पेक्षा कमी असावे लागते.अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालेल्या मधुमेही व्यक्तींनी आता आपण बिनधास्तपणे वाटेल ते खाऊ-पिऊ शकतो, असे समजून एकदम पथ्य सोडू नये. याउलट आपली जीवनशैली बदलून आपल्याला मिळालेल्या १०-१५ वर्षांच्या वाढीव आयुष्याचा चांगल्या प्रकारे वापर कसा करता येईल, याचा विचार करावा.अ‍ॅंजिओप्लॅस्टी किंवा बायपास सर्जरीनंतर अनेक मधुमेही व्यक्ती आता पुढे काय करावे, या संभ्रमात पडतात. काय खावे, काय खाऊ नये, किती प्रमाणात व्यायाम करावा, किती परिश्रम करावेत, रिटायर व्हावे की पार्ट-टाईम नोकरी करावी, नवीन जोखीम घ्यावी की नाही, हवाईप्रवास करता येईल का, ड्रायव्हिंग करता येईल का, वैवाहिक जीवन पूर्वीप्रमाणे जगता येईल का- असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येतात, त्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता असते.मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे?ऋ नियमित रक्तपरीक्षा : स्वत:ची रक्तशर्करा रोज एकदा तरी तपासून बघावी. त्यासाठी अतिशय बिनचूक व वापरायला सोपी अशी उपकरणे मिळतात. दिवसातून निरनिराळ्या वेळी म्हणजे कधी उपाशीपोटी, कधी जेवणाअगोदर, जेवणानंतर, व्यायामाअगोदर, व्यायामानंतर रक्तपरीक्षा करून नोंदी ठेवाव्या.ऋ आपापल्या मधुमेह-तज्ज्ञांना विचारून इन्स्युलिन व गोळ्यांच्या डोसमध्ये फरक करावा. रक्तदाब मोजून तो १२०/८० या फिगरच्या जवळपास असावा. वजन व पोटाचा घेर कमी करावा. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करावा. रक्तातील म्लेदाम्ले आटोक्यात ठेवावीत (LDL-C हे ८० mg % पेक्षा कमी, Triglycerides हे १२० पेक्षा कमी आणि HDL-C हे ४५ च्या वर असावे.) आज या सर्व रिस्क फॅक्टरपेक्षा सर्वात महत्त्वाचा व मोजण्यात सर्वात सोपा असा ‘मार्कर’ म्हणजे पोटाचा घेर. kLifeline is inversely proportional to your waist line' हे सूत्र आता जनमान्य झाले आहे आणि त्याचे अधिक महत्त्व पटावे म्हणून IDF (International Diabetes Federation) या संस्थेने पोटाचा घेर मोजण्यासाठी सर्व देशांना ‘मोजणी-टेप’ वाटण्याचे ठरविले आहे. यामुळे जनसामान्यांत स्वत:चे पोट किती मोठे आहे आणि ते कसे कमी करावे याविषया जागरूकता निर्माण होईल, ही अपेक्षा. जास्तीत जास्त पोटाचा घेर महिलांचा ८८ व पुरुषांचा १०२ सें.मी.पेक्षा जास्त म्हणजे रोगांना आमंत्रण. स्थूलपणापेक्षा स्थूलता पोटाच्या आसपास असणे अधिक हानीकारक असते. पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा भारतीयांचे पोटाच्या आतील चरबीचे प्रमाण अधिक असते म्हणूनच वैद्यकीय परिभाषेत भारतीयांना Thin fat Indian असे म्हणतात आणि ही पोटातील चरबी मधुमेह आणि हृदयविकार यांसाठी महत्त्वाचा रिस्क फॅक्टर मानण्यात येतो.आहाराविषयी :आहार, विहार, विचार आणि औषधोपचार हे मधुमेहावरील उपाय योजनेच्या इमारतीचे चार स्तंभ मानले जातात. त्यात सर्वात महत्त्वाच्या स्तंभ म्हणजे आहारोपचार. योग्य आहाराने जवळजवळ सर्वच रोगांवर मात करणे शक्य असते. मधुमेही व्यक्तीने १६०० उष्मांकाचा आहार घ्यावा. त्यातील ६० टक्के कबरेदेक पदार्थ (जाडय़ा गव्हाच्या पोळ्या, भाकरी, मोड आलेल्या धान्याची उसळ, पालेभाज्या, ज्यांमध्ये चोथा जास्त असेल), ३० टक्के प्रथिने (डाळी, दूध, दही, पनीर), १० टक्के स्निग्ध पदार्थ, तेल (२ चहाचे चमचे ऑलिव्ह किंवा राईस ब्रान) २ चमचे तूप, १ चमचा लोणी मिळून पूर्ण दिवसाचा स्वयंपाक बनवावा. २ चमचे खोबरं वरून घालण्यास हरकत नाही. भात, बटाटे कमी प्रमाणात घ्यावे. बायपासनंतर बऱ्याच लोकांना बद्धकोष्टता होते. त्यासाठी खासकरून पपई/ पेरू/ अंजीर/ काळ्या मनुका या गोष्टींचा वापर करावा. रात्री दुधातून इसबगोल घेण्यासही हरकत नाही. ऑपरेशननंतर औषधांमुळे तोंडाची चव जाते. त्यासाठी आलं-लिंबू, हिंगजिरे यांचा वापर करण्यास हरकत नाही. तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत. गोड खावेसे वाटले तर खजुरात केलेल्या ड्रायफ्रूटच्या मिठाईचा एखादा तुकडा खाण्यास हरकत नाही. आक्रोड व बदाम रोज थोडय़ाच प्रमाणात घ्यावेत. आले, लसूण, कांदा, हिरवी मिरची यांचा समावेश आहारात असावा, त्यांच्यात अँडी ऑक्सिडंटस् असतात.‘बी12’ आणि ‘ड’ या जीवनसत्त्वांचे महत्त्व आता अधिकाधिक पटू लागले आहे. खासकरून ‘ड’ जीवनसत्त्व एका ठराविक पातळीखाली असल्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते, यावर आता अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मधुमेहाला पोषकता मिळते. आपल्या देशात वास्तविक भरपूर सूर्यप्रकाश असूनसुद्धा भारतीयांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असण्याचे कारण म्हणजे हे जीवनसत्त्व त्वचेखाली बनविण्यासाठी लागणारा एक जनूक भारतीयांमध्ये कमजोर असतो, हे आता शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. केवळ हाडे ठिसूळ होणे किंवा लहान वयात मुडदूस होणे एवढेच या जीवनसत्त्वाच्या अभावाने होते असे नाही, तर मधुमेह व हृदयविकार या विकारांनासुद्धा ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे आमंत्रण मिळते असा निष्कर्ष जवळजवळ १५० संशोधनपत्रांतून वैद्यकीय शास्त्रासमोर मांडला गेला आहे. मधुमेही व्यक्तींनी आपल्या रक्तातील D3 level ची परीक्षा करून जर ती 30 mg पेक्षा कमी असेल तर ‘ड’ जीवनसत्त्वाची औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने अवश्य घ्यावीत आणि कोलेस्टरॉलच्या भीतीने उगाचच दूध किंवा दही बंद करू नये.गेल्या काही दशकांत बहुदेशीय कंपन्यांनी भारतीयांना फास्ट फूडच्या विळख्यात जखडून टाकायला सुरुवात केली आहे. त्या विळख्यातून आपण वेळीच बाहेर येऊया.

मधुमेह तज्ज्ञ,एशिअन हार्ट इन्स्टिटय़ूट आणि रहेजा हॉस्पिटलंल्ल्र’ुँ१ं२‘ं१@ँ३ें्र’.ूे

Sunday, September 5, 2010

‘चिनी ज्यादा’ !

loksatta.com
Source- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=98205:2010-09-03-06-15-09&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०sathe.aniket@gmail.com

पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. महासत्ता बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणारा चीन आणि दहशतवादाने पोखरलेला पाकिस्तान यांच्यातील दृढ मैत्रीने आजपर्यंत जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारताला अडचणीत आणले आहे. पाकव्याप्त काश्मिरात सध्या पाकिस्तानी कमी आणि ‘चिनी ज्यादा’अशी स्थिती आहे. आणि ती भारतासाठी मोठीच डोकेदुखी आहे.युद्धाची बदलणारी परिभाषा जो देश जितक्या लवकर आत्मसात करेल, तोच जगावर राज्य करेल, हा मंत्र लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्या तंत्रात बदल करण्यात सध्या आघाडीवर असलेल्या चीनचे सर्वच क्षेत्रांतील वाढते वर्चस्व केवळ शेजारील भारतासाठीच नव्हे, तर बलाढय़ अमेरिकेसाठीही चिंतेचा विषय ठरले आहे. युद्ध केवळ लष्करी पातळीवरच लढले जाते असे नव्हे, तर आर्थिक, राजकीय, कूटनीती, मानसिक आणि सामरिक आघाडय़ांवर व्यूहरचना करत एखाद्या राष्ट्रावर दबाव टाकून एक प्रकारे त्यास आपले मांडलिक कसे बनवता येईल, याचे उदाहरण म्हणून चीनच्या सध्याच्या हालचालींकडे पाहता येईल. अर्थात हे डावपेच म्हणजे भारताविरुद्ध छुप्या युद्धाचाच एक भाग आहेत. भारताच्या आर्थिक प्रगतीत अवरोध निर्माण करणे आणि आशिया खंडासह जागतिक पातळीवर अमेरिकेच्या प्रभावाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सज्जता राखणे, असा यामागे चीनचा दुहेरी उद्देश आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्यास विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते.अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग असतो. महासत्ता बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणारा चीन आणि दहशतवादाने पोखरलेला पाकिस्तान यांच्यातील दृढ मैत्रीने आजवर जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारताला अडचणीत आणले आहे. बलुचिस्तानमधील ग्वादार या नव्या बंदराच्या माध्यमातून त्याला आणखी एक संधी मिळाली आहे. या बंदराचा संबंध गिलगिटमध्ये कार्यरत चिनी लष्कराशी आहे. ‘९/११’ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन फौजा दाखल झाल्या आणि त्यापाठोपाठ चीनने या बंदराचा विकास आणि ग्वादार बंदर ते कराची या महामार्गासाठी तब्बल ३०० कोटी अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. चीन-पाक या राष्ट्रांच्या आर्थिक विकासाला नवे परिमाण देण्याची क्षमता या बंदरात आहे. त्याचे सामरिकदृष्टय़ा असणारे महत्त्व हा या प्रक्रियेतील सर्वाधिक महत्त्वाचा घटक. अफगणिस्तानच्या सीमेला लागून असणाऱ्या या भागापासून इराणची सीमा केवळ ७२ किलोमीटरवर आहे. जगात खनिज तेल पुरवठय़ाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जाणारा ऑइल डेपो ग्वादारपासून ४०० किलोमीटरवर आहे. जगातील जवळपास निम्मा खनिज तेलाचा पुरवठा मार्गस्थ होण्याच्या ठिकाणी हे बंदर आहे. एवढेच नव्हे, तर या परिसरात रेल्वे व रस्तेमार्गाचे जाळे विस्तारून चीनला मध्य आशियाई बाजारपेठेत थेट ‘अॅक्सेस’ मिळणार आहे. खनिज तेल पुरवठय़ाच्या सुरक्षित आणि किफायतशीर स्रोताच्या माध्यमातून काहीशा मागासलेल्या शिनजियांग (सिकियांग) भागाचा विकास साधण्याचे त्याचे नियोजन आहे. सद्य:स्थितीत चीनला जवळपास ६० टक्के खनिज तेलाचा पुरवठा हा मध्यपूर्वेकडून होत असून, त्या भागात अमेरिकन नौदलाचा प्रभाव आहे. कोणत्याही वादाच्या प्रसंगी हा मार्ग अमेरिका खंडित करू शकते. त्या भागात प्रतिकाराची पुरेशी क्षमता नसल्याने चीनने ग्वादारच्या माध्यमातून आपल्या खनिज तेलाचे सागरी मार्ग सुरक्षित करताना भारतावर दबाव ठेवण्याची खेळी खेळली आहे. पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील या बंदरावर अत्याधुनिक यंत्रणा उभारून चीन ओमानचे आखात आणि भारतीय नौदलाच्या अरबी समुद्रातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचे निरीक्षण अमेरिकेच्या पेंटागॉन संस्थेने नोंदविले आहे. या बंदराच्या माध्यमातून चीनला खनिज तेलाचा पुरवठा जलद व कमी खर्चात होणार आहे. सध्या अरबस्तानातील तेलवाहू टँकर भारतीय द्वीपखंडाला वळसा घालून चीनमध्ये जातात. त्याऐवजी ते ग्वादारमध्ये आणून त्यातील खनिज तेल आपल्या प्रांतात नेण्याची त्यांची योजना आहे. चीनने व्यापार व आयात-निर्यात साधनांच्या वाहतुकीकरिता काराकोरमसह किनारपट्टीलगतच्या महामार्गांसाठी मोठी गुंतवणूक करून रेल्वेमार्ग विकासाची योजना मांडली आहे. पाकिस्तानात लष्करी तळ उभारण्याच्याही त्यांच्या हालचाली आहेत. यापूर्वी पाकिस्तानने भारताचा बळकावलेला काही भूभाग कराराद्वारे रीतसर चीनकडे सोपविला आहे. त्यामुळे लष्करी तळासाठी चीनला या प्रदेशात जागा उपलब्ध होणे फारसे अवघड नाही. त्या तळाचा उपयोग आवश्यकता भासल्यास जसा भारताविरुद्ध करता येईल, तसाच तो मुस्लीमबहुल शिनजियांग भागात बळावलेला अंतर्गत असंतोष शमविण्यासाठीदेखील होणार आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये असेच प्रक्षोभक वातावरण असल्याने पाकिस्तान पाहुण्यांच्या हातून साप मारण्याच्या तयारीत आहे. चिनी लष्कराने गिलगिटमध्ये दिलेल्या ठिय्याला असे वेगवेगळे संदर्भ आहेत.आशिया खंडात वर्चस्वासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांना आपल्या गटात समाविष्ट करत चीन त्या प्रत्येक राष्ट्रात पायाभूत सुविधांच्या उभारणीत गुंतला आहे. खनिज तेल पुरवठय़ाचे मार्ग सुरक्षित राखण्याकरिता त्याने श्रीलंकेशी सामंजस्य करार करून हंब्मनतोता प्रकल्पात बंदराचा विकास, खनिज तेल प्रक्रिया केंद्र, विमानतळ आणि तत्सम सुविधांसाठी प्रचंड गुंतवणूक केली. त्यात केवळ खनिज तेलाचे सागरी मार्ग आणि मलाक्काच्या सामुद्रधुनीवर लक्ष केंद्रित करण्याचा त्याचा हेतू नसून, या माध्यमातून चिनी नौदलाचे हिंदी महासागरात अस्तित्व निर्माण करण्यात चीन यशस्वी झाला आहे. आखाती प्रदेशातील अमेरिकेचा प्रभाव आणि मलाक्काच्या सामुद्रधुनीत अमेरिकन नौदलाच्या कवायती होत असतात. त्यामुळे खनिज तेलाच्या सागरी मार्गात आडकाठी होण्याची शक्यता गृहीत धरत चीनने हे खास नियोजन केले आहे. बांगलादेश, म्यानमार, थायलंड, कम्बोडिया अशा विविध देशांशीही असेच करार केले गेले. माओवाद्यांच्या प्रभावाखाली आलेला नेपाळही त्याच्या लाभार्थी गटात आहे. भारताच्या सरहद्दीजवळ चीनने रस्ते बांधण्याची कामे हाती घेतली असून, क्वांघाय ते ल्हासापर्यंतचा लोहमार्ग नेपाळ आणि भारत-चीन सरहद्दीजवळील नथूला खिंडीनजीकच्या डोंगपर्यंत विस्तारला जाणार आहे. दक्षिण आशियातही चीनचे महत्त्व लपून राहिलेले नाही. भारताच्या सर्व शेजाऱ्यांशी मैत्री दृढ करण्यावर चीनचा भर आहे. शेजारी राष्ट्रांना आपलेसे करत चीन भारताला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नात आहे.एकीकडे भारतासोबत व्यापार वाढवायचा, शांतताविषयक चर्चा करायची आणि दुसरीकडे वादग्रस्त सीमाभागात लष्करी वा हवाईतळ निर्माण करायचा, क्षेपणास्त्रे तैनात करायची, लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वेमार्ग सीमेपर्यंत आणून भिडवायचे, भारताच्या अवतीभवती नवे नाविक तळ निर्माण करायचे- अशी चीनची रणनीती राहिली आहे. या सर्वाचा परिणाम अखेर भारताच्या आर्थिक विकासावर होणार असून, तेच चीनला अभिप्रेत आहे. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. भारताची विकासप्रक्रिया गतिमान झाल्याने त्यात जमेल तितके अडथळे आणण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी लडाखमधील माऊंट ग्याजवळील भारतीय भूभागात चिनी लष्कराने दीड किलोमीटपर्यंत केलेली घुसखोरी, लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा- रेषेचा भंग, जम्मू-काश्मीर व अरुणाचल प्रदेशमधील भारतीयांसाठी व्हिसा देण्याच्या पद्धतीत जाणीवपूर्वक ठेवलेला वेगळा निकष, अरुणाचलच्या विकासासाठी भारताने आशियाई विकास बँकेकडून घेतलेल्या कर्जास आक्षेप आणि अलीकडेच नॉर्दर्न कमांडच्या भारतीय लेफ्टनंट जनरलला व्हिसा नाकारण्यापर्यंत गेलेली त्याची मजल.. या बाबी चीनचा अंतस्थ हेतू स्पष्ट करतात. राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून हे डावपेच चीन लढवत असला तरी भारतासाठी मात्र ही सावधानतेची घंटा आहे. भारताला नाइलाजास्तव आपल्या संरक्षण क्षेत्रावरील खर्चात भरमसाठ वाढ करणे भाग पडत असून, त्याचा परिणाम देशांतर्गत विकासकामांवर होणार आहे. म्हणजेच चीनला अपेक्षित असेच घडण्याची शक्यता आहे.सध्या चिनी लष्कर ज्या भागात स्थिरावले आहे, त्या ‘गिलगिट वझारत’चा परिसर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जम्मू-काश्मीर संस्थानचा जो एक-तृतीयांश प्रदेश पाकिस्तानने बळकावला, तो पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. पाकिस्तान व चीनच्या मैत्रीपूर्ण संबंधात काराकोरम महामार्गाला विशेष महत्त्व आहे. या मार्गापासून सियाचेन टापू बराच लांब असला तरी तो भारतातील सर्वाधिक उंचीचा टापू आहे. १८ ते २२ हजार फूट उंचीपर्यंत विस्तार असणाऱ्या या भागात १९८३ पर्यंत भारताला सैन्य ठेवण्याची गरज वाटली नव्हती. पाकिस्तानने तो व्यापण्याचा केलेला प्रयत्न तत्कालीन सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य यांनी हवाईमार्गे सैन्य उतरविण्याचा धाडसी निर्णय घेत हाणून पाडला होता. घुसखोरीची ही घटना आणि काराकोरम महामार्गाचा व्यापारी वाहतुकीसाठी वापर सुरू झाल्यावर या टापूत भारतीय लष्कर तैनात करणे अपरिहार्य ठरले. मुळात हिमालयाच्या दुर्गम पर्वतराजीत जलद लष्करी हालचाल करणे जिकिरीचे ठरते. हिमालयात रस्ते बांधणे हे अवघड काम असल्याचे भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे. रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केलेली डोंगराची कडा कधी कोसळेल याचा नेम नसतो. कारण ही कडा स्थिरावण्यास किमान दशकभराचा कालावधी जावा लागत असला, तरी तोपर्यंत वारंवार दरडी कोसळून रस्ता खचण्याचा अधिक संभव असतो. त्यातही बर्फवृष्टीमुळे जवळपास सहा महिने या भागातील रस्ते बंदच असतात. संघर्षांची संभाव्य ठिणगी हिमालयाच्या पर्वतराजीत पडल्यास भारतीय लष्कराला चीन आणि पाकिस्तान या दोघांशी एकाच वेळी दोन हात करावे लागू शकतात. या प्रतिकूल परिस्थितीत या प्रदेशात पायाभूत सुविधांचा विकास करताना कायमस्वरूपी मोठय़ा प्रमाणात लष्कर तैनात करणे भाग पडले आहे. ही बाबही आर्थिक बाबींशी निगडीत आहे.गेल्या काही वर्षांपासून चीनच्या हालचालींप्रमाणेच भारताला लष्करी नियोजन करावे लागत आहे. तिबेटमध्ये चीनने रेल्वे आणल्यानंतर भारताने अरुणाचल प्रदेशमध्ये सर्व ऋतूंत वाहतुकीस योग्य रस्ते बांधण्यास सुरुवात केली. लडाख आणि अरुणाचलमध्ये विमानांसाठी सर्व धावपट्टय़ा दुरूस्त करून त्या लढाऊ व मालवाहू विमानांना उतरण्यायोग्य करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागला. आसाममध्ये तेजपूर हवाईतळावर सुखोई या अत्याधुनिक विमानांचे पथक हलविण्यात आले. चीनच्या सीमावर्ती भागात घुसखोरीच्या घटना वाढल्याने हवाई टेहळणी करणाऱ्या वैमानिकरहित विमानांची पथके या भागात नव्याने कार्यान्वित करावी लागली. याशिवाय डोंगराळ प्रदेशात नेण्यायोग्य अशा लांब पल्ल्याच्या, पण वजनाने हलक्या असणाऱ्या तोफांची खरेदी करण्याचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात आहे. लष्करी प्रयोजनासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा अधिकाधिक ताण भारतीय अर्थव्यवस्थेवर टाकण्याचा चीनचा हा प्रयत्न आहे.नव्या नाविक तळांमुळे अरबी समुद्र अथवा हिंद महासागरात चीन प्रसंगी हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ग्वादार बंदराची उभारणी होण्यापूर्वी पाकिस्तानची जवळपास संपूर्ण सागरी वाहतुकीची भिस्त कराची बंदरावर अवलंबून होती. १९७१ च्या युद्धात भारताने कराची बंदरावर हल्ला चढवून पाकिस्तानची नाकेबंदी केली. कारगिलच्या युद्धातही तशी नाकेबंदी करण्याची तंबी दिली गेली होती. यामुळे पाकिस्तानवर कायम दबाव ठेवणे शक्य झाले. तथापि आता ग्वादार हे कराचीपासून सातशे किलोमीटरवर आहे. भारतापासून ते आणखी दूर असल्याने पाकिस्तानची नाकेबंदी करण्याची संधी आता मिळणे अवघड झाले आहे. हाच निकष चीनसाठीही येथे लागू करता येईल. उलट, चीनच्या अस्तित्वामुळे भारताच्या सागरी हद्दीत अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. तेल उत्पादन आणि खनिज संशोधनासाठी भारताने कोटय़वधींची गुंतवणूक केली आहे. संभाव्य युद्धात ‘बॉम्बे हाय’सारख्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणाकरिता खास काही युद्धनौका अडकून ठेवाव्या लागणार आहेत. लष्करी सज्जतेसाठी देशाची अर्थव्यवस्था हा कळीचा मुद्दा आहे. गेल्या काही वर्षांत आर्थिक, कृषी, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात चीनने भारताला एका दशकाने मागे टाकले आहे. आर्थिक सुधारणा आणि खुलेपणा हा चिनी धोरणाचा अविभाज्य भाग असून तो यापुढेही कायम राहणार आहे. जागतिक मंदीच्या काळातही चीनच्या भक्कम अर्थव्यवस्थेवर फारसा प्रतिकूल परिणाम झालेला नाही. चीनमध्ये एकाधिकारशाही असल्याने एखादे धोरण नेटाने व धाकाने राबविले जाते. त्यामुळे प्रकल्पांची उभारणी निश्चित कालावधीत पूर्ण करणे शक्य होते. तुलनेत भारतात लोकशाही असल्याने अनेक प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडल्याचे दिसते. आर्थिक विकासात चीनने अलीकडेच जपानला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला आहे. आर्थिक ताकदीच्या जोरावर त्याने एका विशिष्ट प्रदेशापुरत्या सीमित असणाऱ्या मर्यादित युद्धापासून ते अण्वस्त्रांसारख्या आयुधांचा वापर करून लढल्या जाणाऱ्या र्सवकष युद्धापर्यंतची तयारी केली आहे. अंतराळ, सायबर, इलेक्ट्रॉनिक आदी युद्धतंत्राची कौशल्ये आत्मसात करून अमेरिकेशी तो स्पर्धा करत आहे. महासत्ता बनण्याच्या प्रक्रियेत आशिया खंडात भारत त्याला अडसर ठरत असल्याने तो राजकीय, आर्थिक, लष्करी बळाचा धाक आणि हस्तक्षेप करत दबावतंत्राचा अवलंब करतो. या आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानेही आपल्या आर्थिक क्षमतेनुसार लष्करी सामथ्र्य वाढविण्यावर भर दिला आहे. पण या सर्वाची परिणती अखेर शस्त्रास्त्रस्पर्धेत झाल्याचे अधोरेखित होत आहे. प्रत्यक्ष युद्धाऐवजी चीनने सध्या डावपेचांच्या माध्यमातून आशियात आपले वर्चस्व सिद्ध करण्याची धडपड चालवली आहे. चीनचे हे प्रयत्न ज्या प्रमाणात गतीशील होतील, त्या प्रमाणात भारतापुढील आव्हानांमध्येही भर पडेल, हे निश्चित. पाकव्याप्त काश्मिरात सध्या पाकिस्तानी कमी आणि ‘चिनी ज्यादा’अशी स्थिती आहे. आणि ती भारतासाठी मोठीच डोकेदुखी आहे.

चीनचे दोन चेहरे!

सोमवार, ६ सप्टेंबर २०१०
source- loksatta.com
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=98634:2010-09-05-13-39-00&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

चीनचा नेमका कोणता चेहरा खरा, असा प्रश्न भल्याभल्यांना नेहमीच पडत असतो. चीनच्या एका वरिष्ठ नेत्याने बीजिंगच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनामध्ये भारतीय दालनास भेट देऊन भारताविषयी गौरवोद्गार काढले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या देशाला ‘पंचशील’ दिले, असे त्या नेत्याने यावेळी स्पष्ट केले. चीनने आजपर्यंत आपल्या शेजारी देशांशी त्यानुसार आपले वर्तन ठेवले आहे, भारताबरोबरच नव्हे तर अन्य देशांबरोबरही ‘पंचशील’च्या तत्त्वज्ञानानुसार चीन वागतो, असेही त्यांनी म्हटले आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षात पाचव्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जाणारे ली चँगचुंग यांनी हे मत व्यक्त केले आहे. सध्याचा हा काळ प्रसारमाध्यमांमधून चीनविषयी संशय पेरणारा आहे. ‘लोकसत्ता’च्या कालच्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्येही आम्ही जो ‘चिनी ज्यादा’ हा चीनच्या हालचालींविषयी लेख प्रसिद्ध केला आहे, तोही या वातावरणाला अनुसरून आहे. ज्यांनी भारताविषयी आणि भारतीय तत्त्वज्ञानाविषयी आदरभाव व्यक्त केला ते ली हे चिनी कम्युनिस्ट पक्षामधले प्रचारप्रमुख मानले जातात. याचा अर्थ असा नव्हे की, ते प्रचारासाठी असे काही बोलले असतील. गौतम बुद्ध, रवीन्द्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी चांगले भाष्य केले की, भारतीय जनता हुरळून जाते, असे मानण्याचा काळ आता संपला आहे. आपणही आता बऱ्यापैकी व्यावहारिक भूमिका घ्यायला शिकलो आहोत. मात्र चीनविषयी धोरण ठरवताना आपल्याला कोणत्याही प्रचारी दृष्टिकोनाने वाहवून जाता येणार नाही. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चीनने आपले प्रचंड सैन्य आणून ठेवले आहे, या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीच्या आधारे आपल्या राजनैतिक धोरणाला दिशा देणे योग्य नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षामध्ये ज्याप्रमाणे दोन वा तीन मतप्रवाह आहेत, तसे ते आपल्या देशाचे धोरण ठरवणाऱ्यांमध्येही आहेत. चीन हा शत्रू क्रमांक एक म्हणणारे आता सत्तेच्या जवळपासही नाहीत, पण त्यांच्या सत्तेच्या काळातसुद्धा भारतीय पंतप्रधानांनी, अटलबिहारी वाजपेयी यांनी २००३ मध्ये चीनला भेट देऊन सामंजस्य कसे वाढेल, हे पाहिले होते. अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर द्यायचे असेल तर भारताशी कायमचे शत्रुत्व ठेवून चालणार नाही, हे ओळखणारा एक वर्ग चिनी कम्युनिस्ट पक्षात आहे. सध्याचा काळ हा ‘मार्केट फोर्सेस’नुसार चालणारा आहे, हे कळायला आपल्याला थोडा वेळ लागला तरी चीनला ते पक्के माहीत आहे. त्यामुळेही सामंजस्याने वागण्यात शहाणपण आहे, हे चिनी नेते समजून आहेत. विशेष हे की, चीनने यापूर्वीचे सिक्कीमसंबंधातले आपले मत बदलले आहे. १९७५ मध्ये सिक्कीममधल्या राजेशाहीला संपवून इंदिरा गांधी यांनी सिक्कीमला भारतात विलीन केले, तेव्हा सुरुवातीला चीनने त्याविषयी आपले मत राखून ठेवले होते. पण काही वर्षांपूर्वी चीनने भारताबरोबरचा व्यापार सिक्कीमच्या मार्गाने चालू करायचे जाहीर करून त्या सरहद्दीवर आपली व्यापारविषयक नाकी भारताबरोबर निश्चित केली. भारतानेही तिबेट हा चीनचाच प्रदेश असल्याचे फार पूर्वी मान्य करून भारतातून तिबेटविरुद्ध कोणताही प्रचार केला जाणार नाही, याबद्दलची हमी चिनी नेत्यांना दिली होती. तरीही भारतातून अधूनमधून त्याविषयी प्रचार चालतो आणि चिनी वकिलातीवर दिल्लीत मोर्चेही निघतात, हा भाग निराळा! अरूणाचल प्रदेशाला ‘१९६२ चा अपुरा राहिलेला भाग’ किंवा ‘दक्षिण टोकाचे तिबेट’ असे चीनने २००५ पूर्वी कधीही म्हटलेले नव्हते. चीनचा भारतीय अणुस्फोटाला असलेला विरोध आणि त्यानंतर पाकिस्तानला त्याने दिलेली अणुभट्टय़ांविषयीची मदत याबद्दल आपल्या माध्यमांमध्ये माहिती येत असते. तथापि भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अणुऊर्जा कराराविषयी चीनने आपली नाराजी जाहीर केलेली नाही. इतकेच नव्हे तर चीनने भारताबरोबर आतापर्यंत एकदाही आण्विक प्रश्नांवर अधिकृत वा अनधिकृत चर्चा केलेली नाही. तसे केल्याने भारताला आण्विक ताकद म्हणून आपली मान्यता मिळेल, या भीतीने चीनने या वाटेने जायचे टाळले आहे. याउलट भारत आणि पाकिस्तान यांनी अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर सही करावी, अशीच भूमिका चीनने आजवर घेतलेली आहे. पाकिस्तानी दहशतवादाचा धोका भारताला होत असतोच, त्याचा चीनलाही उपसर्ग झाला आहे. शिनजियांग (सिंकियांग) प्रांतात या दहशतवाद्यांचा धुमाकूळ चालूच असतो. कदाचित त्यामुळेही असेल, पाकिस्तानबरोबर अधिक मित्रत्वाचे संबंध राखणे अधिक चांगले असे चीनला वाटले तर नवल नाही. भारत आणि चीन हे दोन्ही देश यापुढल्या जागतिक आर्थिक शक्ती असतील, असे अमेरिकेला वाटते. चीनशी कोणत्याही मापदंडाने आर्थिक स्पर्धेत आपण सध्यातरी उतरू शकत नाही. कोणाला आवडो वा न आवडो, चीन मात्र जगाच्या नकाशावर आर्थिक महाशक्ती म्हणून उदयास आलेला आहे. जपानलाही मागे टाकून तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अशा स्थितीत चीनला आताच कोणत्याही देशाबरोबरचे शत्रुत्व ओढवून घ्यायची इच्छा असेल असे वाटत नाही. चीनने मागे टाकल्याने असेल किंवा अमेरिकेच्या मार्गदर्शनामुळेही असेल, दुसऱ्या महायुद्धानंतर शांत झालेला जपान आता बेताबेताने लष्करी ताकदीतही पुढे येऊ लागला आहे. कदाचित त्यामुळेही असेल, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व भारताला मिळावे असे चीनला वाटते. याबाबतीत चिनी कम्युनिस्ट पक्षातला एक गट भारताच्या पूर्ण बाजूने आहे. हे सदस्यत्व जपानला मिळणार असेल तर त्यास चीनचा विरोध राहील हे उघड आहे. अमेरिकेच्या आशियाविषयीच्या ‘इंटेलिजन्स कौन्सिल रिपोर्ट’नुसार २०१५ पर्यंत भारत आणि चीन यांच्या आर्थिक, राजकीय आणि लष्करी ताकदीला तोंड देता येणे जवळपास अशक्य आहे. या दोन देशांमध्ये वितुष्ट आणण्यासाठी बऱ्याच शक्तींचे प्रयत्न चालले असण्याची शक्यता आपण गृहीत धरायला हवी आहे. भारताशी वैर पत्करून अमेरिकेला भारताच्या अधिक जवळ आणायचे ‘पाप’ करू नये, असा एक मतप्रवाह चिनी कम्युनिस्ट पक्षात आहे, याचा विसर आपल्याला पडता कामा नये. भारत आणि चीन यांनी आपल्या सरहद्दीविषयीचा प्रश्न वाटाघाटींनी सोडवावा, असे दोन्ही देशांमध्ये ठरल्यानंतर उभय देशांच्या सचिव पातळीवर नियमित बैठका होत असतात. त्यात मतभेद झाले तरी चीनने जाहीररीत्या आपली नाराजी कधीही व्यक्त केलेली नाही. चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे, याबद्दल आपल्याला आक्षेप घेता येणार नाही तसाच तो भारत आणि अमेरिका वा अन्य कोणी यांच्यातल्या मैत्रीबद्दल चीनलाही घेता येणार नाही. चीनने तसा तो घेतलेला नाही. पाकिस्तानशी मैत्री असल्यानंतरही चीनने कारगिलच्या युद्धात पाकिस्तानच्या बाजूने कोणतेही मत प्रदर्शित केले नव्हते. या तटस्थ भूमिकेबद्दल खुद्द पाकिस्तानात नाराजीची भावना होती, याचा मात्र आपल्या राजकीय पंडितांना विसर पडत असतो. याउलट पाकिस्तानने भारताबरोबरचे सर्व प्रश्न वाटाघाटींनी सोडवावेत, अशा तऱ्हेचा दबाव पाकिस्तानवर चिनी नेत्यांकडून आणला जात असतो, याकडे हे राजकीय निरीक्षक कानाडोळा करत असतात. भारत आणि चीन यांच्यात चांगले संबंध असायला हवेत, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना वाटते. २००२ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदी हु जिंताओ यांची निवड झाली आणि ते चयांग जमिन यांच्यानंतर चीनच्या अध्यक्षपदी निवडले गेले. त्यांच्या हातात चीनची सर्वात मोठी सत्ता आहे. चीनमध्ये पक्ष, सरकार आणि लष्करी नोकरशाहीच्या हाती सत्तेच्या दोऱ्या असतात, हे लक्षात घेऊनच चिनी परराष्ट्र धोरण निश्चित होत असते. चिनी सत्ताकारणात सातत्याने दोन दशकांमध्ये असलेला आर्थिक विकासाचा दर त्यांच्या बाजूने आहे. तो दहा टक्क्यांच्या आसपास आहे. एखादे वर्ष सोडले तर तो दहाच्या आत कधीही आलेला नाही. चीनच्या या प्रगतीने अमेरिकेसारखा देश स्तंभित झाला असला तरी तो त्यास आळा घालू शकणार नाही. सध्याच्या जगात तसा तो कुणालाही घालता येणार नाही. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चिनी लष्कर आहे वा नाही, या मुद्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यापेक्षा चीनला अधिक जबाबदार देश असा चेहरा आहे, असे आपण मानणे अधिक योग्य ठरणार आहे. शांततापूर्ण सहजीवन हा तर पंचशीलच्या तत्त्वज्ञानाचा आत्माच आहे!

Thursday, September 2, 2010

इराकचे ‘स्वातंत्र्य’?

इराकचे ‘स्वातंत्र्य’?
गुरुवार, २ सप्टेंबर २०१०
Source- loksatta.com
link - http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=97693:2010-09-01-16-21-13&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

संपूर्ण जगात आणि विशेषत: अरब जगतात विद्वेषाचे वातावरण कायम ठेवून अमेरिकेने इराकमधून काढता पाय घेतला आहे. सद्दाम हुसेन यांच्या कारकीर्दीत स्वतंत्र आणि सुस्थिर असणाऱ्या इराकची धूळधाण उडवून मगच इराकी जनतेच्या हाती त्यांचा देश सोपवण्यात आला आहे. इराकचा सत्यानाश करायचे निमित्त होते ते ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचे! हा हल्ला करणाऱ्या ‘अल् काईदा’ या दहशतवादी संघटनेचा आणि इराकचा अर्थाअर्थी संबंधही सिद्ध झालेला नव्हता, तरीही तो आहे असे गृहीत धरून इराकविरुद्ध रान उठवण्यात आले. अल् काईदाचा नेता ओसामा बिन लादेन हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सरहद्दीवर, मात्र त्याचे लागेबांधे इराकमध्ये असल्याचे अमेरिकेकडून जगाला ओरडून सांगण्यात येत होते. त्यातही काही तथ्य नव्हते, हे पुढे स्पष्ट झाले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकच्या युद्धाचा निर्णय घेणारे आपले पूर्वाधिकारी जॉर्ज बुश यांच्या त्यासंबंधीच्या विचारांना हरकत घेतली नसली तरी ‘व्हाइट हाऊस’च्या ओव्हल कार्यालयातून केलेल्या आपल्या भाषणात या युद्धाच्या अनावश्यकतेलाच सूचित केले आहे. वास्तविक इराकमधून अमेरिकेच्या सैनिकांची माघार ही २०११ मध्ये व्हायची होती, पण ती आताच हाती घेण्यात आली. ‘युद्धाच्या राखेतून नव्या संस्कृतीचा उदय व्हावा’ यासाठी इराकी जनतेच्या हाती सर्व सूत्रे सोपवून अमेरिकेचे सैन्य परतत असल्याचा दावा ओबामा यांनी केला आहे. राखेतून निर्माण होणारी संस्कृती ही गोष्ट ओबामा यांना बोलायला सोपी वाटत असली तरी हे अवघड काम करायचे कुणी? मुळातच इराकची राखरांगोळी करायचे कारणच काय होते ते ओबामांनी स्पष्ट केलेले नाही. इराकच्या या युद्धात ४४०० अमेरिकन सैनिकांना मृत्युमुखी पडावे लागले आहे आणि जवळपास ३२ हजार जणांना जायबंदी व्हावे लागले आहे. या युद्धाचा ओबामा यांनी सांगितलेला खर्चाचा आकडा ७४० अब्ज डॉलरच्या घरात आहे. इराकविरुद्ध युद्ध पुकारताना त्या देशाचे नेते सद्दाम हुसेन यांना ‘जिवंत अथवा मृत’ पाहायच्या उद्देशानेच ते सुरू करत असल्याचे बुश यांनी जाहीर केले होते. इराकमधल्या सत्ताबदलाचे उद्दिष्ट अर्थातच त्यात ओघानेच आले. बुश आणि त्यावेळी त्यांना साथ देणारे यांची ती विकृतीच होती. ओबामा यांनी बुश यांच्या देशाभिमानाबद्दल गौरवोद्गार काढले, पण युद्धामागल्या कारणांच्या खोलात शिरायचे त्यांनी खुबीने टाळले. ओबामा यांनी या युद्धात मरण पावलेल्या अमेरिकनांचा आकडा सांगितला, पण किती निष्पाप इराकी जनतेला मृत्यूच्या खाईत विनाकारण लोटण्यात आले ते त्यांनी स्पष्ट केले नाही. न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर, तसेच पेन्टॅगॉनवर हल्ला करणाऱ्या आणि पेन्सिल्व्हानियामध्ये पडलेल्या अशा एकूण चार विमानांमध्ये असणाऱ्या एकूण १९ दहशतवाद्यांपैकी १४ दहशतवादी हे सौदी अरेबियाचे होते आणि इतरांमध्ये एकही इराकी नव्हता, तरी इराकविरुद्ध युद्ध करायचे अमेरिकेने जाहीर केले आणि त्याचे नाव ‘दहशतवादाविरुद्धचा लढा’ असे देऊन त्यात आपल्या गटातल्या इतरही देशांना ओढले. ‘नाटो’ देशांनी त्यांच्या हाकेला ओ दिली. सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा हा बदला साऱ्या जगालाच संकटात लोटणारा होता. इराकला नेस्तनाबूत करायची योजना २००२च्या मध्याला जाहीर करण्यात आली आणि त्या वेळी मात्र ‘अल् काईदा’ला इराकने मदत केल्याचा आरोप करण्यात आला. त्याचा पुरावा आजपर्यंत अमेरिकेला देता आलेला नाही. अमेरिकेतल्या शोधपत्रकारितेविषयी छाती पुढे काढून बोलणाऱ्यांनाही आजवर तो देता आलेला नाही. इराक-इराण युद्ध हे १९८८चे! त्याआधी सद्दाम हुसेन यांनी आपल्याच जनतेविरुद्ध रासायनिक अस्त्रांचा वापर केला होता, असे सांगणाऱ्या अमेरिकेला त्याचाही पुरावा देता आलेला नाही. रासायनिक अस्त्रे आणि जैविक अस्त्रांचा इराककडे साठा असल्याचा अपप्रचार अमेरिकेने पहिल्या आखाती युद्धानंतर म्हणजे १९९०पासून सातत्याने केला. त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघालाही हाताशी धरण्यात आले. अमेरिकेच्या आग्रहास्तव राष्ट्रसंघाने इराक खरोखरच जनसंहारक अस्त्रांच्या निर्मितीत आहे का, याचा शोध घेण्यासाठी दोन समित्यांची निर्मिती केली. त्यापैकी हान्स ब्लिक्स यांच्या नेतृत्वाखालच्या समितीने इराकला भेट देऊन राष्ट्रसंघाच्या आवरणाखाली सर्व संशयास्पद असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यांना कुठेही तशी काही निर्मिती होते असे आढळले नाही. अमेरिका तिथेच शहाणी झाली असती तर पुढचा समर प्रसंग उद्भवला नसता! १९९०मध्ये कुवेतवर इराकने हल्ला केल्यापासून राष्ट्रसंघाने इराकविरुद्ध र्निबध जारी केले. या र्निबधांमुळे इराकची अन्नान्न दशा झाली. रोज सुमारे सहा हजार बालकांना आणि नवजात मुला-मुलींना मृत्यू येऊ लागला. तरीही अमेरिका द्रवली नाही. र्निबधाच्या काळात शिकागोच्या ‘व्हॉईसेस इन द वाईल्डरनेस’ने इराकला जीवनावश्यक औषधांचा १९९८मध्ये पुरवठा केला, तर अमेरिकन सरकारने र्निबधांच्या भंगाबद्दल त्या कंपनीला एक लाख साठ हजार डॉलरचा दंड ठोठावला. त्याच वर्षी अमेरिकेने इराकची तयारी जोखण्यासाठी चारशे क्रूझ क्षेपणास्त्रे आणि सहाशे बॉम्बचा इराकवर प्रारंभी मारा केला. राष्ट्रसंघाला तर अमेरिकेच्या हुकुमाशिवाय पुढे पाऊल टाकता येणे अशक्य असते हे या संपूर्ण कालखंडात स्पष्ट झाले. कुवेतमधून इराकने माघार घेतली तरी अमेरिकेची खुमखुमी संपलेली नव्हती. ती ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने उफाळून आली. अमेरिकेत चार-दोन ‘अँथ्रॅक्स’ या विषारी वायुनिर्मितीच्या पुडय़ा दरम्यान आल्या, तर त्याचा उगम हा इराकमध्ये असल्याचे सांगून त्याविरुद्ध आकाशपाताळ एक करण्यात आले. अमेरिकेला तेल हवे होते आणि ते मिळवायचे तर इराकवर हल्ला करून ते मिळवावे हा अमेरिकेचा अंतस्थ हेतू होता. मधल्या काळात इराकवर र्निबध लागू असताना माणसे पटापट मरू लागली तेव्हा अमेरिकेच्याच प्रेरणेने राष्ट्रसंघाने ‘तेलाच्या बदल्यात अन्न’ ही योजना हाती घेऊन इराकी जनतेला दिलासा द्यायचा प्रयत्न केला. अर्थात तेही अमेरिकेचे थोतांड होते. आपल्यावर हल्ला करणारे खरोखरच इराकी आहेत की नाही हे न पाहताच इराकविरुद्ध युद्ध पुकारण्यात आले. व्हिएतनामच्या युद्धात पुढाकार घेणारे आणि राक्षसी वृत्ती प्रत्यक्षात आणणारे अमेरिकेचे तेव्हाचे परराष्ट्रमंत्री डॉ. हेन्री किसिंजर यांचा तसेच १९९१मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी असलेले ब्रेन्ट स्कोक्राफ्ट यांचा इराकच्या युद्धास विरोध होता. तरीही ते पुकारण्यात आले. तब्बल बारा वर्षे र्निबध आणि सातत्याने केले गेलेले युद्ध याने पिचलेल्या जनतेला अमेरिकेने दिले काय तर संहार! अमेरिकेवरल्या हल्ल्यानंतर इराकमध्ये उतरलेल्या अमेरिकेच्या आणि त्याच्या दोस्तांच्या सैन्याने प्रथम जनसंहारक अस्त्रे कुठे दडवलेली आहेत, याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण ती त्यांनाही कुठे मिळाली नाहीत. लोखंडी नळ्यांच्या कारखान्यास त्यांनी अस्त्रांचे कारखाने म्हटले आणि त्याचे हास्यास्पद प्रदर्शन मांडले. अमेरिकन प्रचार यंत्रणेलाही ते कुठे आढळले नाहीत. बुश आणि मंडळींना हा जबर फटका असूनही त्यांनी आपली खोटेपणाची नीती तशीच रेटली. अमेरिकेला इराकविरुद्ध युद्ध करून काय मिळाले, असा प्रश्न कुणी केलाच तर त्याचे उत्तर ‘काहीही नाही’ असे द्यावे लागेल. असंख्य निष्पाप जनतेला मृत्युमुखी पडावे लागले. सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असणाऱ्या देशाला अस्थिर करण्यात आले. हा देश आता शिया आणि सुन्नी यांच्यात पूर्ण विभागला गेला आहे. पूर्वी सद्दाम हुसेन म्हणजे इराक असे मानले जात होते, आता त्यांचे नावही उच्चारले जात नाही. त्यांना फासावर लटकवल्यानंतरही अमेरिकेचे क्रौर्य संपलेले नव्हते. त्यामुळेही असेल, अजूनही इराकमध्ये अधूनमधून बॉम्ब फुटतच असतात. हे सगळे घडून गेल्यावर आता इराकमध्ये काहीही करण्यासारखे उरलेले नाही, असे दिसताच अमेरिकेने तिथून काढता पाय घेतला आहे. युद्ध संपले आणि आता राख उरली, पण राखेतून उभे राहण्याचे सामथ्र्य अंगी असणाऱ्या फिनिक्सला इराकमध्ये आणायचे ओबामांनी नावही उच्चारलेले नाही. अमेरिकेने इराकवर हल्ला केला, त्या वेळी असणाऱ्या तेलाच्या काही विहिरींना आग लावण्यात आली होती. आता इराकच्या सरकारकडे सत्ता सोपवताना इराककडे संपत्ती किती आहे किंवा आपल्या जनतेला प्रगतीच्या पथावर इराक नेऊ शकेल का, याचाही विचार करण्यात आलेला नाही. इराकबद्दल अमेरिकेने अनेक घोडचुका दोन दशकांमध्ये केल्या आहेत, त्यात आणखी एकाची भर घालून अमेरिकेने माघारीचा हा निर्णय केला आहे. ओबामांनी त्यांचे एक ओझे उतरवून टाकले एवढाच निष्कर्ष या माघारीतून काढता येतो.

Wednesday, September 1, 2010

सुवर्णकाळ सोन्याचा!

सुवर्णकाळ सोन्याचा!
शनिवार, २८ ऑगस्ट २०१०

ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटातला खलनायक हा सोन्याची तस्करी करणारा दाखविला जात असे. कालांतराने सोन्याच्या आयातीवरील र्निबध सैल झाले आणि सोन्याच्या तस्करीत काही ‘दम’ राहिला नाही. त्यामुळे तस्करीने आपला मोर्चा अमली पदार्थाच्या दिशेने वळवला. चित्रपटातला हा कलही बदलत गेला. त्या काळी आपला हा खलनायक काही लाखांची तस्करी करीत असे. आता काळ बदलत गेला तसे त्याच्या तोंडीही करोडोची भाषा येऊ लागली. रुपयाचे मूल्य वाढल्याने हिऱ्याच्या चोऱ्याही आता लाखाच्या नव्हे तर करोडोंच्या होऊ लागल्या आहेत. सोन्याची तस्करी थांबली असली तरीही सोन्याच्या खरेदीतील ‘चार्म’ काही कमी झालेला नाही. दिवसेंदिवस सोन्याच्या किमती आपला नवनवा उच्चांक गाठत आहेत. गेल्या काही वर्षांत मंदीने डोके वर काढल्यावर सोन्याची खरेदी कमी झाली, मात्र किमती काही त्या तुलनेत कमी झाल्या नाहीत. म्हणजेच सोन्याची लकाकी कायम टिकली आहे. अमेरिकेतील मंदी दूर झाल्याने आपल्याकडेही सोन्याच्या बाजारपेठेला पुन्हा एकदा उभारी येऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यांत वाहनांची खरेदी-विक्री वाढली, तशीच ती सोन्याचीही वाढली आहे. यासंबंधीची आकडेवारी ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने प्रसिद्ध नुकतीच केली आहे. मोटार वा सोन्याची खरेदी ही प्रामुख्याने हातात चांगला पैसा खुळुखुळु लागला की करण्यात येते. आता ती वाढली, याचा अर्थच मुळी आता मंदी ओसरली आहे असा होतो. सोन्याच्या खरेदीचा हा कल निश्चितच अर्थव्यवस्थेला सुखावह आहे. यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशातील सोन्याची विक्री जवळपास ९४ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात सुमारे ६० हजार कोटी रुपयांची सोने खरेदी झाली. जगातील श्रीमंत म्हणून समजल्या गेलेल्या विकसित देशात सोन्याची व्यक्तीगत खरेदी फारशी होत नाही, तिथे सरकारच सोन्याची खरेदी करते. या उलट नेमके चित्र विकसनशील देशांत आहे. भारतासह अनेक विकसनशील देश सोन्याची खरेदी मर्यादित स्वरूपात करतात. मध्यंतरी आपल्या देशाने २०० टन सोन्याची खरेदी केली, त्या वेळी ही एक मोठी बातमी झाली होती. दोन दशकांपूर्वी आर्थिक उदारीकरण सुरू होण्याअगोदर आपल्यावर सोने गहाण टाकण्याची नामुष्की आली होती. विकसनशील देशांतील सरकारे जरी सोन्याची खरेदी मर्यादेत ठेवत असली तरी तेथील लोक मात्र सोन्याची खरेदी भरपूर करतात. चीन व भारत ही सोने खरेदीची मोठी बाजारपेठ! आपल्याकडे सोन्यातील गुंतवणूक ही सर्वसामान्य माणसापासून ते श्रीमंत वर्गात अशी सर्व थरांत केली जाते. सोन्याची गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असल्याने, तसेच यातील तरलतेमुळे लोकांना फायदेशीर ठरते. गेल्या दोन दशकांत देशात झपाटय़ाने वाढलेल्या मध्यमवर्गाने गुंतवणुकीसाठी समभागातील गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असली तरीही त्यांची सोन्यातील गुंतवणूक तेवढय़ाच प्रमाणात असते. भविष्यातील तरतुदीसाठी किंवा लग्नाच्या निमित्ताने सोन्याची खरेदी करणारे आपल्याकडे मोठय़ा संख्येने दिसतात. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित म्हणून केली जात असली तरीही त्याची गुंतवणूक ही एक प्रकारे ‘मृत’च असते. कारण या गुंतवणुकीत कोणतीही उत्पादकता असत नाही, परंतु गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना याचे काही देणेघेणे नसते. त्यांना एक सुरक्षित गुंतवणूक हवी असते आणि सोने ही गरज भागविते. त्याच जोडीला सोन्याच्या दागिन्यांची एक मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या गुंतवणुकीचे म्युच्युअल फंड बाजारात आल्यावर तिकडे गुंतवणूकदार आकर्षित झाला आहे. या फंडात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. प्रामुख्याने ज्या गुंतवणूकदाराला सोने सांभाळण्याची जबाबदारी नको आहे आणि त्या जोडीला सोन्यातील नफाही मिळवायचा असतो, त्याच्यासाठी ही एक उत्तम संधी असते. आपल्याकडे उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांसाठी जे अनेक नवीन पर्याय खुले झाले, त्यात सोन्याच्या म्युच्युअल फंडांचा एक उत्तम पर्याय ठरला आहे. म्हणूनच यातील गुंतवणूक सुमारे ४०० टक्क्यांनी वाढली आहे. सोन्यातला गुंतवणूकदार हा अनेकदा ‘भावनात्मक’ गुंतवणूक करणारा असतो. म्हणजे तो सोन्याची खरेदी करतो, पण विक्री करण्यास सहसा पुढे येत नाही. सोन्याच्या म्युच्युअल फंडाकडे अशी मानसिकता असलेला गुंतवणूकदार जात नाही, हेदेखील वास्तव आहे. चीनमध्येही सोन्याच्या खरेदीबाबत आपल्यासारखाच कल आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीची सर्वात मोठी जागतिक बाजारपेठ आशिया खंडात आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या या बाजारपेठेद्वारे लाखो लोकांना रोजगारही मिळतो. ग्रामीण भागात सोन्याची मोठी बाजारपेठ दडलेली आहे. सर्वसामान्य शेतकरी असो वा श्रीमंत, तो दरवर्षी आपल्या कुवतीनुसार थोडी का होईना सोन्याची खरेदी करतोच! कारण कठीण प्रसंगी हेच सोने विकून वेळ निभावून नेता येते. गेल्या वर्षी पावसाळा कमी झाल्याने पिकांची स्थिती वाईट होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, सोन्याची खरेदी मंदावली होती. यंदा मात्र पावसाळा पुरेसा झाल्याने शेतकऱ्याच्या हातात चांगला पैसा खुळखुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी सोन्याच्या खरेदीत निश्चितच वाढ होईल. सोन्याच्या खालोखाल आता शहरी ग्राहकांमध्ये खरेदीसाठी हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढतो आहे. गेल्या तीन वर्षांत मंदीचा मोठा फटका हिऱ्यांच्या उद्योगाला बसला. आफ्रिकेतून कच्च्या हिऱ्यांची आयात करून त्याला पैलू पाडून निर्यात करण्याची मोठी बाजारपेठ आपल्याकडे आहे. त्याचे प्रमुख केंद्र सुरतमध्ये आहे. मात्र गेल्या मंदीत हे केंद्र पूर्णपणे झोपले होते. येथील लाखो कामगार बेकार झाले, परंतु आता पुन्हा एकदा या उद्योगाने भरारी घेतली आहे. चालू वर्षांच्या अखेरीस हिऱ्याची ही बाजारपेठ आता तब्बल ३१ अब्ज डॉलरवर म्हणजेच रुपयाच्या भाषेत बोलायचे झाल्यास १.४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. अमेरिका, चीन, हाँगकाँग, युनायटेड अरब अमिरात व राष्ट्रकुल देशांतली हिऱ्याची मागणी वाढल्याने आपल्याकडील या बाजारपेठेला नवा तजेला आला आहे. हिऱ्याला पैलू पाडण्याच्या उद्योगात जागतिक पातळीवरील विचार करता भारताचा वाटा ७० टक्के आहे. दिवसेंदिवस ही बाजारपेठ विस्तारतच जाणार असल्याने आपल्याकडील हिऱ्याला पैलू पाडणाऱ्या उद्योगास चांगले दिवस आले आहेत. प्रशिक्षित कामगारांना मोठय़ा प्रमाणात रोजगार देणारा हिऱ्याला पैलू पाडण्याचा हा उद्योग भारतात चांगलाच विकसित झाला आहे. जगाने अगदी चीनने देखील या उद्योगाकडे विशेष लक्ष पुरविलेले नाही. याचे कारण म्हणजे यासाठी आवश्यक असलेले कारागीर आपल्याकडे मोठय़ा संख्येने आहेत. या उद्योगामुळे देशाला अमूल्य असे विदेशी चलन मिळते. गेल्या दोन दशकांत गुंतवणुकीची साधने बदलत गेली असली तरीही सोन्याचे व हिऱ्याचे महत्त्व कमी झालेले नाही. समभागात गुंतवणूक करून झटपट नफा कमविण्याचा मार्ग अनेकांनी स्वीकारला असला तरी यात धोकाही असतो. त्या तुलनेत सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित व निश्चित भांडवलवृद्धी करणारी असते हे काळाने सिद्ध केले आहे. आपल्याकडे सोन्याची मागणी व पुरवठा याची तफावत फार मोठी आहे. सोन्याच्या खाणी आपल्या देशात नाहीत. त्या बहुतांशी आफ्रिकेत आहेत. त्यामुळे आपल्याला सोन्याची आयातच करावी लागते. त्याहून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आशिया खंडात सोन्याची सर्वात मोठी मागणी असली तरीही सोन्याचे दर ठरतात ते लंडन येथील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत! आणि नंतर जगात त्या दरानुसार किमतींची वध-घट होते. खरे तर सोन्याचे हे दर मुंबईत ठरले पाहिजेत, परंतु त्यादृष्टीने मार्केट विकसित करण्याचा सरकारने प्रयत्न केलेला नाही. मुंबई हे आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र झाल्यास सोन्या-चांदीची जागतिक बाजारपेठ मुंबईला हलू शकते. तसे झाल्यास देशाच्या विकासाच्या दृष्टीनेही तो एक सोन्याचा दिवस ठरेल. सोन्याची खरेदी काही लोक ‘व्यसन’ म्हणून करतात, तर काही एक निश्चित लाभाचे एक सुरक्षित साधन म्हणून! प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगवेगळे असले तरीही यातून एका मोठय़ा बाजारपेठेची निर्मिती झाली आहे. सोन्याच्या किमती कितीही वाढल्या तरी ही बाजारपेठ वाढतच जाणार हे निश्चित!

Friday, August 6, 2010

नियती वेडावून हसली - Part-1

नियती वेडावून हसली

भा. द. खेर लिखित ‘हिरोशिमा’ या पुस्तकाची पेपरबॅक आवृत्ती विहंग प्रकाशनतर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. त्यातील एक प्रकरण प्रसिद्ध करीत आहोत.
रविवारची, ७ डिसेंबर १९४१ची सुरेख सकाळ. त्या दिवशी धुक्यानंही सुट्टी घेतली असावी. पर्ल हार्बरला पहाटेच जाग आली. चर्चमध्ये जाण्यासाठी तसेच रविवारचे कार्यक्रम आखण्यासाठी घराघरात चर्चा सुरू होती. सगळीकडे धांदल-धावपळ उडाली होती.
जेमी जेफ्रेला रात्रभर झोप लागली नव्हती. शनिवारची रात्र त्याने मोटेलमध्येच मदिरा आणि मदिराक्षी यांच्या धुंद सहवासात घालवली होती. मध्यरात्रीनंतर त्यानं अंथरुणावर अंग टाकलं होतं, पण त्याला शांत झोप लागली नव्हती. अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. प्रत्येक दिवशी वॉशिंग्टनहून हवाईबेटांकडे संदेश येत होते. ‘कोणत्याही क्षणी शत्रूचा हल्ला होईल, सावध रहा’, असं सांगितलं जात होतं. परंतु अ‍ॅड्मिरल किमेल आणि जनरल शॉर्ट हे आपापसात नेहमी म्हणायचे, ‘अ‍ॅड्मिरल स्टार्कसाहेबांना उगाच चिंता वाटते. पर्ल हार्बपर्यंत येणं जपानला कधीच शक्य होणार नाही.’’
वरिष्ठाधिकाऱ्यांनी वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे त्या दोघांनीही दुर्लक्ष केलं होतं. ख्यालीखुशालीत खुशाल दिवस-रात्री घालवल्या होत्या. वरिष्ठाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिलं नव्हतं; मग जेमीनं दिलेल्या इशाऱ्याला ते थोडेच धूप घालणार होते? म्हणून जेमी जेफ्रे अस्वस्थ होता. त्याला झोप लागली नव्हती.
भल्या पहाटे तो उठला आणि ‘गोल्डन ईगल’ समोर येऊन उभा राहिला. बेकरी नुकतीच उघडली होती. म्हातारा युकिओ पाव-बिस्किटांची आकर्षक रचना करण्यात गुंतला होता. योको केक मांडून ठेवत होती. तिच्या रचनाकौशल्याकडे जेमी मन लावून बघत होता. मधूनच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून बघत होता.
त्याची चाहूल लागताच तिनं एकदम वळून त्याच्याकडे बघितलं. तेव्हा त्याची दृष्टी तिच्या उघडय़ा गळ्यावर स्थिर झाली होती.
जेमी जेफ्रे तिकडे टक लावून बघतो आहे हे तिच्या लक्षात येताच योको म्हणाली, ‘‘सभ्यतेनं वागायला तुला कुणी शिकवलेलं दिसत नाही.’’
छद्मी हास्य करून जेमी म्हणाला, ‘‘सगळ्याच ठिकाणी सभ्यतेनं थोडंच वागायचं असतं?’’
‘‘निदान माझ्याशी वागताना तरी सभ्यतेनं वागायला हवं!’’
‘‘मी तुला एवढंच विचारणार होतो की, हा मोठा केक तुझ्या एंगेजमेन्टसाठी तयार केला आहे की काय?’’
‘‘माझी एंगेजमेन्ट तुझ्यापर्यंत नाही येणार!’’
‘‘नाही कशी? तुला एखादी भेट द्यायला नको का? माझ्या कॉर्टर्समध्ये चल.. तिथे भेट देतो तुला!’’
जेमीनं डोळे मिचकावले.
योको म्हणाली, ‘‘तिथे येऊन काय करू?’’
‘‘तू काहीच करू नकोस. मला फक्त हवं ते दे!’’
‘‘तुला हवं ते देण्यापेक्षा इथे समुद्रात बुडालेलं काय वाईट?’’
मग तिनं गंभीरपणानं विचारलं, ‘‘बरं, तुला काय हवंय ते बोल!’’
‘‘योको.. योको हवीय मला!
‘‘योको फार महागात पडेल.. त्यापेक्षा आज घरीच पावरोटी घेऊन जा.. तुला भीती वाटते ना की, या आपल्या बंदरावर केव्हाही हल्ला होईल म्हणून.. पावरोटी घेतलेली असावी.’’
जेमी म्हणाला, ‘‘पावरोटी तर घेतोच, पण तू येणार असशील तर हा मोठा केकही घेतो. तुझ्या केकचा तेवढाच खप होईल.’’
‘‘नाही खपला तर समुद्रात बुडवून टाकीन..’’
तिच्या हातून पावरोटी घेतानाही जेमीनं आपला डावा डोळा मिचकावला.
त्याच्या हातात पाव देताना योको म्हणाली, ‘‘डोळ्यांत चांगलं औषध घाल. नाहीतर तुझे डोळे जातील. फार फडफड करताहेत तुझे डोळे.’’
जेमी जेफ्रे निघून गेल्यावर त्या बेकरीला क्षणाचीही उसंत मिळाली नाही. कारण त्या दिवशी रविवार होता. प्रत्येक रविवारी हे असंच व्हायचं. चर्चमध्ये जायची धांदल असायची. बेकरीतली पावरोटी बंगल्यात गेली म्हणजे न्याहारी व्हायची. मग चांगलेचुंगले कपडे अंगावर चढवून चर्चमध्ये जायची धांदल उडायची. चर्चमधली प्रार्थना आटोपल्यानंतर ज्याचा त्याचा सुट्टीचा कार्यक्रम सुरू व्हायचा. या कार्यक्रमात सवतासुभा नसायचा. या दिवशी नवीन गाठीभेटी व्हायच्या. ओळखीपाळखी व्हायच्या, परस्परांकडे जाणं-येणं वाढायचं, त्यातूनच प्रेमप्रकरणं निर्माण व्हायची. ती रंगायची. जुन्या प्रेमप्रकरणांची रंगत नाहीशी व्हायची. नव्या प्रेमप्रकरणांना गहिरा रंग चढायचा.
हवाईबेटांच्या परिसरात युद्धतळ पडला होता. पण साऱ्यांच्या कल्पनेतलं युद्ध दूर क्षितिजावर टांगलेलं दिसत होतं. लष्करी अधिकारीच जिथे युद्ध खेळण्याच्या कल्पनेनं नाचरंगात दंग होते तिथे इतरांची काय कथा? हवाईबेटांवर इथून तिथून ख्यालीखुशालीचं वातावरण पसरलेलं होतं. इष्काच्या रंगाढंगात हवाईबेटं बुडाली होती.
त्या दिवशी असाच आनंदी सूर्य उगवला. सकाळचे साडेसात वाजून गेले तेव्हा सागरावर उन्हं चांगलीच चमकायला लागली होती. सागराच्या जलाशयावरून उडणारे नीलवर्णी पक्षी पूर्व दिशेला झेपावत होते. जणू सागरतळावरून उडालेली विमानं शत्रूवर झेपावून जात असल्याचा भास होत होता. ते दृश्य नित्याचंच होतं, त्यात नवीन असं काहीच नव्हतं. निळं पाणी आणि निळं आकाश यांच्या सीमारेषेवर लावलेली ही नीलवर्णी पक्ष्यांची झालर कुणालाच विलोभनीय वाटलेली नव्हती. नित्य परिचयामुळे नित्य दिसणारी असली विलोभनीय दृश्यं नेहमीच दृष्टीआड होतात. त्याही दिवशी निसर्गाकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.
पर्ल हार्बरवरचं टेहळणी विमान आणि वॉर्ड ही युद्धनौका टेहळणीचं कार्य करून परतली. तिकडेही लोकांचं लक्ष नव्हतं. कारण रोजचं टेहळणीचं कार्य चाललेलं होतं. त्या दिवशीच्या टेहळणी-पथकाला पर्ल हार्बरपासून थोडय़ाच मैलांच्या अंतरावर एक जपानी पाणबुडी आढळली. ती त्यांनी बुडवूनही टाकली. परंतु तरीदेखील लष्करी अधिकारी निर्धास्त होते. त्या वेळी जपानच्या विमानवाहू नौका पर्ल हार्बरभोवतालच्या समुद्रात येऊन ठेपल्या होत्या. पण अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांची दखल मुळीच घेतली नव्हती.
एकदम आकाश घरघरलं. क्षितिजावर विमानांचे ठिपके दिसायला लागले. जणू नीलवर्णी पक्ष्यांच्या रांगा परत येत होत्या. चार.. पाच.. सहा.. दहा.. किती रांगा होत्या कुणास ठाऊक! अज्ञात विश्वातून कसलं तरी अनपेक्षित संकट ज्ञात विश्वात अवतीर्ण व्हावं असा भास झाला. हिकम फील्डच्या लष्करी केंद्रावर आणि फोर्ड आयलंडवरील नाविक तळावर जपानी बाँब आग ओकू लागले. त्याच्या आधीच जपानच्या विमानवाहू नौका पर्ल हार्बरच्या सागरात येऊन दाखल झाल्या होत्या. त्या नौकांवरील विमानांनी आकाशात झेप घेतली होती; आणि बंदरात उभ्या असलेल्या अमेरिकन युद्धनौकांवर मारा सुरू केला होता.
सगळीकडे गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरू झाला. काही लोक ओरडत होते.. ‘सायरन् सायरन.’ परंतु हवाई हल्ल्याची सूचना देणारी यंत्रंही बसवलेली नव्हती. जी तुटपुंजी व्यवस्था केलेली होती, ती फक्त रात्रीपुरती होती. तरीही लष्करी अधिकारी म्हणत होते, ‘ही केवळ हुलकावणी आहे.. खरा हल्ला इथे होणंच शक्य नाही!’’
जेमी जेफ्रे संतापला होता. त्याला धड बोलता येत नव्हतं. त्याच्या बोलण्याचा कसलाही उपयोग नव्हता.
अध्र्या तासाच्या बॉम्बवृष्टीत अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्यांची फार मोठी हानी झाली. नंतर जपानी विमानं आपल्या तळावर परतली.
सारं शांत झाल्यावर अ‍ॅड्मिरल किमेल जेमी जेफ्रेला म्हणाले, ‘‘मी सांगितलं नव्हतं ही हुलकावणी आहे म्हणून! त्या पत्रात लिहिल्याप्रमाणे पाचपन्नास विमानं आली.. आपण शत्रूची अठ्ठावीस विमानं पाडली!’’
जेमी जेफ्रे काहीशा संतप्त स्वरात म्हणाला, ‘‘आणि आपली किती हानी झाली? त्या पत्रावर तुम्ही विसंबून राहाता, कमालच म्हणायची! मी काय बोलणार? ही आपल्याला खरीच हुलकावणी होती.. पण वेगळ्या अर्थानं!’’
जनरल शॉर्ट मध्येच म्हणाले, ‘‘लष्करी डावपेच आम्हाला जास्त समजतात.. आता संपलं.. यापुढे काहीही घडणार नाही.’’
जनरल शॉर्ट यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. जेमी गप्पच होता.
मध्यंतरी पंधरा मिनिटं गेली असतील. विमानांची घरघर पुन्हा ऐकायला यायला लागली. विमानं फारच वेगळी दिसत होती. आकाशात वेडय़ावाकडय़ा आकृती रेखाटत ती झेपावत होती. ती कुठे जायला निघाली होती कुणास ठाऊक! तळावरच्या अमेरिकन सैनिकांना त्यांची दिशाही कळेना. काय करावं हेही समजेना.
जनरल शॉर्ट धीर देतच होते, ‘ती विमानं आपल्याकडे येणंच शक्य नाही. हुलकावणी चाललीय एवढंच!’
जनरलसाहेबांचं हे बोलणं हवेत विरतं न विरतं तोच पर्ल हार्बरवर आग पाखडली जाऊ लागली. पहिला हल्ला आणि दुसरा हल्ला मिळून तब्बल दोन तास पर्ल हार्बर भाजून निघालं.
मग खाली मान घालून या हल्ल्याचा नुसता हिशेब करण्याशिवाय अमेरिकन अधिकाऱ्यांना दुसरं कामच उरलं नव्हतं.
जपानी विमानांची घरघर सुरू झाल्यावर अमेरिकन युद्धनौकांवरील तोफखाना धडाडू लागला. पण तोफांचा मारा चुकवून जपानी विमानांनी पर्ल हार्बर झोडपून काढलं. पर्ल हार्बरलगतच्या ओहाऊ बेटावर दोनशे दोन विमानं होती. त्यापैकी दीडशे विमानं जपानच्या माऱ्यात निकामी झाली. पर्ल हार्बर बंदरात अमेरिकेच्या ८६ युद्धनौका उभ्या होत्या.
अ‍ॅड्मिरल किमेलनी नाविक तळावरील एका अधिकाऱ्याला विचारलं, ‘‘आरिझोना, ओकाहोमा, कॅलिफोर्निया या बडय़ा नौका आपल्या बंदरात उभ्या होत्या की नाही? काय केलं त्यांनी?’’
तो अधिकारी अदबीनं म्हणाला, ‘‘नेवाडा आणि वेस्ट व्हर्जिनिया या नौकाही उभ्या होत्या. पण बंदरात एकही विमानवाहू नौका नव्हती.. मग या युद्धनौका करणार काय?’’
अ‍ॅड्मिरलसाहेबांनी चिडून विचारलं, ‘‘या युद्धनौका तरी जाग्यावर आहेत का?’’
‘‘नाही सर कित्येक नौका बुडाल्या; आणि ज्या उभ्या असलेल्या दिसताहेत त्या निकामी झालेल्या आहेत..’’
जनरल शॉर्टनी मधेच विचारलं, ‘‘जपानची किती विमानं आली असावीत?’’
‘‘शंभर-सव्वाशे असावीत..’’
‘‘जास्त असावीत असं वाटतं..’’
जपानच्या साडेतीनशे विमानांनी पर्ल हार्बरवर धडक मारली होती, या गोष्टीची कुणालाच कल्पना नव्हती.
जनरल शॉर्ट यांनी तिथे जमलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना काहीशा करडय़ा आवाजात विचारलं, ‘‘विमानवाहू नौका बंदरात का ठेवली नाही? त्यामुळे हा सारा अनर्थ घडला.. एकही एअर क्राफ्ट कॅरिअर बंदरात असू नये हा गाफीलपणा झाला.’’
कुणीच काही बोललं नाही. गाफीलपणा झाला होता खरा! पण कुणाचा? त्या गाफीलपणाचं प्रायश्चित्त कुणाला मिळणार होतं?
पर्ल हार्बरच्या दुर्घटनेनंतर अमेरिकेनं जपानविरुद्ध युद्ध पुकारलं. जपानच्या गट्टी राष्ट्रांनीही अमेरिकेविरुद्ध रणशिंग फुंकलं होतं. त्यामुळे सारं जग युद्धाच्या खाईत सापडलं.
पर्ल हार्बरवरील हल्ल्याची वार्ता व्हाइट हाऊसमधून यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. ओहाऊ बेटातील सर्व नाविक आणि लष्करी ठाण्यांवरील जपाननं प्रखर हल्ला केल्याचंही स्वत: प्रे. रूझवेल्ट यांनीच जाहीर केलं होतं. जपानचा हा जय अमेरिकेच्या वर्मी चांगलाच झोंबला होता आणि किमेल-शॉर्ट या दोघांना त्याचे परिणाम भोगावे लागणार होते. त्या दोघांनी आपल्या मनाची तेवढी तयारी केली होती. जेमी जेफ्रेचं मन मात्र योकोत पुरतं गुंतलं होतं. त्याला दुसरं काही दिसत नव्हतं.
बृहत्पूर्व आशियाचं स्वप्न मात्र जपानच्या लष्करी प्रमुखांच्या टप्प्यात आलं होतं. मांचुरियापासून इंडोचायनापर्यंतच्या प्रदीर्घ प्रदेशात जपानी सेना युद्धसन्मुख होऊन उभ्या ठाकल्या होत्या. प्रधानमंत्री जनरल हिदेकी टोजो आणि परराष्ट्रमंत्री टोगो हे दोघेही गर्जून सांगत होते- ‘जपानच्या गेल्या सव्वीसशे वर्षांच्या इतिहासात एवढा बिकट प्रसंग निर्माण झाला नव्हता आणि अशी सुवर्णसंधीही आम्हाला मिळालेली नव्हती. त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी आम्ही आमच्या लष्करी सिद्धता झपाटय़ानं वाढवीत आहोत..’
पदरात पडलेल्या पहिल्याच विजयानं सारं राष्ट्र उत्साहानं उठलं. विजयाच्या उन्मादात काय करू आणि काय नको असं त्या राष्ट्राला होऊन गेलं.
जपान हा दिव्यांचा देश! आणि अजिंक्य समजलं जाणारं राष्ट्र! जय झाला की दिव्यांची मिरवणूक निघायची, ही सनातन परंपरा! पर्ल हार्बरच्या विजयानंतर राजधानीतून दिव्यांची भव्य मिरवणूक निघाली. सारं टोकियो शहर असंख्य दिव्यांनी झगमगून गेलं. दीपज्योतीतून आनंद ओसंडत होता. दिव्यांच्या विविध प्रकारांनी राजधानीचा सारा प्राकार प्रकाशला.
ही मिरवणूक प्रोफेसर निशिनांच्या अणुम्बॉब प्रयोगशाळेवरून चालली होती. ती भव्यदिव्य मिरवणूक बघण्यासाठी निशिना बाहेर आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताखालची मंडळी बाहेर आली.
त्या मिरवणुकीकडे बघून ते तामिकीला म्हणाले, ‘‘पहिला विजय मिळाला म्हणून लगेच ही मिरवणूक काढलेली दिसते. पण पहिला विजय हा शेवटचा विजय थोडाच असतो?’’
मिरवणुकीतल्या विजयी घोषात त्यांचं बोलणं सर्वाना ऐकू गेलं नाही. ते बोलायचे थांबले. बराच वेळ त्यांना थांबावं लागलं. कारण मिरवणूक फार मोठी होती. मिरवणुकीतले शेवटचे दिवे जेव्हा चालायला लागले तेव्हा निशिना म्हणाले, ‘‘जपाननं ही टक्कर घेतलेली आहे. पण अमेरिकेच्या शक्तीशी आपल्याला मुळीच टक्कर देता येणार नाही, हे एखादं लहान पोरही सांगू शकेल. जपानला याचे फार भीषण परिणाम भोगावे लागतील.’’
त्यांच्या बोलण्यावर कुणीच काही बोललं नाही. कारण तसं बोलण्याची सोयच उरली नव्हती. सारं राष्ट्र घरच्याच लष्कराच्या कैचीत सापडलं होतं. अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे संकटाला पाचारण करण्यासारखं होतं.

मग वृद्ध प्रोफेसर निशिना गंभीरपणानं एवढंच म्हणाले, ‘‘आपलं राष्ट्र हे बुडत्या जहाजासारखं बनलं आहे. हे जहाज केव्हा बुडेल त्याचा नेम नाही. पण या बुडत्या जहाजाला आपण हात दिला पाहिजे- सर्व शक्ती एकवटून! बुडू देता कामा नये या जहाजाला!’’
तसं पाहिलं तर गेल्या अध्र्या शतकाच्या अवधीत जपाननं फार वर डोकं काढलं होतं. जगातल्या बडय़ा राष्ट्रांत त्याची गणना व्हायला लागली होती. स्वत: निशिना हे फार उमदे आणि बुद्धिमान शास्त्रज्ञ होते. राजावर जसं त्यांचं प्रेम होतं, तसंच आपल्या या बलाढय़ झालेल्या राष्ट्रावरही प्रेम होतं. आपला राजा पराभूत व्हावा किंवा आपलं अजिंक्य राष्ट्र गर्तेत जाऊन बुडावं असं त्यांना मुळीच वाटत नव्हतं. देशभक्ती तर त्यांच्या रोमारोमात भिनली होती. म्हणूनच त्यांच्यावर अणुम्बॉब-निर्मितीची जबाबदारी टाकलेली होती.
परंतु पट्टीचा शास्त्रज्ञ कधीच स्वप्नरंजनात गुंतून पडत नाही. ती विजयी मिरवणूक बघत असताना त्यांच्या मनातले विचार त्यांना मनावेगळे करता आले नव्हते. त्यांच्या विचारांना एकदम वाचा फुटली होती. प्रो. निशिनांनी भविष्यकाळात डोकावून बघितलं होतं; आणि भविष्यकाळाच्या पडद्यातून त्यांना जे दिसलं होतं ते त्यांनी बोलून दाखवलं होतं.
पूर्व दिशेला युद्धाची ठिणगी पडली होती. युद्धाच्या कोठारावर पडलेल्या या एका ठिणगीनंही आगडोंब उसळणार होता. त्या आगीच्या ज्वाला धुमसायला लागल्या होत्या. त्यातूनच अग्निप्रलय होणार होता.
केव्हा?
कुठे?..
त्या वेळी तरी ते कुणालाच माहीत नव्हतं.

नियती वेडावून हसली - Part-1

नियती वेडावून हसली

भा. द. खेर लिखित ‘हिरोशिमा’ या पुस्तकाची पेपरबॅक आवृत्ती विहंग प्रकाशनतर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. त्यातील एक प्रकरण प्रसिद्ध करीत आहोत.
रविवारची, ७ डिसेंबर १९४१ची सुरेख सकाळ. त्या दिवशी धुक्यानंही सुट्टी घेतली असावी. पर्ल हार्बरला पहाटेच जाग आली. चर्चमध्ये जाण्यासाठी तसेच रविवारचे कार्यक्रम आखण्यासाठी घराघरात चर्चा सुरू होती. सगळीकडे धांदल-धावपळ उडाली होती.
जेमी जेफ्रेला रात्रभर झोप लागली नव्हती. शनिवारची रात्र त्याने मोटेलमध्येच मदिरा आणि मदिराक्षी यांच्या धुंद सहवासात घालवली होती. मध्यरात्रीनंतर त्यानं अंथरुणावर अंग टाकलं होतं, पण त्याला शांत झोप लागली नव्हती. अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. प्रत्येक दिवशी वॉशिंग्टनहून हवाईबेटांकडे संदेश येत होते. ‘कोणत्याही क्षणी शत्रूचा हल्ला होईल, सावध रहा’, असं सांगितलं जात होतं. परंतु अ‍ॅड्मिरल किमेल आणि जनरल शॉर्ट हे आपापसात नेहमी म्हणायचे, ‘अ‍ॅड्मिरल स्टार्कसाहेबांना उगाच चिंता वाटते. पर्ल हार्बपर्यंत येणं जपानला कधीच शक्य होणार नाही.’’
वरिष्ठाधिकाऱ्यांनी वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे त्या दोघांनीही दुर्लक्ष केलं होतं. ख्यालीखुशालीत खुशाल दिवस-रात्री घालवल्या होत्या. वरिष्ठाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिलं नव्हतं; मग जेमीनं दिलेल्या इशाऱ्याला ते थोडेच धूप घालणार होते? म्हणून जेमी जेफ्रे अस्वस्थ होता. त्याला झोप लागली नव्हती.
भल्या पहाटे तो उठला आणि ‘गोल्डन ईगल’ समोर येऊन उभा राहिला. बेकरी नुकतीच उघडली होती. म्हातारा युकिओ पाव-बिस्किटांची आकर्षक रचना करण्यात गुंतला होता. योको केक मांडून ठेवत होती. तिच्या रचनाकौशल्याकडे जेमी मन लावून बघत होता. मधूनच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून बघत होता.
त्याची चाहूल लागताच तिनं एकदम वळून त्याच्याकडे बघितलं. तेव्हा त्याची दृष्टी तिच्या उघडय़ा गळ्यावर स्थिर झाली होती.
जेमी जेफ्रे तिकडे टक लावून बघतो आहे हे तिच्या लक्षात येताच योको म्हणाली, ‘‘सभ्यतेनं वागायला तुला कुणी शिकवलेलं दिसत नाही.’’
छद्मी हास्य करून जेमी म्हणाला, ‘‘सगळ्याच ठिकाणी सभ्यतेनं थोडंच वागायचं असतं?’’
‘‘निदान माझ्याशी वागताना तरी सभ्यतेनं वागायला हवं!’’
‘‘मी तुला एवढंच विचारणार होतो की, हा मोठा केक तुझ्या एंगेजमेन्टसाठी तयार केला आहे की काय?’’
‘‘माझी एंगेजमेन्ट तुझ्यापर्यंत नाही येणार!’’
‘‘नाही कशी? तुला एखादी भेट द्यायला नको का? माझ्या कॉर्टर्समध्ये चल.. तिथे भेट देतो तुला!’’
जेमीनं डोळे मिचकावले.
योको म्हणाली, ‘‘तिथे येऊन काय करू?’’
‘‘तू काहीच करू नकोस. मला फक्त हवं ते दे!’’
‘‘तुला हवं ते देण्यापेक्षा इथे समुद्रात बुडालेलं काय वाईट?’’
मग तिनं गंभीरपणानं विचारलं, ‘‘बरं, तुला काय हवंय ते बोल!’’
‘‘योको.. योको हवीय मला!
‘‘योको फार महागात पडेल.. त्यापेक्षा आज घरीच पावरोटी घेऊन जा.. तुला भीती वाटते ना की, या आपल्या बंदरावर केव्हाही हल्ला होईल म्हणून.. पावरोटी घेतलेली असावी.’’
जेमी म्हणाला, ‘‘पावरोटी तर घेतोच, पण तू येणार असशील तर हा मोठा केकही घेतो. तुझ्या केकचा तेवढाच खप होईल.’’
‘‘नाही खपला तर समुद्रात बुडवून टाकीन..’’
तिच्या हातून पावरोटी घेतानाही जेमीनं आपला डावा डोळा मिचकावला.
त्याच्या हातात पाव देताना योको म्हणाली, ‘‘डोळ्यांत चांगलं औषध घाल. नाहीतर तुझे डोळे जातील. फार फडफड करताहेत तुझे डोळे.’’
जेमी जेफ्रे निघून गेल्यावर त्या बेकरीला क्षणाचीही उसंत मिळाली नाही. कारण त्या दिवशी रविवार होता. प्रत्येक रविवारी हे असंच व्हायचं. चर्चमध्ये जायची धांदल असायची. बेकरीतली पावरोटी बंगल्यात गेली म्हणजे न्याहारी व्हायची. मग चांगलेचुंगले कपडे अंगावर चढवून चर्चमध्ये जायची धांदल उडायची. चर्चमधली प्रार्थना आटोपल्यानंतर ज्याचा त्याचा सुट्टीचा कार्यक्रम सुरू व्हायचा. या कार्यक्रमात सवतासुभा नसायचा. या दिवशी नवीन गाठीभेटी व्हायच्या. ओळखीपाळखी व्हायच्या, परस्परांकडे जाणं-येणं वाढायचं, त्यातूनच प्रेमप्रकरणं निर्माण व्हायची. ती रंगायची. जुन्या प्रेमप्रकरणांची रंगत नाहीशी व्हायची. नव्या प्रेमप्रकरणांना गहिरा रंग चढायचा.
हवाईबेटांच्या परिसरात युद्धतळ पडला होता. पण साऱ्यांच्या कल्पनेतलं युद्ध दूर क्षितिजावर टांगलेलं दिसत होतं. लष्करी अधिकारीच जिथे युद्ध खेळण्याच्या कल्पनेनं नाचरंगात दंग होते तिथे इतरांची काय कथा? हवाईबेटांवर इथून तिथून ख्यालीखुशालीचं वातावरण पसरलेलं होतं. इष्काच्या रंगाढंगात हवाईबेटं बुडाली होती.
त्या दिवशी असाच आनंदी सूर्य उगवला. सकाळचे साडेसात वाजून गेले तेव्हा सागरावर उन्हं चांगलीच चमकायला लागली होती. सागराच्या जलाशयावरून उडणारे नीलवर्णी पक्षी पूर्व दिशेला झेपावत होते. जणू सागरतळावरून उडालेली विमानं शत्रूवर झेपावून जात असल्याचा भास होत होता. ते दृश्य नित्याचंच होतं, त्यात नवीन असं काहीच नव्हतं. निळं पाणी आणि निळं आकाश यांच्या सीमारेषेवर लावलेली ही नीलवर्णी पक्ष्यांची झालर कुणालाच विलोभनीय वाटलेली नव्हती. नित्य परिचयामुळे नित्य दिसणारी असली विलोभनीय दृश्यं नेहमीच दृष्टीआड होतात. त्याही दिवशी निसर्गाकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.
पर्ल हार्बरवरचं टेहळणी विमान आणि वॉर्ड ही युद्धनौका टेहळणीचं कार्य करून परतली. तिकडेही लोकांचं लक्ष नव्हतं. कारण रोजचं टेहळणीचं कार्य चाललेलं होतं. त्या दिवशीच्या टेहळणी-पथकाला पर्ल हार्बरपासून थोडय़ाच मैलांच्या अंतरावर एक जपानी पाणबुडी आढळली. ती त्यांनी बुडवूनही टाकली. परंतु तरीदेखील लष्करी अधिकारी निर्धास्त होते. त्या वेळी जपानच्या विमानवाहू नौका पर्ल हार्बरभोवतालच्या समुद्रात येऊन ठेपल्या होत्या. पण अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांची दखल मुळीच घेतली नव्हती.
एकदम आकाश घरघरलं. क्षितिजावर विमानांचे ठिपके दिसायला लागले. जणू नीलवर्णी पक्ष्यांच्या रांगा परत येत होत्या. चार.. पाच.. सहा.. दहा.. किती रांगा होत्या कुणास ठाऊक! अज्ञात विश्वातून कसलं तरी अनपेक्षित संकट ज्ञात विश्वात अवतीर्ण व्हावं असा भास झाला. हिकम फील्डच्या लष्करी केंद्रावर आणि फोर्ड आयलंडवरील नाविक तळावर जपानी बाँब आग ओकू लागले. त्याच्या आधीच जपानच्या विमानवाहू नौका पर्ल हार्बरच्या सागरात येऊन दाखल झाल्या होत्या. त्या नौकांवरील विमानांनी आकाशात झेप घेतली होती; आणि बंदरात उभ्या असलेल्या अमेरिकन युद्धनौकांवर मारा सुरू केला होता.
सगळीकडे गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरू झाला. काही लोक ओरडत होते.. ‘सायरन् सायरन.’ परंतु हवाई हल्ल्याची सूचना देणारी यंत्रंही बसवलेली नव्हती. जी तुटपुंजी व्यवस्था केलेली होती, ती फक्त रात्रीपुरती होती. तरीही लष्करी अधिकारी म्हणत होते, ‘ही केवळ हुलकावणी आहे.. खरा हल्ला इथे होणंच शक्य नाही!’’
जेमी जेफ्रे संतापला होता. त्याला धड बोलता येत नव्हतं. त्याच्या बोलण्याचा कसलाही उपयोग नव्हता.
अध्र्या तासाच्या बॉम्बवृष्टीत अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्यांची फार मोठी हानी झाली. नंतर जपानी विमानं आपल्या तळावर परतली.
सारं शांत झाल्यावर अ‍ॅड्मिरल किमेल जेमी जेफ्रेला म्हणाले, ‘‘मी सांगितलं नव्हतं ही हुलकावणी आहे म्हणून! त्या पत्रात लिहिल्याप्रमाणे पाचपन्नास विमानं आली.. आपण शत्रूची अठ्ठावीस विमानं पाडली!’’
जेमी जेफ्रे काहीशा संतप्त स्वरात म्हणाला, ‘‘आणि आपली किती हानी झाली? त्या पत्रावर तुम्ही विसंबून राहाता, कमालच म्हणायची! मी काय बोलणार? ही आपल्याला खरीच हुलकावणी होती.. पण वेगळ्या अर्थानं!’’
जनरल शॉर्ट मध्येच म्हणाले, ‘‘लष्करी डावपेच आम्हाला जास्त समजतात.. आता संपलं.. यापुढे काहीही घडणार नाही.’’
जनरल शॉर्ट यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. जेमी गप्पच होता.
मध्यंतरी पंधरा मिनिटं गेली असतील. विमानांची घरघर पुन्हा ऐकायला यायला लागली. विमानं फारच वेगळी दिसत होती. आकाशात वेडय़ावाकडय़ा आकृती रेखाटत ती झेपावत होती. ती कुठे जायला निघाली होती कुणास ठाऊक! तळावरच्या अमेरिकन सैनिकांना त्यांची दिशाही कळेना. काय करावं हेही समजेना.
जनरल शॉर्ट धीर देतच होते, ‘ती विमानं आपल्याकडे येणंच शक्य नाही. हुलकावणी चाललीय एवढंच!’
जनरलसाहेबांचं हे बोलणं हवेत विरतं न विरतं तोच पर्ल हार्बरवर आग पाखडली जाऊ लागली. पहिला हल्ला आणि दुसरा हल्ला मिळून तब्बल दोन तास पर्ल हार्बर भाजून निघालं.
मग खाली मान घालून या हल्ल्याचा नुसता हिशेब करण्याशिवाय अमेरिकन अधिकाऱ्यांना दुसरं कामच उरलं नव्हतं.
जपानी विमानांची घरघर सुरू झाल्यावर अमेरिकन युद्धनौकांवरील तोफखाना धडाडू लागला. पण तोफांचा मारा चुकवून जपानी विमानांनी पर्ल हार्बर झोडपून काढलं. पर्ल हार्बरलगतच्या ओहाऊ बेटावर दोनशे दोन विमानं होती. त्यापैकी दीडशे विमानं जपानच्या माऱ्यात निकामी झाली. पर्ल हार्बर बंदरात अमेरिकेच्या ८६ युद्धनौका उभ्या होत्या.
अ‍ॅड्मिरल किमेलनी नाविक तळावरील एका अधिकाऱ्याला विचारलं, ‘‘आरिझोना, ओकाहोमा, कॅलिफोर्निया या बडय़ा नौका आपल्या बंदरात उभ्या होत्या की नाही? काय केलं त्यांनी?’’
तो अधिकारी अदबीनं म्हणाला, ‘‘नेवाडा आणि वेस्ट व्हर्जिनिया या नौकाही उभ्या होत्या. पण बंदरात एकही विमानवाहू नौका नव्हती.. मग या युद्धनौका करणार काय?’’
अ‍ॅड्मिरलसाहेबांनी चिडून विचारलं, ‘‘या युद्धनौका तरी जाग्यावर आहेत का?’’
‘‘नाही सर कित्येक नौका बुडाल्या; आणि ज्या उभ्या असलेल्या दिसताहेत त्या निकामी झालेल्या आहेत..’’
जनरल शॉर्टनी मधेच विचारलं, ‘‘जपानची किती विमानं आली असावीत?’’
‘‘शंभर-सव्वाशे असावीत..’’
‘‘जास्त असावीत असं वाटतं..’’
जपानच्या साडेतीनशे विमानांनी पर्ल हार्बरवर धडक मारली होती, या गोष्टीची कुणालाच कल्पना नव्हती.
जनरल शॉर्ट यांनी तिथे जमलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना काहीशा करडय़ा आवाजात विचारलं, ‘‘विमानवाहू नौका बंदरात का ठेवली नाही? त्यामुळे हा सारा अनर्थ घडला.. एकही एअर क्राफ्ट कॅरिअर बंदरात असू नये हा गाफीलपणा झाला.’’
कुणीच काही बोललं नाही. गाफीलपणा झाला होता खरा! पण कुणाचा? त्या गाफीलपणाचं प्रायश्चित्त कुणाला मिळणार होतं?
पर्ल हार्बरच्या दुर्घटनेनंतर अमेरिकेनं जपानविरुद्ध युद्ध पुकारलं. जपानच्या गट्टी राष्ट्रांनीही अमेरिकेविरुद्ध रणशिंग फुंकलं होतं. त्यामुळे सारं जग युद्धाच्या खाईत सापडलं.
पर्ल हार्बरवरील हल्ल्याची वार्ता व्हाइट हाऊसमधून यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. ओहाऊ बेटातील सर्व नाविक आणि लष्करी ठाण्यांवरील जपाननं प्रखर हल्ला केल्याचंही स्वत: प्रे. रूझवेल्ट यांनीच जाहीर केलं होतं. जपानचा हा जय अमेरिकेच्या वर्मी चांगलाच झोंबला होता आणि किमेल-शॉर्ट या दोघांना त्याचे परिणाम भोगावे लागणार होते. त्या दोघांनी आपल्या मनाची तेवढी तयारी केली होती. जेमी जेफ्रेचं मन मात्र योकोत पुरतं गुंतलं होतं. त्याला दुसरं काही दिसत नव्हतं.
बृहत्पूर्व आशियाचं स्वप्न मात्र जपानच्या लष्करी प्रमुखांच्या टप्प्यात आलं होतं. मांचुरियापासून इंडोचायनापर्यंतच्या प्रदीर्घ प्रदेशात जपानी सेना युद्धसन्मुख होऊन उभ्या ठाकल्या होत्या. प्रधानमंत्री जनरल हिदेकी टोजो आणि परराष्ट्रमंत्री टोगो हे दोघेही गर्जून सांगत होते- ‘जपानच्या गेल्या सव्वीसशे वर्षांच्या इतिहासात एवढा बिकट प्रसंग निर्माण झाला नव्हता आणि अशी सुवर्णसंधीही आम्हाला मिळालेली नव्हती. त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी आम्ही आमच्या लष्करी सिद्धता झपाटय़ानं वाढवीत आहोत..’
पदरात पडलेल्या पहिल्याच विजयानं सारं राष्ट्र उत्साहानं उठलं. विजयाच्या उन्मादात काय करू आणि काय नको असं त्या राष्ट्राला होऊन गेलं.
जपान हा दिव्यांचा देश! आणि अजिंक्य समजलं जाणारं राष्ट्र! जय झाला की दिव्यांची मिरवणूक निघायची, ही सनातन परंपरा! पर्ल हार्बरच्या विजयानंतर राजधानीतून दिव्यांची भव्य मिरवणूक निघाली. सारं टोकियो शहर असंख्य दिव्यांनी झगमगून गेलं. दीपज्योतीतून आनंद ओसंडत होता. दिव्यांच्या विविध प्रकारांनी राजधानीचा सारा प्राकार प्रकाशला.
ही मिरवणूक प्रोफेसर निशिनांच्या अणुम्बॉब प्रयोगशाळेवरून चालली होती. ती भव्यदिव्य मिरवणूक बघण्यासाठी निशिना बाहेर आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताखालची मंडळी बाहेर आली.
त्या मिरवणुकीकडे बघून ते तामिकीला म्हणाले, ‘‘पहिला विजय मिळाला म्हणून लगेच ही मिरवणूक काढलेली दिसते. पण पहिला विजय हा शेवटचा विजय थोडाच असतो?’’
मिरवणुकीतल्या विजयी घोषात त्यांचं बोलणं सर्वाना ऐकू गेलं नाही. ते बोलायचे थांबले. बराच वेळ त्यांना थांबावं लागलं. कारण मिरवणूक फार मोठी होती. मिरवणुकीतले शेवटचे दिवे जेव्हा चालायला लागले तेव्हा निशिना म्हणाले, ‘‘जपाननं ही टक्कर घेतलेली आहे. पण अमेरिकेच्या शक्तीशी आपल्याला मुळीच टक्कर देता येणार नाही, हे एखादं लहान पोरही सांगू शकेल. जपानला याचे फार भीषण परिणाम भोगावे लागतील.’’
त्यांच्या बोलण्यावर कुणीच काही बोललं नाही. कारण तसं बोलण्याची सोयच उरली नव्हती. सारं राष्ट्र घरच्याच लष्कराच्या कैचीत सापडलं होतं. अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे संकटाला पाचारण करण्यासारखं होतं.

मग वृद्ध प्रोफेसर निशिना गंभीरपणानं एवढंच म्हणाले, ‘‘आपलं राष्ट्र हे बुडत्या जहाजासारखं बनलं आहे. हे जहाज केव्हा बुडेल त्याचा नेम नाही. पण या बुडत्या जहाजाला आपण हात दिला पाहिजे- सर्व शक्ती एकवटून! बुडू देता कामा नये या जहाजाला!’’
तसं पाहिलं तर गेल्या अध्र्या शतकाच्या अवधीत जपाननं फार वर डोकं काढलं होतं. जगातल्या बडय़ा राष्ट्रांत त्याची गणना व्हायला लागली होती. स्वत: निशिना हे फार उमदे आणि बुद्धिमान शास्त्रज्ञ होते. राजावर जसं त्यांचं प्रेम होतं, तसंच आपल्या या बलाढय़ झालेल्या राष्ट्रावरही प्रेम होतं. आपला राजा पराभूत व्हावा किंवा आपलं अजिंक्य राष्ट्र गर्तेत जाऊन बुडावं असं त्यांना मुळीच वाटत नव्हतं. देशभक्ती तर त्यांच्या रोमारोमात भिनली होती. म्हणूनच त्यांच्यावर अणुम्बॉब-निर्मितीची जबाबदारी टाकलेली होती.
परंतु पट्टीचा शास्त्रज्ञ कधीच स्वप्नरंजनात गुंतून पडत नाही. ती विजयी मिरवणूक बघत असताना त्यांच्या मनातले विचार त्यांना मनावेगळे करता आले नव्हते. त्यांच्या विचारांना एकदम वाचा फुटली होती. प्रो. निशिनांनी भविष्यकाळात डोकावून बघितलं होतं; आणि भविष्यकाळाच्या पडद्यातून त्यांना जे दिसलं होतं ते त्यांनी बोलून दाखवलं होतं.
पूर्व दिशेला युद्धाची ठिणगी पडली होती. युद्धाच्या कोठारावर पडलेल्या या एका ठिणगीनंही आगडोंब उसळणार होता. त्या आगीच्या ज्वाला धुमसायला लागल्या होत्या. त्यातूनच अग्निप्रलय होणार होता.
केव्हा?
कुठे?..
त्या वेळी तरी ते कुणालाच माहीत नव्हतं.

Monday, July 26, 2010

लॉकरबी बॉम्बर, दहशतवादाचे कॉर्पोरेट धागे

प्रशांत दीक्षित, रविवार, २५ जुलै २०१०
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=88579%3A2010-07-24-14-49-03&catid=55%3A2009-07-20-04-00-45&Itemid=13
आर्थिक स्वार्थ जपण्यासाठी कडव्या दहशतवाद्याला मुक्त करावे काय, हा प्रश्न सध्या ब्रिटन व अमेरिकेत चर्चेला आला आहे. या प्रश्नाचे उत्तर सोपे असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणतेही प्रकरण नेहमी गुंतागुंतीचे होते. तसेच हेही झाले असून ब्रिटनचे नवे सरकार अडचणीत सापडले आहे. स्कॉटलंडमधील लॉकरबी येथील प्रकरणातून भारतालाही शिकण्यासारखे बरेच आहे. किंबहुना पाकिस्तानला मार्गावर आणण्यासाठी काय करता येईल याबद्दल काही आडाखे यातून बांधता येतात.बावीस वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर २१, १९८८ याच दिवशी पॅन अ‍ॅम कंपनीचे लंडनहून न्यूयॉर्कला जाणारे विमान आकाशातच बॉम्बने उडविण्यात आले. दक्षिण स्कॉटलंडमधील लॉकरबी शहराजवळ ते कोसळले. यामध्ये २४३ प्रवासी, १६ विमान कर्मचारी व विमान शहराजवळ पडल्यामुळे काही स्थानिक नागरिकही ठार झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे लक्षात येताच स्कॉटलंड पोलीस व एफबीआय या अमेरिकी गुप्तचर संस्थेने संयुक्तपणे तपास सुरू केला. तीन वर्षे चाललेल्या तपासातून या हल्ल्याचे धागेदोरे लिबियात असल्याचे आढळून आले. लिबियन अरब एअरलाइन्सचा सुरक्षा प्रमुख अली अल मेग्राही आणि याच एअरलाईन्सचा माल्टा विमानतळावरील स्टेशन मॅनेजर खलिफा फिमा हे या हल्ल्याचे सूत्रधार असल्याचे कळून आले. दोघेही लिबियात पळून गेले होते. दोघेही लिबियाच्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी होते व छुपेपणे अन्य देशात काम करीत असत. पाकिस्तानच्या आयएसएप्रमाणेच लिबियाची संस्था काम करीत असे. सध्या ज्या प्रमाणे येमेन हा दहशतवाद्यांचा अड्डा समजला जातो, तसा त्यावेळी लिबिया होता.संशयित कोण हे निश्चित होताच अमेरिकेने लिबियावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. संशयितांना स्कॉटलंड पोलीसांच्या हवाली करण्याचा आग्रह लिबियाकडे सुरू झाला. लिबिया तयार नव्हता. लगेच युनोच्या सुरक्षा परिषदेने लिबियावर र्निबध लादले. लिबियाची कमालीची आर्थिक कोंडी करण्यात आली. लिबियाचा सर्वेसर्वा कर्नल गडाफीने शेवटी या दोघांना स्कॉटलंड पोलीसांच्या हवाली केले. हे सर्व होण्यास दहा वर्षांचा कालावधी लागला.या नंतर दोघांवर खटला सुरू झाला. २००१मध्ये मेग्राहीवरील आरोप सिद्ध झाला. त्याला २७ वर्षांची शिक्षा झाली. मात्र पुराव्याअभावी खलिफाची सुटका झाली. मेग्राहीने शिक्षेविरुद्ध अपील केले. अगदी युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राईटस्चे दरवाजे ठोठावले. त्याचे अर्ज फेटाळले गेले. पण स्कॉटिश क्रिमिनल केसेस रिव्ह्यू कमिशनने त्याचा खटला ऐकला. मेग्राहीला बचावाची पुरेशी संधी मिळालेली नाही, असे मत नोंदवून कमिशनने त्याचे प्रकरण एडिंबरो कोर्टात पाठवले. त्यानंतर ऑगस्ट २०, २००९, म्हणजे गेल्या वर्षी दयाबुद्धीने त्याची सुटका केली गेली. त्याला प्रोस्टेट कॅन्सर झाला असून तो जास्तीत जास्त तीन महिने जगण्याची शक्यता असल्याने त्याची सुटका करावी, असे स्कॉटलंड सरकारचे म्हणणे पडले. हे खटले चालू असताना अमेरिकेने लिबियावर दबाव कायम ठेवला. शेवटी ऑगस्ट १५,२००३ मध्ये दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लिबियाने अधिकृतपणे युनोत स्वीकारली. इतकेच नव्हे तर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी आठ दशलक्ष डॉलर्सची नुकसानभरपाई दिली. भरभक्कम नुकसानभरपाई मिळाल्यानंतर लिबियावरील र्निबध उठविण्यास अमेरिकेने मान्यता दिली. अमेरिकी नागरिकांचा बळी पडला की अमेरिका कशी वागते याचे हे उदाहरण आहे.स्कॉटलंड व युरोपच्या न्यायप्रक्रियेत अमेरिकेने हस्तक्षेप केला नसला तरी मेग्राहीची सुटका अमेरिकेला आवडली नव्हती. मेग्राही लिबियात परतला. मात्र त्याच्यावर एफबीआयचे लक्ष होते. तीन महिने उलटून गेले तरी तो मेला नाही. आज वर्ष झाले तरीही तो जिवंत आहे हे कळताच अमेरिकेतील काही सिनेटर्सनी हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले. या दहशतवादी मारेकऱ्याच्या आयुष्यातील प्रत्येक नवा दिवस ही त्याच्या हिंस्त्र कृत्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना डागण्या देतो, अशा शब्दात अमेरिकी सरकारच्या प्रवक्त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.दरम्यान या प्रकरणातील एक नवा धागा पुढे आला. ब्रिटिश पेट्रोलियम या बहुराष्ट्रीय कंपनीने मेग्राहीच्या सुटकेत महत्वाची भूमिका बजावल्याची बातमी फुटली. लिबियाच्या समुद्रातील काही तेलसाठय़ांवर ब्रिटिश पेट्रोलियमला ताबा मिळवायचा होता. सर मार्क अ‍ॅलन हा कंपनीचा बडा अधिकारी त्यासाठी प्रयत्न करीत होता. मार्क अ‍ॅलन पूर्वी एमआय-६ या बिटिश इंटेलिजन्स सव्‍‌र्हिससाठी काम करीत होता. न्यायखात्याचा माजी मंत्री जॅक स्ट्रॉ हा त्याला मदत करीत होता. हे दोघे सरकारमध्ये काम करीत असतानाच त्यांनी कर्नल गडाफीशी संधान बांधून लिबिया व ब्रिटन यांच्यात, कैद्यांना परस्परांकडे पाठविण्याचा,सामंजस्य करार घडवून आणला. या कराराचा फायदा मेग्राहीला मिळाला. त्याची सुटका झाली.ब्रिटीश पेट्रोलियमला तेलाचे कंत्राट मिळवायचे होते, तर मेघराहीला परत आणणे हे गडाफीसाठी आवश्यक होते. ब्रिटीश पेट्रोलियमला तेल साठे मिळण्यात ब्रिटीश सरकारचा फायदा होता. हे कंत्राट सुमारे ५० कोटी पौंडाचे होते. त्या बदल्यात एखादा दहशतवादी सोडून देण्यास ब्रिटीश सरकारही तयार होते. मग त्याने शेकडो जणांचे बळी घेतले असले तरी त्यापेक्षा पैसा महत्वाचा होता.ब्रिटीश व अमेरिकेतील वृत्तपत्रांनी हा विषय लावून धरला आहे. ‘गार्डीयन’ व ‘टेलिग्राफ’मध्ये विशेष वृत्तांत प्रसिध्द होत आहेत. तेलासाठी मेग्राहीची सुटका केली नाही, तो आजारी होता म्हणूनच केली, असे ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरून यांनी प्रथम सांगितले असले तरी मेग्राहीसाठी काही देवघेव झाल्याचे आता ते अप्रत्यक्षपणे मान्य करू लागले आहेत. हिलरी क्लिंटन यांनी चौकशीचे आश्वासन दिले. ब्रिटीश पेट्रोलियम ही कंपनी ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाका अशी मागणी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या परिसरातील कंपनीचे तेल उत्खनन थांबविण्यात यावे असे सुचविण्यात आले आहे. मेक्सिकोमधील तेल गळतीमुळे आधीच अडचणीत आलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमवर या नव्या अडचणीला तोंड द्यायची वेळ आली. दहशतवाद्याला मुक्त करण्यासाठी धडपड केल्याच्या आरोपामुळे कंपनीचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.हे प्रकरण अद्याप संपलेले नाही. आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या सरकारला हाताशी धरून कशी कामे करतात याची बरीच माहिती अजूनही हाती येईल. मात्र या प्रकरणातून भारताला काही धडे घेता येतील.लिबियाप्रमाणेच पाकिस्तानमधील लष्करी अधिकारी ‘लष्कर ए तैयब्बा’सारख्या दहशतवादी संघटनांना भरपूर मदत करीत आहेत. हा सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे. लिबियाने असाच सरकार पुरस्कृत दहशतवाद चालविला. पण अमेरिकी सरकार, युनो, त्याचबरोबर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांचे कुटुंबिय, तेथील पोलीस या सर्वानी एकत्रित काम केले. अन्य देशांची मदत घेण्यात आली व लिबियाकडून गुन्हेगार ताब्यात घेतले.पाकिस्तान दहशतवादी गटांना पोसत आहे हा आता फक्त भारताचा आरोप नसून खुद्द अमेरिकी गुप्तचर यंत्रणाही तसेच म्हणत आहेत. डेव्हिड कोलमन हेडलीच्या जबाबाने त्याला पुष्टी दिली आहे. हा जबाब भारतात घेतलेला नसून अमेरिकेनेच घेतला असल्याने त्याच्या सच्चेपणाबद्दल जगाला शंका नसावी. अशा स्थितीत लिबियावर जसा दबाव आणला गेला तसाच दबाव अमेरिका पाकिस्तानवर का आणीत नाही व मेघराहीप्रमाणे हफीझ सईदसारख्या भारतविरोधी दहशतवादी कारवाया आखणाऱ््या सूत्रधाराला भारताच्या हवाली करण्याचा आग्रह का धरीत नाही?अमेरिका तसे करणार नाही. कारण अमेरिकेच्या आर्थिक हितसंबंधांना भारतात अद्याप धक्का बसलेला नाही. दुसरे कारण अधिक महत्वाचे आहे. भारत सरकारने हा आग्रह जागतिक पातळीवर जोमाने मांडलेला नाही. पाकिस्तानच्या कारवायांच्या विरोधात भारताने अद्याप आंतरराष्ट्रीय आघाडी उघडलेली नाही. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ तसेच कॅबिनेट सेक्रेटरीएटमध्ये काम केलेले माजी सहसचिव बी रामन यांनी याबाबत काही मुद्दे मांडले आहेत. भारताने काय केले नाही याची यादीच त्यांनी दिली आहे. युनोच्या सुरक्षा परिषदेसमोर आपण मुंबईवरील हल्ल्याचा विषय अद्याप नेलेला नाही, युनोच्या दहशतवाद विरोधी समितीसमोर आपण आपल्याजवळील पुरावे ठेवले नाहीत व कृतीचा आग्रह धरलेला नाही, हेडलीचा कबुजबाबत युनोसमोर मांडलेला नाही, हेडलीने ज्यांची नावे घेतली त्या पाकिस्तानी अधिकाऱ््यांवर आपण अद्याप संशयीत म्हणून आरोप दाखल केलेले नाहीत. मुंबईवरील हल्ल्यात २५ परदेशी नागरिक ठार झाले. त्यामध्ये अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, बेल्जीयम, इटालियन, फ्रान्स, मॉरीशस, मलेशिया, सिंगापूर, थायलंड व जपान या देशातील नागरिकांचा समावेश होता. यापैकी अमेरिका वगळता अन्य देशांशी भारताने अद्याप संपर्क साधलेला नाही. पाकिस्तानच्या कारवायांबाबत जमा केलेले पुरावे या देशांसमोर मांडले जाणे आवश्यक होते. त्याचबरोबर मुंबईत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने पूर्ण मदत करून पाकिस्तानकडून भरभक्कम आर्थिक भरपाई वसूल करण्यासाठी जागतिक पातळीवर आघाडी उघडायला हवी होती असे बी रामन यांनी म्हटले आहे. अशी आघाडी उघडून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीत आणण्याऐवजी करकरे आणि साळसकर यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण करण्याचे उद्योग आपण करीत आहोत. लॉकरबी बॉम्बिंगनंतर लिबियाच्या विरोधात अशी आघाडी उघडण्यात आली होती आणि पाकिस्तान काश्मिरसंदर्भात भारताच्या विरोधात जगात अशीच आघाडी उघडत असते. भारताने या दिशेने काहीही केले नाही.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी नुकत्याच झालेल्या परिषदेत भारतावर तोंडसुख घेतले. पाकिस्तानबरोबर बोलणी करावी की नाही अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली. आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चा कधीच बंद करता येत नाही. पण चर्चा सुरू ठेवताना अधुनमधून आघात करण्याची क्षमताही वाढवावी लागते. ही क्षमता दाखविण्याची इच्छाशक्ती आपल्याकडे नाही. आघात म्हणजे युद्ध नव्हे. आघाताचे अन्य अनेक प्रकार असतात. दहशतवाद जर सरकार पुरस्कृत असेल तर छुपे आघात करणे योग्य आहे, असे रेगन प्रशासनाच्या काळात तयार करण्यात आलेल्या सुरक्षा अहवालातच स्पष्ट म्हटले आहे. अमेरिकेचे त्याकडे लक्ष वेधले पाहिजे. मात्र यासाठी जबर इच्छाशक्तीची गरज असते. अशी इच्छाशक्ती सरकारमध्ये दिसत नाही. पाकिस्तानला बळाची भाषा कळते तशी अमेरिकेला आर्थिक फटक्याची भाषा कळते. आर्थिक हितसंबंधांना धक्का बसला तर अमेरिका अस्वस्थ होते. अमेरिकेला असे फटके लावण्याची धमक सरकारमध्ये नाही. किंबहुना अमेरिकेला काय वाटेल याचा विचार करूनच आपण आपले प्रत्येक पाऊल टाकत असतो. भारताच्या संयमी भूमिकेचे कौतुक होते, पण भारताचा धाक वाटत नाही आणि पाकिस्तान आपले ऐकत नाही.लिबियाबाबत अमेरिकेने जे केले तेच त्या देशाला पाकिस्तानबाबत करायला लावणे आणि पाकिस्तानविरोधात सर्व देशांची आघाडी उभारणे, यात मनमोहनसिंग सरकारच्या मुत्सद्देगिरीची कसोटी आहे.

Monday, July 19, 2010

वैपुल्य आणि वैफल्य

वैपुल्य आणि वैफल्य
Source - loksatta
छाया दातार , शनिवार, १७ जुलै २०१०


‘फास्ट, कन्व्हिनव्हिनियंट आणि चीप’ हे अमेरिकन खाद्यशैलीचे आजचे परवलीचे शब्द झाले आहेत. तेथील ग्राहक या जीवनशैलीचे गुलाम बनले आहेत. अमेरिकेतील विपुलतेमुळेच तेथील माणसे निसर्गनियमांच्या, खाण्यापिण्यासंबंधींच्या पारंपरिक विधिनिषेधांच्या पलीकडे पोहोचली आहेत. आणि आपण काय गमावत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाहीये..दरवेळी अमेरिकेत जाऊन आले की अस्वस्थ व्हायला होते. एका बाजूला तेथील ऐश्वर्य आणि वैपुल्य यामुळे दिपून जायला होते. त्याचबरोबर तेथील ‘सिस्टीम्स’ कशा वैशिष्टय़पूर्ण काम करत असतात आणि न चुकता सुरळीत चालू राहतात, तसेच त्या हाताळण्याचे तेथील नागरिकांचे कसब, याबद्दलही कौतुक पाझरत राहते. दुसऱ्या बाजूला सारखं असंही वाटत राहतं की, ही किती उधळमाधळ चालली आहे. ऊर्जेचा प्रचंड प्रवाह हे सर्व सौंदर्य, ऐश्वर्य आणि विपुलता टिकविण्यासाठी आणि पुनर्निर्माण करण्यासाठी राबविला जात असला पाहिजे. महाजालावर गेले असते तर मला सर्व प्रकारचे स्टॅटिस्टिक्स मिळालेही असते. पण कोणाही सुज्ञ माणसाला हा ऊर्जेचा प्रश्न सांख्यिकी भाषेत न शिरतासुद्धा समजू शकेल. मी माझी काही निरीक्षणेच येथे मांडणार आहे.मला मजा एवढीच वाटते की, हा ऊर्जेचा विषय काढला की अमेरिकेतील भारतीय माणसे पटकन म्हणतात की, तुम्ही नोकरांची ऊर्जा वापरता. एक प्रकारे ही मानवी ऊर्जा वापरणे म्हणजे गुलामी पद्धती स्वीकारणे आहे. आम्ही जास्तीत जास्त ऑटोमॅटिक यंत्रेच वापरतो. अगदी रोजच्या खाण्याचे पदार्थही प्रक्रिया केलेले असतात. त्यामुळे हाताखालच्या नोकरांची गरज लागत नाही. ही गोष्ट खरी आहे की, भारतामध्ये नोकर मंडळी फारच स्वस्तात मिळतात. किमान वेतनाचे कायदे धांब्यावर बसविले जातात आणि स्थलांतरीचे लोंढे येत असल्याने नोकरांचा भरपूर पुरवठा मध्यम व उच्च मध्यमवर्गाच्या पथ्यावर पडतो. परंतु माझ्या मनात आले की, या प्रक्रिया केलेल्या अन्नासाठी, वाहतुकीसाठी, कारखान्यांमध्ये उत्पादनासाठी, त्याच्या आधी शेते, जनावरे यांच्या उत्पादनासाठी किती मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा लागते, याचा विचार या लोकांनी केलाय का? ऊर्जेचा महापूर असल्याशिवाय हे ‘ऑटोमॅटिक’ प्रकरण शक्यच नाही.मोठाली घरे- मॅन्शन्स, माणशी एक गाडी, १६ वर्षांच्या मुलामुलींना गाडी चालवायला परवानगी.. घरे दूरदूर पसरलेली असल्यामुळे शाळा, कॉलेज, सिनेमा, मित्र-मैत्रिणी सर्वासाठी गाडी हवीच. न्यूयॉर्क शहर सोडले तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळजवळ नाहीच आणि परवडणारही नाहीच. अमेरिकेला प्रचंड जागा, अवकाश मिळालेला असल्यामुळे दूर दूर पसरलेली उपनगरे हेच तेथील वैशिष्टय़. कोपऱ्यावरचे पानपट्टीचे दुकान ही संकल्पनाच नाही. युरोपमध्ये काही प्रमाणात अजूनही ती आहे. त्यामुळे गाडीत बसल्याखेरीज ब्रेड, दूध, भाजी या रोजच्या गोष्टीसुद्धा आणता येत नाहीत. त्यामुळे घरातही सर्व गोष्टी फ्रिजमध्ये साठवून ठेवायच्या. प्रचंड मोठे फ्रीज, फूड मॉल्समध्येही सर्व मांस, मासे आणि प्रक्रिया केलेले अन्न फ्रोझन स्थितीत मिळते. याचा अर्थ वाहतूक करतानाही फ्रिझिंग ट्रक वापरले जात असणार आणि हा माल उत्पादन होऊन विक्री होईतोवर सहा सहा महिने टिकत असणार, त्यासाठी लागणारी ऊर्जा. म्हणजे आपण मानवी ऊर्जेचा वापर करतो, तर अमेरिकन अर्थव्यवस्था खनिज ऊर्जा, अणुशक्ती, काही प्रमाणात जलस्रोतावरील ऊर्जा यांचा वापर करते. आणि या प्रचंड ऊर्जेचा वापर करता यावा म्हणून ‘क्लायमेट चेंज’सारख्या महत्त्वाच्या विषयाला त्यांना बगल द्यावीशी वाटते. आपली सौंदर्यशाली अतिश्रीमंती राहणी, ऊर्जेला मध्यनजर ठेवून आखलेली नगररचना, रोजच्या खाण्यापिण्यात असणारी खाद्यशैली (ज्यामध्ये पुन्हा भरपूर ऊर्जेचा वापर) या सर्वाचा जगातील ऊर्जा-साठय़ांवर विशेषत: खनिज तेलांच्या साठय़ांवर कब्जा मिळविण्यासाठी खेळले जाणारे राजकारण आणि युद्धमोहिमा- अशी ही साखळी आहे, हे लक्षात येणे खरे म्हणजे सहजशक्य आहे. अर्थात हे नाते इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक धाग्यांनी व्यामिश्र झाल्यामुळे लपविले जाते, हे कबूल. पण पर्यावरण- प्रश्न सध्या ऐरणीवर येऊन ठेपला असताना सर्वसाधारण समंजस माणसाच्या हे सहज लक्षात येणे शक्य आहे; परंतु बाजारपेठ, विशेषत: साखळी पद्धतीचे मॉल्स व त्यांच्या एकमेकांशी असलेल्या स्पर्धेतून स्वस्त मिळत जाणारे अन्न याची मोहिनी पडणे स्वाभाविक आहे. या वेळी तर असे लक्षात आले की, उच्च-मध्यमवर्गाचे प्रमाण लोकसंख्येत वाढल्यामुळे क्वालिटी फूड, ऑरगॅनिक फूड व विविध देशोदेशींचे फूड यासाठी असलेल्या स्पेशल साखळी मॉल्सचे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच पुन्हा वाहतुकीसाठी लागणारी ऊर्जा वाढली आहे.आजचे पर्यावरणीय प्रश्न हे ऊर्जेच्या चुकीच्या वापराने, अकार्यक्षम पद्धतीच्या वापराने आणि ऊर्जा साधने निर्माण करताना वापराव्या लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पद्धतीमुळे (उदा. समुद्राखालील खोदल्या जाणाऱ्या विहिरींमुळे आणि संभाव्य धोक्यांमुळेच) निर्माण झाले आहेत. यावर उपाय म्हणून अधिक कार्यक्षम पद्धतीने ऊर्जेचा वापर, उदा. हायब्रीड मोटारगाडय़ा वगैरे उत्तरे पुढे येत आहेत, परंतु ऊर्जेची गरज कशी कमी होईल याकडे लक्ष देणारी चर्चा, उदाहरणे जवळजवळ ऐकू आली नाहीत. अमेरिकन्स आणि भारतीय अमेरिकन्स या प्रश्नाकडे पाठच फिरवतात, असे सतत लक्षात येत होते.एक बारीकसे निरीक्षण. अतिशय स्वच्छ, नीटनेटके फूटपाथ, दोन्ही बाजूला हिरवळ, नुकताच रोलर फिरविलेला, काही ठिकाणी खास वसंतासाठी लावलेली फुले उमललेली असा, तेथे आम्ही उतरलो होतो त्या कॉलनीचा परिसर. आलिशान मॅन्शन्सची ही कॉलनी. सकाळी फिरायला बाहेर पडलो. आदल्या दिवशीच छान पाऊस पडून गेला होता. आजही पुन्हा पावसाची चिन्हे होतीच आणि लक्षात आले की, सगळ्यांच्या समोरच्या हिरवळीवर पाण्याची छोटी कारंजी उडत होती. स्प्रिंक्लर्स. मजा वाटली. घरी येऊन विचारले तर लक्षात आले की ही कारंजी टाइमवर लावलेली असतात. कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेले असते. ती ठराविक वेळा उडणारच. पाऊस असो की नसो. थंडीत बर्फ पडतो तेव्हा बंद. बंद करा, चालू करा यासाठी माणूस ठेवणे परवडत नाही. पण वीज जास्त जळली तरी चालते. पाणी तर भरपूरच आहे.दुसरे निरीक्षण- हायलॅन्ड फार्म, होल फूडस्, वर्ल्ड मार्केट अशा जरा उच्च दर्जाच्या फूड मॉल्समध्ये जायचा योग आला. २०० प्रकारचे ताजे ब्रेड, फेटलेल्या मोहरी सॉसचे २० प्रकार, २९० प्रकारचे चीज, डुकराचे मांस, गाईचे मांस, तेही १५-२० प्रकारच्या वेगवेगळ्या प्रक्रियांनी बनविलेले, सॅन्डविचमध्ये घालण्यासाठी पातळ काप, तेही ३-४ प्रकारचे, स्टेक, व्हील.. दिसायला आकर्षक पद्धतीने मांडलेले, वरून चांदी मिठाईला असते तशी. आपल्याकडे टांगलेल्या धडाचे तुकडे शोधून घ्यावे लागतात. येथे एखाद्या नवख्या माणसाला कळणार नाही की हा मांसाहाराचा पदार्थ आहे. सर्व स्वच्छ, शुद्ध. काप कापणारी बाई हातात प्लॅस्टिकचे मोजे घालते. आपण कशालाही हात न लावता चिमटय़ाने पदार्थ काढून घ्यायचे. आणि दुकान किती मोठे? शिवाजी पार्कचे अर्धे मैदान. वातानुकूलित आणि फ्रोझन फूडच्या शीतपेटय़ा. कोणतेही शेल्फ थोडेसुद्धा रिकामे नव्हते. ठोसून भरलेले. एक तर जरा एखादा माल विकला गेला की लगेच तेथे गोडाऊनमधून नवीन माल आणून भरला जात असावा. बहुतेक ठिकाणी ‘ऑरगॅनिक’च्या (सेंद्रिय) पाटय़ा होत्या. मला असं कळलं की, सर्वसाधारण सुपर मार्केट मध्यमवर्गीयांसाठी, स्वस्त अन्न घेण्यासाठी चालविली जातात; परंतु गेल्या काही वर्षांत अधिक जाणीवपूर्वक खरेदी करणारा ग्राहक पुरेशा संख्येने तयार झालाय. म्हणून ही खास साखळी मार्केटस्. म्हणजे थोडक्यात तिथेही श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढलीय. अशा प्रकारच्या मार्केटमध्ये गेल्यावर विविधता व वैफल्य आपल्या पायाशी लोळतंय, म्हणून आनंद होत असे. पण त्याबरोबर छाती दडपूनही जात असे. श्रीकृष्णाने तोंड उघडून विराट जगाचे दर्शन द्यावे आणि आपण अचंबित होऊन पाहावे, तसे. आणि भारतासारख्या देशातील ४० टक्के जनतेने किडा-मुंगीसारखे जीवन जगत राहावे, ही तीव्र विषमता विषण्ण करीत असे. हा ऊर्जेचा महापूर कसा आला आणि हा शाश्वत रहाणार आहे का? सूर्यऊर्जा, वायूऊर्जा हे पर्यायी स्रोत अजून मोठय़ा प्रमाणावर उभे राहत नाहीत. राहिले तरी त्यामध्ये बरीच भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे.हे सगळे अनुभवत, फिरता फिरता एक पुस्तक हाती लागले- ‘ऑम्निव्होरस् डायलेमा’- मायकेल पोलान आणि वाचता वाचता या सगळ्या जादूई वैफल्याची, विशेषत: हारीने लागलेल्या अन्नपदार्थाच्या चळतीच्या मागची पाश्र्वभूमी अधिकाधिक प्रकाशमय होत गेली. मला जाणवणारा अस्वस्थपणा, ऊर्जेचा अपव्यय आणि अन्नाच्या गुणवत्तेबद्दलचा संशय या सर्वाचे निरसन होत गेले. अन्नासारखी जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट, शरीराला ऊर्जा पुरविणारे साधन, हे बाजारपेठेच्या आणि दोन-तीन सर्वात मोठय़ा धान्य कंपन्यांच्या नफ्याच्या विळख्यात कसे सापडले आहे, याची कळ उघडत गेली. या पुस्तकातील दोन-तीन महत्त्वाच्या गोष्टी नोंदवाव्याशा वाटतात.कार्गिल आणि जनरल मिल्स या सगळ्यात मोठय़ा धान्याचा व्यापार करणाऱ्या कंपन्या. त्यांनी सरकारवर दबाव आणून गेल्या काही वर्षांत मक्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले गेले. मका पिकविणाऱ्या शेतकऱ्याला सबसिडी दिली गेली आणि मक्याचा वापर कल्पवृक्षासारखा करून (भरपूर संशोधन करून मक्याचे विघटन करून त्याच्यातून अनेक प्रकारचे ‘फ्रॅक्शन्स’ (केमिकल्स) काढण्यात आली.) मग वेगवेगळ्या स्वरूपात मक्यातून निघालेले हे फ्रॅक्शन्स अन्नपदार्थामध्ये मिसळण्याचे तंत्र सुरू झाले. मुख्य म्हणजे गाई-बैल, डुकरे, कोंबडय़ा या सर्वाना मोठमोठय़ा फीडलॉटमध्ये कोंडून ठेवून २४ तास मका खायला लावण्याची किमया त्यांनी करून दाखविली. माळावर गवत खात फिरणारी ही जात कापण्यासाठी तयार व्हायला ३-४ वर्षे लागायची. ती या नव्या तंत्राने १४ महिन्यांत, तेवढे मांस उत्पादन करायला लागली. इतरही अनेक हार्मोन्सची औषधे वगैरे देत देत जनावरांना धष्टपुष्ट करून दिवसाला शेकडो जनावरे मारण्याची सोय असलेली यंत्रे आणि त्यांना सामावून घेणारे कत्तलखाने बांधले गेले. गाईच्या पोटात अनेक प्रकारचे जिवाणू असतात आणि गवत खाऊन पोटात गेले की ते कामाला लागतात. त्यातूनच गाईंचे आरोग्य चांगले रहाते व प्रतिकारशक्ती निर्माण होते (देशी गाईच्या दुधाचे तूप जास्त गुणकारी असते, कारण त्यांच्या पोटातील जिवाणू चांगले असतात, गवतावर चरतात.) मक्याचा खाद्यपदार्थ म्हणून गरजेहून जास्त वापर झाल्याने या जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाली. मग त्यांना दणादण अ‍ॅन्टिबायोटिक्स खाण्यातूनच देण्याची पद्धत निघाली. जनावराची व्यक्ती म्हणून निगा न होता ‘मास कमोडिटी’च्या पद्धतीने वाढ केल्यामुळे गुणवत्तेकडे लक्ष न देता आजारी, थकलेली, दमलेली जनावरे चांगल्याच्या बरोबरीने कत्तलखान्याकडे नेली जातात आणि सरसकट सगळे मांस मिसळले जाते. ऑटोमॅटिकचा प्रभाव येथेही आहेच- हेच आजचे ‘फास्ट’ फूड.पोलानने पुस्तकात या सर्व ‘औद्योगिक सिस्टीम’चा छानच मागोवा घेतला आहे. परंतु त्याने या कंपन्यांच्या नफेखोरीबरोबरच ग्राहकांनाही दोषी धरलंय. ‘फास्ट, कनव्हिनियंट आणि चीप’ हे आजचे परवलीचे शब्द झाले आहेत. अर्थात भांडवलशाहीनेच जाहिरातींच्या माध्यमातून हे शब्द आणि त्यांच्यातून प्रतीत होणाऱ्या जीवनशैलीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्या जीवनशैलीचे सर्वच ग्राहक, विशेषत: स्त्रिया या गुलाम बनल्या आहेत.झटपट जेवण, सोयीस्कररीत्या बनविलेले, पॅक केलेले आणि स्वस्त अन्न जर मिळाले तर आजच्या धावपळीच्या जगात, पैशाच्या मागे लागलेल्या आणि इतर अनेक इंद्रिय सुखाच्या अधीन होऊ इच्छिणाऱ्या जनतेला आणखी काय हवे? ‘मॅक्डोनाल्ड’ ही स्वस्त अन्न विकणारी पहिली अमेरिकन कंपनी. त्यांचे बर्गर कसे बनतात, त्यात कोणते पदार्थ असतात, ते कुठून येतात, कसे उत्पादन होतात वगैरे काही माहिती असायची गरज ग्राहकांना वाटत नाही. आज अमेरिकेत ‘जाडेपणा’ हा रोग पसरला आहे, याचे एक कारण ज्यात त्यात मका घालून, कॉर्न सिरप घालून भरपूर कबरेदके असलेले अन्नच गरीब माणसांच्या पोटात जाते आहे. मांस खाल्ले तरी ते कबरेदकांवर पोसलेले मांस आहे आणि हा मकासुद्धा रासायनिक खते व पेस्टिसाईड यांच्यावर पोसलेला आहे.अन्न जेव्हा औद्योगिक पद्धतीने तयार केले जाते, तेव्हा पोलान ऊर्जेचा मुद्दा पुन:पुन्हा मांडतो. आज अमेरिकेत एक कॅलरी देणारा खाद्यपदार्थ निर्माण करण्यासाठी १० कॅलरी ऊर्जा- मुख्यत: खनिज तेलापासून मिळणारी वापरली जातेय. माणसाचे श्रम कमीत कमी खर्च होत आहेत. जवळजवळ सर्वच स्त्रिया ऑफिसमध्ये किंवा कारखान्यात काम करतात, पण घरात अन्नपदार्थ निर्माण करण्यात त्यांचाही फारसा हात नसतो आणि पुरुषांचा तर नसतोच नसतो. बाई पुरुषासारखी बनतेय. याउलट पुरुषांनाही घरकाम, विशेषत: खाद्यपदार्थ बनविण्याचे काम करण्यासाठी प्रवृत्त करायला ती असमर्थ ठरली आहे. अमेरिकन शेतकऱ्याने तर हाताने काम करणे केव्हाच सोडून दिलंय. तो कार्गिल आणि जनरल मिल्सचा ‘बाँडेड लेबर’ म्हणूनच काम करतो. कारण कर्ज मिळविणे वगैरे कामात त्याच मदत करतात. शेतावरचा माल त्याच उचलून घेऊन जातात. प्रचंड कारखान्यांसारख्या गुरांच्या कोंडवाडय़ात काम करायला स्थलांतरित मजूरच कमी पगारावर घेतले जातात. एकूणच ‘स्वस्त अन्न’, ‘सोयीस्कर अन्न’, ‘झटपट अन्न’ या तिन्ही आकर्षक संकल्पनांमध्ये गुणवत्तेचीही स्वताई आहे, संख्येला मान आहे आणि माणसाचे आरोग्य, त्याची प्रतिकारशक्ती आणि जीवनशैली प्रचंड प्रमाणात बदलवण्याची ताकद आहे.एक सुविचार आहे- ‘आपण जे खातो, तसे आपण होतो’. पोलानच्या मते- या विपुलतेमुळेच येथील माणसे निसर्गनियमांच्या, खाण्यापिण्यासंबंधींच्या पारंपरिक विधिनिषेधांच्या पलीकडे पोहोचली आहेत आणि आपण काय गमावत आहोत, हे लक्षात यायला अजून वेळ लागणार आहे.म्हणूनच मला भारतीय अमेरिकन बंधू-भगिनींना सांगावेसे वाटते की, आम्ही आमच्या नोकराचाकरांना, मानवी ऊर्जेला जास्त मोल देणे आवश्यक आहे हे कबूल; परंतु तुम्हीही तुमच्या ‘खाद्यशैली’कडे तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. ऊर्जेचा वापर कमी कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. आणि ‘क्लायमेट चेंज’च्या ठरावावर शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे.